सैराट मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:05 AM2018-10-21T06:05:00+5:302018-10-21T06:05:00+5:30
पौगंडावस्थेतील मुले अचानक विचित्र वागू लागतात. छोट्या छोट्या कारणांनी रागावतात, चिडतात, हिरमुसतात, शालेय वयातच प्रेमात पडतात, घरातून पळून जातात, आई-बापाच्या जिवाला घोर आणतात. का होते असे?
- डॉ. यश वेलणकर
पौगंडावस्था म्हणजे बाल्य आणि तारुण्य यामधील काल. साधारण बारा-तेराव्या वर्षांपासून अठरा वर्षांपर्यंतच्या या वयोगटातील बरीच मुले सैराट वागतात. शालेय वयातच प्रेमात पडून किंवा थ्रिल म्हणून घरातून पळून जातात, छोट्या छोट्या कारणांनी हिरमुसतात, मोबाइल गेमच्या नादाला लागून रस्त्याने धावत सुटतात, काहीजण तर आत्महत्याही करतात. या वयातील मुले अशी वागतात त्यामागे वैज्ञानिक कारण आहे.
पौगंडावस्थेत त्याच्या मेंदूतील प्री-फ्रण्टल कोरटेक्स पूर्ण विकसित झालेला नसतो. तारुण्यात प्रवेश करताना माणसाच्या शरीरात बदल घडत असतात तसेच मेंदूतदेखील घडामोडी होत असतात. माणसाच्या मेंदूत प्री-फ्रण्टल कोरटेक्स नावाचा भाग असतो. त्याची विवेकबुद्धी, भावनांना योग्य दिशा देण्याची क्षमता आणि स्वयंशिस्त या भागाने नियंत्रित होत असते. या प्री-फ्रण्टल कोरटेक्सचा विकास पौगंडावस्थेत आठव्या, नवव्या वर्षी सुरू होतो आणि तो वयाच्या पंचविशीपर्यंत चालू राहतो. याचाच अर्थ पंचवीस वर्षांपर्यंत हा भाग पूर्ण विकसित झालेला नसतो, काम चालू असते. त्याचे परिणाम या वयात दिसत असतात.
मेंदूतील प्री-फ्रण्टल कोरटेक्स हा भाग भावना नियंंत्रण करीत असतो. कोणती भावना, कधी, कशी व्यक्त करायची ते तो ठरवतो. तारुण्यात होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे उत्साह आणि नैराश्याच्या लाटा उसळत असतात; पण त्यावर वैचारिक नियंंत्रण ठेवणारा प्री-फ्रण्टल कोरटेक्स मात्र पूर्ण विकसित नसतो. त्यामुळेच या वयात इमोशनल स्विंग्स खूप होता. एकेदिवशी आपण जग जिंकू, असा आत्मविश्वास वाटत असतो आणि काही तासांनी मी जगायला नालायक आहे, माझे कुणीही नाही असे वाटू लागते, आपण जग जिंकू असे वाटत असते त्यावेळी वागणे बिनधास्त होते. अचानक सणक आली म्हणून या वयातील मुले कोणतेही धाडस करायला तयार होतात. परिणामांची तमा न बाळगता घरातून पळून जातात. याच वयात स्वत:ची वेगळी ओळख, स्वत:चे विश्व निर्माण करायचे असते. आता पालकांपेक्षा मित्रमैत्रिणी जवळच्या वाटू लागतात, पालकांचे उपदेश ऐकत राहण्यापेक्षा समवयस्क व्यक्तींचा सहवास हवा हवासा वाटू लागतो, त्यांच्यात स्थान निर्माण करण्यासाठी धोकादायक ठरू शकणारे निर्णय घेतले जातात.
कोणतेही बदल अस्वस्थता निर्माण करतात, मानसिक ताण वाढवतात. त्यातच सध्याचे तंत्रज्ञान मनाची ही सैराट अवस्था वाढवायला मदत करते. पूर्वीही हैदोससारखी मासिके असायची, ब्ल्यू फिल्म्सचे व्हिडीओ लपूनछपून पाहिले जायचे. आता हे वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी कोठे जाण्याची आवश्यकता नाही, स्मार्ट फोनवर एका क्लिकमध्ये हे दिसू लागते. यावर उपाय म्हणून काहीजण सोशल मीडिया, स्मार्ट फोन पूर्ण टाळावा, असे सुचवतील. पण आजच्या काळात ते कठीण आहे आणि अनावश्यक आहे. कठीण यासाठी की या वयात मुले बंडखोर होतात. घरात मोबाइल मिळाला नाही तरी मित्रमैत्रिणीकडे तो असतोच. तेथे तो पाहिला जातो. त्यामुळे असे बंधन फारसे शक्य नाही. अनावश्यक यासाठी की नवीन तंंत्रज्ञानाचे चांगले उपयोगही आहेत, त्याकडे पाठ फिरवून चालणार नाही.
या वयातील मुलांशी तर्कशुद्ध, लॉजिकल बोलून फारसा उपयोग नसतो त्याऐवजी त्यांच्या भावना समजून घेऊन मनात येणाऱ्या विविध भावना या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात. उपदेशाचे डोस न देता त्यांना अधिक बोलते करायला हवे. असे केल्याने ती मुले स्वत:च्या भावना नीट समजून घ्यायला शिकतात. या मुलांना त्यांच्या मेंदूची जडणघडण कशी होते आहे याची माहिती सोप्या भाषेत दिली आणि इम्पल्स कंट्रोल करण्याचे साधे उपाय शिकवले तर त्यांची भाविनक बुद्धी वाढू शकते. त्यांचे इम्पलसिव्ह वागणे, तंद्रीत राहणे कमी होऊ लागते. हे मनातील इम्पल्स कंट्रोल करण्याचे उपाय म्हणजेच माइण्डफुलनेसचे ट्रेनिंग होय. माइण्डफुलनेसचे व्यायाम एक दोन मिनिटांत करता येतात आणि त्यामुळे विचारांचे भान वाढते.
या मेंदूच्या व्यायामाने मेंदूतील अटेन्शन सेंटर अधिक सक्रि य होते. त्यामुळे मुले त्यांचे अटेन्शन कोठे ठेवायचे ते निवडू शकतात. ते त्यांच्या मनातील विचारांच्या कल्लोळाला कसे तोंड द्यायचे ते शिकतात. म्हणून वयाची दहा-बारा वर्षे झाली की सर्व मुलांना हे माइण्डफुलनेसचे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे.
परदेशात अशा पद्धतीने माइण्डफुलनेसचे ट्रेनिंग अनेक ठिकाणी दिले जात आहे आणि त्यावर संशोधन प्रसिद्ध होत आहे. अमेरिकेत २००० पेक्षा अधिक शाळा असे ट्रेनिंग देतात. आपल्या देशात मात्र अजून या विषयाची जागरूकता खूप कमी आहे. ही जागरूकता आपणच वाढवायला हवी. आपल्या येथेदेखील मुलांना माइण्डफुलनेस हा मेंदूचा व्यायाम आहे असे समजावून सांगितले तर तो करण्याची त्यांची तयारी असते. आपणच अशी संधी त्यांना उपलब्ध करून द्यायला हवी.
मुले का वागतात अशी?
1 पौगंडावस्थेच्या वयात मन बंडखोर असते. परिस्थिती उलथून टाकायची स्वप्ने मन पाहत असते. मात्र परिणामांचा विचार करणारा प्री-फ्रण्टल कोरटेक्स अजून अविकसित असतो, त्यामुळे अनाठायी धोका पत्करला जातो, बाइक वेगाने चालवली जाते, थ्रिल म्हणून धूम वेग गाठला जातो. म्हणूनच सर्वांत जास्त अपघात याच वयात घडतात.
2 या वयातील मुलांच्या मेंदूत आणखीही बऱ्याच घडामोडी होत असतात. त्यांच्या मेंदूत मायलिनेशन म्हणजे मेंदूतील सूक्ष्म तंतूंवर आवरण बनू लागते. तोपर्यंत
ते नसते.
3 असे आवरण आल्याने त्यातून इलेक्ट्रिक करंट वेगाने वाहू लागतात ज्याचा परिणाम म्हणून मनात असंख्य विचार येऊ लागतात. विचारांची गती आणि संख्यादेखील खूप वाढते. या विचारांमुळे या वयातील मुले तंद्रीत राहतात. समोर कोणी बोलत असेल तिकडे त्यांचे लक्ष राहत नाही, त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप छोटा होतो. याचा दुष्परिणाम अभ्यासावर होऊ शकतो.
4 या वयातील मुलांचा धांदरटपणा या मेंदूतील बदलांचाच परिणाम असतो. त्यांना सांगितलेले लक्षात राहत नाही. बरीच मुले या वयात फार भराभर बोलू लागतात कारण मनात विचार इतक्या वेगाने येत असतात, तेवढा बोलण्याचा वेग असत नाही, तो जुळवून घेण्यासाठी ती भराभर बोलू लागतात.
5 याच वयात शरीरातही बदल होत असतात. शरीरात नवीन लैंगिक हार्मोन्स तयार होऊ लागतात, त्यामुळे मुलींना पाळी येऊ लागते, मुलांना स्वप्नस्खलन होऊ लागते. भिन्न लिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते.
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
yashwel@gmail.com