पारावरून पडद्यावर, धूळभरल्या पारावरच्या संथ, ऐसपैस चर्चांची जागा जेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 06:24 PM2017-12-16T18:24:56+5:302017-12-17T06:40:23+5:30

धूळभरल्या पारावरच्या संथ, ऐसपैस चर्चांची जागा जेव्हा चकाकत्या पडद्यावरील चमकदार पोस्टच्या साखळ्या घ्यायला लागतात तेव्हा...

When the space of mercury falls on the screen, the blues of the dusty parrot, the aspacus churches ... | पारावरून पडद्यावर, धूळभरल्या पारावरच्या संथ, ऐसपैस चर्चांची जागा जेव्हा...

पारावरून पडद्यावर, धूळभरल्या पारावरच्या संथ, ऐसपैस चर्चांची जागा जेव्हा...

Next

- विश्राम ढोले

धूळभरल्या पारावरच्या संथ,
ऐसपैस चर्चांची जागा जेव्हा
चकाकत्या पडद्यावरील
चमकदार पोस्टच्या साखळ्या
घ्यायला लागतात तेव्हा...
योर्गेन हबरमास. हे समकालिन जागतिक विचारवंतांमधील एक प्रमुख नाव. लोकशाही आणि समाजातील सार्वजनिक संवाद व्यवहार हा त्यांच्या चिंतनाचा एक प्रमुख विषय. एखाद्या समाजाचे, एखाद्या काळातील सार्वजनिक चर्चेचे विश्व कसे साकारते किंवा बदलते यावर त्या समाजातील जनमताचे आणि राजकारणाचे आरोग्य अवलंबून असते हे त्यांच्या मांडणीचे मुख्य सूत्र. वरकरणी हे सूत्र सोपे वाटत असले तरी हबरमास यांची मांडणी बरीच गुंतागुंतीची आहे. या सार्वजनिक चर्चा कुठे घडतात, त्यात कोणकोण सहभागी होतात, लोक एकमेकांशी कसे बोलतात, कोणकोणत्या विषयांवर बोलतात, त्याच्या बोलण्याला धरून ठेवणारी सामूहिक समज काय आहे, बोलण्यामध्ये विवेक आणि तर्काला किती स्थान आहे वगैरे.. अनेक गोष्टींबद्दल हबरमास खूप खोलवरची मांडणी करतात. त्यादृष्टीने सतराव्या आणि अठराव्या शतकातील युरोमध्ये कॅफे हाउस, सलॉन, रिडिंग क्लब यांच्या माध्यमातून नवे सार्वजनिक चर्चाविश्व कसे उदयाला येत गेले याचे ते विश्लेषण करतात. या नव्या सार्वजनिक चर्चाविश्वामुळेच फ्रान्समध्ये राज्यक्र ांती होऊ शकली, असेही त्यांचे प्रतिपादन आहे.
त्यातील काही सूत्रे आपल्याकडेही लागू होतात. गावोगाव पारांवर आणि चावड्यांवर चालणाºया चर्चा म्हणजे आपल्याकडील सार्वजनिक चर्चाविश्वाचा पारंपरिक आविष्कार. त्याखेरीज आपल्याकडेही अठराव्या आणि एकोणविसाव्या शतकात एक नवे सार्वजनिक चर्चाविश्व आकाराला येत गेले. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज यासारखे विविध समाज, अनेक प्रकारची मंडळे आणि सभा, विचारांच्या प्रसारासाठी चालवलेली नियतकालिके वगैरेंच्या माध्यमातून त्यावेळी अनेक विषयांवर चर्चा झडत गेल्या. चर्चा करण्याचे नवे संकेतही रूढ होत गेले. महाराष्ट्र आणि बंगालमधील प्रबोधन पर्व हे त्या अर्थाने एका नव्या सार्वजनिक चर्चाविश्वाचेही पर्व होते. पुढे जसजशी नवी माध्यमे आणि सार्वजनिक संवादाच्या नव्या जागा येत गेल्या तसतशी नवनवी सार्वजनिक संवादविश्वेही तयार होत गेली. एकमेकांना घडत-बिघडवत राहिली.
हबरमास यांची मांडणी अशी भिन्न सांस्कृतिक संदर्भातही लागू करता येण्यासारखी असली तरी त्यात काही त्रुटीही आहेत. या चर्चाविश्वांमधून कोणाला वगळले जाते, तिथे कोणाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मज्जाव असतो वगैरे मुद्द्यांबाबत हबरमास फार बोलत नाहीत. उदाहरणार्थ- आपल्याकडच्या पारावर किंवा चावड्यांमधून साकारणा-या संवादविश्वामध्ये स्त्रिया आणि दलितांना काहीही स्थान नव्हते. अठराव्या आणि एकोणविसाव्या शतकातील चर्चाविश्वामध्ये त्यांना ते मिळाले खरे; पण जेमतेमच. सार्वजनिक चर्चा कोणत्या माध्यमांतून साकारतात, त्याचे काय परिणाम होतात याकडे झालेले दुर्लक्ष हा मूळ मांडणीतील दुसरा कच्चा दुवा. हबरमास यांनी नंतर व्यावसायिक वर्तमानपत्रे आणि टीव्ही यांतून साकारणाºया संवादविश्वाचे विश्लेषण करून तो दोष दूर करण्याचा प्रयत्न केला खरा. पण माध्यमांमुळे सार्वजनिक संवादविश्व किती आरपार बदलू शकते याचा पुरेसा वेध त्यांनी घेतला नाही, असे त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियातून साकारत असलेल्या सार्वजनिक संवादविश्वाचे खरे वेगळेपण या माध्यमाच्या मुद्द्यातच आहे. दलितांचा, स्त्रियांचा इतकेच नव्हे तर लैंगिक अल्पसंख्यांकाचा लक्षणीय सहभाग हे या सोशल मीडियाच्या चर्चाविश्वाचे एक प्रमुख वैशिष्ट्य. स्वस्तातील फोन, स्वस्तातील डेटापॅक, आपल्या भाषेत व्यक्त होण्यासाठी सोप्या तांत्रिक सुविधा आणि डिजिटल युगात प्रवेश करण्यासाठी एकूणच सरकारी व व्यापारी शक्तींकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे एरवी सार्वजनिक संवादविश्वाच्या गावकुसाबाहेर राहिलेला एक फार मोठा वर्ग लोंढ्यासारखा या नव्या संवादविश्वामध्ये शिरला. तंत्रज्ञानाच्या रेट्याखेरीज आणि क्षमतांखेरीज हे इतक्या प्रमाणावर आणि इतक्या वेगाने घडते ना.
सोशल मीडियाने सार्वजनिक संवादविश्वामध्ये आणलेल्या आरपार बदलांपैकी एक महत्त्वाचा बदल तिथे प्रत्यक्ष घडणाºया संवादाच्या स्वरूपाशी संबंधित आहे. पण, त्याचे वर्णन करण्यासाठी माध्यम तत्त्वज्ञ मार्शल मॅकल्युहन यांची मांडणी अधिक उपयुक्त ठरते. संवादाचे माध्यम बदलले की संवादाचा तर्क, क्षमता आणि शक्यता असे सारेच बदलते. आणि हे एकदा बदलले की, एक नवी मानसिकता घडते आणि त्यातून संस्कृतीचाही पोत आरपार बदलतो असे मॅकल्युहन यांच्या मांडणीचे सूत्र आहे. त्यांच्या मते, लिपी आणि पुस्तकांच्या आधीच्या काळातील समोरासमोरील संवादातून साकारणारी मानसिकता ही आदिवासी मानसिकता होती. ही मानसिकता एकात्म, समूहवादी आणि गूढाला प्राधान्य देणारी होती. लिपीनंतर विशेषत: मुद्रित माध्यमांमुळे तयार झालेली मानसिकता व्यक्तीला, तर्काला, स्वायत्ततेला, विवेक आणि विश्लेषणाला प्राधान्य देणारी. आधुनिकतेची आणि लोकशाहीची बीजेही याच काळात रोवली गेली. त्यामुळे या व्यवस्थांमध्येही याच मूल्यांना प्राधान्य दिले जाते. सिनेमा आणि टीव्हीचे माध्यम आले आणि ही मानसिकता बदलली. सहभाग, भावना, उत्तेजना, वलयांकितता, गूढता ही मूल्ये टीव्ही आणि सिनेमा यासारख्या माध्यमांनी पुन्हा एकदा प्रस्थापित केली. एका अर्थाने मानसिकतेचे नव्या संदर्भात आदिवासीकरण झाले.
अर्थात, पारावरची चर्चा अशी नसते. तिथली चर्चा ही एकमेकांना ओळखणाºया, एकमेकांमध्ये हितसंबंध गुंतलेल्या, एक बºयापैकी सामूहिक समज धारण करणाºया लोकांमधील चर्चा असते. त्याला त्यांच्या त्यांच्या सामाजिक संकेतांचे दृश्य-अदृश्य कोंदण असते. पडद्यावर फेसबुकच्या, व्हॉट्सअ‍ॅपच्या किंवा ट्विटरच्या पारावर चालणाºया चर्चांमध्ये सहभागी होणारे आपण सारे भटके समोरच्यांना कितपत ओळखतो, पडद्यापलीकडे आपली त्यांच्यात आणि त्यांची आपल्यात कितपत गुंतवणूक असते, त्यांच्यात आणि आपल्यात सुसंवादासाठी आवश्यक अशा सहसमजुतीचे- सहमतीचे नव्हे- किती धागे समान असतात, या प्रश्नांची उत्तरे काय येतात यावर सोशल मीडियावरील संवादविश्वाचा पोत अवलंबून आहे. त्याचे एकच एक असे सर्वव्यापक उत्तर देणे अवघड आहे. मात्र अनोळखी व्यक्तींमधील, कमी गुंतवणुकीचा, कमी सामायिक समजेतून साकारणारा, हलक्या सहभागापुरता मर्यादित असणारा, मुख्यत्वे साक्षीभावातून साकारणारा वेगवान, विखुरलेला आणि शतधारांनी वाहणारा संवादप्रवाह असे सोशल मीडियावरील संवादविश्वाचे सर्वसाधारण स्वरूप असते. हबरमास यांनी लोकशाहीसाठी आदर्शवत मानलेल्या अठराव्या एकोणिविसाव्या शतकातील सार्वजनिक चर्चाविश्वापेक्षा हे चर्चाविश्व स्वभावत:च खूप वेगळे आहे.
या चर्चाविश्वाचे आणखी एक खूप मोठे वेगळेपण त्याच्या दृश्यात्मकतेत आहे. मोबाइल आणि संगणकांच्या पडद्यांच्या आश्रयाने अफाट वेगाने वाढतेय ती आपल्या संवादातील दृशात्मकता. काहीतरी सांगणे, काहीतरी समजावून घेणे, व्यक्त होणे, ज्ञान मिळविणे किंवा देणे या साºया गोष्टींवरही आता चित्रांचे आणि दृश्यांचे वर्चस्व निर्माण होत आहे. अगदी टेक्स्ट मेसेजही दोन-चार इमोजींखेरीज पूर्णच होत नाहीत. लिपीच्या टप्प्यापासून समजून घेणे-सांगणे या प्रांतावर शब्दांचे वर्चस्व होते. पण त्यांच्या एकछत्री अमलाला प्रतिमा आणि दृश्यांनी आव्हान दिले आहे. शब्दप्रधानतेने ‘एरा आॅफ रिझन’ (विवेकाचे पर्व) आले असे मानले जाते. या पर्वाने भाषेसोबत येणाºया तर्क, चिकित्सा, अलिप्तता, अमूर्तता, एकरेषीयता अशा मूल्यांना प्राधान्य दिले. पण प्रतिमा भावना, अनुभव, सहभाग, मूर्तता, मुग्धता अशा मूल्यांना प्राधान्य देतात. म्हणूनच ‘एरा आॅफ रिझन’ऐवजी ‘एरा आॅफ इमेज’ येत असल्याची एक जाणीव या नवमाध्यमांच्या डिजिटल संस्कृतीत होत आहे. वस्तुनिष्ठ माहिती आणि ज्ञानाला कमी प्रतिष्ठा देणारे आणि मत, भावना आणि मुग्धतेला प्राधान्य देणारे एक नवे पर्व हळूहळू साकारत आहे. तोच ‘पोस्ट ट्रूथ’- सत्योत्तर काळ! एखादा नेता नेमके काय बोलतो, कोणते मुद्दे वा विचार मांडतो यापेक्षा कसे बोलतो, कसा दिसतो, कसा खिळवून ठेवतो, कसा वलयांकित वाटतो, कसा सहभाग आणि भावनिक गुंतवणूक निर्माण करतो हे आता अधिक महत्त्वाचे ठरत आहे. संवादामध्ये तर्क, वैचारिकता, पल्लेदारपणा, शब्दप्राधान्यता, अलिप्तता, गांभीर्य यापेक्षा दृश्यात्मकता, नाट्यमयता, भावनिकता, चमकदारपणा, विनोद, अल्पाक्षरीता यांना प्राधान्य मिळत आहे. सोशल मीडियावरील चित्रे, व्हिडीओ, इमोजी, स्टीकर्स, विनोदी आणि टवाळखोर पोस्ट्स, तोडलस भावा, आॅस्सम, अमेझिंग, जबरा यासारख्या प्रतिक्रि यांचा सतत कोसळणारा पाऊस बघितला तरी या बदलेल्या संवादविश्वाच्या स्वरूपाची कल्पना येऊ शकते.
हे सारे चांगले की वाईट याचे ठोस वा वस्तुनिष्ठ उत्तर देणे अवघड आहे. कारण ते मुळातच एक मूल्यात्मक मत असेल. ते बाजूला ठेवले तरी एक मात्र नक्की म्हणता येते की सोशल मीडियावरील संवादविश्वामध्ये सहभागी होणारी व्यक्ती आणि त्यातून साकारलेल्या संवादाचे स्वरूप हे सतराव्या-अठराव्या शतकात विकसित झालेल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये गृहीत धरलेली व्यक्ती आणि संवादाच्या स्वरूपापेक्षा खूपच वेगळे आहे. हे वेगळेपण अगदी खोलवरचे आणि व्यवस्थात्मक आहे. त्यातून कोणत्या प्रकारची लोकशाही साकारेल हे सांगणे अवघड आहे; पण जी साकारेल ती सध्याच्या लोकशाहीपेक्षा खूप वेगळी असेल हे मात्र नक्की. कारण लोकशाहीचा मूळ घटक असलेला सार्वजनिक मुक्तसंवाद ज्या अवकाशात घडतो त्या अवकाशाच्या मितीच बदलत आहेत. धूळभरल्या पारावरच्या संथ, ऐसपैस चर्चांची जागा जेव्हा चकाकत्या पडद्यावरील चमकदार पोस्टच्या साखळ्या घ्यायला लागतात तेव्हा फक्त संवादाचे स्वरूपच नव्हे तर संवादाचे अख्खे अवकाशच बदललेले असते. आणि ते  एकदा बदलले की मग लोकशाहीचे अवकाशही बदलते. त्याच एक संक्रमण काळातून आपण जातो आहोत.

अंगठा असलेले भटके
सोशल मीडियामुळे आपण एक नव्या प्रकारचे भटके आणि विमुक्त होत चाललो आहोत. न्यू नोमॅड होत आहोत. मोबाइल किंवा संगणकाच्या पडद्यावरील आभासी विश्व, तिथल्या अनेक प्रकारच्या संवाद जागा आणि इकडे प्रत्यक्ष जग यांच्यात आपली अखंड ये-जा सुरू असते. शरीर एका जागी असले तरी मन आणि संवादाच्या पातळीवर आपण अखंडपणे भटकंती करीत असतो. भटका एका जागी रमत नाही. कोणत्याही एका ठिकाणी त्याची मानसिक गुंतवणूक माफकच असते. पोहचण्यापेक्षा सतत जात राहण्याच्या कृतीला त्याच्या लेखी महत्त्व असते. सतत नव्या जागेचा एक निरु द्देश शोध त्याला खुणावत असतो. आपल्या स्क्रीनवर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर पाहत अंगठ्यानं तासन्तास स्क्रोल करताना आपली मानसिकता यापेक्षा काय वेगळी असते?

Web Title: When the space of mercury falls on the screen, the blues of the dusty parrot, the aspacus churches ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.