विचारस्वातंत्र्य - चिंतेचा विषय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 05:25 PM2019-10-02T17:25:56+5:302019-10-02T17:28:54+5:30
विचार केला पाहिजे, तो व्यक्त करता आला पाहिजे, त्याच्या गुणवत्तेवर निर्लेप मनाने चर्चा होऊ शकली पाहिजे आणि त्याची चिकित्साही झाली पाहिजे. चिकित्सक बुद्धीनेच जग पुढे गेले आहे. ज्यांना चिकित्सा नको असते ते मग ज्ञानाचेच विरोधक बनतात. विचार स्वातंत्र्याचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व निदान लेखकांना तरी वाटले पाहिजे.
- नरेंद्र चपळगावकर
विचारस्वातंत्र्य हा तुमच्या माझ्या सर्वांच्याच आस्थेचा आणि चिंतेचाही विषय आहे. या विषयाचे महत्त्व नियतीनेच माझ्या मनावर अगदी लहानपणापासून बिंबवले आहे. निजामी राजवटीतल्या मराठवाड्यात माझा जन्म झाला. राज्यकर्त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती हीच र्शेष्ठ. इतरांनी जीव मुठीत धरून राहायचे, दुय्यम नागरिकाचे जीवन जगावयाचे असे त्यांचे आणि त्यांच्या सर्मथकांचे तत्त्वज्ञान होते. सर्व नागरिकांना विचारांचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य ही कल्पनाच त्या राजवटीला मान्य नव्हती. नागरिकांना विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले तर ते बंड करतील अशी भीती सर्वच हुकूमशहाप्रमाणे निजामालाही वाटत होती. तुमच्याकडे असलेल्या ब्रिटिश शासनाच्या कारभारात अधूनमधून विचारस्वातंत्र्य ावर बंधने येत असली तरी निजामाच्या राजवटीच्या तुलनेत पुष्कळ मोकळेपणा होता. वृत्तपत्ने प्रसिद्ध होत होती. काही लेखनाबद्दल त्यांच्यावर खटले झाले तरी सामान्यपणे वृत्तपत्नांच्या प्रसिद्धीला मनाई नव्हती.
ब्रिटिश राजवटीने जवळजवळ दीडशे मराठी पुस्तकांवर बंदी घातली असली तरी इतर पुस्तके मोठय़ा प्रमाणात प्रसिद्ध होत होती. निजामाच्या राजवटीत मुद्रणालये आणि पुस्तक प्रकाशन यासुद्धा अडचणीच्या बाबी होत्या. अभिव्यक्तीचे आणखी एक साधन म्हणजे सभा आणि मिरवणुका. त्याही परवागीशिवाय होऊ शकत नव्हत्या आणि परवानगी शक्यतो दिलीच जात नव्हती. सतराव्या शतकातला हॉलंडमध्ये राहणारा एक तत्त्वचिंतक स्पिनोझा म्हणाला होता की, माणसाच्या जिभेवर नियंत्नण ठेवता येते तसे त्याच्या मनावर नियंत्नण ठेवता आले असते तर जगातले सगळे राजे सुरक्षित राहिले असते. भारत स्वतंत्न झाला. निजामाचे राज्यही गेले.
विचारस्वातंत्र्याचे युग
खरे म्हणजे भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा उदारतेला आणि विचारस्वातंत्र्याला जपणारी आहे. प्राचीन ज्ञानपरंपरेचे एक ऋषितुल्य अभ्यासक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांच्या मते उपनिषदकाळापासून ते आस्तिक नास्तिक दर्शने निर्माण होईपर्यंतचा सुमारे एक हजार वर्षाचा काळ हा विचारस्वातंत्र्य ाचे युग होता. या खुल्या वातावरणामुळे सैद्धांतिक चर्चा होत, अनेक नव्या शास्रविचारांचा जन्म होई. वैचारिक विरोध ही विचारवाढीची प्र्वतक शक्ती आहे, अशी जाणीव प्राचीन भारतीयांच्या ठिकाणी होती. नास्तिक हा दावेदार म्हणून नष्ट न करता खेळगडी म्हणून वैचारिक क्र ीडांगणात सामील करून घ्यावयाचा असा या विद्याविषयक बौद्धिक संस्कृतीचा बाणा होता असा त्यांचा निष्कर्ष आहे.
वैज्ञानिक दृष्टीला संपूर्ण विचारस्वातंत्र्य ाचे अधिष्ठान असावे लागते. युरोपमध्ये मध्ययुगीन धर्मसंस्थांची आणि अंधर्शद्धेची जाचक बंधने होती. त्यांचा सामना करीत, आपल्या वैज्ञानिक शोधाच्या, भूमिकेच्या सर्मथनार्थ आत्मबलिदानाची तयारी ठेवत युरोपातल्या विज्ञान संशोधकांनी नवे शोध लावले. भारतात मात्न संपूर्ण धर्मस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य होते, त्यामुळे नवा विचार मांडणारांवर अशी पाळी येत नसे, असेही शास्रीजींनी सांगितले आहे.
विचार केला पाहिजे, तो व्यक्त करता आला पाहिजे, त्याच्या गुणवत्तेवर निर्लेप मनाने चर्चा होऊ शकली पाहिजे आणि त्याची चिकित्साही झाली पाहिजे. इमॅन्यूअल कांटने आजचे युग चिकित्सेचे युग आहे, टीकेचे युग आहे, असे म्हटले आहे. चिकित्सक बुद्धीनेच जग पुढे गेले. गुरुत्वाकर्षणाचा न्यूटनला लागलेला शोध, आर्थिक विषमतेचे मूळ शोधण्याचा मार्क्सने केलेला प्रयत्न हे सारे चिकित्सक बुद्धीतूनच निर्माण झालेले आहे. चिकित्सा झाली म्हणजे विचारांच्या संशोधनाच्या सत्यासत्याची खात्नी करून घेता येते. अगदी जुन्या काळातसुद्धा आम्ही म्हणतो तोच धर्म, तेच तत्त्वज्ञान आणि तेच खरे असा आग्रह धरणारे लोक जगाच्या पाठीवर होते. त्यांना चिकित्साच नको असते. ज्ञान हे माणसाला चिकित्सा करण्याची प्रेरणा देते.
ज्यांना चिकित्सा नको असते ते ज्ञानाचेच विरोधक बनतात. नालंदा आणि तक्षशीला ही ज्ञानभांडार असलेली आणि ज्ञानपंरपरा चालवणारी विद्यापीठे ज्ञानशत्नूंनी उद्ध्वस्त केली. अलेक्झांड्रियावर जेव्हा मुस्लिमांनी आक्र मण केले, तेव्हा तेथले जगप्रसिद्ध ग्रंथालयच जाळून टाकले. पाकिस्तानी शासकांनी बांगला देशमधल्या ढाका विद्यापीठाला लक्ष्य करून नवा विचार करणार्या प्राध्यापकांची एक पिढीच मारून टाकली. ही झाली उघड उघड क्र ौर्याची उदाहरणे. कायद्याने मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून तीच गोष्ट केली जाते. एखाद्या पुस्तकावर सरकार बंदी घालते म्हणजे काय होते, प्रत्यक्षात ते पुस्तक वाचण्याचा वाचकांचा अधिकार काढून घेतला जातो. सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ या कादंबरीवर त्यावेळच्या भारत सरकारने ती कादंबरी भारतात येण्यापूर्वीच बंदी घातली आणि वाचकांना ती कादंबरी पाहताही आली नाही.
संयम, विनय आणि औचित्य
मराठी लेखकांनासुद्धा शासनाच्या आडमुठेपणाचा जाच भोगावा लागलेला आहे. र्मढेकरांच्या काही कविता आणि चंद्रकांत काकोडकरांच्या ‘श्यामा’ कादंबरीबद्दल भरण्यात आलेल्या खटल्यांची आठवण आपणा सर्वांना आहे. दुसर्याचे अभिव्यक्तीचेच काय; पण कोणतेच स्वातंत्र्य मनोमन मान्य करणे ही अवघडच गोष्ट असते. सरकार अडाणी असू शकते, हेकेखोरही असते, त्याला पु. मं. लाडांसारख्या आपणच नेमलेल्या तज्ज्ञ माणसाने खटला भरू नये असा दिलेला सल्लासुद्धा नको असतो, हे आपल्याला माहीत आहे. पण र्मढेकरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन घालण्याचा प्रयत्न एकट्या सरकारनेच केलेला नव्हता. साहित्य संमेलनात र्मढेकर कविता वाचत असताना आणि नंतरही त्यांची हेटाळणी करण्यात आली. पण त्या मेळाव्यात फक्त खादीचे पंचे गुंडाळलेला एक तपस्वी उभा राहिला आणि त्याने या हेटाळणीकडे दुर्लक्ष करून आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहा आणि जे पटेल तेच लिहा असा र्मढेकरांना जाहीर सल्ला दिला. र्मढेकरांवर खटला झाला तेव्हा काही मित्न त्यांच्या मदतीला आले. पण साहित्यिकांच्या संस्था संघटितपणे त्यांच्यामागे उभ्या राहिल्याचे दिसले नाही. असे का व्हावे? एखादी कविता किंवा कादंबरीसारखी वाड्मयकृती आपल्याला आवडत नसेल; पण तिच्यावर बंदी घालावी याला तर विरोध व्हावयास हवा. कादंबरी चांगली नाही, तिच्यात कालविपर्यास आहे, असे अनेक आक्षेप आपल्या मनात असू शकतात; पण लेखकाला वाईट कादंबरीसुद्धा लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे अशी भूमिका साहित्यिकांनी संघटितपणे घेतली नाही. प्रत्येक लेखकाला आपापला लढा स्वत:च्या कुवतीनुसार लढवावा लागला. विचारस्वातंत्र्याचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व समाजातल्या इतरांना सोडा, निदान लेखकांना तरी वाटले पाहिजे. अलीकडील काळात सरकारच्या काही कारवायांबद्दल अगर लेखकांवर झालेल्या हिंसक हल्ल्याबद्दल निषेध करण्यासाठी काही शहरातले लेखक एकत्न आल्याचे दिसले ही आशादायक गोष्ट आहे.
र्शी.पु. भागवत मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या एका भाषणात लेखकाचे अधिकार आणि त्याने पाळावयाची पथ्ये यांची आठवण करून दिली आहे.
‘सर्व प्रकारच्या समाजरचनात आविष्कार स्वातंत्र्यावर आक्र मण करणार्या शक्ती कमीअधिक प्रमाणात दडलेल्या असतात. लोकशाहीच्या मुखवट्याखाली लोकशाहीच्या साधनांचाच विपरीत उपयोग करून आपल्या देशात हुकूमशाही येण्याची भीती आहे, असा इशारा डॉ. आंबेडकर वारंवार देत. त्यांचा तो इशारा किती समयोचित आणि दूरदृष्टीचाही होता हे आणीबाणीत सिद्ध झाले आहे.’
आविष्कार स्वातंत्र्याचा उपभोग घेताना पाळावयाचं र्शी.पुं.नी सांगितलेलं सर्वांत महत्त्वाचं पथ्य म्हणजे ‘संयमाचं, विनयाचं आणि औचित्याचं.’ विवेक सुटला तर वैचारिक वातावरण प्रदूषित होते याचीही आठवण र्शी.पुं.नी दिली आहे.
संयम, विनय आणि औचित्य ही तिन्ही पथ्ये ही सुसंस्कृत लेखकाने स्वत:वर घालून घेतलेली बंधनेच असतात. सहिष्णुता आणि औचित्याचा विचार संस्कारानेच मनावर बिंबला असेल तर त्यासाठी वेगळी काळजी घ्यावी लागत नाही. आपल्याला जो मतभेद व्यक्त करावयाचा आहे अगर नवा विचार मांडावयाचा आहे, तो आपोआपच संयमपूर्ण भाषेत व्यक्त होतो.
आपल्या लहानपणाची जाणीव हे माणसाच्या मोठेपणाचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. दुसर्याचा उपर्मद न करता आपण आपले म्हणणे विनयाने मांडू शकतो. प्रसंग काय आहे आणि त्यावेळी काय बोलणे अगर लिहिणे उचित आहे याचा विचार लेखकाच्या आणि वक्त्याच्या मनात नेहमी असावा लागतो. या र्मयादा पाळणे म्हणजे विचारस्वातंत्र्यावर बंधन घालून घेणे नसते. संयमी, विनयी आणि औचित्यपूर्ण अभिव्यक्ती अधिक प्रभावी ठरू शकते.
(लेखक न्यायमूर्ती (निवृत्त) आहेत.)
(राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा.चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या वतीने देण्यात आलेला र्शी. ग. माजगावकर पुरस्कार स्वीकारताना पुणे येथे 15 सप्टेंबर 2019 रोजी केलेल्या भाषणाचा संपादित अंश.)