समुद्राच्या पोटातल्या प्लॅस्टिकचं काय करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:00 AM2018-07-01T03:00:00+5:302018-07-01T03:00:00+5:30
आपण फेकत असलेलं प्लॅस्टिक आणि ते उचलण्याचं प्रमाण याचा मेळ कधीच बसणार नाही. प्लॅस्टिक समुद्रात जातं कोठून हे शोधून थांबवणार नसलो तर हा खेळ चालूच राहील. समुद्र त्याच्या पोटात काहीच ठेवत नाही. तुम्ही टाकलेला कचरा सगळा मुद्देमाल आहे तसा तो परत किना-यावर फेकून देतो. हे चक्र थांबवण्याचा आपण प्रयत्नसुद्धा करत नाही. कचरा टाकायचा, प्लॅस्टिक फेकायचं ते सरळ नाल्यातच,असा आपला बेपर्वा उद्धट व्यवहार!- मग समुद्र तरी तुमचं का ऐकेल? तो सगळा कचरा परत पाठवतो. पाठवणारच! (गेली अनेक वर्षं मुंबईच्या समुद्रकिना-यावर घारीसारखं लक्ष ठेवून असलेल्या प्रदीप पाताडे नावाच्या अवलिया माणसासोबत (कोमट) प्लॅस्टिकबंदीनंतरच्या दुस-या दिवशी)
- ओंकार करंबेळकर
हॅट घातलेला एक दाढीवाला माणूस मुंबईत गिरगाव चौपाटी, जुहू किनारा, कफ परेडजवळच्या कोळीवाड्यात दिसला की समजायचं ते प्रदीप पाताडे आहेत. ५१ वर्षांचा हा माणूस गेली अनेक वर्षं मुंबईच्या समुद्रावर घारीसारखा नजर ठेवून आहे. एकेकाळी गिरगावात राहात असल्यामुळं त्यांचं रोज गिरगाव चौपाटी आणि जवळच्या समुद्रावर फिरणं व्हायचं. आता गिरगावातून बाहेर गेल्यावरही त्यांचं रोज समुद्रावर जाणं चुकलेलं नाही. वॉटर स्पोर्ट्स शिकवणं हे मूळ काम असणा-या प्रदीप पाताडेंच्या सतत समुद्राजवळ राहाण्याने मुंबईच्या किना-याचा अभ्यास चांगलाच झाला आहे. शहरांजवळील समुद्राचे किनारे प्रदूषित झाले आहेत हे आता सगळ्यांना माहिती झालंय. पण पाताडे ते वाचून शांत बसत नाहीत. मुंबईच्या किना-यावर कोठे प्रदूषण होतंय, कोण करतंय याचा ते सतत शोध घेत असतात. तो घेतल्यावर पुढची पायरी म्हणजे तक्रार दाखल करणं. त्यांच्या या तक्रारींमुळे ते प्रसिद्ध आहेत. एखाद्या ठिकाणी जरा विचित्र काही दिसलं की त्याचे फोटो काढून ठेवायचे. वॉर्ड आॅफिसरपासून, प्रदूषण महामंडळापर्यंत सर्वांना गदागदा हलवायचं किंवा थेट आपत्ती व्यवस्थापनाच्या हेल्पलाइनला फोन करून तक्रार नोंदवायची. हे सगळं सोशल मीडियावर टाकून छडा लागेपर्यंत, कारवाई होईपर्यंत हात धुवून संबंधित यंत्रणेच्या मागे लागायचं, हा या माणसाचा सध्याचा खरा उद्योग.
पाताडेंचा हा उद्योग आधीपासून माहिती होताच. प्लस्टिकबंदीनंतर ही बंदी कशी चांगली किंवा वाईट याबाबत लोकांनी फेसबुकवर आपल्या मतांचा आडवा-तिडवा पाऊस पाडलेला. याच काळामध्ये थायलंड, फिलिपाइन्स वगैरे देशांमधील नद्यांवर आता प्लॅस्टिकचे थर साचलेत, काही बेटांवरील पक्ष्यांच्या पोटात फक्त प्लॅस्टिक आढळतं, पक्षी आपल्या पिलांना प्लॅस्टिकचा खाऊ भरवतात, हे सगळं पुष्कळ वाचनात आलेलं. पण बहुतेकवेळा असं पाहिलं की हे बाहेरच्या देशांमध्ये होतं, त्याच्याशी आपला फारसा काही संबंध नाही, असा समज होऊन वर्तमानपत्रं मिटवून ठेवली जातात, इंटरनेटवरच्या साइट्स बंद केल्या जातात.
अलीकडे मात्र अस्वस्थ करणा-या पोस्ट्स आणि लिंक्स फिरू लागल्या आहेत, त्या महासागरांच्या पोटाशी साठत चाललेल्या प्लॅस्टिकच्या डोंगराची वर्णनं करणा-या. खोल समुद्रतळाशी जाऊन हातात अत्याधुनिक कॅमेरे घेऊन केलेलं शूटिंग असलेल्या अनेक शॉर्टफिल्म्स आता इंटरनेटवर बघायला मिळतात. समुद्रात तरंगणा-या माशांच्या झुंडी, कोरल्स आणि इतर सागरी जीवनाला वेढून असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे फास प्रत्यक्ष पडद्यावर हलताना बघताना अस्वस्थ व्हायला होतं.
प्लॅस्टिकबंदीच्या निमित्ताने बाजूच्या आणि विरोधी मतांचं काहूर उठलेलं असताना पाताडेंसारख्या माणसांनी गेली अनेक वर्षं चर्चांच्या भानगडीत न पडता मूकपणाने सुरू ठेवलेलं काम महत्त्वाचं!
प्लॅस्टिक आणि इतर कचरा समुद्रात जाऊच नये, यासाठी गेली अनेक वर्षं हा माणूस अखंड लढतो आहे.
मुंबईच्या समुद्राजवळ अनेक सागरी प्रजाती आश्रयाला येतात, त्यांच्यावर प्रदूषणाचा, प्लॅस्टिकचा नेमका काय परिणाम होतो हे पाताडे सतत सांगतात. दाखवून देतात. त्यासाठी त्यांनी जागरूक नागरिक, तरुण आणि मुलांबरोबर बीच वॉकची आयडिया काढली आहे.
म्हणजे फोनचा स्क्रीन समोर धरून त्यावर उलटसुलट मतं खरडत बसण्यापेक्षा थेट समुद्रावरच जायचं. तिथे काय ते प्रत्यक्षच दिसतं.
भेटायचं ठरवलं.
पाताडे म्हणाले, समुद्रावरच ये. तिथेच भेटू!
भल्या सकाळी गिरगाव चौपाटीवर भेट ठरली.
***
गिरगाव चौपाटीवरची सकाळ. अचानक सगळ्याच बाजूंनी त्यांच्या ओळखीचे हात उंचावू लागले. फिरायला येणा-यागिरगावातल्या गुजराती लोकांपासून तिथल्या कोळी, लाइफगार्डपर्यंत पाताडेंच्या ओळखीच्या माणसांची मोठी रेंज आहे. खरं तर प्लॅस्टिक पाहायला म्हणून सकाळी गिरगाव चौपाटीला गेलो होतो; पण किना-यावर प्लॅस्टिक कोठेच दिसत नव्हतं. ही वाळू एकदम अशी स्वच्छ कशी काय झाली?
‘कारण ती स्वच्छ करण्याच्या आॅर्डर्स आल्यात’ - एक मच्छिमार म्हणाला. जाळ्यातून मासे सोडवणारे लोक प्लॅस्टिकबंदीनंतरच्या गेल्या दोन-चार दिवसांमध्ये काय झालं ते सांगू लागले. प्लॅस्टिकबंदी झाल्यावर एक मोठी कंपनी इथे येऊन गेली होती. त्या कंपनीने किना-यावरच्या सगळ्या लोकांना प्लॅस्टिक विकत घेण्याची आॅफर दिली. स्वच्छ धुतलेले प्लॅस्टिकचे चमचे, बाटल्या, पिशव्या त्या कंपनीने एका किलोला एक डॉलर दर देऊन विकत घेतल्या होत्या. त्यामुळे त्या सर्वांनी अगदी उत्साहाने हे काम केलं. कोणी चार हजार कमावले, कोणी हजार मिळवले असं पाताडेंना लोक सांगत होते.
पाताडे म्हणाले, ‘आपल्याकडे प्लॅस्टिक किंवा समुद्राच्या जवळचा कचरा उचलण्याच्या नावाखाली वाळूही उचलली जाते. त्यामुळे त्याचं वजन वाढतं. आता ही आंतरराष्ट्रीय कंपनी असल्यामुळे साहजिकच त्यांनी धुतलेलंच प्लॅस्टिक विकत घेण्याचा मार्ग पत्करला. पण आपल्याकडे समुद्राजवळचा कचरा उचलण्याची पद्धती शास्त्रशुद्ध नाही. कचरा किंवा प्लॅस्टिक दिसणारे किनारे सरळ खरवडायचे आणि ट्रक भरून डम्पिंग ग्राउण्डला न्यायचे अशी पद्धत आहे. किंवा बहुतांशवेळा ते तसेच ढीग राहातात व परत ते कोणत्यातरी मार्गाने पुन्हा समुद्रातच येतात. या टनांच्या आकडेवारीमुळं भरपूर कचरा उचलला असं वाटलं तरी वाळू किंवा इतर नैसर्गिक पदार्थ उचलले गेल्यामुळे मला ते एकाअर्थी पर्यावरणाचं नुकसानच वाटतं.’
पाताडे एकूणच प्लॅस्टिक उचलण्याच्या पद्धतीवर नाखूश होते. मी त्यांना म्हटलं,
‘अहो, आता मुंबईत अनेक ठिकाणी किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमा चालतात. भरपूर कलाकार त्यात भाग घेतात. सीएसआर अॅक्टिव्हिटीसाठी कंपन्या मदत करतात, हे चांगलंच लक्षण आहे की!’
- तर त्यावर ते म्हणाले, ‘आहे. हे प्रयत्न चांगलेच आहेत. पण ते प्रयत्न वाया जातील अशी भीती वाटते. आपण फेकत असलेलं प्लॅस्टिक आणि ते उचलण्याचं प्रमाण याचा मेळ कधीच बसणार नाही. प्लॅस्टिक समुद्रात जातं कोठून हे शोधून थांबवणार नसलो तर हा खेळ चालूच राहील. समुद्र त्याच्या पोटात काहीच ठेवत नाही. तुम्ही टाकलेला कचरा सगळा मुद्देमाल आहे तसा तो परत किना-यावर फेकून देतो. मुंबईमध्ये हार्बरलाइनच्या दोन्ही बाजूला पाहा. प्लॅस्टिक आणि इतर कचरा साठलेला दिसेल. हा सगळा कचरा पावसाळ्यात त्या गटारींमधून नाल्यांमध्ये येतो आणि पर्यायाने समुद्रामध्ये येतो. नाल्यांमधला कचरा हा तर एक मुंबईतील चर्चेचा आवडीचा विषय आहे. नाल्यांचे वरचे थर प्लॅस्टिकचे दिसायला लागले की, पावसाळ्यापूर्वी ते साफ करा, साफ करा असा आरडाओरडा सुरू होतो. त्यातला काही गाळ बाजूला होतो. कधी बाजूला ठेवलेले कच-याचे ढीग पुन्हा पावसाळ्यात नाल्यातच जातात. हे चक्र थांबवण्याचा आपण प्रयत्नच केला नाही. कचरा टाकायचा, प्लॅस्टिक फेकायचं म्हणजे नाल्यात फेकून देणं असा सोपा उपाय आपण स्वीकारलेला आहे. मग समुद्र तरी तुमचं का ऐकेल. तो सगळा कचरा परत पाठवतो. पाठवणारच!’’
- पाताडे सांगत होते ते सगळं खरंच होतं.
गिरगावात किना-यावर प्लॅस्टिक दिसलं नाही म्हणून आम्ही जुहूच्या किना-यावर जायचं ठरवलं. जाताना पाताडे म्हणाले, आपल्याकडे कचरा वेगळा करण्याकडे अजूनही गांभीर्याने पाहिलं जात नाही. कच-याची वर्गवारी गांभीर्याने होत नाही. समुद्राजवळ गोळा केलेल्या प्लॅस्टिकमध्ये ७५ टक्के वाळूच असते. धारावीत काही ठिकाणी कचरा वेगवेगळा करणारे लोक आहेत. ते अगदी व्यवस्थित प्लॅस्टिकची वर्गवारी करतात. पेनाची, बाटल्यांची टोपणं अगदी रंगानुसार वेगळी काढतात. इतक्या नीटपणे प्लॅस्टिक वेगळं केलं तर पुढे त्याचं काय करायचं याचा निदान विचार तरी करता येईल. त्याचा फक्त कचराच करणार असलात तर हा प्रश्न कधीच सुटणार नाही’ - पाताडेंचं बोलणं ऐकतंच आम्ही जुहूला पोहचलो.
जुहूच्या किना-याची स्थिती गिरगावच्या अगदी उलट होती. संपूर्ण किना-यावर फूट-दोन फूट जाडीचा प्लॅस्टिकचा आणि कसल्या तरी गाळाचा थर समुद्रातून पहाटे वाहून आला होता. पाताडे म्हणाले, आज वटपौर्णिमा आहे, दुपारी १२ वाजता भरती आहे. हा सगळा कचरा पहाटे वाहून आला आहे. आता हळूहळू पुन्हा पाण्यात लोटला जाईल आणि संध्याकाळी पुन्हा वर येईल. हे असंच चालत राहातं इथे!’
आजवर किना-यावर प्लॅस्टिकचा कचरा येतो म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या वाहून येतात असं वाटत होत. पण जुहूचं चित्र भयानक होतं. प्लॅस्टिकचे कदाचित सगळे प्रकार तिथल्या कच-यात वाहून आले होते. कपडे, बाटल्या, चमचे, थर्मोकोल, डबे असा रंगीत थर जवळजवळ अर्धा किलोमीटर भागावर पसरला होता. या रंगीत थराखाली एक गाळासारखा काळा थरही वाहून आला होता. काही ठिकाणी टेकडीसारखे ढीगही तयार झाले होते. कदाचित हे वाहून आल्यावर कोणीतरी तक्रार केली असावी. कारण महानगरपालिका एकदम कामाला लागली होती. जेसीबी मशिन्स आणि डंपर्सनी त्या जागेत गर्दी करून कचरा उचलायला सुरुवात केली होती.
कचरा उचलण्याच्या पद्धतीकडे बोट करून पाताडे म्हणाले, ‘ते पाहा, ही मशिन्स सगळा किनारा खरवडून काढतात. त्यात सगळं प्लॅस्टिक उचललं जात नाहीच; पण त्याऐवजी भरपूर वाळू मात्र उचलली जाते. उचललेल्या कचर्याचं जे वजन ‘दाखवलं’ जातं, त्यात 75 टक्के वाळूच असते!’
गिरगावात कचर्यासाठी चाळण लावलेली आहे त्यामुळे वाळू खाली पडते आणि प्लॅस्टिक तेवढं उचललं जातं. पण इथे जुहूच्या किनार्यावर सगळी घाई-गडबड चालली होती. भरतीची वेळ जवळ येत असल्यामुळे शक्य असेल तितका किनारा भराभर खरवडायची धडपड चालू होती. सगळ्या कच-यातला काहीच भाग उचलणं शक्य होतं. काही लोकांनी त्या कच-यातही नाणी किंवा काही किमती वस्तू सापडतात का ते पाहायला सुरुवात केली होती.
खरं तर जुहू हा र्शीमंत लोकांचा, बॉलिवूड अभिनेत्यांच्या निवासाचा, पंचतारांकित हॉटेलांचा भाग. अनेक हॉटेलं या किना-याला लागून आहेत, तशी ते जाहिरातही करतात. पण किनारे मात्र असे काळवंडलेले! प्लॅस्टिक उचलण्याच्या कामावर लक्ष ठेवणा-या अधिका-याना दर पावसाळ्यात असं प्लॅस्टिक वाहून येतं का असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘हो. प्लॅस्टिक नेहमीच येतं. पण हे काहीतरी वेगळंच आहे. प्लॅस्टिकबरोबर कसला तरी गाळ वाहून आला आहे. त्यामुळे कच-याचे ढीग मोठेमोठे दिसत आहेत. आम्ही असला कचरा कधीच पाहिला नाही.’
काळ्या गाळासह प्लॅस्टिकचा तो सगळा कचरा उचलून मुलूंडला नेण्यात येणार होता.
समुद्राचं पाणी तपकिरी झालं होतंच. त्या काळपट तपकिरी लाटांनी पुन्हा प्लॅस्टिकचे ढीग पोटात ओढून घ्यायला सुरुवात केल्यावर तिथे उभं राहवेना. आम्ही निघालो. लाटांमुळे कच-याचे डोंगर पुन्हा आत जाऊ लागले.
पाताडे सांगत होते, ‘आता प्लॅस्टिक म्हणजे केवळ पिशव्या असं राहिलेलं नाही. या कच-यामध्ये एकदम बारीक तुकडे झालेलं प्लॅस्टिक आहे. या काळपट ढिगामध्ये तेलाचा अंशही दिसून येतोय. त्यामुळेच समुद्राच्या लाटा आणि हा सगळा कचरा तपकिरी काळा झालेला दिसत असावा !’
प्लॅस्टिकचा कचरा वा-याच्या दिशेनुसार सतत वाहात राहातो. या किनार्यावरून त्या किना-यावर फिरत राहातो. जुहूपेक्षा वर्सोवा वगैरे भागात प्लॅस्टिक जास्त वाहून येतं. जुहूच्या किना-यावर पाहिलेलं प्लॅस्टिक धडकी भरवणारं होतं. डोक्यावरती प्रत्येक दोन-तीन मिनिटांना एक हेलिकॉप्टर आणि विमान उडत होतं. त्यातून हा कचरा दिसत नसावाच. खिन्न करण्याच्या पलीकडे नेणारं प्लॅस्टिकचं प्रदूषण आणि कुबट वास असह्य होऊन निघालो तेव्हा पुढच्या काही वर्षांमध्ये या किनार्यांवर साधं फिरणंही मुस्कील होईल असं वाटत होतं.
आणि शहरात मात्र सगळीकडे जन्मोजन्मीची खात्री करणारी वटपौर्णिमा साजरी करण्याची लगबग सुरू होती.
(लेखक ‘लोकमत’च्या ऑनलाइन टीममध्ये उपसंपादक आहेत)
onkark2@gmail.com