मी मुंबईत गेले तेव्हा... १२ मुलींसोबत एकत्र राहिले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 05:55 AM2022-08-28T05:55:23+5:302022-08-28T05:55:37+5:30
मी २०१० साली मुंबईकर झाले. मालिकेच्या सेटवर मी तशी नवखीच होते. यापूर्वी कॅमेऱ्याला कधीच सामोरी गेले नव्हते. अनुभव नव्हता पण आत्मविश्वास होता. हिंमत करून सगळं दडपण झुगारलं.
- मृणाल दुसानीस, अभिनेत्री
नाशिकसारख्या अतिशय शांत, रम्य आणि देखण्या शहरात वाढले. कुठूनही कुठेही आम्ही जास्तीत जास्त १५ मिनिटांत पोहोचतो. मी इथल्या जिनियस नामक नाट्यसंस्थेची सक्रिय सदस्य होते. नाटकातील कामांसोबतच मी पत्रकारितेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमही करत होते आणि त्यावेळच्या स्टार माझा वाहिनीवर उमेदवारीही सुरू होती. अशातच हृषिकेश जोशी एकदा एका शिबिराच्या निमित्ताने भेटले आणि त्यांनी आम्हा सर्व शिबिरार्थींची एका मालिकेच्या ऑडिशनसाठी शिफारस केली. दुर्दैवाने ती मालिका प्रत्यक्षात झालीच नाही, पण मला मात्र त्या अनुभवातून ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही पहिली मालिका मिळाली. मालिका दैनंदिन असल्याने मुंबईतच थांबणं भाग होतं म्हणून मगं मी २०१० साली मुंबईकर झाले. मालिकेच्या सेटवर मी तशी नवखीच होते. यापूर्वी कॅमेऱ्याला कधीच सामोरी गेले नव्हते. अनुभव नव्हता पण आत्मविश्वास होता. हिंमत करून सगळं दडपण झुगारलं.
मला मुंबईची फारशी माहिती नव्हती. आई-बाबांना सोडून दुसऱ्या शहरात आजपर्यंत कधीच राहिले नव्हते. सुखी, सुरक्षित अशा नाशिकच्या वातावरणातून मी एकदम मुंबईसारख्या म्हटलं तर व्यावसायिक शहरात आपलं नशीब आजमावायला आले होते. ओळखीतून मालाडला एका गुजराती आजींकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायची सोय झाली. तिथे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या १२ मुली राहत होतो. सुरुवातीच्या काळात या संख्यांची मला बऱ्यापैकी मदत झाली. मी मुंबईतच नंतर ८ जागा बदलल्या. त्यात गोरेगावच्या सप्रे चाळीत खूप चांगले शेजारी मिळाले होते. सप्रे काका, आठल्ये काकू, भावे काकू मला कधी ‘होम सिक’ होऊच द्यायच्या नाहीत. त्यांच्यामुळे नाशकात माझे आई-बाबा देखील निश्चिंत असायचे.
सुरुवातीला मुंबईतले पत्ते आणि लोकलची स्टेशन्स यांची सांगड घालायला जड जायचं. नंतर मात्र काहीतरी थ्रिलिंग केल्याचा अनुभव येत होता. एकदा मात्र अंधेरीहून मी विरार लोकलमध्ये चढले आणि त्या बायकांनी मला बोरिवलीला उतरूच दिलं नाही. मला दहिसरला उतरून मागे यायला लागलं होतं. मुंबई शहर हे मनाला हुरूप देणारं शहर आहे. मी तर हीच माझी कर्मभूमी मानते. माझं माहेर नाशिक आणि सासर पुणे असलं तरी माझं घर हे मुंबईच आहे आणि मुंबईच राहणार !
- शब्दांकन : तुषार श्रोत्री