सुशांतसिंह राजपूत केसमध्ये नवे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 06:03 AM2020-10-11T06:03:00+5:302020-10-11T06:05:08+5:30
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांना खलनायक ठरवण्यात आले; पण केंद्रीय तपास यंत्रणा ज्या निष्कर्षाप्रत आल्या होत्या, तिथपर्यंत मुंबई पोलीसही पोहोचले होते. मग नवीन काय घडले?
- जमीर काझी
बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूबाबत निर्माण झालेला संशयकल्लोळ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) व्हिसेराच्या फेरतपासणीच्या दिलेल्या अहवालातून दूर झाला आहे. त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून त्याबाबत ‘साप, साप म्हणून भुई थोपटण्याचा आणि महाराष्ट्र व मुंबई पोलिसांच्या बदनामीचा जो लांच्छनास्पद प्रकार मीडियाला हाताशी धरून काही राजकारण्यांकडून सुरू होता त्याला जोरदार चपराक मिळाली आहे. केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग, सक्तवसुली संचालनालय आणि अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग या तीनही केंद्रीय तपास यंत्रणांनी अथक प्रयत्न करून केलेल्या तपासानंतरही जे पुरावे हाती आले, ज्या बाबी स्पष्ट झाल्या आहेत त्याचे वर्णन डोंगर पोखरून उंदीर शोधण्यासारखे केले जात आहे.
एनसीबीने बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींकडे चौकशी करून, सुशांतची गर्लफं्रेड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करून ड्रग्ज कनेक्शन चव्हाट्यावर आणले. मात्र यामध्ये कोणत्याही बड्या स्टारबद्दल कथित व्हाट्ॅसअप चॅटशिवाय दुसरी कोणतीही लिंक सापडलेली नाही की त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात अंमलीपदार्थांचा साठा सापडला नाही. त्यामुळे एनडीपीएस कलमान्वये दाखल केलेला हा खटला कोर्टात कितपत टिकेल, याबाबत तज्ज्ञांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. रियाला जामीन देताना उच्च न्यायालयाने याच बाबी निदर्शनास आणल्या आहेत.
या प्रकरणी सीबीआयचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. तो कधी होईल, की अपूर्णावस्थेत दीर्घकाळ प्रलंबित ठेवला जाईल, याबाबत सध्यातरी काहीही स्पष्टता नाही; परंतु सुशांतची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याची कंडी पिकवून अभासी वातावरण निर्माण केले गेले. मुंबई पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेऊन सोशल मीडियासह विविध माध्यमांद्वारे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रय} केले गेले ते एम्सने सुशांतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचा जो अहवाल दिला, त्यामुळे ते प्रय} पूर्णपणे हाणून पडले आहेत.
वास्तविक तीनही केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्रपणे तपास करून ज्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्या आहेत तिथपर्यंत मुंबई पोलीसही पोहोचले होते. त्यांचा तपास पूर्णपणे व्यावसायिक व योग्य पद्धतीने सुरू होता, त्यात फरक इतकाच होता की मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी पूर्णपणे गुप्तता पाळली जात होती, तर केंद्रीय यंत्रणांकडून त्याबाबतची माहिती कधी उघड तर कधी ‘ऑफ द रेकार्ड’ मीडियापर्यंत पोहोचवली जात होती. त्यामुळे त्याला अमाप प्रसिद्धी मिळत होती. त्याचबरोबर बिहारचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी खाकी वर्दीतील नैतिक बंधने, गोपनीयता या सर्वांची पर्वा न करता मुंबई पोलिसांविरुद्ध मुलाखतींचा सपाटा लावला होता.
14 जूनला सुशांतसिंहने वांद्रय़ातील आपल्या निवासस्थानी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दुपारी समजली. तेव्हापासूनच या घटनेचे गांभीर्य समजून पोलिसांनी शिताफीने कार्यवाही सुरू केली होती. सिलिब्रिटी असल्याने वरिष्ठांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच दिवशी सदर घटनेची नोंद अकस्मित मृत्यू म्हणून केली. कुपर रुग्णालयात पोस्टमार्टेम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. अत्यसंस्कारानंतर 16 जूनला सुशांतचे वडील के. के. सिंह, तिन्ही बहिणी व मेव्हुण्यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यामध्ये त्यांनी आत्महत्या असल्याचे नमूद केले होते. इथपर्यंत सर्व सुरळीतपणे सुरू होते. त्यानंतर मात्र पोलिसांनी अधिक माहितीसाठी बोलाविल्यानंतर कुटुंबीयांनी ते जाणीवपूर्वक टाळले.
आत्महत्येमागील सर्व शक्यता गृहीत धरून त्याबाबत पोलिसांनी त्याची गर्लफ्रेंड रिया, त्याचे मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठाणी, घरातील नोकर, संबंधितांकडे चौकशीचे काम सुरू होते. या घटनेच्या आठ दिवसांपूर्वी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिने जुहू येथील घरी उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचा या घटनेशी संबंध आहे का, याचीही पडताळणी बारकाईने केली जात होती. सुशांतकडे वर्षभरापासून कोणताही मोठय़ा बॅनरचे काम नव्हते. त्यामागे बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार असून, त्याला ठरवून वाळीत टाकण्यात आले होते, अशा चर्चा रंगल्याने बॉलिवूडही काहीसे हादरले होते. याचदरम्यान 25 जुलैला पटना पोलिसांनी सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनुसार सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि त्याचे 15 कोटी रुपये परस्पर हडप केल्याप्रकरणी रिया, तिचे कुटुंबीय, सीए र्शुती मोदीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि येथून प्रकरणाला वेगळे वळण लागले.
राज्यातील सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना मुंबई पोलिसांवर काहीसे दडपण वाढले. मात्र अधिकार्यांनी तपासाबाबत काहीच भाष्य न केल्याने संशयाचे धुके वाढत गेले.
सीबीआयच्या दिल्लीहून आलेल्या ‘जम्बो’ पथकाने सलग तीन-साडेतीन आठवडे सुशांतची हत्या झाली असावी, या अँँगलने तपासाचा धडाका लावत पुरावे शोधण्याचा प्रय} केला. त्याच्या घराचा, सोसायटी व सभोवतालच्या परिसराचा कोपरानकोपरा धुंडाळून काढला. मात्र संशयित व साक्षीदारांच्या तपासातून एकही सबळ पुरावा मिळालेला नाही. मुंबई पोलिसांच्या तपासाबाहेरील एकही बाब त्यांना मिळविता आलेली नाही. त्यामुळे एम्सकडून व्हिसेराची फेरतपासणी करण्यात आली. त्यामध्येही त्याच्या शरीरात विषाचा एक अंशही नसल्यावर शिक्कामोर्तब झाले. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील सात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलने तीन आठवडे व्हिसेरा व अन्य फॉरेन्सिक पुराव्याचा सूक्ष्म अभ्यास करून हा निष्कर्ष नोंदवला आहे, त्याला डावलून तपासाची दिशा बदलणे सीबीआयला शक्य होणार नाही. त्यामुळे आता फार तर सुशांतच्या आत्महत्येसाठी कोणालातरी जबाबदार ठरवित या प्रकरणाची फाइल बंद केली जाण्याची अधिक शक्यता आहे.
सीबीआयने काय केले?
मुंबई पोलिसांनी पूर्ण कौशल्य पणाला लावत 65 दिवस या प्रकरणाचा तपास केला आहे. जवळपास 56 जणांचे सविस्तर जबाब नोंदविले असून, काहींनी सुशांत ड्रग्ज घेत असल्याचा, तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती दिली होती. त्याच्या बहिणींकडून प्रिस्क्रिप्शनशिवाय सुशांतला औषधे दिल्याची बाब समोर आली होती. मात्र पोलिसांनी आत्महत्येचे कारण शोधण्याला प्राधान्य दिल्याने या बाबी उघड केल्या नव्हत्या. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे गेल्याने तपासात कोणताही मोठा गुणात्मक फरक पडलेला नाही, उलट सुशांतसिंहचे वर्तन व व्यसनाची बाब चव्हाट्यावर आल्याचे वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात येते.
jameerkz@gmail.com
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य बातमीदार आहेत.)