मायक्रो सेकंदाने ऑलिम्पिकवारी हुकते तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 06:02 AM2021-07-18T06:02:00+5:302021-07-18T06:05:07+5:30

गेल्या वेळी तेजूने ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीतही तिने उत्तम कामगिरी केली; पण तिचे व दुसऱ्या स्पर्धक खेळाडूचे समान गुण झाले. मायक्रो सेकंदांनी तिची पहिली ऑलिम्पिकवारी हुकली.. पण ती जिद्द हरली नाही. फक्त सराव एके सराव. आजपर्यंत एकाही घरगुती कार्यक्रमाला तिने हजेरी लावलेली नाही. यावेळी मात्र ऑलिम्पकमध्ये तिचे सिलेक्शन झाले आहे.

When the Olympics missed by microseconds.. | मायक्रो सेकंदाने ऑलिम्पिकवारी हुकते तेव्हा..

मायक्रो सेकंदाने ऑलिम्पिकवारी हुकते तेव्हा..

Next
ठळक मुद्देआमची परिस्थिती साधारणच होती. प्रत्येक वेळी बसला पैसे असतीलच असे नव्हते; पण अनुराधा व विजयमाला या तेजूच्या लहान बहिणीही खूप समजूतदार होत्या. तेजूकडे बसभाड्याला पैसे नसले की, या दोघी त्यांचे खाऊचे स्वत:जवळील सुटे पैसे तिला द्यायच्या.

-सुनीता सावंत (कोल्हापूर) 

(तेजस्विनीची आई)

खरे तर तेजूला शूटिंगपेक्षाही बास्केटबॉलची आवड जास्त. शाळेत असताना उत्कृष्ट बास्केटबाॅलपटू म्हणून ती गौरविली गेली होती. आपली राज्य संघात निवड होईल, अशी तिची अपेक्षा होती. काही कारणांमुळे तिची निवड झाली नाही. त्यामुळे तेजू खूपच निराश झाली होती.

नववीत असताना तेजूने एनसीसी घेतली होती. बारावीनंतरही तिने एनसीसी जॉइन केली. त्यावेळी तिच्यातील नेमबाजी पुन्हा उफाळून आली. दुधाळी शूटिंग रेंजवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक व नॅशनल रायफलचे उपाध्यक्ष जयसिंग कुसाळे सर तिला भेटले. शूटिंगमध्ये ती नक्कीच चमकेल असा त्यांना विश्वास होता. मी माझ्या बहिणीची लुना घेऊन तेजूला रोज दुधाळी रेंजवर सोडत असे. काही दिवसांनंतर ती बसने जायला लागली. आमची परिस्थिती साधारणच होती. प्रत्येक वेळी बसला पैसे असतीलच असे नव्हते; पण अनुराधा व विजयमाला या तेजूच्या लहान बहिणीही खूप समजूतदार होत्या. तेजूकडे बसभाड्याला पैसे नसले की, या दोघी त्यांचे खाऊचे स्वत:जवळील सुटे पैसे तिला द्यायच्या.

२००४ साली इस्लामाबाद येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताला तिने सुवर्णपदक मिळवून दिले. यादरम्यान राष्ट्रीय स्पर्धेतही अंजली वेदपाठक व सुमा शिरूर यांना मागे टाकत पाच पदके तिने पटकावली. २००९ म्युनिक विश्वचषक स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात कास्यपदक मिळविले. मुनिकमध्येच २०१० साली ५० मीटर रायफल प्रोन प्रकारातही जागतिक विजेतेपदाला तिने गवसणी घातली. गेल्या वेळी ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीतही तिने उत्तम कामगिरी केली; पण तिचे व दुसऱ्या स्पर्धक खेळाडूचे समान गुण झाले. मायक्रो सेकंदांनी तिची पहिली ऑलिम्पिकवारी हुकली.. पण ती जिद्द हरली नाही. फक्त सराव एके सराव. आजपर्यंत एकाही घरगुती कार्यक्रमाला तिने हजेरी लावलेली नाही.

टोकिओ ऑलिम्पिकसाठी तेजू पात्र ठरली त्यावेळी मी गिरनार परिक्रमेला गेले होते. ३६ कि.मी. चालत जात होते. मोबाइलवर नेटवर्क नव्हते. घरच्यांचा मला फोन लागत नव्हता. यादरम्यान माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा मला फोन आला. त्यांनी माझं अभिनंदन केलं. मी म्हटलं, कशासाठी? त्यावर त्यांनी सांगितलं, अहो, तेजू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय हे तुम्हाला माहीत नाही का?.. तिच्या कामगिरीकडे आता आमचे लक्ष लागले आहे.

शब्दांकन - सचिन भोसले (कोल्हापूर, लोकमत)

फोटो कॅप्शन- आई सुनीता व पती समीर दरेकरसह तेजस्विनी.

Web Title: When the Olympics missed by microseconds..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.