मी ‘इथे’ का आहे?

By admin | Published: September 2, 2016 04:29 PM2016-09-02T16:29:46+5:302016-09-02T16:29:46+5:30

मी पूर्ण व्यवस्था बदलू शकत नाही, पण ती बदलण्याची मानसिकता ठेवतो. इतक्या साऱ्या मर्यादांचा जाच होतो कधी कधी. रागही येतो व्यवस्थेचा.पण या सर्वांपुढे फिका पडेल असा अध्यापनातला आनंद आहे. खऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये गेल्यावर सगळं जग विसरता आलं पाहिजे! अवर्णनीय असतं ते समाधान आणि त्याची किंमत पैशात मोजता येत नाही.

Why am I here? | मी ‘इथे’ का आहे?

मी ‘इथे’ का आहे?

Next

सगळ्या अडथळ्यांवर मात करत शिक्षणक्षेत्रामध्ये शिरलेल्या एका तरुण शिक्षकाचं मनोगत..

- मुकुंद रामतीर्थकर


पाचव्या इयत्तेमध्ये असेन बहुतेक. वर्गात बाई प्रत्येकाला ‘‘तुला कोण व्हायला आवडेल?’’ असं विचारत होत्या. प्रथेप्रमाणे अनेकांनी डॉक्टर, इंजिनिअर, सैनिक, पायलट अशी उत्तरं दिली. वावगं काही नाही त्यात. पण माझी वेळ आली तेव्हा मी मला ‘मास्तर’ व्हायचंय (बरोबर मास्तरच) असं म्हटल्याचं आठवतं. किंचितसा हंशाही पिकला होता वर्गात तेव्हा. नुकतंच पुलंचं चितळे मास्तर, पिंजरा सिनेमातले मास्तर बघितल्याचा परिणाम असावा तो. पण शिक्षक ही व्यक्ती, ही मूर्ती माझ्यासाठी वलयांकितच राहिली आहे. मला आयुष्यात पुढे जाऊन शिक्षकच व्हायचं होतं. अंतरंगात पेरलेलं उगविण्याचा काळ असावा बहुधा तो. ज्याप्रमाणे कला आणि सृजन हे मूलत:च असावं लागतं आणि आतून बाहेर यावं लागतं, तसंच शिक्षकाचं आहे असं मला वाटतं. शिक्षक निर्माण होत नसतो, तो असावाच लागतो. फार फार तर त्याला घडवता येतं. समोरच्याच्या (बहुतेक वेळेला विद्यार्थ्यांच्या) मनाला वश करून अतिशय सहजतेने ईप्सित ते ज्ञान सढळ हातानं देता यावं लागतं. 
ज्ञानाची रचना होत असतानाच्या प्रक्रि येमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि स्वत: ज्ञान हे भागधारक आहेत आणि ते परस्परपूरक, परस्परकार्यशील आहेत. या तिघांचा विचार एकत्रच करावा लागतो. तो तसा नाही झाला तर सगळा डोलारा कोसळण्याची भीती वाटते. आधी विद्यार्थी (तसा मी अजूनही आहे व पुढेही असेन) आणि आता शिक्षक अशी भूमिका पार पाडताना अनेक गोष्टी मग त्या व्यवस्थेच्या असोत, व्यवहाराच्या असोत किंवा भावना अथवा परिस्थितीच्या असोत नकळत टिपल्या गेल्या आहेत. 
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या स्थानांत, बाकाच्या अलीकडे आणि पलीकडे एवढाच फरक असला तरी हे संक्र मण मोठं आहे. एका मोठ्या, क्लिष्ट अशा प्रशासकीय व्यवस्थेला भेदून (की व्यवस्थेमध्ये तरून?) तिथे पोचावं लागतं. विद्यार्थी-शिक्षक-ज्ञान हे संबंध या टप्प्यापर्यंत परिपक्व पण जटिल झालेले असतात. तिघांनीही आपापल्या भूमिका पक्क्या केलेल्या असतात आणि तिघांमधील प्रत्येकजण उरलेल्या दोघांकडे अपेक्षेनं बघत असतो. कुठल्याही क्षणी कोणाकडूनही अपेक्षाभंग होत असेल तर ती एकूणातच धोक्याची घंटा असते. ज्ञानाच्या अभिसरणाचं काम आपल्याही हातून घडावं, अनेकांच्या घडण्यामध्ये आपलाही सहभाग असावा, माझ्या विषयातील संशोधनकार्यात सहभागी होऊन त्या ज्ञानात भर घालावी, हे सगळं करत असताना माणूस म्हणून स्वत: विकसित होत, राष्ट्रनिर्माणाच्या आणि ज्ञानरचनेच्या प्रक्रि येत छोटासा वाटा द्यावा म्हणून मी शिक्षक झालो. 
उच्च शिक्षणक्षेत्रात शिक्षक येतात ते प्रामुख्याने तीन स्तरातून. एक- परदेशातून शिक्षित होऊन आलेले, भारतातच परंतु अतिशय नामवंत अशा संस्थानांमधून अथवा केंद्रीय वा राज्य विद्यापीठाच्या आवारातील (कॅम्पस) संस्थांमधून आलेले आणि सुदूर, दुर्गम किंवा फारशा न गणलेल्या संस्थांमधून आलेले. या सगळ्यांना राष्ट्रीय स्तरावर शिक्षक म्हणून मान्यता घेण्यासाठी एकाच परीक्षेची (नेट) योजना आहे. आपण सुरुवातीपासून कसे चुकत जातो याचं हे पहिलं उदाहरण. मान्यता मिळविण्यास इच्छुक असणाऱ्यांपैकी योग्य व्यक्ती निवडण्यास आणि त्याचा कल जाणण्यास अशा परीक्षा आवश्यकच आहेत, हे मान्य. नेट या परीक्षेची काठिण्यपातळी, तिचा आवाका, आवश्यक असणारे विषयाचे सखोल ज्ञान हे आजपर्यंत स्थिर आणि सर्वोच्च राहिलं आहे आणि म्हणूनच ती विश्वासार्ह आहे. पण ती देण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक असणारं प्रशिक्षण सर्वांचं सारखं नाही. त्यामुळे ज्ञान देण्याची तीव्र इच्छा असूनही आणि तसे गुण असूनही निव्वळ परिपूर्ण आणि उत्तम प्रशिक्षणाअभावी उमेदवार मागे पडतो. ही दरी भरण्यासाठीच राज्यस्तरीय पात्रता परीक्षांचा (सेट) उगम झाला, आणि तेव्हापासून हा प्रश्न काहीसा सुटण्यास मदत झाली आहे. पात्रता मिळवून शिक्षक म्हणून रु जू झाल्यानंतर सर्व काही आलबेल होतं असं नाही. तो शिक्षक अनुदानित आहे, अंशत: अनुदानित आहे की विना अनुदानित यावर कार्यपद्धती ठरते. 
अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि मूल्यमापन ही शिक्षकांची मूलभूत कामं. नैतिकदृष्ट्या विद्यार्थी व पर्यायाने समाज आणि राष्ट्र घडविणं ही काहीशी अनुस्यूत अशी कर्तव्यं. पण आज शिक्षकांना निवडणुका, जनगणना, विद्यार्थ्यांशी संबंधित इतर काही सर्वेक्षणं यात सहभागी व्हावं लागतं. महाविद्यालय, संस्था, विद्यापीठ अशा वेगवेगळ्या स्तरावरील विविध समित्यांवर काम करावं लागतं. आणि हे सर्व करत असताना वर म्हटलेल्या मूलभूत कर्तव्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आजही सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला की प्राधान्याने शिक्षकभरती थांबविली जाते. वर्षानुवर्षे पदं भरली जात नाहीत. महाविद्यालयं, संस्था यांना पर्यायाने अतिशय तुटपुंज्या मनुष्यबळावर काम चालू ठेवावं लागतं. यातून अतिशय खडतर अशी आव्हानं पार पाडत आपली कर्तव्यं बजावणाऱ्यांचा एक वर्ग जन्माला आला आहे; तो म्हणजे घड्याळी तासिका तत्त्वावर रुजू होणाऱ्यांचा.
आज पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरातील अनेक महाविद्यालयांमधील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थिसंख्या आणि उपलब्ध पूर्णवेळ-पूर्णवेतनधारी अध्यापकसंख्या यांचं गुणोत्तर इतक्या भयानकरीत्या व्यस्त आहे की ते आता स्वत:हून कोसळल्याशिवाय राहणार नाही. घड्याळी तासिकांवर अथवा एकत्रित निश्चित वेतनावर नियुक्त केलेले शिक्षक ज्यामध्ये अनेकजण अर्हताप्राप्त शिक्षक आहेत, नावाजलेले संशोधक विद्यार्थी आहेत त्यांच्याकरवी हे विभाग चालवले जातात. त्यांना दिलं जाणारं वेतन इतकं तुटपुंजं आहे, की ते सांगताना हसावं की रडावं हेच कळत नाही. या सगळ्यामध्ये शिक्षकाचं आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक नुकसान होतंच, पण पर्यायाने विद्यार्थ्यांचंही होतं. परिणामी शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंच्या शैक्षणिक विकासावर गदा येते. शिक्षकाला त्याच्या सेवेचा योग्य तो मोबदला योग्य वेळी, अपेक्षित दीर्घकालीन स्थैर्याच्या हमीसहित मिळत असेल तर तो त्याच्या क्षमतेच्या कित्येक पट कार्य उत्साहाने बजावेल. पण ते स्थैर्य न देता या संपूर्ण व्यवस्थेकडेच अक्षम्य दुर्लक्ष केल्यास विद्यार्थी आणि समाज घडविण्याचं कार्य दृष्टिपथामध्येसुद्धा राहत नाही. 
या व्यवस्थेचा मोठा दुर्गुण म्हणजे तो विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनामध्ये परीक्षेला नको तितकं महत्त्व देतो. पण समांतररीत्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षा देण्याकरिता सक्षम करण्याच्या व्यवस्थेत पळवाटा निर्माण करतो. त्या व्यवस्थेत सुधारणा होणं गरजेचं आहे. आपल्याकडे कायम ब्रेन ड्रेनची भाषा केली जाते. चांगले, प्रतिभावान, हाडाचे शिक्षक परदेशात (बहुतांशी अमेरिकेत) सेवा बजावत असल्याची कुरकुर केली जाते. पण तिथल्या व्यवस्थेमधील ज्ञानरचनेषयीची कमालीची समज लक्षात घेण्याची गरज आहे.
उदाहरणादाखल- अमेरिकेतील विद्यापीठामध्ये (मग ते कितीही वरच्या क्र मांकाचे असो) पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बाहेरील देशातून गेलेल्या कोणालाही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. कारण ती (विद्यापीठे) सखोल प्रशिक्षणावर सुरु वातीस भर देतात. दाखल झालेल्या सर्वांना त्यांच्या पद्धतीने त्यांचा देश, त्यांची मातृसंस्था या सर्वांच्या निरपेक्ष योग्य ते शिकवलं जातं आणि मग त्यांची पात्रता परीक्षा घेतली जाते. मुद्दा आपण त्यांच्यासारखंच झालं पाहिजे असा नसून किमान ती विचारधारा आपण धारण करावी असा आहे.
मी माझा असा स्वतंत्र विचार घेऊन अध्यापन संशोधन क्षेत्रात पुढे काम करू इच्छितो. मी पूर्ण व्यवस्था बदलू शकत नाही पण ती बदलण्याची मानसिकता ठेवतो. इतक्या साऱ्या मर्यादांचा जाच होतो कधी कधी. रागही येतो व्यवस्थेचा. पण या सर्वांपुढे फिका पडेल असा अध्यापनातला आनंद आहे. खऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये गेल्यावर सगळं जग विसरता आलं पाहिजे. अवर्णनीय असतं ते समाधान आणि त्याची किंमत पैशात मोजता येत नाही. 
खरा शिक्षक त्यासाठीच जगत असतो आणि त्यासाठीच त्यानं जगलं पाहिजे. 


(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागात रिसर्च स्टुडंट आणि 
अध्यापन सहयोगी आहेत)

Web Title: Why am I here?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.