लेखकांसाठी OTT सोन्याचे दिवस आणेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 06:03 AM2021-09-26T06:03:00+5:302021-09-26T06:05:11+5:30
नेटफ्लिक्स आणि सर्वच डिजिटल माध्यमे हे टीव्ही आणि सिनेमा यांचे मिश्रण आहे. इथे सतत नवेपणा लागतो आणि त्यासाठी तगडे लेखकही लागणारच आहेत. या जगात आत्ता काय घडतंय?
- अपर्णा पाडगावकर
कोविडच्या काळात ज्या मोजक्या गोष्टींना सोन्याचे दिवस आले, त्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन उद्योगाचा नंबर खूपच वरचा आहे. आता टीव्ही चॅनेल्स बंदच होऊन नेटफ्लिक्स वा तत्सम डिजिटल प्लॅटफॉर्मच राज्य करणार, अशा स्वरूपाच्या चर्चा मीडियामधून रंगू लागल्या. डिजिटल मनोरंजनात काय पाहावं, काय टाळावं, कुठे नवं काय येतं आहे... अशा चर्चा करणारे ग्रुप्स तयार झाले. या प्लॅटफॉर्म्सवर असलेल्या परदेशी कार्यक्रमांची जागा हळूहळू भारतीय कार्यक्रमांनी घेतली आणि मनोरंजनाच्या या नव्या शाखेची दखल घेणं पर्याप्त झालं.
कोणताही नवा उद्योग-व्यवसाय नव्या संधी उपलब्ध करून देत असतो. त्या दृष्टीने या उद्योगामुळे कलाकार, तंत्रज्ञ यांना उत्तम दिवस आले आहेतच; पण या व्यवसायाचा प्रमुख व पायाभूत असलेल्या लेखक या घटकाला नव्या संधी मिळाल्या का, याचं उत्तर शोधणं तितकंच मनोरंजक ठरेल.
स्क्रीन रायटर्स असोसिएशनमध्ये तीस हजार लेखकांची नोंदणी आहे. मनोरंजन उद्योगात येऊ पाहणाऱ्या या लेखकांना (नाटक व जाहिराती वगळता, कारण उद्योग म्हणून त्यांचं अर्थकारण व व्यवस्थापन संपूर्णपणे वेगळं आहे) आतापर्यंत टीव्ही व सिनेमा हीच दोन माध्यमं उपलब्ध होती. तीस वर्षांपूर्वी जन्मलेल्या खासगी प्रसारण टीव्हीने उदयोन्मुख लेखकांना फक्त लेखन हेही उपजीविकेचं साधन होऊ शकेल, हा विश्वास दिला. डिजिटल क्षेत्राचा उदय झाल्यावर यातील अनेक लेखकांची (निर्मात्यांचीही) नजर तिथे वळली.
मात्र, तिथे त्यांचं स्वागत मात्र झालं नाही. भारतीय जनतेची नस ओळखून असणाऱ्या या टीव्ही लेखकांसाठी डिजिटल क्षेत्राची दारे मात्र प्रारंभीच्या काळात सहजतेने उघडली नाहीत. ‘हमें टीव्हीवालों के साथ काम नहीं करना है’, असं तोंडावर ऐकून आलेले लेखक (व निर्माते) अनेक आहेत. याची कारणं प्रामुख्याने टीव्हीच्या कार्यशैलीत आहेत.
रेसमध्ये टिकून राहण्यासाठी टीव्ही मालिकांच्या कथानकात दर आठवड्याला टीआरपीनुसार बदल करीत राहण्याची व्यावसायिक गरज निर्माण झाली आणि लेखक त्याचा पहिला बळी होते. रोज एपिसोड शूट होऊन ऑन एअर गेलाही पाहिजे, या रेट्यात वेळ, चित्रीकरण स्थळ, कलाकार यांच्या उपलब्धतेवर बंधनं येत गेली आणि भारतीय टीव्ही मालिकांचं विश्व प्रामुख्याने घर, कुटुंब आणि तत्संबंधी भावविश्व यांभोवती घोटाळत राहिलं. जसजसा टीआरपी massesला अधिकाधिक आवाक्यात घेत गेला, तसतसं सधन व सांस्कृतिकदृष्ट्या किंचित उन्नत असा विश्वाभिमुख (Exposed to the Global culture) - विशेषतः तरुण प्रेक्षक टीव्ही मालिकांपासून दूर जाऊ लागला.
- आज डिजिटल कार्यक्रम पाहणारा हाच वर्ग आहे.
टीव्हीवाले लोक याच गोष्टीमुळे टाईपकास्ट झाले, डिजीटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांकडून त्यांचा अधिक्षेप प्रारंभीच्या काळात झाला आणि या माध्यमावर बराच काळ केवळ फिल्मवाल्या लेखक-दिग्दर्शकांचीच चलती राहिली. डिजिटल माध्यमांमध्ये अनेक पद्धतींचे विषय हाताळता येऊ शकतात, या गृहीतकाला या फिल्मी लेखकांनीही धक्काच दिला प्रारंभी.
सेन्सॉरमुक्त असल्यामुळे असेल कदाचित; पण हिंसा व सेक्स यांनी ओतप्रोत भरलेले विषयच प्रामुख्याने प्रारंभीच्या भारतीय कार्यक्रमांमधून आढळले. मुंबईचे अंडरवर्ल्ड किंवा उत्तर भारतीय गावरान माफिया, शिव्यांनी भरलेले संवाद आणि सॉफ्ट पॉर्नच म्हणावी अशा पद्धतीची कारणाशिवायची दृश्यं यामुळे काही काळ हलचल माजली खरी. डिजिटल जग हे टीव्हीवरील कार्यक्रमांच्या पार विरुद्ध टोकाला जाऊन बसलं.
बंदीश बँडिट किंवा गुल्लक यासारखे कार्यक्रम आल्यानंतर आता थोडा पर्स्पेक्टिव्ह बदलू लागला आहे आणि कुटुंबाच्या परिप्रेक्ष्यातसुद्धा काही दर्जेदार घडू शकेल, असा दिलासा मिळाल्यानंतर डिजिटल माध्यमकर्मींची टीव्ही लेखकांकडे बघण्याची नजर थोडी बदलू लागली आहे. अर्थात पल्ला लांबचा आहे.
लेखकांना डिजिटल माध्यमामध्ये काम करण्याचं आकर्षण म्हणजे टीव्हीच्या परिप्रेक्ष्याबाहेरचे विषय आणि त्यांची नव्या पद्धतीची हाताळणी करता येणं. अर्थात त्यासाठी आपली नेहमीची कार्यव्यवस्था बदलायला हवी. एका दिवसात एपिसोड ही टीव्हीची गरज आहे, तर डिजिटल माध्यमासाठी लेखकाची किमान वर्षभराची बांधीलकी अपेक्षित आहे. सतत लेखन व पुनर्लेखन करीत राहायला हवं. आपल्याच लेखनाकडे थोडे दूरस्थ होत त्याच कथानकाची किंवा पात्राची काही नवी मांडणी करता येणं शक्य आहे का, ते तपासून
बघायला हवं. टीव्हीवर हे होत नाही, असं नाही; पण त्याला काळाचं एक पक्कं बंधन असतं.
एक मोठा फरक म्हणजे टीव्हीच्या प्रेक्षकाला हेच बघायचं आहे, असा गेल्या काही वर्षांत झालेला पक्का समज, तर डिजिटल माध्यमात जे एकदा झालं आहे, ते न करता सातत्याने काय नवं देता येईल, ते शोधण्याचा प्रयत्न करीत राहावा लागतो.
एका अर्थाने डिजिटल माध्यम हे टीव्ही आणि सिनेमा यांचं मिश्रण आहे, असं म्हणता येईल. कथानकाची निवड कदाचित सिनेमासारखी; पण मांडणी थोडी वेगळी, अधिक वैयक्तिक स्वरूपाची- पात्राच्या (आणि म्हणून प्रेक्षकाच्या) मनाच्या गाभ्यात शिरू पाहणारी अशी आहे.
सिनेमाचा विषय प्रामुख्याने एककेंद्री, नायकाभिमुख असा, तर डिजिटल माध्यमाची गरज अनेककेंद्री (मल्टिपल ट्रॅक्स) विषयाची आहे. अनेक ट्रॅक्स समतोलाने हाताळता येणं, हे टीव्ही माध्यमाचं शक्तिस्थान आहे. ते हाताळणं सोपं नव्हे. त्यामुळेही आता टीव्ही लेखकांना डिजिटल व्यासपीठांची द्वारं किलकिली होऊ लागली आहेत.
या माध्यमात काम करण्याचं एक मोठं आव्हान म्हणजे या माध्यमाला भाषेचा अडसर नाही. तुम्ही तुमच्या विश्वाची, संस्कृतीची गोष्ट जगभरात नेऊ शकता. त्या गोष्टीत आणि कथनात तेवढी शक्ती व नावीन्य मात्र असलं पाहिजे. त्यामुळे म्हटलं तर जग खुलं आहे; पण देशभरातल्या सगळ्याच भाषक लेखकांशी स्पर्धाही करायची आहे. त्यासाठी आवश्यक ते श्रम आणि वेळ देता येणं हीच एकमेव किल्ली
आहे, या विश्वात प्रवेश करण्याची. बाकी, ‘सारा जहाँ हैं आगे...’
aparna@dashami.com