मंगळावर स्वारी कुणाची?

By admin | Published: May 10, 2014 05:41 PM2014-05-10T17:41:27+5:302014-05-10T17:41:27+5:30

मंगळावर कुणी राहत असेल का, या कुतूहलापासून ते थेट मंगळावर स्वारी करण्यापर्यंत पृथ्वीवासीयांची मजल गेली; पण त्यांच्या स्वारीनंतर काही जीवाणू त्यांच्या समवेत तिथेच राहिले असल्याचा शास्त्रज्ञांना आता दाट संशय वाटू लागला आहे. उद्या मंगळावर वसाहत करायची वेळ आली, तर हेच जीवाणू त्रासदायक ठरतील?.

Who invades Mars? | मंगळावर स्वारी कुणाची?

मंगळावर स्वारी कुणाची?

Next

 डॉ. अनिल लचके

 
मंगळावर कुणी राहत असेल का, या कुतूहलापासून ते थेट मंगळावर स्वारी करण्यापर्यंत पृथ्वीवासीयांची मजल गेली; पण त्यांच्या स्वारीनंतर काही जीवाणू त्यांच्या समवेत तिथेच राहिले असल्याचा शास्त्रज्ञांना आता दाट संशय वाटू लागला आहे. उद्या मंगळावर वसाहत करायची वेळ आली, तर हेच जीवाणू त्रासदायक ठरतील?..
 
 
मंगल या शुभकारक शब्दाऐवजी ‘मंगळ’ असा शब्द कुठं कानावर पडला तर काही लोक उगाचच भांबावून जातात. कारण मंगळ या शब्दात एक अनामिक भीती आहे. पूर्वीपासूनच या ग्रहाचा संबंध क्रौर्य, युद्ध आणि प्रलयाशी जोडला गेला आहे. कदाचित मंगळाच्या तांबूस रंगामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाला भारदस्तपणा प्राप्त झाला असेल. प्रत्यक्षात मंगळ हा एक छोटा ग्रह आहे. साधारण पृथ्वीच्या निम्मा! पृथ्वी आणि मंगळावरचा एक दिवस साधारण २४ तासांचाच आहे. मंगळाचा दिवस केवळ ४१ मिनिटांनी लांबलाय. इतर फरक मात्र बरेच आहेत. आपल्या ग्रहावर सरासरी तापमान १४ अंश सेल्सिअस आहे, तर मंगळावर ते खूप थंड, म्हणजे उणे ६३ अंश सेल्सिअस आहे. तिकडे वातावरणाचा दाब नगण्य आहे. पृथ्वीवर ज्यांचं वजन ६0 किलोग्रॅम त्यांचं मंगळावर केवळ २३ कि.ग्रॅ. भरेल. दुर्बिर्णीच्या साह्याने निरीक्षण केल्यावर मंगळावर कालव्यांसारखे भूभाग दिसून आलेत. साहजिक मंगळावरील ‘वसाहत’ आपल्यापेक्षा अधिक प्रगत मानवाची असावी, असा आपला एकेकाळी ग्रह होता. मंगळाचे चैतन्यस्वरूप लक्षात घेऊन तिथं आपली पावलं उमटली जावीत, किंवा तेथे आपलीही वसाहत असावी, अशी दुर्दम्य आशा मानवाच्या मनात पूर्वीपासूनच घर करून आहे.  तथापि तेथे वनस्पती किंवा प्राणीजीवनासाठी अनुकूल वातावरण नाही. पण तेथे पुरेसे अनुकूल वातावरण निर्माण करता आलं तर? ही समस्या गुंतागुंतीची आहे. तरीही संशोधन केले तर यश मिळू शकेल असं संशोधकांना वाटतं. 
मंगळावरील एकूण परिस्थिती जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत बरीच याने तेथपर्यंत जाऊन पोहोचली आहेत. तेथे जीवसृष्टी आहे का, कोण्या एकेकाळी होती का, तेथे पाणी आहे का, जीवसृष्टीला अत्यावश्यक असणारी मूलद्रव्ये पुरेशी आहेत का, तेथील वातावरणात कोणकोणते वायू आहेत, त्यांचे प्रमाण किती आहे, वनस्पती वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करता येईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी क्युरिऑसिटी आणि ऑपॉच्र्युनिटी नावाची दोन वाहने मंगळावर फिरवण्यात आली. या वाहनांवर विविध उपकरणे बसवलेली असल्यामुळे बरेचसे प्रयोग करण्यात आले. मंगळावरील कोरड्या नद्या आणि सरोवरांचे निरीक्षण करून झाले आहे. २0१४ च्या सुरुवातीलाच नासा या संस्थेने काही निष्कर्ष जाहीर केले आहेत. मंगळावर पण चक्क ऋतू असतात. काही भूभाग तर कोण्या एकेकाळी तेथे जीवसृष्टी असावी असं सुचवतात. मंगळावर कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस आणि सल्फर ही जीवसृष्टीला, मुख्य म्हणजे वनस्पतींना वाढीसाठी लागणारी मूलद्रव्ये आहेत. मंगळावर फिरलेल्या वाहनांनी निदान तेथे सूक्ष्मजीव वाढण्यासाठी पुरेशी साधनसामग्री असल्याचे सूचित केले; पण जीवसृष्टी निश्‍चित होती, असा पुरावा त्यांना मिळाला नाही. 
परग्रहावर जाऊन पोहोचलेल्या अंतराळयानांनी पुष्कळच चांगली कामगिरी केलेली आहे. तरीही आता त्यांच्या विरोधात काही संशोधकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. हे संशोधक परग्रहांवरील जीवसृष्टीचा मागोवा घेत असतात. त्यांच्या मते जी अंतराळयाने मंगळावर आली, त्यांनी त्यांच्या बरोबर पृथ्वीवरील काही जीवजंतूपण बरोबर आणले. त्यातील विशिष्ट जंतू मंगळावरील अत्यंत प्रतिकूल वातावरणात तगून राहिले असणे शक्य आहे. त्यामुळे अशा परग्रहांवर मूळचे जीवजंतू कोणते, याचा शोध घेता येणं मुश्कील आहे. मुळात त्या ग्रहावर जीवसृष्टी होती का हेच सांगता येणार नाही. मंगळावर आता जी याने गेली आहेत, त्यांच्या बरोबर चिकटून काही जंतू आलेले असणार आणि परग्रहांवरील मातीत ते मिसळलेपण गेले असतील. भावी काळात येथे मानवाने वसाहत केलीच तर आधी पोचलेले जंतू त्यांना अपायकारक ठरतील. 
या हरकतीला उत्तर देण्यासाठी काही संशोधक पुढे सरसावले. त्यांच्या मते अंतराळयानाला चिकटलेले जंतू मंगळावरील वातावरणात बिलकूल तग धरू शकणार नाहीत. त्यांचा नाश होईल. त्यामुळे ते परग्रहांवर वाढतील, ही भीती व्यर्थ आहे. अवकाशात पाठवायची याने ही अत्यंत स्वच्छ अवस्थेत ‘वर’ पाठवली जातात. त्यांच्यावर अल्ट्रा-व्हायोलेट (अतिनील) किरणांचा मारा केला जातो. शिवाय त्याला पेरॉक्साइड ‘ट्रीटमेंट’ दिली जाते. परिणामी अंतराळयान हे पुरेसे जंतुविरहित असते. अर्थात ही पद्धत पूर्ण सुरक्षित नाही, हे सिद्ध करण्याचे प्रयत्न जगातील तीन प्रयोगशाळांनी केले असून, ते ३ मे २0१४ रोजी अव्वल दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकात ते प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 
 
काय होते हे प्रयोग? 
बॅंक्टेरिया म्हणजे जीवाणू. हे सहसा बीजाणू बनवत नाहीत. (बुरशी मात्र बीजाणू बनवते. हे बीजाणू अनुकूल परिस्थिती लाभताच वाढीला लागतात). काही जीवाणू मात्र बीजाणू बनवतात. बीजाणू हे प्रतिकूल परिस्थितीत सहज तगून राहतात. बॅंसिलस पुमिलीस (एसएएफआर-0३२) हा जीवाणू (आणि त्याबरोबर येणारे बीजाणू) संशोधकांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) नेले. 
नंतर त्यांना मंगळावर जसे वातावरण आहे, तसे वातावरण एका पेटीत निर्माण करून चक्क १८ महिने ठेवले. आश्‍चर्य म्हणजे त्यातील १0 ते ४0 टक्के जीवाणू सक्षम राहिले. याचा अर्थ एवढाच, की मंगळाच्या प्रतिकूल वातावरणात अशा प्रकारचे जंतू तगून राहतात आणि अनुकूल परिस्थितीत पुन्हा वाढू शकतात. सर्वसामान्य जंतू मात्र अशा प्रतिकूल वातावरणात फार तर ३0 सेकंद जगतात. हा प्रयोग दगडांवर वाढणार्‍या लिथोप्यानस्परमिया या जीवाणूवर केला होता तेव्हा असेच निष्कर्ष मिळाले.  या अशा ‘टफ’ जंतूंवर वैश्‍विक किरणांच्या मार्‍याचा काही विपरीत परिणाम होत नाही, हेही कळले आहे. या प्रयोगांचे श्रेय र्जमन एरोस्पेस सेंटर, कॅलटेक आणि जेट प्रॉपल्जन प्रयोगशाळा या संस्थांना जाते. या प्रयोगांचे निष्कर्ष उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहेत. यापुढे अंतराळात जाणार्‍या यानांना जास्त काळजीपूर्वक जंतुविरहित केले जाईल. यामुळे संभाव्य धोके टाळले जातील. अंतराळ प्रवास आणि परग्रहप्रवास आणि तेथील मुक्काम अधिक सुरक्षित होईल.  
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

Web Title: Who invades Mars?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.