शेतकरी नवरा का नको गं बाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:29 AM2020-02-16T01:29:59+5:302020-02-16T01:31:41+5:30

कधी काळचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असं समाजसूत्र आता मोडीत निघालं आहे. मुलाला नोकरीच हवी, फार झाले तर व्यवसाय चालेल; पण शेती करणारा नवरा नकोच, अशी मानसिकता तयार झाली आहे. यामुळे भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येणार आहे.

 Why not a farmer's husband? | शेतकरी नवरा का नको गं बाई?

शेतकरी नवरा का नको गं बाई?

Next
ठळक मुद्दे यासाठी शेतकरी मुलगा नको, असा हेका सोडा, दृष्टी बदला, सृष्टी आपोआप बदलेली दिसेल.

- शरद यादव

कृषिप्रधान समजल्या कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात पूर्वी शेतीला प्रतिष्ठा होती. नोकरी म्हणजे दुसऱ्यांची चाकरी करणे, असा मतप्रवाह होता. काळानुसार यात बदल होत गेला व शेतीची प्रतिष्ठा कमी होत गेली. बेभरवशाचा पाऊस, शेती मालाला न मिळणारा हमीभाव, शासनाचे मनमानी धोरण यामुळे शेती करणे म्हणजे मन:स्ताप वाढवून घेणे, असा समज घट्ट होत गेला.
९० च्या दशकापर्यंत शेतीची प्रतिष्ठा टिकून होती. ९२-९३ नंतर जागतिकीकरण, उदारीकरणाच्या वाºयात शेतमालाचे उत्पादन वाढले; पण हमीभावाअभावी शेतकरी कंगाल बनत गेला. याच दरम्यान, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम शिकविणाºया संस्था वाढल्या. यातून शिकलेल्या तरुणाईला नोकºयाही मिळाल्या. महिन्याच्या ठरावीक तारखेला होणारा पगार व नोकरीची श्वाश्वती यामुळे स्थिरता येत गेली. याउलट उत्पादन जास्त झाल्याने दर पडला म्हणून शेतकरी कांदे, टोमॅटो रस्त्यावर टाकू लागला, ऊस आणि दुधाला रास्त भाव मिळावा, यासाठी रस्ते अडवू लागला. कधी महापूर, तर कधी कडक दुष्काळ असे दुष्टचक्र त्याला कीटकनाशक पिण्यास उद्युक्त करू लागले. बघता बघता ‘शेतकरी आत्महत्या’ हा चर्चासत्राचा, चिंतेचा विषय बनला. यातूनच साधारण २०१० पासून शेतकरी मुलाचे लग्न ठरणे कठीण बनल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा हे राज्यातील पाणीदार जिल्हे म्हणून ओळखले जातात. बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाचे मळे या भागात फुलले. पण, या पट्ट्यातसुद्धा ‘शेतकरी नवरा नको’, अशी मानसिकता ठाम होऊ लागली आहे.

दहा ते पंधरा एकर शेती असणा-या शेतकरी पुत्रालाही नोकरी नाही म्हणून मुलीकडून येणारा नकार अस्वस्थ करीत आहे. यातून भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
चित्रपट, साहित्यातून रंगवले चित्र

काही चित्रपट, साहित्य यांतून शेतकरी म्हणजे अठराविश्वे दारिद्र्य, ग्रामीण ढंगात बोलणारा, घरात चुलीवर जेवण करणारा, चाबूक खांद्यावर घेऊन फिरणारा, असे चित्र निर्माण केले. या आभासी चित्राचा परिणाम मुलींच्या मानसिकतेवर झाल्याचे दिसून येते; पण आज साधनसुविधेचा झालेला विकास पाहता शेतकºयाच्या घरातही चुलीची जागा गॅसने घेतली आहे. शेतकरी युवक सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. ग्रामीण भागात वाढलेली बांधकामे पाहता खेड्यांचा तोंडवळा आता शहरी बनू लागला आहे. परिणामी शेतकºयाच्या जीवनात गुणात्मक बदल झालेला दिसतो; पण मुलींच्या डोक्यात शेतकरी म्हणजे वनवासी, असे मत पक्के बनल्याचे दिसून येते.

शेतक-याच्या मुलीला नोकरदारच हवा
एखाद्या शेतकºयाला दोन मुली व एक मुलगा असेल, तर तोसुद्धा नोकरदारच जावई शोधतो. आयुष्यभर शेतात चिखल तुडविणाºयालासुद्धा शेतकरी युवक आपल्या मुलींना सुखात ठेवेल, याची खात्री वाटत नसेल तर शहरी लोकांकडून कोणती अपेक्षा करायची.

‘हम दो, हमारा एक फ्लॅट...’
टीव्हीवर दररोज मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. या मालिकांतून शहरातील फ्लॅटमध्ये राहणे, नोकरी करणारा नवरा, आठवड्यातून एक-दोन दिवस बाहेर जेवण, असे छानछौकी जीवन दाखविण्यात येते. याचाही परिणाम मुलींवर झालेला दिसतो. शेतकरी कुटुंबात जाणे म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती आली, शिवाय स्वातंत्र्यावरही मर्यादा येणार, अशी भीती वाटत असल्याने ‘हम दो हमारा एक फ्लॅट सुनहरा’, असेच स्वप्न मुली रंगवत असल्याचे दिसते.

मुलींची संख्या कमी...
मुलांची संख्या जास्त व तुलनेने कमी मुली यामुळे वधू-पित्याच्या अपेक्षा वाढल्या. नोकरी हवीच, शिवाय जोडीला थोडी शेतीही हवी. बंगला, गाडी हवी, अशा अपेक्षांची यादी वाढल्याने शेतकरीपुत्र या यादीतून बाहेर फेकला गेल्याचे चित्र दिसते.

वीर सेवा दलाचा अभिनव प्रयोग
बेळगाव जिल्ह्यातील मलिकवाड येथील वीर सेवा दलाने गतवर्षी शेतकरीपुत्र वधू-वर मेळावा घेतला. याबाबत रावसाहेब कुन्नुरे म्हणाले, नोव्हेंबर २०१८ मध्ये आम्ही असा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात २२ विवाह ठरले. यासाठी आम्ही ७७ गावांत बैठका घेतल्या. अशा उपक्रमाला समाजाचे पाठबळ मिळत नसल्याने आमचा हा प्रयत्न थंडावला.

शासनाच्या धोरणामुळे शेतक-याचे मरण
शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी पुत्राची अशी अवस्था झाल्याचे ‘स्वाभिमानी’चे नेते डॉ. जालंदर पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ग्रामीण भागात लग्न न ठरलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. शासनाने शेतीमालाला रास्त भाव देण्याचे धोरण अंगीकारले तरच हा प्रश्न सुटू शकतो.

...तर आत्महत्यांचे दृष्टचक्र
गेल्या काही महिन्यांपासून वर्तमानपत्र उघडले की, आत्महत्येची बातमी नाही असे कधीच होत नाही. या समस्या भविष्यात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दृष्टी बदला सृष्टी बदलेल
सर्वांनीच नोकरी करायची म्हटले तर आपल्याला लागणारे दोनवेळचे अन्न कोण पिकवणार, याचा विचार करावा. एकरी १०० टन ऊस पिकवणारा, एकरात ४० टन केळी घेणारा, शेतकरी युवक उद्याच्या जगाचा मूलभूत आधार असणार आहे. यासाठी शेतकरी मुलगा नको, असा हेका सोडा, दृष्टी बदला, सृष्टी आपोआप बदलेली दिसेल.

 

(लेखक, ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

 

Web Title:  Why not a farmer's husband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.