वाढलेल्या उकाड्याचा अर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:02 AM2019-05-05T06:02:00+5:302019-05-05T06:05:03+5:30
गेल्या आठवड्यात महाराष्टÑात तापमानात अचानक वाढ झाली. नाशिक, पुणे, कोल्हापूर या एरवी थंड समजल्या जाणाऱ्या शहरांमध्येही उष्म्याच्या झळांचे राज्य होते. पुण्यात ५२ वर्षांनंतर तापमान पहिल्यांदाच ४३ अंशांवर पोहोचले होते. अकोला, चंद्रपूर, परभणी येथे तर एकाच दिवशी ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. का होतेय असे? त्यावर उपाय काय?
- अभिजित घोरपडे
महाराष्ट्रात उकाड्याच्या बाबतीत एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा चर्चेत राहिला. विशेषत: २६ ते २९ एप्रिल या काळात राज्याच्या सर्वच भागात तापमान सरासरीच्या कितीतरी वर होते. २७ आणि २८ एप्रिल या तारखांना तर नाशिक, पुणे, कोल्हापूर या एरवी थंड समजल्या जाणाऱ्या शहरांमध्येही उष्म्याच्या झळांचे राज्य होते. त्यामुळे हवामान बदलापासून ते बदललेल्या ऋतुमानापर्यंत अनेक चर्चा सुरू झाल्या. या उकाड्याचा नेमका अर्थ काय, याबाबत चर्चा अजूनही सुरूच आहेत.
उकाडा नेमका किती?
महाराष्ट्राचा विचार करता, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात बरीच वाढ झाली होती. विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र ती जाणवत होती. बहुतांश ठिकाणी पारा दुपारच्या वेळी ४० अंश सेल्सिअसच्या वर चढला होता, तर विदर्भात तो ४६-४७ अंशांपर्यंत पोहोचला होता. पुण्याचे उदाहरण घेऊन हे नेमकेपणाने सांगता येईल. (पुण्याची सविस्तर आकडेवारी उपलब्ध आहे म्हणून हे उदाहरण.) पुण्यात तापमानाने चाळीस अंशांचा टप्पा ओलांडला की उकाडा वाढला, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. तापमान ४१.० – ४१.५ अंशांपर्यंत पोहोचणे ही पुणेकरांसाठी मोठी हैराण करणारी बाब. या वेळी २५ ते २८ एप्रिल या काळात तापमान ४१.६, ४२.६, ४२.९ आणि ४३.० अंश असे वाढत गेले. विदर्भ, खान्देश किंवा मराठवाड्यासाठी ही नोंद विशेष नसली तरी पुण्यासाठी ती खूपच जास्त होती. कारण पुण्याचे तापमान १९६७ सालानंतर म्हणजे बावन्न वर्षांनंतर पहिल्यांदाच ४३ अंशांवर पोहोचले होते. अशीच परिस्थिती राज्याच्या इतर भागातही होती. अकोला, चंद्रपूर, परभणी येथे तर एकाच दिवशी ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या आकडेवारीवरून त्या आठवड्यात नेमकी परिस्थिती काय होती, याचा निश्चित अंदाज येईल.
तत्कालिक व स्थानिक कारणे
हवामानाच्या घटनांना काही तत्कालिक आणि स्थानिक कारणे असतात, तर काही व्यापक आणि दीर्घकालीन. तत्कालिक कारणांमध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातील हवामानाच्या स्थितीचा समावेश होता. उकाडा वाढण्यामागे मुख्यत: हवामानाची एक महत्त्वाची स्थिती कारणीभूत ठरते. ती म्हणजे- हवेच्या जास्त दाबाचे क्षेत्र. एखाद्या भागावर असे क्षेत्र निर्माण झाले की तिथे हवा वरून खालच्या दिशेने येत राहते. हवा वरून खाली येते तेव्हा ती गरम होते. परिणामी, जास्त दाबाच्या क्षेत्रात हवा गरम होते, तिथले तापमान वाढते. त्याचबरोबर हवा खाली येत असल्याने ढगांची निर्मिती होत नाही. त्यामुळे आकाश निरभ्र राहते. ही स्थिती तापमान वाढण्यास अनुकूल ठरते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हिंदी महासागरात दोन चक्रीवादळे होती. चक्रीवादळात हवा वरच्या दिशेने वाहते. पण ती वर गेली की तिला कुठे तरी खाली यावे लागते. ती नेमकी मध्य भारतात खाली येत होती. त्याचा परिणाम म्हणून विदर्भावर हवेच्या जास्त दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते आणि उकाडा वाढण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाली होती. हा हवेचा जास्त दाब जितका जास्त काळ कायम राहील, तितका उकाडा वाढत जातो. त्यामुळेच विदर्भ आणि महाराष्ट्राचा इतर भाग तापला, राज्याच्या तापमानात वाढ झाली. आता ही वादळे किनाऱ्याकडे झेपावलेली असताना (त्यापैकी एक ओरिसा किनाऱ्यावर धडकलेले 'फनी' चक्रीवादळ) तापमानात घट झाली आहे. कारण हवेच्या जास्त दाबाचे क्षेत्र मध्य भारतावरून दूर झाले आहे, त्याची तीव्रता कमी झाली आहे.
या वाढलेल्या उकाड्यात भर म्हणजे सध्या गेल्या वर्षीच्या दुष्काळाचा परिणाम कायम आहे. त्यामुळे जमिनीत तुलनेने कमी बाष्प आहे. या वेळी उन्हाळी पावसाने विशेष हजेरी लावली नाही. तापमान वाढण्यास त्याचाही हातभार लागला. याच्याही पलीकडे बहुतांश लोकांच्या मनात असलेल्या मुद्द्यांचाही संबंध आहेच. शहरीकरणात जमीन सिमेंट-डांबराने झाकली जाते, उष्मा वाढवणारे उद्योग, जीवनशैली वाढीस लागते. झाडांचे आणि वनस्पती आवरणाचे प्रमाण बरेच कमी होते. या सर्व गोष्टींचा परिणाम तापमान वाढण्यात होतो. किंवा आधीच वाढलेल्या तापमानाची तीव्रता आणखी वाढवण्यास हे घटक नक्कीच कारणीभूत ठरतात. त्यांचाही काही प्रमाणात संबंध वाढलेल्या तापमानाशी आहेच. पण एक बाब नेमकेपणाने लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे यांचा संबंध स्थानिक पातळीवरच आहे, मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याशी त्यांचा संबंध नाही, त्यासाठी कारणीभूत ठरतो ते हवेचा जास्त दाब आणि हवामानाचे त्यासारखे व्यापक घटक.
दीर्घकालीन घटक
प्रत्येक वर्षी उकाडा वाढला की त्याचा थेट संबंध हवामानबदलाशी जोडण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र, याबाबत काही काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याचा चर्चेचा विषय असलेली तापमानवाढ हे वास्तव आहे. ते नाकारून चालणार नाही. औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी हवेत कार्बन वायूंचे प्रमाण प्रति दशलक्ष घटकांमध्ये २८० इतके (२८० पार्ट्स पर मिलियन) होते. आता ते वाढून ४०० च्या वर पोहोचले आहे. कार्बन वायूंचा गुणधर्म उष्णता धरून ठेवण्याचा असल्याने त्यांचे प्रमाण वाढले की तापमानात वाढ होणार हे निश्चित. तशी जागतिक पातळीवर ती नोंदवली गेलीही आहे. पण त्याचा स्थानिक तापमानवाढीशी एकास एक संबंध लावता येणार नाही. त्यात ठिकठिकाणी वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळते. याबाबत पुन्हा पुण्याचेच उदाहरण घेऊ. या शहराचे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान ४३.३ अंश सेल्सिअस इतके आहे. ते ३० एप्रिल १८९७ आणि ७ मे १८८९ या दोन दिवशी नोंदवले गेले. या दोन्ही नोंदी १२० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यानंतरच्या पुण्याच्या तीन नोंदी १९५८, १९६०, १९६७ या वर्षातील आहेत. म्हणजे त्याही ५० वर्षे जुन्या आहेत. याच्या विपरित चंद्रपूरची आकडेवारी आहे. चंद्रपूर हे महाराष्ट्रातील (आणि देशातीलसुद्धा) सर्वांधिक उष्ण ठिकाणांपैकी एक. तेथे महाराष्ट्रातील ४९ अंश सेल्सिअस या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. ती नोंद अलीकडची म्हणजे २ जुलै २००७ या दिवसाची आहे. यावरून एक बाब स्पष्ट होते की आपण कोणत्याही एका निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. जागतिक तापमानवाढ हा आताचे तापमान प्रभावित करणारा एकमेव घटक नाही. किंबहुना, त्यासाठी इतर घटक महत्त्वाचे ठरतात. त्यात याही घटकाचे निश्चित काही योगदान आहे. पण ते नेमके किती? हे सध्या तरी आपण सांगू शकत नाही.
हवामानातील चढउतार
हवामानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात नैसर्गिक चढउतार होत असतात. म्हणूनच कोणत्याही घटकांचा थेट संबंध नसतानाही नैसर्गिकरीत्या तापमान कमी - जास्त होऊ शकते. तापमानाप्रमाणेच पाऊस व हवामानाच्या इतर घटकांबाबतही हे पाहायला मिळते. त्याचा भाग म्हणूनही कधी तापमान वाढते. त्याचबरोबर काही वर्षांनंतर उत्पन्न होणारे एल-निनो सारखे घटकही काही भागात मोठ्या प्रमाणात तापमान घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे काही वर्षी तापमान खूपच जास्त वर गेलेले पाहायला मिळते, तर कधी ते तितकेच खालीही येते. या सर्वांकडे तुटक तुटक पाहिले तर वस्तुस्थितीचा अंदाज येत नाही. त्याऐवजी या सर्वांचे एकत्रित चित्र खऱ्या परिस्थितीचे वर्णन करते. तसे करण्यासाठी त्या त्या प्रदेशात हवामानाच्या इतिहासात काय घडले आहे, हे जाणून घेणे आवश्यक ठरते. त्यावरून हे बदल तत्कालिक आहेत की दीर्घकालीन याचाही अंदाज येतो.
म्हणूनच आताच्या उष्णतेच्या लाटेकडे तुटकपणे पाहून चालणार नाही. तिचा आधी घडून गेलेल्या गोष्टींशी कुठे व कसा संबंध लागतो यावर तिचा अर्थ काढणे योग्य ठरेल. तसे पाहिले तर अशा उष्णतेच्या लाटा पूर्वीही येऊन गेल्या आहेत. त्यांची तीव्रता शक्य तितकी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेच. त्यापैकी लगेचचा उपाय म्हणजे आपल्या परिसरात तापमान वाढवणाऱ्या गोष्टी कमी करणे आणि दीर्घकालीन उपाय म्हणजे जागतिक तापमानवाढ होऊ नये म्हणून आपणही काही वाटा उचलणे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक असून, ‘भवताल’ या नियतकालिकाचे संपादक आहेत.)
abhighorpade@gmail.com