मोबाइल इंटरनेट बिलात स्वस्ताईची आणखी चंगळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 06:03 AM2021-09-19T06:03:00+5:302021-09-19T06:05:08+5:30
मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सवलतींची अक्षरशः खैरात वाटली. त्यामुळे कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कंपन्यांवर सरकारचे देणे देण्यासाठी पैशांचा ठणठणाट झाला. या कंपन्यांना तारून नेण्यासाठी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार का?
- पवन देशपांडे
आपला मोबाइल डेटा एवढा स्वस्त आहे की, सध्या रोज एक जीबी डेटा वापरला तरी तो महिनाभर पुरतो. कॉलिंग तर जवळपास मोफतच आहे. त्यामुळे मोबाइलचे जाळे आणि स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सवलतींची अक्षरशः खैरात वाटली. त्यामुळे कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कंपन्यांवर सरकारचे देणे देण्यासाठी पैशांचा ठणठणाट झाला. या कंपन्यांना तारून नेण्यासाठी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार का? मोबाइल बिल कमी येईल का? डेटा पॅक स्वस्त होईल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. या नव्या धोरणामुळे अनेक गोष्टीही बदलणार आहेत.
ग्राहकांना काय फायदा?
तोट्यात चालत असलेल्या टेलिकॉम कंपन्या सेवांचे दर वाढवण्याचा विचार करत होत्या. काहींनी त्याची सुरुवातही केली होती.
आता हा दरवाढीचा सिलसिला थोडा मंदावणार आहे. काही काळ दरवाढ पुढे ढकलली जाईल.
कारण, सरकारने कंपन्यांना व्याजात सूट दिली आहे. कोट्यवधी रुपये त्यातून वाचणार आहेत.
काही बड्या कंपन्या नवे ग्राहक मिळवण्यासाठी इतरांपेक्षा स्वस्त पॅकेजेसही आणू शकतात. त्यामुळे ग्राहकांना फायदाच होईल.
कागदपत्रांची झंजट मिटेल
नव्या मोबाइल कनेक्शनसाठी कागदपत्रे द्यावी लागत होती. ही झंजट कदाचित येत्या काही काळात संपून जाईल.
सर्व कंपन्या डिजिटल स्वरूपातील कागदपत्रे मंजूर करतील. त्यासाठी आधारचा डेटाही वापरला जाऊ शकतो.
४०० कोटी कागदांचा डोंगर या कंपन्यांकडे साचला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट होताना किंवा प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये कन्व्हर्ट करतानाही कागदपत्रे द्यावी लागत होती. आता ती द्यावी लागण्याची शक्यता कमी आहे.
डिजिटल केवायसीची सुविधा आता सुरू करण्यात येणार आहे.
स्पर्धा वाढेल, किंमत पुन्हा घटेल
टेलिकॉम कंपन्यांमध्ये आता १०० टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना परदेशातून निधी जमवणे सोपे होईल. त्यामुळे गुंतवणूकदार तर मालामाल होतीलच. शिवाय, स्पर्धा वाढल्याने सेवांच्या किमतीही पुन्हा कमी होऊ शकतात.
सध्या कोणाचे किती ग्राहक?
एकूण ग्राहक- १२० कोटी
रिलायन्स जिओ- ४३.६ कोटी
भारती एअरटेल- ३५.२ कोटी
व्होडाफोन आयडिया- २७.३ कोटी
बीएसएनएल- १२.५ कोटी
एमटीएनएल- ६२.८ लाख
(जून २०२१ ची आकडेवारी)
(सहायक संपादक, लोकमत)
pavan.deshpande@lokmat.com