बाबा आणि बुवा या लोकांचा सुळसुळाट का झाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 06:00 AM2021-09-12T06:00:00+5:302021-09-12T06:00:02+5:30

‘बाळू मामाचे अवतार’ म्हणवून घेणारे अनेक भोंदू बाबा-बुवांची सध्या चलती आहे. लोकांना फसवून आपले आर्थिक राज्य त्यांनी स्थापन केले आहे. ‘लसीकरण’ हाच त्यावरचा प्रभावी उपाय आहे...

Why does fake 'Baba', 'Buwa' and 'Maharaj' rise in the society? | बाबा आणि बुवा या लोकांचा सुळसुळाट का झाला?

बाबा आणि बुवा या लोकांचा सुळसुळाट का झाला?

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाविरोधात जसे शासन आणि समाज यांच्या सहकार्याने एक मोठी लसीकरण मोहीम आपण राबवतो आहे, तशीच बुवाबाजीविरोधी विचारांची लसीकरण मोहीम राबवणे आता आवश्यक आहे!

-हमीद दाभोलकर

गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत भोंदू बाबा-बुवांनी लोकांना फसवल्याची अनेक गंभीर प्रकरणे पुढे आली. चंद्रपूरमध्ये करणी करत असल्याचा संशय घेऊन पाच-सहा लोकांना मारहाण केल्याची तीन प्रकरणे लागोपाठ समोर आली. जालना जिल्ह्यात दारू सोडवायसाठी केलेल्या

अघोरी उपचारामुळे एका व्यक्तीला मृत्यू झाल्याबद्दल तडवीबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर, अशा चार जिल्ह्यांमध्ये वावर असलेला मनोहर भोसले या स्वत:ला ‘बाळू मामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या तरुणालादेखील जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक झाली. विदर्भ आणि मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या या बुवाबाजीच्या गंभीर प्रश्नांची दखल घेणे आवश्यकच आहे.

महाराष्ट्राच्या दुर्गम भागात जेथे आरोग्यव्यवस्था आणि शिक्षणाचा प्रसार तुलनेने कमी झाला आहे अशा ठिकाणी बुवाबाजीचा प्रभाव आपण एकवेळ समजून घेऊ शकतो; पण शिक्षण आणि आरोग्य सुविधांची तुलनेने चांगली उपलब्धी असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातदेखील शिकली सावरलेली आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असलेली माणसे जेव्हा या बुवाबाजीला बळी पडतात तेव्हा ती विचार करण्याजोगी गोष्ट आहे. केवळ आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार होऊन ही बुवाबाजी थांबू शकेल, असे मानणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसकडे आलेल्या तक्रारींचा अभ्यास केला, तर असे लक्षात येते की या बुवाबाजीला बळी पडणारा एक मोठा वर्ग आरोग्यविषयक समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यामध्ये आरोग्यावर वाढलेला खर्च, कर्करोगासारख्या गंभीर आजारातून कुटुंबाच्या मनात निर्माण झालेली हताशा आणि काहीतरी करून आपला माणूस जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे बरा व्हावा ही नातेवाइकांची अपेक्षा, अशा अनेक गोष्टींची सरमिसळ आहे. या सगळ्या गोष्टींचा हुशार भोंदूबाबा शिताफीने फायदा उठवतात. ‘आपल्याकडे दैवी शक्ती आहे असे भासवून आपण या गोष्टी चुटकीसरशी बऱ्या करून देऊ’ या दाव्याला आधीच भावनिकदृष्ट्या हळवे झालेले लोक सहज बळी पडतात. आपण ‘बाळूमामाचा अवतार’ आहोत, अशी आवई उठवून आपले साम्राज्य स्थापन करणाऱ्या मनोहर भोसालेने हेच केले. गमतीचा भाग म्हणजे सोशल मीडिया, टेलिव्हिजन ही आधुनिक विज्ञानाने निर्माण केलेली साधने वापरण्यात नव्या पिढीचे भोंदू माहीर आहेत. या प्रकारच्या बुवाबाजीतून निर्माण होणारा पैसा इतका जास्त आहे की, अशा स्वरूपाचे दैवी चमत्काराचे दावे करणारी एखादी सिरिअल टेलिव्हिजनवर निर्माण करण्याइतका पैसा या बुवाबाबांकडे असतो. त्यामधून गोष्ट,नाट्य आणि वास्तव यांची हुशार सरमिसळ करून हे बुवा आपली जाहिरात शिताफीने करतात.

(भोंदू गणेश महाराजांचा अंनिसकडून नाशिकमध्ये भांडाफोड)

दुसरा भाग आहे या बुवा-बाबांशी लगट करून स्वत:चे स्थानिक सत्तासंबंध टिकवून ठेवणाऱ्या राजकारण्यांचा! मनोहर भोसलेचे भक्त म्हणून पुढे आलेल्या राजकारण्यांची यादी आपण बघितली, तर सहज हे आपल्या ध्यानात येऊ शकते. ‘तुम्ही मला पाठिंबा द्या, मी तुम्हाला एकगठ्ठा मते मिळवून देतो!’ असे हे साटेलोटे आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्यावर दैवी शक्तीचा आभास, राजकारणातील ऊठबस आणि पैसा यांच्या वापरातून प्रभाव टाकणे हे एकदम सहज होऊन जाते. कोविडनंतरच्या कालखंडात निर्माण झालेले ताणतणाव आणि आर्थिक ओढाताण यामधून बुवाबाजी पसरायला एकदम पोषक वातावरण तयार होते. या पार्श्वभूमीवर आपले काम चोख बजावणारी माध्यमे, पोलीस दलातील अधिकारी आणि या सगळ्यांविरोधात समाजप्रबोधन करणारे आणि लढणारे महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांसारखे लोक एकदम अल्पसंख्याक म्हणावे असे. त्यामधूनच मनोहर भोसलेसारख्या माणसाला अटक होऊ शकते आणि इथून पुढे रामरहिम किंवा आसारामसारखे त्याचे साम्राज्य होण्याला आळा बसू शकतो. हेही नसे थोडके, अशी सध्या आपली परिस्थिती आहे; पण याचा अर्थ हे चित्र बदलू शकत नाही, असे अजिबात नाही. नियोजनबद्ध प्रयत्न करून आपण बुवाबाजीविषयीदेखील हे करू शकतो. त्यासाठी खालील दोन महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर आपण करू शकतो.

त्यामधील पहिले सूत्र म्हणजे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला आहे. त्याअंतर्गत आजअखेर आठशेपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. असे असले तरी ते पुरेसे नाही. त्या कायद्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार आणि अंमलबजावणी हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. या कायद्यामधील दक्षता अधिकारी ही अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे; जी योग्य प्रकारे कार्यान्वित केली, तर अशा अनेक भोंदू बाबा-बुवांना वचक बसवू शकतो.

दुसरे सूत्र आहे ते म्हणजे अशा स्वरूपाच्या फसवणुकीविषयी एक नागरिक म्हणून आपण सदैव सतर्क राहणे. केवळ कोणी प्रसिद्ध किंवा यशस्वी व्यक्ती म्हणते आहे म्हणून किंवा टीव्ही सिरिअलमध्ये दाखवले आहे म्हणून आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता कामा नये. ही फसवणूक थांबवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपल्या देवविषयक आणि धार्मिक भावनांचा गैरफायदा कोणी उठवत तर नाही, याविषयी आपण सतत सजग राहणे आवश्यक आहे. केवळ शासनाच्या प्रयत्नाने एका मर्यादेपलीकडे या बुवाबाजीचा बीमोड होऊ शकत नाही. व्यक्ती म्हणून आपलीही जबाबदारी आहे. कोरोनाविरोधात जसे शासन आणि समाज यांच्या सहकार्याने एक मोठी लसीकरण मोहीम आपण राबवतो आहे, तशीच बुवाबाजीविरोधी विचारांची लसीकरण मोहीम राबवणे आता आवश्यक आहे!

(कार्यकर्ता, अंनिस)

Web Title: Why does fake 'Baba', 'Buwa' and 'Maharaj' rise in the society?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.