गुप्तचर यंत्रणा का अपयशी होतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:58 PM2022-04-17T12:58:08+5:302022-04-17T13:01:49+5:30

तज्ज्ञ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तवार्ता विभागातील पोस्टिंग म्हणजे ‘साईड ब्रॅन्च’ ही अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. पोलीस करिअरमध्ये साईड ब्रॅन्चचे पोस्टिंग केले की नाही, हे देखील पाहिले जाते. त्यामुळे एक पोस्टिंग ‘उरकण्याची’ मानसिकता पोलिसांत दिसते. 

Why do intelligence agencies fail | गुप्तचर यंत्रणा का अपयशी होतात?

गुप्तचर यंत्रणा का अपयशी होतात?

Next

नेपोलियन एकदा म्हणाले होते की, युद्ध जिंकण्यासाठी हजारो सैनिक तैनात करण्याऐवजी जर एक उत्तम गुप्तचर अधिकारी असेल, तर युद्ध होण्याआधीच ते जिंकता येते. तर, अनेक शतकांपासून गुप्तचरांचे महत्त्व असे अबाधित आहे. आता अलीकडच्या काळात महाराष्ट्रात शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला, हिंदुस्थानी भाऊचा पत्ता न लागणे अशा घटनांमुळे गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा कशा काम करतात, त्यांना अपयश का येते, या प्रश्नांचा हा सारांश... 

अपयश का येते? -
- तज्ज्ञ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तवार्ता विभागातील पोस्टिंग म्हणजे ‘साईड ब्रॅन्च’ ही अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. पोलीस करिअरमध्ये साईड ब्रॅन्चचे पोस्टिंग केले की नाही, हे देखील पाहिले जाते. त्यामुळे एक पोस्टिंग ‘उरकण्याची’ मानसिकता पोलिसांत दिसते. 
- अशा मानसिकतेत असलेले अधिकारी मग गुप्त वार्ता संकलनासाठी आवश्यक टेहेळणी, गुप्त चौकशी, सोंग, बतावणी, शोध अशी तंत्रेच वापरत नाहीत. प्रत्यक्ष फिल्डवर जाणे, लोकांशी संवाद साधणे, स्वतःचे नेटवर्क तयार करणे, या साऱ्याला जवळपास पूर्णविराम मिळाल्याचे दिसते. 
- अनेक प्रकरणांत केंद्रीय गुप्तवार्ता विभागाकडून येणारी माहिती आणि राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पुढे येणारी माहिती यांच्यात तफावत दिसते. संवादाअभावी माहिती मिळण्याचे स्त्रोतच तकलादू झाल्यामुळे, मिळालेल्या माहितीची खातरजमाही करणे कठीण होते. 
- या साऱ्याची परिणती अपुरी, दिशाभूल करणारी माहिती मिळण्यात होते. वास्तविक या विभागाने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कान, डोळे, नाक असल्याप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे. इतका महत्त्वाचा हा विभाग आहे. 

गुप्तचर यंत्रणा कसे काम करतात?
जमिनीला कान लावता आले, तर जी माहिती मिळेल ती सर्व माहिती मिळविण्याचे प्रामुख्याने काम गुप्तचर यंत्रणांना करावे लागते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, जातीय आणि भोवताली घडणारी प्रत्येक घटना समजून, त्याचा अर्थ-अन्वयार्थ लावत कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, याची काळजी घेणे या यंत्रणेचे सर्वात प्रमुख काम आहे. या यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांना स्वतःचे माहितीचे स्त्रोत, नेटवर्क उभारावे लागते. अशा नेटवर्कमध्ये रस्त्यावरचा झाडूवाला, दूधवाला, पेपरवाला ते विशिष्ट वर्तुळात काम करणारी लोक अशा अनेकांचा समावेश असतो. भविष्यात काय होऊ शकते, याचा अंदाज बांधत काळजी घेतली जाते. मात्र, सध्या तळागाळात आवश्यक अशा नेटवर्कची कमतरता, संवादाचा अभाव प्रामुख्याने दिसून येतो. 

गुप्तचर यंत्रणांची रचना कशी आहे ? -
या सेवेत जेव्हा अधिकाऱ्याचे पोस्टिंग होते, तेव्हा त्याच्या पदातून ‘पोलीस’ हा शब्द वगळला जातो. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी राज्य गुप्तवार्ता विभागाचा प्रमुख (आयुक्त) असतो. मुख्यालयात त्या खालोखाल पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी कार्यरत असतो. तसेच चार उपायुक्त असतात. याखेरीज नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोकण, नाशिक अशा रेन्ज कार्यक्षेत्रासाठी एक उपायुक्त असतो. प्रत्येक जिल्ह्यालादेखील एक अतिरिक्त उपायुक्त अधिकारी असतो. गुप्तवार्ता विभागामध्ये व्हीआयपी सुरक्षा, नक्षल, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, राजकीय, सामाजिक, महिला अशा विविध घटकांची माहिती घेणारे उपविभाग आहेत. कानाकोपऱ्यांतून मिळणारी ही माहिती राज्य गुप्त वार्ता प्रमुखांमार्फत रोजच्या रोज मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचिव यांना दिली जाते. 
 - विशेष प्रतिनिधी
 

Web Title: Why do intelligence agencies fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.