कुठे नेऊन ठेवली काँग्रेस?

By admin | Published: October 25, 2014 02:05 PM2014-10-25T14:05:24+5:302014-10-25T14:05:24+5:30

लोकसभेतील काँग्रेस पक्षाचा पराभव त्यांना नैराश्याच्या गर्तेत नेण्यास पुरेसा होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी तर त्यांचा उरलासुरला आत्मविश्‍वासही हिरावून घेतला आहे. स्वत्व हरवून बसलेल्या या पक्षाला पुन्हा उभारी मिळणार तरी कशी?

Where did Congress put it? | कुठे नेऊन ठेवली काँग्रेस?

कुठे नेऊन ठेवली काँग्रेस?

Next

 राजकारण म्हटले, की खुर्चीसाठी रस्सीखेच ही आलीच. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तर ती प्रकर्षाने जाणवली. स्वबळावर लढण्याच्या जोषात सार्‍यांनीच त्रिशंकू अवस्था निर्माण करून ठेवली. राष्ट्रीय राजकारणात स्वत:चे अढळस्थान निर्माण केलेला काँग्रेस पक्ष पराभवानंतर न्यूनगंडाच्या कोशात गेला आहे; तर शिवसेनेचीही सत्तास्थापनेची इच्छा अखेर स्वप्नच ठरली. या राजकीय गदारोळात नक्की काय चुकले? 

 
- हेमंत देसाई
 
हल्लीच्या एका केंद्रात १९७७मध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना जनता पक्ष आणि पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेसवाले दाखवा आणि शंभर रुपये मिळवा’ अशी एक घोषणा तयार केली होती. मतमोजणीत काँग्रेसच्या सर्वच्या सर्व उमेदवारांची पीछेहाट होत असताना त्या प्रतिकूल स्थितीतही या घोषणेला युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिआव्हान दिले. ‘हाँ हाँ हम हैं काँग्रेसी, लाओ सौ रुपये’ अशी प्रतिघोषणा देण्याची हिंमत त्यांनी दाखवली. जनता पक्षाचे व पाठोपाठ चरणसिंहांचे सरकार कोसळल्यावर देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा झाली तेव्हा पक्षाच्या तिजोरीत निधीची चणचण होती. तरीही त्या निवडणुकीत युवक काँग्रेसच्या नेत्यांना किमान शंभर जागा मिळाव्यात, या भूमिकेतून संजय गांधींनी राज्याराज्यांतल्या पक्षातील सुभेदारांना ‘कट टू साइज’ केले. संजय गांधींबद्दल प्रचंड आक्षेप असले, तरी ते अत्यंत आक्रमक नेते होते. इंदिरा गांधी व संजय यांनी त्या काळात ४0 हजार किलोमीटरचा हवाई प्रवास करून देश पालथा घातला. आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या, अशा काळात इंदिरा गांधींनी १९८0मध्ये सत्तेत पुनरागमन केले. आजच्या काँग्रेसमध्ये मात्र तो जोम, ती चैतन्याची सळसळ दिसत नाही.
लोकसभेतील पराभवानंतर पक्ष खचला. पोटनिवडणुकांत भाजपला तडाखे बसल्यामुळे त्याच्या जिवात जीव आला; पण महाराष्ट्र व हरियाणातील पराभवानंतर त्याने जणू मानच टाकली आहे. २00४मध्ये जनतेने नाकारल्यानंतरही भाजपचे महत्त्वाचे नेते प्रमोद महाजन माध्यमांपुढे लगेच आले होते. या वेळच्या पराभवानंतर भूपिंदरसिंग हुडा व पृथ्वीराज चव्हाणांनी पुढे येऊन अडचणीच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे धाडसच दाखवले नाही. ९0 सदस्यांच्या हरियाणात भाजपला ४७, तर काँग्रेसला अवघ्या १५ जागा मिळाल्या. पक्ष तिसर्‍या स्थानावर फेकला गेला. महाराष्ट्रातही काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेली असून, राष्ट्रवादीपेक्षा एक जागा जास्त आली एवढेच काय ते समाधान! एके काळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता. विदर्भाच्या ११ पैकी ५ जिल्ह्यांत या वेळी काँग्रेसचे नामोनिशाण शिल्लक राहिलेले नाही. मराठवाड्यात काँग्रेसला केवळ ९ जागा (मागच्या वेळी १९) मिळाल्या व १0 आमदारांना पराभवाचा धक्का बसला. मराठवाड्यात पक्ष एकजुटीने लढलाच नाही. कोकणात नारायण राणेंना पराभूत करून वस्त्रहरणाचा प्रयोग रंगला. उत्तर महाराष्ट्रात पक्षाला ७ जागा मिळाल्या. पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस चौथ्या स्थानावर फेकला जाऊन, त्याच्या वाट्याला फक्त ९ जागा आल्या. कोल्हापुरात तर त्याला खातेही उघडता आले नाही. मुंबईतल्या जागा १७ वरून ५ वर आल्या. 
महाराष्ट्रात १५ व हरियाणात १0 वर्षे सत्ता भोगल्यानंतर प्रस्थापितांविरुद्धचा कौल अपेक्षितच असला, तरी त्याची तीव्रता अँटमबाँबची आहे. काँग्रेसचा प्रचार पराभूत मानसिकतेतून केल्यासारखा वाटला. काँग्रेसच्या नेत्यांची तोंडे परस्परविरुद्ध दिशेला होती. स्वच्छ प्रतिमेचे पृथ्वीराज चव्हाण हीच जमेची बाजू होती व ते अखेरच्या टप्प्यात अत्यंत आक्रमकपणे विरोधकांवर बरसत होते; पण त्यांची टीका शिवसेना-भाजपपेक्षा राष्ट्रवादीवरच जास्त होती. तसेच, जनतेला नुसता विश्‍वास देऊन चालत नाही; नेतृत्वाबद्दल आकर्षण, प्रेम, आस्था व जिव्हाळाही वाटला पाहिजे. त्या पद्धतीने प्रचार झाला नाही. 
उलट पंप्रधान नरेंद्र मोदींनी निकराने प्रचार केला व त्यांच्या करिष्म्याचे रूपांतर मतांत होईल, यादृष्टीने भाजपची पक्षयंत्रणा राबली. भाजपने महाराष्ट्रात ५00 सभा घेतल्या आणि नमोंनी २७! काँग्रेसच्या सभांपैकी राहुलच्या होत्या फक्त सात.. विविध सामाजिक गट-घटकांच्या आघाड्या आपल्यामागे उभ्या करण्याचे काँग्रेसचे कौशल्य हरवत चालले आहे. काँग्रेसकडे जे राजकीय चातुर्य व व्यवस्थापकीय कौशल्य दिसायचे, ते आता भाजपकडे दिसू लागले आहे.
पक्षाने लोकसभा पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ए. के. अँटोनी समिती नेमली; परंतु त्या अहवालात सोनिया व राहुल गांधींविरुद्ध एकही शब्द नव्हता. मुस्लिमांमधील असुरक्षिततेची भावना जोपासणे, त्यांना वरवरच्या सवलती देऊन वापरून घेणे, हेच धोरण राहिले. सामाजिक समता, नागरिकत्वाचे हक्क/अधिकार, त्यांच्यातील स्थलांतर, शिक्षण व नोकर्‍यांची स्थिती या संदर्भात त्या समाजाचा विचारच केला गेला नाही. काँग्रेसची ब्रँड इक्विटीही राहिलेली नाही. त्यातच आता मुस्लिमांची मते एमआयएमकडे वळू लागली आहेत.
राहुल गांधींनी राजस्थानातील पक्षाच्या चिंतन शिबिरात पंतप्रधानपदासाठी लायक असणारे शंभर तरी नेते आम्ही तयार करू, असा निर्धार व्यक्त केला होता. काय झाले त्याचे? १९९१मध्ये नेतृत्वासाठी शरद पवार व नरसिंह राव यांच्यापैकी एकाची निवड करायची झाल्यास, मी नरसिंह रावांना प्राधान्य देईन, असे संकेत सोनियाजींनी दिले होते. तो राग पवारांनी मनात धरून त्यांचे विदेशी मूळ काढले. मात्र, सोनियाजींनी राष्ट्रवादीसह अनेक छोट्या-मोठय़ा पक्षांना बरोबर घेऊन २00४मध्ये काँग्रेसप्रणीत सरकार आणले. कोलकात्यात काँग्रेसचे ८0वे महाधिवेशन झाले. सोनियाजी तेव्हा म्हणाल्या होत्या, की लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या पक्षाच्या वाट्याला जयपराजय येतच असतात. आपण स्वत:ला विचारायला हवे, की देशातील सामान्य जनांशी, त्यांच्या दैनंदिन संघर्षाशी, आकांक्षांशी आपले पूर्वीसारखे नाते राहिले आहे का? काँग्रेस पक्ष पूर्वी सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक होते. आज मात्र सत्तालोभातून आम आदमीपासून तो दुरावत आहे. राष्ट्रीय ऐक्य, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, आर्थिक विकास, समाजवाद यांचे मोल आपल्याला वाटत नाही. त्याऐवजी तकलादू मुद्दय़ांना आपण महत्त्व देत आहोत. सोनियाजींच्या या भाषणाला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. मात्र, राहुलकडून अद्याप कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत नाही, तेव्हा त्यांनी शंभरापैकी इतर ९९ नेत्यांना तरी पुढे आणले पाहिजे. फक्त प्रियंकाच का? सचिन पायलट वा कुठल्याही घराणेशाहीतून झोतात न आलेल्या हाडाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांतून नेता का घडवला जात नाही? 
उद्या झारखंड व जम्मू-काश्मिरातही काँग्रेसला फटका बसणार आहे. बिहार, उत्तर प्रदेशात काँग्रेसचे अस्तित्व नाही. आज उत्तरेत भाजप रुजला आहेच व भविष्यात पूर्व भारतातही तो घुसणार, हे नक्की.
१९६0च्या दशकात राज्ये गमावल्यावरही दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. आज काँग्रेसच्या हातून राज्येही जात आहेत आणि केंद्रात भाजपचीच सत्ता आहे. अजूनही काँग्रेसला पॅन इंडियन सामाजिक आधार आहे. भाजपचे तरुण नेते तो कमी करण्याचा प्रयत्न करणारच. मोदी विविध विषयांवर बोलतच नाहीत. कारण विकासपुरुषाच्या प्रतिमेवर डाग पडू नये म्हणून. काँग्रेसने प्रचारात नुसताच धर्मनिरपेक्षतेवर भर दिला, तर भाजपचे हिंदुत्वाचे अपील वाढत जाणार. महाराष्ट्राचा विचार केल्यास, मुंबई व राज्याच्या किनारपट्टीचा भाग हा विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे गव्हर्नन्स, पायाभूत सुविधा व गुंतवणूक या विषयांवर काँग्रेसने जोर द्यायला हवा.
सध्या काँग्रेस उत्तरेत हिमाचल प्रदेश व उत्तराखंड, दक्षिणेत कर्नाटक-केरळ व ईशान्य भारतातच उरली आहे. पक्षाची महाराष्ट्रातली मतदानाची टक्केवारी २0 टक्क्यांच्या खाली गेली आहे. अशी घसरण झाल्यावर उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू व प. बंगालमध्ये काँग्रेस पुन्हा उठून उभीच राहू शकलेली नाही. म्हणजे महाराष्ट्र व एकूणच देशातली काँग्रेसची स्थिती किती गंभीर आहे ते लक्षात येईल; पण पक्ष अजून ढिम्मच आहे! उद्या एखाद्या राज्यातील जनतेला भाजपचा कंटाळा आला, तर ती दुसर्‍या पक्षाकडे वळेल. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे फावेल.
म्हणूनच काँग्रेसने वेळीच जागे व्हावे. प्रत्येक निकाल काँग्रेसच्या शिखरस्थ नेतृत्वाची पोकळी अधोरेखित करीत असून, त्याच वेळी एकापाठोपाठ एक पराभवांमुळे पोकळी भरू पाहणारे नेतेही साफ होत आहेत. म्हणजे पक्षात परिवर्तनाची गरज आहे; पण ते करताही येत नाही, अशी गोची आहे. निवडणूक प्रचारात भाजपने काँग्रेसला लाज वाटावी इतका काळा-पांढरा पैसा खर्च केला. त्यामुळे काँग्रेसच्या हत्यारानेच काँग्रेसचा बळी घेण्याचे तंत्र मोदीयुक्त भाजपने अवगत केले आहे. मतपेट्यांचे तंत्र आत्मसात केल्याचा प्रयोग भाजपने हरियाणात करून दाखविला. अँड्रेसिंग इन इक्वॅलिटी इन साउथ एशिया हा शोधनिबंध नुकताच जागतिक बँकेने प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे, की २00४-0५मध्ये भारतातील १६ टक्के जनता मध्यमवर्गात होती. २00९पर्यंत ती २0 टक्क्यांवर गेली. जवळपास एक टक्का गरीब लोक नव्याने मध्यमवर्गात प्रवेश करते झाले. लोकसंख्येतील गरिबांचे प्रमाण कमी झाले. ग्रामीण भागातील रोजगार वाढला तो बिगरशेती व्यवसाय-उद्योगांमुळे. 
खेड्यापाड्यातील बिगरशेती क्षेत्रातील कामगारांचे सरासरी वेतन शेतमजुरांपेक्षा ३0 ते ५0 टक्के जास्त आहे. शेतीतील बेरोजगारांना बिगरशेती व्यवसायात काम मिळाले. आपापल्या गावात हंगामी कामावर पोट भरणार्‍या शेतमजुरांपैकी २९ टक्के व्यक्तींना शहरांत जाऊन कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. वाढत्या नागरीकरणाचा हा परिणाम. आज इतर समाजांतील व्यक्तींइतकीच दलित-आदिवासींचीही वरच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 
समाजाची कूस बदलत आहे. लोकांच्या आकांक्षा खरोखरच वाढत आहेत. म्हणूनच पोथीनिष्ठ डाव्यांप्रमाणे नुसत्या गरिबीच्या विराण्या गाऊन उपयोगाचे नाही. दलित-आदिवासी-मागासांवर फक्त खैराती करणे पुरेसे नाही. स्वबळावर उभे करीत त्यांना स्वप्नपूर्तीची वाट दाखवावी लागेल. राजीव गांधींनी दूरसंचार-संगणक क्रांतीद्वारे व नरसिंह रावांनी उदारीकरणामार्फत मध्यमवर्गाला काँग्रेसजवळ आणले होते. गेल्या काही वर्षांत तो काँग्रेसापासून का दुरावला, याचा विचार केला पाहिजे. शहरातील परिसर स्वच्छता, रोगराईचे निर्मूलन, पिण्याचे पाणी, पादचार्‍यांचे हक्क, झाडांची कत्तल हे विषय काँग्रेस कार्यकर्ते हातात का घेत नाहीत? यशवंतराव चव्हाण साहित्यिक-कलावंतांच्या सहवासात रमत. आज मात्र सुतकी चेहर्‍याच्या काँग्रेसवाल्यांना सांस्कृतिक प्रश्न हाती घेणे म्हणजे मध्यमवर्गीय प्रतिगामित्व वाटत असावे!
लोकांच्या दैनंदिन सुख-दु:खांत सेना-भाजपवाले सहभागी होताना दिसतात. आजकाल काँग्रेस नेते मात्र लोकांना आपले वाटत नाहीत. ते स्थानिक प्रश्नांऐवजी लोकशाही, ऐक्य, स्वातंत्र्य वगैरेंवर गोल गोल बोलतात; पण अपवाद वगळता नागरिकांच्या मदतीला धावून जात नाहीत. मतदानापूर्वी ते कर्णाप्रमाणे उदार होतात व नंतर कार्य-कंजूस. अशा पक्षाने आपला स्वभाव न बदलल्यास लोक त्यापासून मुक्ती शोधणारच.
(लेखक सामाजिक व आर्थिक 
घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Where did Congress put it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.