पावसाळी अधिवेशनातील तमाशाला जबाबदार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 05:43 AM2022-08-28T05:43:53+5:302022-08-28T05:47:19+5:30
Maharashtra POlitics: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेली हमरीतुमरी चर्चेचा विषय ठरला आहे.
- भरत गोगावले, गटनेते, शिंदे गट
विधान भवनाच्या पायऱ्यांवर जो काही प्रकार झाला, त्याला पूर्णपणे विरोधक जबाबदार आहेत. कारण त्यांनी गोंधळाला सुरूवात केली नसती तर आम्ही काहीच केले नसते. पहिले कोण बोलले, काय झाले ते बघा. मुळात आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करत असताना त्यांनी तिथे यायला नको होते. विरोधक तीन दिवस पायऱ्यांवर आंदोलन करत होते, तेव्हा आम्ही आंदोलन करायला गेलो का? मग आम्ही आंदोलन करत असताना ते तिथे का आले? त्यामुळेच घडल्या प्रकाराला विरोधकच जबाबदार आहेत. पायऱ्यांवर आम्ही आंदोलन करत नव्हतो. आमच्यावर ‘पन्नास खोक्यां’वरून जी टीका होत होती, त्याला आम्ही जशास तसे उत्तर देत होतो. अशावेळी त्यांनी काहीही केले तर आम्ही बघत बसायचे का?
आमचे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी तिथे यायला हवे होते, आम्ही तिथे दिवसभर बसणार नव्हतो. आमदारांसाठी आचारसंहिता आणणार असतील तर ती सगळ्याच आमदारांना लागू होईल. एकाच गटाला किंवा एका पक्षाला लागू होणार नाही ना? विरोधक जे काही बडबडत आहेत, त्यामुळे हे सगळे घडत आहे. सभागृहातील आचारसंहितेचा आम्ही भंग केलेला नाही. विरोधक चुकीचा दावा करत आहेत.
रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
एक तर सत्तेत असताना आमदारांना आंदोलन करण्याची काय गरज होती? ते कोणा विरोधात आंदोलन करत होते की, राजकीय स्टंट होता? आम्ही सत्तेत असताना आंदोलन केले नाही. लोकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ती जागा खरे तर विरोधकांना आंदोलन करण्यासाठी आहे. शिंदे-भाजप गटाचे १७ ते १८ आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. विरोधक तिथे रोज आंदोलन करतात. त्या दिवशीही आम्ही २० ते २२ आमदार आलो आणि पायऱ्यांवर मागे उभे राहिलो, काही वेळाने आमचे आणखी आमदार आले. जवळपास आमचे ६० आमदार आल्यानंतर जागा नसल्याने त्यातील काही आमदार शिंदे गटाच्या आमदारांच्या पुढे जाऊन उभे राहिले. त्यामुळे कदाचित शिंदे गटातील कुणाचा ‘इगो हर्ट’ झाला असावा.
शेवटी आपण कुठे तरी कमी पडतो, ते काही लोकांना पचत नाही. त्यातील एक आमदार महेश शिंदे पुढे आले. आम्ही काहीच बोललो नाही. पण त्या गर्दीत जात असताना बहुतेक त्यांना कुणाचा तरी धक्का लागला की, काय झाले माहीत नाही. त्यांनी थोडा आक्रमक पावित्रा घेतला. त्यात अमोल मिटकरीही आक्रमक झाले आणि दोघांमध्ये जुंपली. पलीकडून थोडी शिवीगाळ झाली. सभागृहात आमदारांसाठी असलेली आचारसंहिता पाळत नाही, ही एक गोष्ट आणि बाहेरील वर्तनासाठी आचारसंहिता आणावी लागते हे महाराष्ट्राला शोभणारे नाही.
शब्दांकन : दीपक भातुसे