वर्दीला ग्रहण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 06:01 AM2019-09-01T06:01:00+5:302019-09-01T06:05:02+5:30
पोलिसांवरील वाढता ताण आणि त्यातून होणार्या आत्महत्या. हा सध्या मोठा कळीचा प्रश्न बनला आहे. पण या प्रश्नाकडे ना अधिकार्यांचे लक्ष आहे, ना शासनाचे! का वाढताहेत पोलिसांच्या आत्महत्या? काय आहेत त्यांच्या समस्या? त्यावर उपाय काय? - त्याचाच हा ऊहापोह..
- जमीर काझी
बर्याचदा चोवीस चोवीस तास ड्यूटी, कुटुंबापासून दूर राहून कायम कर्तव्य बजावण्याचं बंधन, वेळी-अवेळी काम करण्याची सक्ती आणि आत्यंतिक तणावाच्या परिस्थितीत सतत करावं लागत असलेलं काम.
पोलिसांच्या शरीर-मनावर त्याचा ताण आला नाही तरच नवल !
यासंदर्भात आजवर बरेच वेळा चर्चा झाली, माध्यमांतून त्यावर बोललं, लिहिलं गेलं; पण त्याविषयी फारसं गांभीर्यानं कोणी घेतल्याचं कधीच दिसलं नाही.
याच ताणामुळे महाराष्ट्रात किती पोलिसांनी आत्महत्या कराव्यात? त्याची आकडेवारी खरंच भयावह आहे. माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या या अधिकृत सरकारी माहितीनं अक्षरश: हादरायला होतं.
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे, मन:स्वास्थ्य बिघडलेल्या पोलिसांनी आत्महत्या करण्याच्या घटना अगदी रोजच्या रोज घडताहेत. किती घटना सांगाव्यात?.
नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्या दिवशीची रायगड जिल्हा पोलीस दलातील घटना. अलिबाग मुख्यालयात नियुक्तीला असलेले सहाय्यक निरीक्षक प्रशांत कानेटकर यांनी रात्रपाळी केल्यानंतर अधिकार्यांच्या विर्शांती कक्षात ते गेले. सायंकाळपर्यंत त्यांनी दरवाजा उघडलाच नाही. सहकार्यांनी दरवाजा तोडला. पाहिले तर गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केलेली होती.
दोन महिन्यांपूर्वी राज्य गुप्त विभागातून याठिकाणी रुजू झालेले पन्नाशीतील कानेटकर काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होते. सुसाइड नोट मिळूनही त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
भारत राखीव बटालियनच्या कोल्हापुरातील तुकडीतील सुशील भेंडे हा जवान. जादा ड्यूटी लावल्याच्या कारणाने आपल्या वरिष्ठ अधिकार्यांशी वाद, झटापट झाल्याने त्याला निलंबित करण्यात आले होते. नागपूर येथील खेंडा या मूळ गावी जाऊन शेतात गळफास घेऊन त्याने आयुष्य संपवले.
. ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुभद्रा पवार या तरुणीला वरिष्ठांचाच जाच होता. अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत त्या अधिकार्याने मध्यरात्री, पहाटे तब्बल 108 फोन कॉल तिला केले होते. या जाचाला कंटाळून तिने अखेर आपल्या जीवनाची इतिर्शी केली.
मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार दिलीप शिर्के हे नाइट ड्यूटीवेळी जागेवर आढळून न आल्याने त्यांची गैरहजेरी लावण्यात आली. संतापलेल्या शिर्के यांनी वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांच्या केबिनमध्ये जाऊन सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर आणि स्वत:वरही गोळ्या झाडल्या.
आयपीएसच्या 1988च्या बॅचचे हिमांशू रॉय यांनी मुंबई क्राइम ब्रॅचबरोबरच व महाराष्ट्र एटीएसचे कुशलपणे नेतृत्व करीत आपल्या कर्तृत्वाचा आलेख उंचावला होता. कर्तव्यकठोर आणि शरीरिक फिटनेसमुळे ‘रॉबिनहूड’ म्हणून ओळखल्या जाणार्या रॉय यांनी कर्करोगाला कंटाळून स्वत:ला संपवल्याची घटना तर कोणीच विसरू शकणार नाही.
गेल्या साडेपाच वर्षात अशा प्रकारे तब्बल 138 खाकी वर्दीवाल्यांनी आपला अंत करून घेतला.
पोलीस दलात आत्महत्यांचे हे लोण का पसरलेय?
अनेक कारणे आहेत. त्यातील काही कारणे तर उघड उघड समाजात आणि पोलिसांकडूनही सांगितली जातात. पोलिसांवरील कामाचा वाढलेला ताण, अवेळचा बंदोबस्त, वरिष्ठांची अरेरावी, पक्षपातीपणा, बदल्या, नियुक्तीमधील वशिलेबाजी, त्यातला राजकारण्यांचा हस्तक्षेप, वरिष्ठांची र्मजी राखण्यासाठी त्यांना पैशापासून ते आवश्यक आणि अंगवळणी पडलेली सर्व प्रकारची ‘सेवा’ पुरविणे. शिपायापासून ते महासंचालक दर्जापर्यंतच्या अधिकार्यांना या गोष्टी नव्या नाहीत. त्यामुळे पोलीस दलात आतून नेहमीच खदखद असते. ‘शिस्तीच्या’ बडग्यामुळे कायमच ‘तोंड दाबून बुक्याचा मार’ सहन करावा लागत असल्याने ही कोंडलेली वाफ अचानक कधीतरी बाहेर येते.
एखाद्या कोणी अंमलदार, अधिकार्याने आपल्यावरील अन्याय, घडत असलेल्या गैरप्रकाराबाबत आवाज उठविण्याचा प्रय} केलाच तर त्याचा ‘सीआर’ खराब करून कायमची अद्दल खडविली जाते. ‘साइड पोस्टिंग’ला टाकलं जाते किंवा खातेनिहाय चौकशीत अडकवून त्यांना निलंबित, बडतर्फ करून हकालपट्टी केली जाते.
वरिष्ठ, सहकार्यांकडून मिळणारी अशी साप} वागणूक एकीकडे, तर अनेक पोलीस कौटुंबिक समस्यांनी कायमच घेरलेले दिसतात. कामाच्या अनियमित वेळा आणि जास्त वेळ काम यामुळेही अनेक पोलिसांना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते, हे वास्तव आहे. याशिवाय अपुरी निवासस्थाने, त्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव, पाल्यांचे शिक्षण, रोजगार आदींबाबतच्या प्रश्नांचा डोंगर कायमच त्यांच्या डोक्यावर असतो.
ड्यूटीमुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्याने अनेकवेळा प}ी, मुलांशी सुसंवाद दुरावलेला असतो. शारीरिक र्शम, मानसिक तणाव दूर होण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे आपसूकच ते तंबाकू, गुटखा, दारूच्या व्यसनांना अधीन होतात. व्यसनांची पूर्तता करण्यासाठी पैसा कमी पडू लागल्यानंतर वर्दी, पदाचा गैरवापर करीत झटपट पैसे मिळविण्याची नशा लागते. भ्रष्टाचाराचा अतिरेक झाल्यानंतर कधीना कधी ते चव्हाट्यावर येतेच. त्यातून झालेली बदनामी, व्यसनामुळे मागे लागलेल्या विविध व्याधी आणि त्यात कुटुंबापासूनही दुरावल्याने वैफल्याची परिसीमा गाठली जाते. या सर्वातून मुक्तीसाठी आयुष्याचा अंत करून घेणे हाच आता एकमेव पर्याय असल्याची भावना मनात ठसत जाते आणि त्यातून टोकाचा निर्णय घेतला जातो.
महिला पोलिसांची स्थिती आणखीच विदारक. उपरोक्त बाबींबरोबरच काही वेळा वरिष्ठ सहकार्यांकडूनच होणार्या शारीरिक, मानसिक छळाने त्या कोलमडून पडतात.
अर्थात अनेक अधिकारी कर्तव्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावित आहेत. आपल्या अखत्यारितील अधिकारी, अंमलदारांना योग्य काम, वागणूक देण्याचा त्यांचा प्रय} असतो. मात्र काही वेळा इच्छा असूनही विविध कारणांमुळे ते न्याय देऊ शकत नाहीत.
पोलिसांवरील ताण दूर करण्यासाठी कुटुंबकल्याण तसेच विविध उपक्रम, योगासने, आरोग्य शिबिरे घेतली जातात. मात्र बहुतांश वेळा त्याबाबतची औपचारिकता तेवढी पार पाडली जाते. कागदावर हे उपक्रम छान वाटतात, प्रत्यक्षात पोलिसांना त्याचा फायदा मिळण्याच्या घटना अपवादात्मक आहेत.
असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे पोलिसांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. समाजाला वळण, शिस्त लावण्यासाठी उपयुक्त असलेला एक महत्त्वाचा घटकच असा दुर्लक्षित असेल, अन्यायाला बळी पडत असेल, तर त्याकडे सार्यांनीच गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
वरिष्ठ अधिकार्यांनी
‘कुटुंबप्रमुख’ व्हावे!
पोलिसांतील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढते आहे. वरिष्ठ अधिकारीही त्याला बर्याच अंशी जबाबदार आहेत. पोलिसांमध्ये नाराजीचे कारण बहुतांशवेळा कर्तव्य वाटप हेच असते. ड्यूटी मास्तरकडून र्मजीतील लोकांना चांगली ड्यूटी, बंदोबस्त, वॉरंट, समन्स बजाविणे, आरोपी पार्टी आदी कामे दिली जातात. त्याचप्रमाणे पोलिसांना रजा देतानाही त्याची निकट, आवश्यकतेचा विचार न करता वैयक्तिक संबंधांशी सांगड घातली जाते. कॉन्स्टेबलपासून ते वरच्या दर्जाच्या अधिकार्यांना बदली, नियुक्ती देताना या प्रकाराला सामोरे जावे लागते. अशा बाबींकडे घटकप्रमुखांनी स्वत: लक्ष घालून ही प्रकिया योग्य प्रकारे, नि:पक्षपातीपणे होण्यासाठी प्रय} केले पाहिजेत. अन्यथा त्यातून डावलले गेलेले पोलीस, अधिकारी ‘एकाकी’ होऊन वैफल्यग्रस्त बनतात. ड्यूटीचे वाटप समान न्यायाने होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पोलीस परेड, दरबार, फॅमिली मिटिंग यांसारख्या उपक्रमांत उपस्थित राहून पोलिसांच्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या, अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांचे सीट रिमार्क तपासण्यासाठी वर्षातून किमान एकदातरी त्यांना प्रत्यक्ष भेट घेणे आवश्यक आहे. पोलीस रुग्णालयांना भेट देऊन तेथील परिस्थिती, उपचाराच्या सुविधांची माहिती घेतली पाहिजे. घटक प्रमुखाने पोलिसांना घरच्याप्रमाणे वागणूक देऊन कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावली पाहिजे.
पूर्वीच्या तुलनेत पोलिसांकडील साधने, सुविधांमध्ये मोठी वाढ, सुधारणा झालेली आहे. गुन्ह्यांचे स्वरूप, त्याच्या मोडस ऑपरेण्टीमध्येही मोठा बदल झाला असून, सायबर, सोशल क्राइमचे गुन्हे वाढत असताना तपासाच्या आधुनिक व शास्रोक्त पद्धतीही विकसित होत आहेत. मात्र पोलिसांच्या आर्थिक, सामाजिक व कायदेशीर प्रश्नांची उकल व्यवस्थित होत नसल्याने पोलीस आत्महत्या बळावत आहेत. त्यासाठी पोलीस भरतीपासूनच योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मुलाखती बंद झाल्याने लेखी परीक्षेत मानसशास्रीय मानकांचा समावेश केला गेला पाहिजे. पोलीस प्रशिक्षणांत ताण हाताळण्याचा अभ्यासक्रम ठेवण्याची आवश्यकता आहे. शेतकर्यांच्या आत्महत्यांप्रमाणे हा विषयही संवेदनशीलपणे हाताळला गेल्यास पोलिसांच्या आत्महत्या निश्चितच कमी होतील.
- डॉ. माधवराव सानप
(निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक)
ताणातून व्यसन आणि
त्यातून आत्महत्या!
पोलिसांवरील वाढता ताण आणि आत्महत्यांना त्यांच्यातील वाढते नैराश्य जबाबदार आहे. या नैराश्यामुळेच गेल्या काही वर्षांत पोलिसांमधील व्यसनाधिनता वाढली आहे. कामाची वाढीव जबाबदारी, वेळी-अवेळी ड्यूटी, बंदोबस्ताचा ताण हा त्यांच्या कामाचाच भाग आहे, असे आजकाल सर्वांनाच वाटू लागले आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकार्यांचा आदेश, काहीही करून हुकुमाची अंमलबजावणी. इत्यादी कारणांमुळे पोलिसांवरील दबाव आणखी वाढतो आहे. मन:स्वास्थ्य हरवलेले अनेक पोलीस आमच्याकडे येतात, तेव्हा हा ताण किती वाढला आहे, हे लक्षात येते. हा ताण दूर करण्यासाठी त्यांना ना योग्य पर्याय सुचविला जातो, ना त्यासाठी त्यांना वेळ दिला जातो. यातून ‘सुटण्यासाठी’ अनेकजण मग व्यसनांचा आधार घेतात. त्यातून त्यांचे आरोग्य व कौटुंबिक स्वास्थ्यही हरवते आहे.
शारीरिक स्वास्थाबरोबरच पोलिसांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना झाली पाहिजे. योगासने, स्ट्रेस मॅनेजमेंट कोर्सेस नियमितपणे घेतले गेले पाहिजेत. पोलिसांच्या कौटुंबिक समस्या जाणून घेऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांकडून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली पाहिजे. त्या यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करून दिल्यास ते प्रभावी व प्रामाणिकपणे काम करू शकतील. मानसिक संतुलन व्यवस्थित राहाण्यासाठी शारीरिक व मानसिक जागृतीचे कार्यक्रम प्राधान्याने घेतले पाहिजेत तरच पोलिसांचे मनोबल वाढून ते नैराश्यापासून दूर राहू शकतील.’
- डॉ. अली अकबर गबरानी
(भायखळा येथील ‘डॉ. माचिसवाला हॅपी माइण्ड’ या मनोवैज्ञानिक उपचारकेंद्राचे ज्येष्ठ समुपदेशक)
jameer.kazi@lokmat.com
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य प्रतिनिधी आहेत.)