वे क्यों चुप है..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 07:01 PM2018-03-25T19:01:55+5:302018-03-25T19:01:55+5:30
जे भाषा जाणतात, ते नेमके मोक्याच्या वेळी, मौनात का जातात असा त्यांचा सवाल होता..
गणेश विसपुते
केदारनाथ सिंह मानवतावादी कवी होते. त्यांच्यात समकालीन कवी दडलेला होता. ते प्रखर प्रागतिक होते; पण त्यांचा स्वर सौम्य होता. माणसाचं भाषेशी असणारं नातं आणि त्यातले पैलू ते सतत शोधत राहिले. ज्यांना बोलता येतं, जे भाषा जाणतात, ते नेमके मोक्याच्या वेळी, मौनात का जातात असा त्यांचा सवाल होता..
आता हा योगायोग वाटतो की केदारजींच्या प्रकाशित झालेल्या शेवटच्या संग्रहातली शेवटची कविता ‘जाऊंगा कहां/रहूंगा यहीं’ ही जाण्याबद्दलची कविता आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ‘जाणे’ हे भाषेतलं सगळ्यात महत्त्वाचं क्रियापद असतं. गमावण्याच्या सगळ्या परी त्या क्रियापदात सामावलेल्या आहेत.
केदारनाथ सिंह यांचं निघून जाणं ही भारतीय साहित्यासाठी शोककारक घटना आहे. चंद्रकांत देवताले, कुंवर नारायण आणि दूधनाथ सिंह यांचं अलीकडे पाठोपाठ निधन होणं हे हिन्दी साहित्यजगतावरचे मोठे आघात आहेत.
केदारजी पन्नासच्या दशकापासून लेखन करत होते आणि एवढ्या दीर्घ काळातल्या कवितेच्या प्रवासात त्यांची कविता अखेरपर्यंत ताजीतवानी, समकालीन आणि बांधीव राहिली. या पाच-सहा दशकातल्या हिंदीतल्या कवींवर सर्वाधिक प्रभाव केदारनाथ सिंह यांचाच आहे.
आज, जेव्हा त्यांच्यासारख्या लोकांची, त्यांच्या कवितेची अधिक गरज आहे असं वाटावं असा काळ आलेला असताना त्यांचं निघून जाणं दु:ख गडद करणारं आहे.
त्यांनीच इशारा देऊन ठेवला होता की..
कठिन दिन आने वाले हैं
बेहद लम्बे और निचाट दिन
जब तुम्हारी साइकिलों से
उम्मीद की जाएगी
वे अपना संतुलन बनायें रखें...
केदारनाथ सिंह यांच्या कवितेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यांना मानवतावादी कवी म्हटलं जातं; परंतु ती त्यांची ओळख अपुरी होईल. त्यांच्या कवितेची सुघड भाषा, तिच्यातली गीतात्म लय, प्रतिमा-रूपकांचा विधानांसारखा वापर, अनुभवांचे साधे सरळ, निर्व्याज प्रतिध्वनी यांमुळे त्यांची कविता थेट आणि सहज संवादी होते.
ते मनानं पूरबिया होते. ‘हिंदी भाषा मी अर्जित केलेली भाषा आहे; पण माझ्यावर भाषिक संस्कार माझ्या भाषेनं-भोजपुरीनं केलेले आहेत. या भाषेत रूपकांचा, वाक्प्रचारांचा, लयींचा, कहाण्यांचा, गीतांचा खजिना आहे. त्यानं मला संपन्न केलेलं आहे’, असं त्यांनी म्हणून ठेवलं आहे.
बलिया जिल्ह्यातल्या चाकियातल्या बालपणातल्या अनुभवांचा खोल ठसा त्यांच्या कवितेवर स्पष्टपणे दिसतो. भाषा बोलींनी बनते, भाषा लोकसंस्कृतीतून येणाऱ्या ऐवजानं समृद्ध बनते हे ते ठामपणे मांडत असत. कारण ग्रामीण परिवेशातले लोकव्यव्यवहार, लोककला आणि लोकभाषेतली बहुमुखी संपन्नता ते जाणून होते. यासाठी ते फणिश्वरनाथ रेणूंना आदर्श मानत. भाषा कशी वापरावी हे कवींनी रेणूंकडून शिकावं, प्रेमचंद आणि नागार्जुन यांच्याकडून शिकावं असं ते म्हणत. बनारस, रोटी का स्वाद या कविता उदाहरणं म्हणून सांगता येतील.
भाषेच्या पातळीवर ते किती सूक्ष्मतेनं, संवेदनशीलतेनं मानवी व्यवहार पाहत हे त्यांच्या कवितेतल्या ओळींमध्ये जागोजाग दिसेल..
तो मैंने भागीरथी से कहा,
माँ, माँ का ख्याल रखना
उसे सिर्फ भोजपुरी आती है..
अशी त्यांच्या कवितेतली एक ओळ आहे. माझी कविता सामान्यांची, त्यांच्या भाषेतली कविता आहे, म्हणून ती जगातल्या सामान्यांचीही आहे असं ते आग्रहपूर्वक मांडत राहिले.
मेरी भाषा के लोग
मेरी सड़क के लोग हैं
सड़क के लोग
सारी दुनिया के लोग
एकीकडे ते निराला-त्रिलोचन यांना गुरु मानत, तर दुसरीकडे परदेशी भाषेतल्या कवींच्या कविताही वाचत असत. मीर आणि गालिब तर ते बनारसच्या दिवसांपासून सतत वाचत होतेच; पण सातत्यानं हिंदीतल्या तरुण कवींच्या संपर्कात असत, त्यांच्या कविता वाचत.
त्यांच्यात एक समकालीन तरुण कवी दडलेला होता. त्यांची कविता ग्रामीण आणि महानगरी जीवनात सहजपणे ये-जा करू शके. ते प्रखर प्रागतिक होते; पण त्यांचा स्वर सौम्य होता. त्यांची कविता समकालीन संस्कृतीची चिकित्सा करीत होती. त्यांची ‘बाघ’ ही दीर्घकविता मुक्तिबोध यांच्या ‘अँधेरे में’इतकीच महत्त्वाची मानली जाते.
‘रोटी का स्वाद’ ही कविता सरळ सरळ आईच्या, बालपणाच्या, खेड्यातल्या घराच्या स्मृतीतली कविता आहे. चुलीवरच्या तव्यावर भाजल्या जाणाºया भाकरीचा खरपूस वास हा थेट तिथून येणारा आहे आणि त्यावरून ते जे कविताविधान रचतात ते कविता म्हणून अपूर्व होऊ शकतं कारण ही टोकं सांधणारी भाषा आणि संवेदनशील जाण त्यांच्याकडे आहे.
एकीकडे त्यांनी आपल्या कवितेतला ग्रामीण परिवेशातल्या पूर्वायुष्यातला जीवरस जिवंत ठेवला, तर दुसरीकडे त्यांनी आधुनिकतेला डोळसपणे स्वीकारलं होतं. त्यात काही गोंधळ त्यांच्या मनात नव्हता. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या मातृभाषेतल्या बोलीला हिंदीत आणून कवितेतलं नवं आधुनिक विधान केलं, तर दुसरीकडे त्यांनी प्रारंभीच्या छंदांकडे असलेला कल आणि लयीचं भान कवितेतून सुटू दिलं नाही.
लय गद्यातही असते आणि लय किंवा छंदाचं भान सुटणं म्हणजे लोकजीवनातला आधार सोडणं आहे, असं ते म्हणत. विख्यात भोजपुरी लोककलाकार भिखारी ठाकूर त्यांचा खूप प्रभाव आपल्यावर आहे असं ते मान्य करीत. माणसाचं भाषेशी असणारं नातं आणि त्यातले पैलू ते सतत शोधत राहिले. ज्यांना बोलता येतं, जे भाषा जाणतात, ते नेमके ऐन मोक्याच्या वेळी, बोलणं आवश्यक असतं तेव्हाच मौनात का जातात, असा त्यांचा सवाल आहे.
बिजली चमकी, पानी गिरने का डर है
वे क्यों भागे जाते हैं जिन के घर हैं
वे क्यों चुप है जिनको आती है भाषा
वह क्या है जो दिखता है हरा हरा - सा
केदारनाथजींची कविता तीव्र किंवा आवेगी नाही. तिचा स्वर मद्धम आहे. मानवी जगण्यातलं जे जे सुंदर, मंगल आहे ते ती टिपते आणि आशावाद उभा करते. आणि त्यांच्या आस्थेच्या परिघात शेतकरी, श्रमिक, नूरमिया, सार्त्र, टॉल्स्टॉय येतात, माणूस येतोच; पण निसर्गही येतो, वस्तू येतात, शेतं येतात, पिकं येतात, प्राणी, झाडं, वनस्पती आणि मोडून पडलेला ट्रकसुद्धा येतो. या सगळ्यांकडे ते सहृदयतेनं पाहातात. सतत माणुसकीची बाजू घेत माणसांना माणुसकीची आठवण करून देणारी त्यांची कविता आहे. माणूस आणि भाषेच्या घर्षणातून परस्परांवर निश्चितपणे परिणाम होत असतात आणि यातच कवितेच्या शक्यता असतात यावर त्यांचा विश्वास होता. ‘मुक्ति’ या कवितेत ते म्हणतात,
मैं पूरी ताकत के साथ
शब्दों को फेंकना चाहता हूँ
आदमी की तरफ
यह जानते हुए कि
आदमी का कुछ नहीं होगा
मैं भरी सड़क पर
सुनना चाहता हूँ वह धमाका
जो शब्द और आदमी की
टक्कर से पैदा होता है
यह जानते हुए कि
लिखने से कुछ नहीं होगा
मैं लिखना चाहता हूँ.
कोणतीही कविता ही अखेरीस पृथ्वीवरच्या पिचलेल्या, पीडिताचा आवाज मुखर करणारी असते या विश्वासानं ते म्हटले होते, की त्यांचा आवाजही संवेदनशीलतेनं ऐकणं कवीची जबाबदारी आहे.
अगर इस बस्ती से गुज़रो
तो जो बैठे हों चुप
उन्हें सुनने की कोशिश करना
उन्हें घटना याद है
पर वे बोलना भूल गए हैं।
या थोर कवीनं अनेक पिढ्यांना बळ दिलं, शिकवलं आणि उजेड दाखवून श्रीमंत केलं. त्यांना एकदाच भेटलो होतो-पणजीमध्ये. ऋजू, प्रसन्न, खुलं व्यक्तिमत्त्व. तेव्हाच त्यांच्या तोंडून काही कविता ऐकल्या होत्या.
त्यांनी वाचलेली ‘लिखुंगा’ अजूनही कानात आहे. त्यांचे शब्द कविता लिहिण्याची प्रेरणादेखील आहेत.