मुलांची ‘शिकार’ होऊ नये, म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 06:00 AM2019-11-17T06:00:00+5:302019-11-17T06:00:04+5:30

नऊ ते दहा वर्षं वयाच्या वयातील मुला-मुलींविषयी मोठय़ा माणसांना लैंगिक आकर्षण वाटणं  किंवा फॅण्टसीज मनात येत राहणं या विकाराला ‘पीडोफिलिया’ म्हणतात,  तर शारीरिक बदलाच्या खाणाखुणा स्पष्ट होऊ लागलेल्या  मुला-मुलांविषयी मोठय़ा माणसांना लैंगिक आकर्षण वाटणं म्हणजे ‘हेबेफिलिया’! - या विकारातून होणारी लैंगिक आक्रमणं मुलांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना आळा बसावा म्हणून आता जनजागृती सुरू झाली आहे. त्याबाबत..

Why adult experiences a primary or exclusive sexual attraction to children? What are the remedies? | मुलांची ‘शिकार’ होऊ नये, म्हणून..

मुलांची ‘शिकार’ होऊ नये, म्हणून..

Next
ठळक मुद्देअर्ध्या वयातल्या मुलांविषयी लैंगिक आकर्षणाच्या विकृतीला पायबंद घालण्याचे प्रयत्न..

- हीनाकौसर खान-पिंजार

लहान वयातील बालकांवर कुठल्याही प्रकारचं लैंगिक आक्रमण झालं, की त्याचा त्यांच्या पुढील आयुष्यावर दीर्घ परिणाम होतो. लहान मुलांचा लैंगिक छळ करणं हा कायद्याने गुन्हा आहे. जगभर यासाठी कायदेकानू आणि शिक्षा ठरवली गेली आहे. लहान बालकांचं बालपण निरोगी आणि सदृढ असायला हवं याबाबत कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारणच नाही. सध्या माध्यमांच्या प्रचार, प्रसारामुळे का होईना, पालक आपल्या मुलांच्या सर्व तर्‍हेच्या तक्रारी जाणून घेण्यात रस घेतात. ते कुणाविषयी काय म्हणताहेत, कुणाविषयी नाखुशी दाखवताहेत, कोण त्यांना कुठल्या कारणाने नकोसे वाटताहेत या सगळ्याची चिकित्सा करतात. किंबहुना मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा करून काही प्रमाणात संशयखोरही होतात. यातूनच मग मुलांना ‘गुड टच, बॅड टच’ शिकवणे, स्पर्शाची भाषा समजावून सांगणे, मोठी माणसं कुठली लैंगिक कृती करण्यास सांगत असतील तर ती न करणे, तसा प्रसंग उद्भवलाच तर पळ कसा काढायचा इत्यादी गोष्टी आपण मुलांना शिकवतोच. या सर्वातून एका अर्थी आपण मोठी माणसं लैंगिक छळातून स्वत:चा बचाव करण्याची जबाबदारी लहान मुलांवरच टाकून देतो. असे प्रसंग टाळण्यासाठी किंवा त्यांचा सामना करण्यासाठी काय करावं लागेल याचा भार बिचार्‍या चिमुरड्यांवरच टाकतो; पण केवळ लहान मुलांवरच ही जबाबदारी टाकण्यापेक्षा अशा प्रकारचं लैंगिक वर्तन करणार्‍या, तशी प्रवृत्ती असणार्‍या मोठय़ा माणसांनाच त्यापासून परावृत्त होण्यास मदत केली तर?.
ही गोष्ट फार आवश्यक आहे, कारण लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण वाटणं हा एकतर्‍हेचा मानसिक विकार आहे.
विशेषत: पौगंडावस्थेच्या आधीच्या वयातील मुला-मुलींविषयी (साधारण नऊ ते दहा वर्षे) मोठय़ा माणसांना लैंगिक आकर्षण वाटणं किंवा फॅण्टसीज मनात येत राहणं या विकाराला वैद्यकीय भाषेत ‘पीडोफिलिया’ असं म्हणतात, तर शारीरिक बदलाच्या खाणाखुणा स्पष्ट होऊ लागलेल्या मुला-मुलांविषयी (साधारण 11 ते 14) मोठय़ा माणसांना लैंगिक आकर्षण व फॅण्टसीज वाटणं याला ‘हेबेफिलिया’ म्हणतात. हे दोन्हीही मानसिक विकारच. ‘बीएसएम 5’ या मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील निदानाचे निकष सांगणार्‍या ग्रंथामध्ये याचा समावेश ‘पॅराफिलिया’ या प्रकरणामध्ये केला आहे.
पीडोफिलिया, हेबेफिलिया असे विकार असणारी माणसं मुलांविषयी कल्पनाचित्नं रंगवतात, सध्याच्या काळात इंटरनेटसारखं माध्यम हाती असल्यानं सतत लहान मुलांचा वापर असलेल्या किंवा त्यांना व्हिक्टीमाइज्ड केलेल्या लैंगिक चित्नफिती पाहतात आणि त्यातून उत्तेजितही होत राहतात. पीडोफिलिया, हेबेफिलिया हा विकार असला तरी अशा व्यक्ती लहान मुलांवर लैंगिक हल्ले करतातच असं नव्हे. बाललैंगिक अत्याचार आणि पीडोफिलिया अगर हेबेफिलिया या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षणाला किंवा उत्तेजनेलाच ‘विकार’ म्हटलं जातं. यातला अत्याचार आणि पीडोफिलियातील भेद आपण लक्षात घेण्याची गरज आहे.
बालकांवर लैंगिक अत्याचार करणारा पीडोफिलिक आहे असं समजून शिक्षा टाळायची का, तर नाही. शेवटी तो गुन्हाच आहे, मात्न तो गुन्हा होण्यापासून अगर मोठय़ांच्या विकारातून बालकांना इजा होण्यापासून वाचवता येईल का, तर ते निश्चितच शक्य आहे. अशाच प्रतिबंधात्मक उपचारांसाठी पुण्यात केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे मागील चार वर्षांपासून काम करत आहे.
सध्या भारतात ही एकमेव संस्था आहे जी पीडोफिलिया विकाराबाबत जनजागृती आणि समुपदेशन करत आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये असणारे हे रिसर्च सेंटर आरोग्य क्षेत्नात संशोधन करणारी स्वयंसेवी संस्था आहे. भारतात हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी र्जमनी येथे पीडोफिलियासंबंधी बरंच काम सुरू झालेलं होतं. मागील दहा-बारा वर्षांपासून तेथील पीडोफिलिक व्यक्तींसोबत बर्लिन येथील श्ॉरिते युनिव्हर्सिटी यशस्वीरीतीने सायकोथेरपी आणि औषधे या स्वरूपात उपचार करीत आहे. 2015 मध्ये र्जमनीच्या श्ॉरिते युनिव्हर्सिटीने केईएम रिसर्च सेंटरसोबत भारतातदेखील हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचे नावच ‘प्रायमरी प्रिव्हेन्शन फॉर चाइल्ड सेक्शुअल व्हायलन्स’ असं आहे. लोकांमध्ये या विकाराविषयी जनजागृती करण्यासाठी, समुपदेशनासाठी ‘बायर इंडिया’ यांच्या सीएसआरमधून निधी उभा केला आहे.
दुर्दैवाने सध्याच्या घडीला हा विकार बरा होत पूर्ण बरा होईल असे उपचार उपलब्ध नाहीत, आयुष्यभर हा मानसिक विकार त्या व्यक्तीसोबतच राहतो, मात्न असं असलं तरी हा विकार नियंत्नणाखाली निश्चितच ठेवता येतो. विशिष्ट पद्धतीने मानसिक समुपदेशनाची ठरावीक मुदतीची थेरेपी घेतल्यास मनात उमटणार्‍या फॅण्टसी, मुलांविषयी वाटणारं आकर्षण नियंत्रित ठेवता येतं, या विकारातून लहान मुलांना इजा होणार नाही याची काळजी घेता येऊ शकते. पीडोफिलिया हा काही नव्याने माहीत झालेला विकार नाही. पीडोफिलिया हा एकतर्‍हेचा पॅराफिलिया म्हणजे मनोलैंगिक विकार आहे याबाबत वैद्यकीय जगाला फार पूर्वीपासूनच ओळख आहे. जगभरात लहान बालकांवरील लैंगिक छळाचं प्रमाण वाढीस लागल्यानंतर बर्लिन येथील श्ॉरिते युनिव्हर्सिटीतल्या सेक्सॉलॉजी अँण्ड सेक्शुअल मेडिसीनचे संचालक प्रोफेसर क्लॉस बेईर यांनी हा विषय आपल्या अजेंड्यावर घेतला. मात्न लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार थांबवायचं तर मोठय़ांच्या विकाराचं रूपांतर विकृतीत होण्यापासून रोखणं ही गोष्ट प्रथम करणं गरजेचं वाटू लागलं.
मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला प्रेमाची आणि योग्य त्या औषधोपचारांची गरज असते हे ध्यानात घेऊन बेईर यांनीच बर्लिन येथे क्लिनिक सुरू केलं. प्रो. बेईर यांना दीर्घकालीन अनुभवातून लक्षात आलं की, जगभरातील लोकसंख्येच्या किमान एक टक्के पुरुष पीडोफिलिया या विकाराने ग्रस्त आहेत. आणि अशा पुरुषांमध्ये त्यांच्या पौगंडावस्थेपासूनच या विकाराची लक्षणं दिसून येतात. प्रो. बेईर यांनी 2005 मध्ये यासंबंधी काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवानंतर पीडोफिलिक व्यक्तींच्या प्रतिबंधात्मक उपचारासंदर्भात मॉडेल तयार झालं आहे. मात्न भारतात तसेच्या तसं ते वापरता येणार नव्हतं. र्जमनीतील सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती, तेथील लोकांमध्ये लैंगिकतेविषयी असलेला मोकळेपणा आणि भारतातील सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती भिन्न आहे. शिवाय आपल्याला लहान मुलांविषयी आकर्षण वाटतं किंवा आपण या विकाराच्या आत-बाहेर आहोत याची जाणीव होऊन पुढं येणं याबाबत भारतीय लोकांच्या प्रतिसादाची खात्नी सुरुवातीला रिसर्च सेंटरलाही नव्हती. 2014-15 या वर्षभरात रिसर्च सेंटरने या प्रकल्पाची गरज तपासून पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं की, भारतातही अशा पद्धतीने पीडोफिलिया असणार्‍या व्यक्तींना प्रतिबंधात्मक सायकोथेरेपी हवी आहे.
यानंतर विविध सायकॉलॉजिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट, पोलीस, समाजसेवक, शासकीय संस्थांतील अधिकारी यांच्यासोबत कार्यशाळा घेऊन प्रथम हा विकार काय आहे याबाबत जनजागरणाचं काम सुरू करण्यात आलं. अद्यापही यासंदर्भातून बसेस, सिनेमागृह, प्रत्यक्ष वस्त्यांमधून जनजागृती करणे, विकारग्रस्त व्यक्तीला स्वत:हून पुढे येण्यासाठीचे वातावरण तयार करण्याचे काम या रिसर्च सेंटरमधून केले जात आहे. हा असा विकार आहे की यात प्रत्यक्ष व्यक्तीलाच आपल्या लैंगिक जाणिवांची नेमकी ओळख होणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याबाबत मौन न बाळगता योग्य उपचार घेण्यसाठी पुढं येण्याची जरूर आहे. 
मोफत समुपदेशन
अनेकदा समाज काय म्हणेल, आपल्या कुटुंबातील लोक काय म्हणतील या दबावाखाली व्यक्ती आपल्या या लैंगिक आकर्षणाबाबत बोलत नाहीत. अशास्थितीत मानसिक खच्चीकरण अधिक होऊ शकते. आपल्या भावनिक-शारीरिक ताणाचा निचरा होऊ शकत नसल्याने निराशा, चिंता आणि एकटेपणादेखील वाढतो. ही अतिशय मूलभूत म्हणावीत अशी लक्षणं असू शकतात. याकडे लक्ष दिले नाही किंवा त्या भावनांवर नियंत्नण मिळविण्याचा प्रयत्न झाला नाही तर मुलांचे लैंगिक शोषण होण्याची किंवा बाललैंगिक चित्नफितींचा वापर होण्याची (चाइल्ड पोर्नोग्राफी) शक्यतादेखील वाढते.
त्यामुळेच रिसर्च सेंटरच्या ‘ट्रबल्ड डिजायर’ या वेबसाइटवर प्रश्नोत्तरे स्वरूपातील एक निदान चाचणी तयार केलेली आहे तसेच 24 तास चालणारा त्यांचा टोल फ्री क्रमांकदेखील आहे. या दोन्ही ऑनलाइन ठिकाणी भेट देणार्‍या व्यक्तीच्या माहितीबाबत गुप्तता ठेवली जाते. स्वत:ची ओळख होण्यासाठी ही चाचणी मदत करते तर टोल फ्री क्र मांकावर समुपदेशनही केले जाते. अर्थात केवळ चाचणी किंवा टोल फ्री क्र मांकावर संपर्क साधणार्‍या सर्व व्यक्ती पीडोफिलियाने ग्रस्तच असतात असं नव्हे. कारण केवळ लहान मुलांचं आकर्षण वाटणं किंवा चाइल्ड पॉर्न पहावंसं वाटणे म्हणजेच पीडोफिलियाचा विकार झाला आहे असं होत नाही. वैद्यकीयदृष्ट्या संशोधित असणार्‍या विविध चाचण्या द्याव्या लागतात. 
निदानात्मक चाचण्या कोणत्या?
ऑनलाइन चाचणीतून व्यक्तीच्या लक्षात येऊ शकते की, लैंगिक प्रेफरन्स कोणता आहे. मात्न पुरेशा स्पष्टतेसाठी सेक्सॉलॉजिस्टसोबत प्रदीर्घ वैद्यकीय मुलाखत आवश्यक असते. अनेक मानसिक, लैंगिक आणि सांस्कृतिक निदानात्मक तपासण्या केल्या जातात. अशा मुलाखतीमध्ये व्यक्तीचा लैंगिक अनुभव, लैंगिक वर्तनाविषयी सखोल आणि सविस्तर माहिती घेतली जाते. काहीवेळा इतर शारीरिक चाचण्या, सवयी (दारू, नशा) याही तपासाव्या लागतात. दारू पिण्याची सवय किंवा रागीटपणा या गोष्टी पीडोफिलिक व्यक्तीच्या हातून गुन्हा घडण्याची जोखीम वाढवत असतात. आजवरच्या संशोधनातून पीडोफिलियाचा विकार बहुतांशकरून पुरुषांतच आढळतो. स्रियांमध्ये हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. बर्लिनमध्ये चालू असलेल्या बाललैंगिक शोषणाच्या प्रतिबंधात्मक प्रकल्पांतर्गत फार थोड्या स्रिया आपण होऊन तपासणीसाठी पुढे आल्या. मात्न त्यात अतिशय नगण्य स्वरूपात पीडोफिलियाचे किंवा हेबेफिलियाचे निदान लागू झाले.
सायको थेरेपीमध्ये नेमकं काय केलं जातं?
या थेरेपीत लैंगिक आरोग्यतज्ज्ञ तसेच मानसोपचारतज्ज्ञ या दोघांचीही गरज असते. मानसिक समुपदेशन, मनाच्या आरोग्यासाठी औषधे तसेच काहीवेळा लैंगिक समस्येसाठीही औषधांचा वापर केला जातो. सर्वप्रथम व्यक्तीच्या लैंगिक प्रेफरन्स व त्याच्या नेमक्या गरजा काय आहेत हे तपासणे. स्वत:ची धोकायदायक परिस्थिती ओळखणे म्हणजे हातून काही गुन्हा घडणार नाही किंवा ते घडण्यास कारणीभूत ठरू शकणार्‍या दारूसारख्या सवयींचा विचार करणं, त्याचं व्यवस्थापन करणं. आपल्या आसपासच्या व्यक्तींशी नातेसंबंध सुधारणं. स्वत:च्या वर्तणुकीवर कायमस्वरूपी नियंत्नण ठेवण्यासाठी अंत:प्रेरणा मजबूत करणं. स्वत:च्या कृतीची किंवा वर्तनाची जबाबदारी घेणं. स्वत:विषयीच्या नकारात्मक विचार आणि भावनांच्या समस्यांवर काम करणं. आपल्या जीवनातील समस्यांशी यशस्वीरीत्या सामना करायला आणि भावनांचं व्यवस्थापन करायला शिकणं आणि त्यातून लैंगिक आवेग नियंत्रित करण्याची क्षमता प्राप्त करणं. लैंगिक गुन्ह्यांपासून दूर राहून जीवनात आवश्यक असलेल्या सामाजिक आणि वैचारिक क्षमतांचा विकास करणं. भविष्यासाठीचा योग्य दृष्टिकोन तयार करणं आणि त्याचा विकास करणं.  अशारीतीनं सायको थेरपीचा वापर केल्यानं त्या त्या व्यक्तींनादेखील आनंदी व निरोगी आयुष्य जगता येतं. पीडोफिलिया, हेबेफिलियाचा विकार असतानाही गुन्हेरहित आयुष्य जगता येऊ शकतं, असा विश्वास या थेरेपींमुळे मिळतो. त्यासाठी सात-आठ महिने प्रदीर्घ उपचार घ्यावे लागतात. मुळात कुणीही आपलं लैंगिक प्रेफरन्स ठरवू शकत नसलं तरीही आपल्या वागणुकीची जबाबदारी आपल्या स्वत:वर असते त्यामुळे तो निरोगी दृष्टिकोन देण्याचं काम इथं केलं जातं. प्रत्यक्ष भेट देऊन उपचार घेऊ शकणार्‍या व्यक्तींसाठी पुणे-मुंबई येथील केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर येथे मानसोपचारतज्ज्ञ व लैंगिक आरोग्य तज्ज्ञांची टीम आहे. 
पीडोफिलिया विकार कशामुळे जडतो?
या विकाराचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यासंबंधी जगभर संशोधन सुरू आहे. लैंगिक आरोग्यतज्ज्ञ मोठय़ा माणसांच्या या विकाराबाबत विचार करताना विविध तर्‍हेच्या घटकांचा विचार करताना दिसतात. जसं की, मेंदूचा विकास, संप्रेरक, चेतातंतूशी संबंधित विकास, बालवयातील नातेसंबंध, आपुलकी संदर्भातले अनुभव, बालवयात झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटना. मात्न नेमकं एक कारण सांगावं इतकी स्पष्टता अद्याप वैद्यकीय संशोधनाला आलेली नाही.
उपचार कोणावर केले जातात?
आपल्या लैंगिक विकाराची जाणीव होऊन जे पुढे येतात त्यांच्यावर केईएम रिसर्च सेंटरमध्ये उपचार केले जातात. आपल्याला ताप-सर्दी झाल्याचं लक्षात आल्यावर आपण जसं डॉक्टरांकडे जातो तसंच. अशापद्धतीने लहान मुलांविषयी प्रौढावस्थेतही कमालीचं आकर्षण वाटणं किंवा उत्तेजित वाटणं या सामान्य भावना नाहीत याची जाणीव ज्याची त्याला होत असते. त्यामुळे स्वत:हून ज्या व्यक्ती या उपचारासाठी पुढे येतात त्यांना त्यांच्या या भावना नियंत्रित ठेवण्यासाठी मदत केली जाते. गुन्हा घडण्याआधीच प्रतिबंधात्मक उपचार केले जातात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने शोषण करणार्‍या गुन्हेगारांवर उपचार केले जात नाहीत.
संशोधनाच्या र्मयादा
बाललैंगिक शोषण करणारे सर्व लोक पीडोफिलियानं किंवा हेबेफिलियानं ग्रस्त नसतात. लहान मुलामुलींबद्दलचं आणि /किंवा नुकत्याच वयात येणार्‍या मुलामुलींबद्दलचं लैंगिक आकर्षण वाटून बाललैंगिक शोषण करणारे लोक आणि प्रौढ व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण वाटूनही मुलांचा वापर करणारे लोक यांच्यात फरक आहे. पीडोफिलिक किंवा हेबेफिलिक लैंगिक प्राधान्य असणारे सगळेच जण मुलांविरुद्ध लैंगिक गैरवर्तनाचे गुन्हे करत नाहीत. तसेच बाललैंगिक चित्नफितीचा/ पोर्नोग्राफीचा वापर केल्यानं मुलांवर लैंगिक अत्याचार करून बघण्याची इच्छा वाढू शकतं ही शक्यता नि:संशयपणे मोजता येणं आजवरच्या संशोधनाला शक्य झालेलं नाही. तरीही, केवळ अशा चित्नफितींचा वापर करणं हादेखील गुन्हाच आहे. बाललैंगिक शोषणाचा तो एक गंभीर प्रकार आहे. ही बाब नीट ध्यानात घेतली गेली तर बाललैंगिक शोषण प्रतिमा निर्माण होऊ नये हादेखील एक उपचाराचा प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकेल.

greenheena@gmail.com                                    
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
वेबसाइट- troubled-desire.com
टोल फ्री क्रमांक- 18001238905
संदर्भ सहाय्य- 
डॉ. लैला गार्डा (केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या संचालिका), 
उज्ज्वल नेने (प्रमुख संशोधक व लैंगिक आरोग्य तज्ज्ञ), 
वर्षा टोळ (प्रकल्प समन्वयक)

Web Title: Why adult experiences a primary or exclusive sexual attraction to children? What are the remedies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.