...हे ही बदलेल!

By admin | Published: September 2, 2016 04:11 PM2016-09-02T16:11:51+5:302016-09-02T16:11:51+5:30

संगीताच्या प्रचार-प्रसाराला, कलाकाराला विनियोगासाठी आर्थिक गरज आहे ; पण ती गरज लोकप्रतिसादातून भागावी! याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे कलाकारांनी आपली जबाबदारी ओळखून वागायला हवं. सध्याच्या संगीत व्यवसायात एकूणच फारसं उत्साहवर्धक चित्र मला दिसत नाही, पण मी निराश नाही!

... this will change! | ...हे ही बदलेल!

...हे ही बदलेल!

Next

ख्यातनाम गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी संवाद

मुलाखत : राजा पुंडलीक
 

माझ्या जीवनात गाणं अपघातानेच आलं! खरं तर आईच्या आजारपणात तिच्या मनाला जरा शांतपणा मिळावा म्हणून तिला हार्मोनियम शिकवायला आमच्या घरात गाणं आलं. त्यापूर्वी मला नाही वाटत आमच्या घरी कोणी संगीत ऐकलं असेल. पण काही दिवसांतच आईला कंटाळा आला. आता त्या गाणं शिकवायला येणाऱ्या गृहस्थांना नाही कसं सांगायचं, असा प्रश्न वडिलांना पडला असावा. पण मला मात्र तोपर्यंत गाण्याची गोडी लागली होती आणि मग माझीच शिकवणी सुरू झाली’ - प्रभाताई मोकळेपणाने सांगत होत्या. 
‘पुढे कुणीतरी सुचवल्यामुळे माझं संगीत शिक्षण किराणा घराण्याचे विख्यात गायक पं. सुरेशबाबू माने यांच्याकडे गुरू-शिष्य परंपरेने सुरू झालं, पण तेदेखील सुरेशबाबूंनी माझी रीतसर परीक्षा घेतल्यानंतर! मला वाटतं मी त्यावेळी त्यांच्यासमोर राग मधुवंती आणि एक ठुमरी गायले होते. गाणं ऐकायला त्यांच्या भगिनी हिराबाई बडोदेकर पण बसल्या होत्या समोर’ - प्रभातार्इंच्या आठवणी अगदी लख्ख असतात.
सुरेशबाबूंकडे सुरू झालेली ही घराणेदार तालीम उणीपुरी सहा वर्षं चालली आणि सुरेशबाबूंच्या अचानक अकाली निधनाने सलग गुरुमुखातून शिकणं थांबलं! पण एव्हाना शिष्याच्या अंतर्मनात सुरांचा वेल चांगलाच बहरला होता. ‘मुळात सुरेशबाबूंनी मला ‘त्यांच्यासारखं’ गाण्यापासून परावृत्तच केलं. त्यांनी मला नेहमी ‘समांतर’ विचार करायला शिकवलं. त्यामुळे विचार जरी तोच होता तरी माझ्यातून येणारं गाणं माझा स्वभाव घेऊन प्रकट होत होतं. आणि जरी गुरूंचा सहवास फार थोडी वर्षं मिळालेला असला, तरी आमच्यातलं गुरू-शिष्याचं नातं इतकं घट्ट होतं की ते गेल्यानंतर मी कोणालाही गुरुस्थानी बसवू शकले नाही. म्हणूनच त्यांच्यानंतर मी एकलव्याचा मार्ग धरायचा निर्णय घेतला!’ - आपल्या सांगीतिक वाटचालीबद्दल प्रभाताई मोकळेपणानं सांगत होत्या.
प्रभातार्इंची मतं परखड आहेत, पण प्रांजळ आहेत. त्यात विखार नाही, तर संगीतावर असलेले ओतप्रोत प्रेमच फक्त दिसतं. त्यामुळेच आजही प्रभातार्इंचं व्यक्तिमत्त्व रसिकांना लोभवून टाकतं, मग ती मैफल सुरांची असो वा गप्पांची! प्रभातार्इंनीच एका कवितेत लिहून ठेवलंय..
सूर जेव्हा जागे होतात,
कळीसारखे उमलू लागतात, 
लयीबरोबर डोलू लागतात,
भावगंध उधळू लागतात,
येतो मग एखादा रसिक, सुरांचा बादशहा
जपून ठेवतो तो रंग, गंध श्रद्धेच्या ओलाव्यात.
असे सूर मग कधी सुकत नाहीत, गळत नाहीत
अमर होतात मनाच्या गाभाऱ्यात....
- त्यांच्याशी झालेला हा संवाद!



खरं तर आपण सायन्स व लॉ अशा दोन्ही पदव्या प्राप्त करून एक मोठी शैक्षणिक झेप घेतलेली होती. अशा वेळी गाणं हेच करिअर किंवा पूृर्णवेळ व्यवसाय करावा, असं का वाटलं?
- मला प्रयोगशाळेत बेडूक किंवा पालीचं डिसेक्शन करायचं नव्हतं आणि कोर्टात उभं राहून गुन्हेगारांचाही बचाव करायचा नव्हता. ती माझी प्रवृत्तीच नाही. शिवाय स्वरांचं गारुड तर झालंच होतं, त्यामुळे फारसा प्रश्न आलाच नाही. मात्र पूर्णवेळ संगीतालाच द्यायचं ठरवल्यावर मी माझ्या या वेडाला पूरक ठरेल असा आकाशवाणीचा मार्ग धरला. आॅल इंडिया रेडिओवर मी प्रोड्यूसर म्हणून दाखल झाले. 

आकाशवाणीत आपण तब्बल दहा वर्षं काम केलंत, तिथल्या अनुभवाबद्दल आज मागे वळून पाहताना काय वाटतं? 
- आकाशवाणीत सगळ्यात पहिलं म्हणजे कामाचा एक भाग म्हणून मी संगीतरचना करायला लागले. त्यापूर्वी मी कधी एक ओळदेखील स्वरबद्ध केली नव्हती. पण गंमत म्हणजे, रांचीच्या रेडिओ स्टेशनवर रुजू झाल्यावर लगेचच मला एका आॅपेरासाठी संगीतरचना करायला सांगितली. मला क्षणभर सुचेना, पण तिथे एक सारंगीवादक सहकारी होता. त्याच्या सहकार्याने मी एक रचना केली. अर्थातच ती चांगलीच झाली. कारण त्यानंतर मी शेकड्यांनी संगीतरचना केल्या आणि त्या लोकप्रियही झाल्या. 
आकाशवाणीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे मला अनेक कलाकारांना रेकॉर्डिंगच्या वा कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटता आलं, त्यांची पेशकारी जवळून अनुभवता-अभ्यासता आली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात कधी ऐकू न येणारं दाक्षिणात्य पद्धतीचं संगीत मला जवळून ऐकता आलं आणि त्यातल्या सरगमच्या वापराचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. याव्यतिरिक्त उ. अमीर खानसाहेबांच्या सांगीतिक विचारांचा, दृष्टिकोनाचा आणि गायनातल्या सरगमच्या कल्पक योजनेचा माझ्या सांगीतिक बैठकीवर नक्कीच परिणाम झाला!

याच सुमारास आपण शास्त्रीय संगीतात बंदिशी रचायलादेखील सुरुवात केली होती. एकाअर्थी मळलेली वाट सोडून नवीन विचार करावासा का वाटला?
- सुरेशबाबूंच्या आकस्मिक निधनानंतर मी एकलव्याच्या भूमिकेतून स्वत:च शिकत गेले. बाबूरावांनी मला स्वतंत्र विचार करायला तर शिकवलं होतंच, पण मग मला जे प्रचलित गायकीपेक्षा थोडंसं काही वेगळं; माझं म्हणून जे सांगायचं होतं, ते मला उपलब्ध रचनांमधून मांडता येईना. एकाअर्थी या गरजेतूनच माझ्या रचनांना सुरुवात झाली. 
माझी पहिली बंदिश म्हणजे मारुबिहागमधली ‘जागू मै सारी रैना’! ही रचना अतिशय लोकप्रिय झाली आणि आजही तितक्याच आवडीने ऐकली जाते. या बंदिशीने मला रचनाकार म्हणून ओळख दिली!

प्रभाताई, संगीताप्रमाणेच लिखाणालाही खूप लहान वयात सुरुवात केलीत. व्यक्त करण्यासाठी लेखणीचं माध्यमदेखील का हातात घ्यावंसं वाटलं?
- मुळात माझा जन्म अशा घरात झाला जिथे एखादी गोष्ट मला येत नाही, असं म्हणणंच मान्य नव्हतं. प्रयत्न करून पाहा आणि नाही जमलं तरच मग नकार द्या, अशी माझ्या वडिलांची शिकवण. त्यामुळे त्यांचे एक मित्र चालवत असलेल्या ‘रुद्रवाणी’ नावाच्या मासिकासाठी एका संगीतविषयक लेखाची गरज होती, तेव्हा ते काम माझ्याकडे आलं. माझ्या त्या लेखाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आला. पुढे संगीत व्यवसायात पडून जेव्हा कलाकार- गुरू रचनाकार म्हणून काम करायला लागले तेव्हा असं लक्षात आलं की मी माझा सांगीतिक विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा तर मला त्यांना कळेल अशा शब्दांच्या माध्यमातूनच पोहोचवायला हवा. सामान्य रसिकांना सांगीतिक भाषा, त्यातले बारकावे कळतीलच असं नाही; पण शब्द हे उत्तम माध्यम आहे त्यांच्याशी संवाद साधायला. म्हणून लिहित गेले. मग त्यातून संगीतविषयक स्फुटं, आठवणी आणि वैचारिक लेखाचं ‘स्वरमयी’ आलं. त्याच धर्तीचं पण संगीताच्या शास्त्रावर आणि तंत्रावर आधारित लिखाणाचं ‘सुस्वराली’देखील आलं. याव्यतिरिक्त मी रचलेल्या बंदिशींवर आधारित ‘स्वरांगिणी’, ‘स्वरंजनी’ आणि ‘स्वररंगी’ ही पुस्तकंपण प्रकाशित झाली, त्यांचे इतरही भाषांमध्ये अनुवाद झाले. गद्य लिखाणाबरोबरच मला कविताही लिहायला आवडतात. ‘अंत:स्वर’ हा माझा काव्यसंग्रहदेखील प्रसिद्ध आहे. 

१९९२ नंतर मात्र आपण खऱ्या अर्थाने पूर्णवेळ संगीताला वाहून घेतलं. त्यावेळची व्यावसायिक परिमाणं आणि आजचा जमाना यात खूप फरक पडला आहे. आजच्या संगीत व्यवसायाबद्दल आपली काय धारणा आहे?
- या प्रश्नाच्या उत्तरापूर्वी मला इथं एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की, ज्यावेळी मी संगीत व्यावसायिक बनले त्यावेळी जर श्रोत्यांनी मला पसंत नसतं केलं तर मी कदाचित वकिली वगैरे व्यवसायात गेले असते. पण त्यावेळी श्रोत्यांनी माझ्या मैफलींना तिकिटे काढून गर्दी केली, माझ्या रेकॉर्ड्स-कॅसेट्स विकत घेतल्या आणि मला यशस्वी कलाकार केलं. त्यामुळे मी आज जिथं पोचलेय ते माझ्या श्रोत्यांमुळेच! या पार्श्वभूमीवर आज मला तिकीट काढून येणाऱ्या श्रोत्यांच्या घसरणाऱ्या संख्येबद्दल काळजी वाटते. त्यामुळे प्रायोजकांना काहीसं जास्त महत्त्व आलंय की काय, अशी भावना आहे. संगीताच्या प्रचार-प्रसाराला आणि कलाकाराला विनियोगासाठी आर्थिक गरज आहे यात शंका नाही; पण ती गरज लोकप्रतिसादातून भागावी असं मला वाटतं. 
याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे कलाकारांनी आपली जबाबदारी ओळखून वागायला हवं. वक्तशीरपणा, मैफलींमधला व्यावसायिक दृष्टिकोन यासारख्या साध्या गोष्टींमध्येसुद्धा कलाकाराने काटेकोर राहायला हवं. जर कलाकार जबाबदारीने वागत नसतील तर त्यांना त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी श्रोत्यांची-समाजाची आहे. तशीच व तितकीच जबाबदारी प्रसिद्धी माध्यमांची पण आहे. 
पण माध्यमांमध्ये तर आजकाल फक्त वार्तांकन छापून येतं वा दाखवलं जातं. संगीताचे अभ्यासू जाणकार असलेले टीकाकारदेखील आज विरळ झालेत. म्हणून वाटतं की सध्याच्या संगीत व्यवहारात फारसं उत्साहवर्धक चित्र नाही. पण मी आशावादी आहे. जबाबदारीने संगीत मांडणारे अनेक वेगळे कलाकारदेखील क्षितिजावर दिसताहेत, तेव्हा हे दृश्यदेखील बदलेल!


संगीताचा अभ्यासक्रम
डॉ. प्रभा अत्रेंनी १९७९ ते १९९२ या कालखंडात एस. एन. डी. टी. महिला विश्वविद्यालयाच्या संगीत विभागात स्नातकोत्तर अभ्यासाच्या विभागप्रमुख म्हणूनदेखील जबाबदारी समर्थपणे सांभाळली. या कालखंडात विश्वविद्यालयाद्वारे राबविण्यात येणारा संगीतविषयक अभ्यासक्रम पूर्णपणे नव्याने आखण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली.
त्या सांगतात, ‘लोकांच्या मनात असा गैरसमज आहे की संगीताचं शिक्षण म्हणजे फक्त हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत! पण भावसंगीत, चित्रपटसंगीत, लोकसंगीत, पाश्चात्त्य संगीत, इतकंच काय मूळ आपलंच असलेलं पण मध्य-उत्तर भारतात अजिबात ऐकू न येणारं कर्नाटकी / दाक्षिणात्य संगीत हेदेखील स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचे विषय आहेत आणि त्यांचा तसाच स्वतंत्र अभ्यासक्रमाद्वारे समावेश करावासा मला वाटला. म्हणून मी एस. एन. डी. टी.च्या संगीत विभागासाठी नवीन सर्वांगीण-सर्वंकष-सर्वसमावेशक अभ्यासक्रम बनवला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण आणि अनुभूती अधिक उपयोगी झाली, असं मला वाटतं!’


मारुबिहाग आणि 
जागू मैं सारी रैना..
रसिकांच्या माहितीसाठी इथे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं की, ‘जागू मैं सारी रैना’ ही बंदिश डॉ. प्रभा अत्रे यांनी गायलेल्या मारुबिहाग, कलावती आणि खमाज ठुमरीच्या (तत्कालीन) एच.एम.व्ही.ने १९७१ साली प्रकाशित केलेल्या ध्वनिमुद्रिकेद्वारे रसिकांसमोर आली. ही ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.ने हिंदुस्तानी संगीताच्या बाजारात आणलेल्या ध्वनिमुद्रिकांमधे सार्वकालिक, सर्वाधिक लोकप्रिय यादीत अग्रभागी आहे. रेकॉर्ड्सचा जमाना मागे पडल्यानंतर आज डिजिटल युगामध्येही यू-ट्यूबवर ऐकल्या जाणाऱ्या मारुबिहागच्या ध्वनिमुद्रणांमध्ये ही बंदिश शीर्षस्थानी आहे. इतकेच नव्हे तर ‘जागू मैं सारी रैना’ म्हणजेच मारुबिहाग असं समीकरण झालंय जणू! पण अशा इतिहास घडवणाऱ्या रचनेबद्दल बोलतानाही प्रभाताई अगदी साधेपणाने सांगत असतात!

Web Title: ... this will change!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.