वेगळ्या वाटेने जाणाऱ्यांची पावले का घसरतात?
By संदीप प्रधान | Published: January 30, 2022 10:41 AM2022-01-30T10:41:27+5:302022-01-30T10:42:12+5:30
Education News: प्रसिद्धीचा कैफ मोठा आत्मघातकी! एकदा का ते रक्त ओठाला लागले की भल्याभल्यांची मती गुंग झालेली दिसते! झरझर शिखरावर पोहोचलेल्यांचा प्रवास मग थेट उतरणीलाच लागतो! डिसले गुरुजींचे तरी काय वेगळे झाले आहे?
- संदीप प्रधान
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)
सर्वात मोठी नशा कोणती? असा प्रश्न एकदा एका सभेत केला गेला तेव्हा अनेकांनी पैसा, मद्य, अमली पदार्थ वगैरे उत्तरे दिली. प्रश्नकर्त्याने नकारार्थी मान डोलवली. अखेर उत्तर मिळाले की, सर्वात मोठी नशा प्रसिद्धीची. प्रसिद्धी पावलेल्या अनेकांची पावले या नशेपायी वेडीवाकडी पडल्याचे, तोल गेल्याचे नंतर पाहायला मिळालेले आहे. अशा ‘प्रसिद्धीविनायकांची’ यादी मोठी आहे. सध्या ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’प्राप्त गुरुजी रणजीतसिंह डिसले यांच्यावर प्रसिद्धीचा कैफ चढल्याची टीका होत आहे. शासन व्यवस्थेत अध्यापनाची जबाबदारी असलेले डिसले हे आपली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडत नाहीत, असा ठपका त्यांच्यावर ठेवलेला आहे. अर्थात लागलीच डिसले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य होणार नाही. मात्र, एक नक्की की, डिसले यांचा प्रवास प्रसिद्धीच्या शिखरावरुन उताराच्या दिशेने सुरु झाला आहे.
टी. चंद्रशेखर, गो. रा. खैरनार, अण्णा हजारे, तुकाराम मुंढे अशी असंख्य नावे आपण घेऊ शकतो, ज्यांनी एकेकाळी प्रसिद्धीचे शिखर सर केले. त्यांचा प्रत्येक शब्द टिपण्याकरिता माध्यमे त्यांच्या मागे धावत असत. राजकीय नेते, नोकरशाही व्यवस्थेतील त्यांचे सहकारीच नव्हे तर वरिष्ठही त्यांच्या प्रसिद्धीचा हेवा करत. मात्र, कालांतराने त्या प्रत्येकाचा प्रवास प्रसिद्धीच्या शिखरावरुन उताराकडे सुरु झाला.
- हे असे मसिहा वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्माण का होतात व त्यांचा अस्त का होतो? राजकारणापासून प्रशासनापर्यंत, कलेपासून क्रिकेटपर्यंत, समाजसेवेपासून बॉलिवूडपर्यंत जीवनाच्या वेगवेगळ्या अंगात कार्यरत असलेल्या मंडळींपैकी बहुतांश मंडळी ही आजूबाजूची व्यवस्था स्वीकारुन त्यामध्ये आपले स्थान पक्के करतात. या व्यवस्थेत भ्रष्टाचार, चापलुसी, घराणेशाही, गुन्हेगारीकरण वगैरे प्रवृत्ती ठासून भरल्या आहेत. अनेक मंडळी या प्रवृत्तींना खुबीने टाळून किंवा शरण जाऊन आपला कार्यभाग साधतात. जे या व्यवस्थेतील अशा दानवी प्रवृत्तींच्या विरोधात उभे ठाकतात, या दानवी प्रवृत्तीच्या बळावर प्रस्थापित बनले आहेत त्यांना आव्हान देतात, तेच आपल्या बहुतांश चित्रपटाचे नायक असतात. सर्वसामान्य माणसाला राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेतील तळातील व्यक्तीही जुमानत नाही. अनेकदा त्याचा पाणउतारा होतो, त्याला धमक्या दिल्या जातात. त्यामुळे पडद्यावरील मसिहा प्रत्यक्षात पाहिल्यावर ईश्वराची भेट झाल्याचाच भास होतो.
माध्यमेही अशा आयडॉल्सच्या शोधात असतात. मूर्तीपूजन व मूर्तीभंजन या दोन्हीला प्रचंड टीआरपी असल्याने राजकीय व्यक्तींच्या घसरलेल्या जिभेची जशी बातमी होते तशी लोकांमध्ये आदराचे स्थान असलेल्या मसिहांच्या वक्तव्याचीही हेडलाईन होते. प्रसिद्धीचे हे चषक एकदा का घशाखाली उतरले, दररोज अंकात आपलीच ठळक बातमी पाहायची व टीव्हीवर आपल्या मुलाखती पाहायची सवय लागल्यावर मग नोकरशहा, समाजसेवक, अभिनेते अशा अनेकांना प्रसिद्धीच्या या प्रवाहात एक क्षणाचाही खंड पचनी पडत नाही. त्यातून मग मीडियाच्या तालावर नाचायला ही मंडळी तयार होतात. शरद पवार यांच्याविरोधात तुमच्याकडे किती पुरावे आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर हातगाडीवर मावतील इतके, असे उत्तर खैरनार यांनी दिले होते. त्यावर ‘बस्स एवढेच?’
- असे विचारता ट्रकभर पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले होते.
डान्सबार बंद केल्यामुळे प्रसिद्धीचे एव्हरेस्ट सर केलेले माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात एका फॅशन शोमध्ये मॉडेलच्या अंगावरील वस्त्र घसरल्याने वाद झाला होता.
विधिमंडळ अधिवेशन सुरु असल्याने चौकशीचे आदेश झाले. त्याचा अहवाल प्राप्त झाला तोपर्यंत विधानसभा बंद झाली होती. परंतु मीडियाला ती बातमी चालवायची होती. मीडियाच्या प्रतिनिधींनी आबांच्या मागे लागून विधान परिषदेचे कामकाज संपत असताना तेथे त्यांना या अहवालाबाबत निवेदन करायला भाग पाडून आपले इप्सित साध्य केले. या दोन घटना याकरिता नमूद केल्या की, बरेचदा हे आयकॉन्स मीडियाच्या हातातील बाहुले बनतात.
अशातून मग कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता कारवाया करणे, त्यामुळे न्यायालयाचे ताशेरे येणे, खातेनिहाय चौकशीचा ससेमिरा सुरु होणे हे प्रकार घडतात. प्रसिद्धीच्या अजीर्णामुळे काहीवेळा लोक इतके बिघडतात की, अमूक एका नेत्याला एका माथेफिरुने मारले, याकडे लक्ष वेधल्यावर “सिर्फ एकही मारा?” असे संतापजनक वक्तव्य स्वत:ला गांधीवादी म्हणवणारे मीडियासमोर करुन मोकळे होतात. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्यांचा संघर्ष हा बरेचदा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरुद्ध असतो. लोकशाहीत साधारणपणे चाळीसेक टक्के मते घेऊन ते सत्ताधारी झालेले असतात. त्यामुळे या मसिहांना उर्वरित ६० टक्के जनता उचलून डोक्यावर घेते.
मात्र, सत्ताधाऱ्यांना मानणारा वर्ग हळूहळू मसिहांना वैचारिक लेबल लावून मोकळा होतो. विरोधकांशी संबंधित संस्था, संघटना या मसिहांना पुरस्कार देतात, त्यांची भाषणे ठेवतात. त्यामुळे मग हे मसिहा उजव्या, डाव्या, समाजवादी वगैरे विचारसरणीचे ठरवून त्यांच्या प्रत्येक कृतीकडे त्याच नजरेने पाहिले जाते. महाराष्ट्रातील एका मुख्यमंत्र्यांनी लोकप्रिय समाजसेवकास इतके आपलेसे केले होते की, त्यांच्या पत्रांना तत्काळ उत्तरे देण्याकरिता स्वतंत्र विभाग स्थापन केला होता. या ‘राजेशाही’ वागणुकीमुळे या समाजसेवकाने मग मुख्यमंत्र्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांची कुलंगडी बाहेर काढली. एकदा का मसिहांवर पक्षीय बांधिलकीचे किंवा लागेबांध्यांचे स्टँप बसले की, मग त्यांचा प्रवास उतरणीकडे सुरु होतो.
...तेव्हा आपण शिवी हासडत दातओठ खातोच ना?
एकाच वेळी ५० गुंडांना लोळवून जिवंत राहणे अशक्य आहे, हे आपल्यालाही माहीत असते. परंतु पडद्यावर रजनीकांत किंवा अक्षयकुमार जेव्हा हे करीत असतो तेव्हा आपण टाळ्या पिटून आनंद व्यक्त करतो. पडद्यावर प्रस्थापितांची वरात निघते तेव्हा आपण शिवी हासडत दातओठ खातो. वास्तवात जेव्हा मुंबईत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले असते तेव्हा पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदच्या इमारतीवर स्वत: हातोडा घालताना दिसणारे खैरनार आपल्याकरिता वास्तवातील रजनीकांत असतात. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर रकानेच्या रकाने लिहिले जाऊनही जेव्हा कारवाई होत नाही तेव्हा उपोषण करुन दोन-तीन मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारायला भाग पाडणारे अण्णा हजारे यांची तुलना पटकन महात्मा गांधी यांच्याशी करण्याचा मोह सर्वांनाच होतो.
sandeep.pradhan@lokmat.com