पु.ल. देशपांडे - आनंदपुरुषोत्तमाचे टपाल तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 06:30 AM2020-06-21T06:30:00+5:302020-06-21T06:30:02+5:30

अठरा वर्षापूर्वी अचानक एक फोन आला आणि त्याबरोबर एक भाग्ययोग चालून आला! - त्या ‘आनंद-योगा’ची ही गोष्ट!

when there was a postal stamp on Pu. La. Deshpande | पु.ल. देशपांडे - आनंदपुरुषोत्तमाचे टपाल तिकीट

पु.ल. देशपांडे - आनंदपुरुषोत्तमाचे टपाल तिकीट

googlenewsNext
ठळक मुद्देमराठी सारस्वताचा मुकुटमणी असलेल्या त्या आनंदपुरुषोत्तमाच्या सन्मान तिकिटावर मी टिपलेलं त्यांचं प्रकाशचित्र निवडलं जावं

सतीश पाकणीकर 

2002 सालचा मार्च महिना असेल. मला एक फोन आला. पलीकडची व्यक्ती म्हणाली,  ‘मी पी.एम.जी. अनिल जोशी बोलतोय. माझं तुमच्याकडे एक तातडीचं काम आहे. कधी भेटू शकतो आपण?’
मला अनिल जोशी हे नाव कळले होते. पण पी.एम.जी. म्हणजे काय हे कळले नव्हते. अज्ञान प्रकट करायला लागणार होते. तसे मी ते केले. त्यावर ते म्हणाले, ‘मी अनिल जोशी, पोस्टमास्टर जनरल, पुणे , म्हणून नुकताच रुजू झालोय. कधी भेटू या?’
मग मला वाटले की, त्यांच्याकडून राँग नंबर लागलाय. मी तसे म्हटल्यावर ते घाईने म्हणाले, ‘नाही हो. मी भेटल्यावर तुम्हाला सांगतो. फोनवर सर्व सांगता येणार नाही. पण काम महत्त्वाचे आहे आणि तातडीचेही !’ वेळ ठरली संध्याकाळी साडेचारची. ठिकाण लॉ कॉलेज रोडला फिल्म इन्स्टिटय़ूटच्या बाहेर.
बरोबर साडेचारला एक पांढरी अॅम्बॅसिडर गाडी तेथे येऊन पोहोचली. मी अंदाजाने ओळखले. त्यांनीही मला गाडीत बसण्याची खूण केली. मी गाडीत बसल्यावर अनिल जोशी यांनी सांगायला सुरुवात केली, ‘मी रुजू व्हायच्या आधी काही दिवस येथे उत्तर हिंदुस्थानी बाई पीएमजी होत्या. त्यांच्या काळात पु.ल. देशपांडे यांच्यावर टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यांना पुलंविषयी फारशी माहिती नव्हती. त्यांनी परस्पर त्यांच्या एका कनिष्ठ सहका:याला पुलंच्या घरी त्यांचे फोटो आणायला पिटाळले. तो तेथे गेला व त्याने ‘फोटो हवे आहेत’, असे सुनीताबाईंना सांगितले. सुनीताबाईंनी त्याला चार-पाच दिवसांनी या, असे सांगितले. सुनीताबाईंनी मुंबईहून फोटो मागवले. त्या फोटोग्राफरने दोनच फोटो पाठवले होते. एक पु.ल. व विजया मेहता असा. व दुसरा पु.ल. सिगारेट ओढत आहेत असा. ते फोटो घेऊन तो माणूस ऑफिसवर पोहोचला. ते फोटो मग दिल्लीस पाठवले गेले. पण असे फोटो तिकिटासाठी चालणार नव्हते. त्यामुळे ते रिजेक्ट झाले. परत एकदा तीच व्यक्ती सुनीताबाईंच्या समोर पोहोचली. त्याने सरळ त्यांना सांगितले की, ‘तुम्ही दिलेले फोटो रिजेक्ट झालेत नवीन फोटो द्या !’ त्या व्यक्तीचे असे बोलणो ऐकून सुनीताबाई वैतागल्याच. त्या म्हणाल्या,  ‘माझ्याकडे फोटो नाहीत. तुम्ही पुलंवर तिकीट काढूच नका. नाहीतरी तुम्ही माझ्या  नवऱ्याचे तिकीट प्रसिद्ध करणार आणि त्याच्या चेहऱ्यावर परत शिक्का मारणार. त्यापेक्षा तुम्ही तिकीटच काढू नका ना !’ असे म्हणून त्यांनी त्याची बोळवण केली. त्यामुळे तो प्रस्ताव मागे पडला. मी चार्ज घेतल्यावर आधीचे सर्व प्रकल्प बघताना माङया ही गोष्ट लक्षात आली. इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग केवळ माहिती करून न घेतल्याने घडला आहे हे जाणवून मी आता त्याला प्रथम प्राधान्य दिलेले आहे. एक मराठी म्हणून मला अभिमानाने सांगता येईल की,माझ्या  कारकिर्दीत मी पुलंवर तिकीट काढू शकलो. मी नुकतेच एका पुस्तकात तुम्ही काढलेले पुलंचे फोटो पाहिले. मग तुमचा नंबर मिळवला व फोन केला!’
मला वाटलं, म्हणजे आपण फोटो दिले की काम झालं; त्यासाठी इथे असं बोलावण्याचं काय प्रयोजन?- त्यांनी बहुतेक माझा विचार ओळखला असावा. कारण ते लगेचच म्हणाले,     ‘आपण आत्ता येथूनच सुनीताबाईंना भेटायला जाऊ. मी तुमच्याकडून फोटो घेणार आहे हे त्यांना सांगीन. पण त्यांची त्याआधी समजूत काढावी लागेल. म्हणून तुम्ही बरोबर चला!’ मी होकार दिला. 
आम्ही त्यांच्याच गाडीतून पाच मिनिटात ‘मालती-माधव’ येथील त्यांच्या घरी पोहोचलो.  सुनीताबाईंनीच दरवाजा उघडला. मी त्यांना अनिल जोशी यांची ओळख करून दिली. सुनीताबाईंच्या लगेच सगळे लक्षात आले. त्या म्हणाल्या, ‘काùùय हो तुमची माणसं? कसं बोलायचं असतं याचं त्यांना काही शिक्षण दिलेलं नसतं का?’
अनिल जोशी यांनी लगेच त्यांची माफी मागितली. अर्थात सुनीताबाईही लगेचच निवळल्या. म्हणाल्या, ‘आता मी काय करू तुमच्यासाठी?’
ही संधी साधत अनिल जोशी यांनी सुनीताबाईंना फिलाटेलीविषयी इत्थंभूत माहिती द्यायला सुरुवात केली. जगभरात लहानथोर असे करोडो लोक पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद जोपासतात. त्यातून आपल्याला जगभराचा चित्रमय इतिहास पाहायला मिळतो. प्राणि, फळे-फुले, शास्र, कला, उद्योग याबरोबरच जगभरातील महान व्यक्ती, इतिहासकार, कलाकार, शास्रज्ञ, राजनीतिज्ञ यांचे स्मरण आपल्याला पोस्टाच्या तिकिटांवर झालेले दिसते. अशी प्रसिद्ध झालेली तिकिटे जमवण्याच्या छंदास ‘फिलाटेली’ म्हणतात. फिलाटेलिस्ट हा फक्त तिकिटे जमवतो असे नाही तर त्या तिकिटांच्या व त्या अनुषंगाने छापले जाणारे एरोग्राम, पोस्टकार्ड, पत्रके, नोंदणीकृत लिफाफा, मुद्रित लिफाफा, प्रथम दिवस आवरण या सर्वाच्या छपाई, संरचना यामध्येही त्याला रस असतो व या सर्वाचा संग्रहही तो करीत असतो.. हे सगळे सांगत त्यांनी पुलंवरील स्मरणार्थ तिकिटाचे आपल्याला कसे महत्त्व आहे हेही पटवले.
त्यांच्या या सविस्तर कथनाने सुनीताबाईंच्या मनातील आधीची नाराजी नाहीशी झाली. त्या उठल्या. पुलंवरील ‘चित्रमय स्वगत’ हा ग्रंथ जोशी यांना दाखवत म्हणाल्या, ‘याचा काही उपयोग होईल का पहा. यात भाईचे शेकडो फोटो आहेत’.
 जोशी यांनी तो ग्रंथ चाळला व म्हणाले, ‘मी जाता जाता डेक्कन जिमखान्यावरून हा ग्रंथ घेईन!’
अचानकपणो माङयाकडे हात करीत सुनीताबाई म्हणाल्या, ‘अहो, यांनी काढले आहेत की खूप फोटो भाईंचे. यांच्याकडून घेता येतील तुम्हाला!’
जोशी म्हणाले, ‘हो मला माहीत आहे. त्यांना मी सांगणारच आहे!’-  चहापान झाले आणि आम्ही तेथून आनंदात निघालो. मलाही हुश्श झाले होते. 
जोशी यांनी केलेले वर्णन ऐकल्यामुळे मी त्यांना म्हणालो, ‘मी तुम्हाला काही फोटोंच्या प्रिंट्स करून देतोच; पण त्याबरोबर स्टॅम्प, फस्र्ट डे कव्हर व कॅन्सलेशन स्टॅम्पचे डिझाइनही करून पाठवतो. त्याची निवड झाल्यास उत्तमच नाहीतर मला मी काही काम केल्याचे समाधानही  मिळेल!’
आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पुढच्याच आठवडय़ात अनिल जोशी यांना मी त्यांच्या मुख्य पोस्ट ऑफिसमधील कार्यालयात सर्व साहित्य नेऊन दिले. त्यांनी  ‘चित्रमय स्वगत’ व मी दिलेले सर्व साहित्य दिल्लीस पाठवून दिले.
जवळ जवळ दीड महिन्याने मला अनिल जोशी यांचा फोन आला. तारीख होती 6 मे 2002. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले, ‘पाकणीकर तुमचा फोटो पुलंच्या तिकिटासाठी निवडला गेला आहे. त्या तिकिटाचं डिझाइन आजच मला दिल्लीहून आलं आहे. पण तुम्ही आत्ताच ही बातमी कोणाला सांगू नका. पुढच्या महिन्यात 16 जूनला पुण्यातच त्याचं प्रकाशन माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते होणार आहे. निमंत्रण मी देईनच  तुम्हाला !’.  झाले ते सर्व स्वप्नवतच घडले होते.
16 जून 2002. आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या सन्मानार्थ निघणा:या पोस्टाच्या तिकिटाचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात रसिकांनी तुफान गर्दी केली होती. प्रमुख पाहुणो होते पंडित भीमसेन जोशी. ‘बहुविध गुण असणा:या ऋषितुल्य पु.ल. देशपांडे यांच्या सन्मानार्थ त्यांचे टपाल तिकीट काढून कळत न कळत मी पुलंना आपली गुरुदक्षिणा अर्पण केली आहे. ते आम्हाला पुण्यात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात रेडिओ पत्रकारिता हा विषय शिकवण्यास येत असत. हे ऋण फेडण्याची संधी योगायोगाने मी या खात्याचा मंत्री असताना मिळाली हे मी माझं भाग्य समजतो’, अशा भावपूर्ण उद्गारांसह प्रमोद महाजन यांनी ते तिकीट, प्रथम दिवस आवरण व कॅन्सलेशन स्टॅम्प या सर्वाचे प्रकाशन केले. तर भीमसेनजी म्हणाले, ‘गाणो, साहित्य आणि कलांवरील प्रेमामुळे पु.ल.देशपांडे कायम अमरच आहेत!’
पुलंची बहुविविधता दाखवण्यासाठी या तिकिटावर त्यांच्या प्रकाशचित्रसह मागे ‘जोहार मायबाप’मधील त्यांनी साकारलेला चोखामेळा, लेखणी, पुस्तक, रंगमंच, चित्रफीत व त्यांची स्वाक्षरी अशी चित्रे विराजमान आहेत. प्रथम दिवस आवरणावर त्यांच्या ‘बटाटय़ाची चाळ’मधील सहा प्रतिमा तर कॅन्सलेशनच्या खास शिक्क्यात तानपुरा व लेखणी एकाकार झाले आहेत.
कार्यक्रम संपन्न झाला.  सुनीताबाई मात्र येऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे काही मोजक्याच व्यक्तींसह प्रमोद महाजन ‘मालती-माधव’वर पोहोचले. तिकीट व त्याबरोबरचे सर्व साहित्य पाहून सुनीताबाईंना किती आनंद झाला आहे हे त्यांच्या डोळ्यात जमलेले आनंदाश्रूच सांगत होते. अनिल जोशी यांनी श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते मला भारतीय टपाल खात्यातर्फे तिकीट, प्रथम दिवस आवरणावर चिकटवलेले तिकीट, त्यावर उमटवलेला कॅन्सलेशन स्टॅम्प व या तिकिटाची विवरणिका (ब्रोशर) असा एक सुंदर अल्बम भेट म्हणून दिला.
मराठी सारस्वताचा मुकुटमणी असलेल्या त्या आनंदपुरुषोत्तमाच्या सन्मान तिकिटावर मी टिपलेलं त्यांचं प्रकाशचित्र निवडलं जावं व त्यांच्या ऋणातून काही अंशानं का होईना उतराई व्हावं हे त्या नियतीच्याच  मनात होतं ना? आणि आदरणीय सुनीताबाई, पं. भीमसेनजी व प्रमोद महाजन यांच्या स्वाक्षऱ्यासह अमूल्य असा तो तिकीट अल्बम माझ्या संग्रही कायम राहावा हेही त्या नशिबानेच ठरवले असणार नां?


(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

Web Title: when there was a postal stamp on Pu. La. Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.