हवा भी रूख बदल चुकी है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:01 AM2019-01-06T01:01:18+5:302019-01-06T01:01:57+5:30

विसाव्या शतकाने सामाजिक-राजकीय परिप्रेक्षातले कमालीचे चढ-उतार बघितले. पहिल्या महायुद्धाच्या रणशिंगाने उघडलेले विसाव्या शतकाचे खाते त्यानंतर रशियन क्रांती, भारतीय स्वातंत्र्य लढा, दुसरे महायुद्ध, विनाशकारक असा अणुबॉम्बचा स्फोट आणि त्यानंतर चाललेले शीतयुद्ध अशा अनेक

The wind has also changed ... | हवा भी रूख बदल चुकी है...

हवा भी रूख बदल चुकी है...

Next
ठळक मुद्दे हवामान बदलाचे ज्या देशांवर सर्वाधिक जास्त परिणाम होणार आहेत त्यातील एक आपला भारत देश आहे आणि आता ते दूर कुठेतरी न राहता आपल्या अंगणात येऊन पोहोचले आहे.

- रसिया पडळकर

विसाव्या शतकाने सामाजिक-राजकीय परिप्रेक्षातले कमालीचे चढ-उतार बघितले. पहिल्या महायुद्धाच्या रणशिंगाने उघडलेले विसाव्या शतकाचे खाते त्यानंतर रशियन क्रांती, भारतीय स्वातंत्र्य लढा, दुसरे महायुद्ध, विनाशकारक असा अणुबॉम्बचा स्फोट आणि त्यानंतर चाललेले शीतयुद्ध अशा अनेक घटनांनी भारून गेले. याच शतकाने विज्ञान-तंत्रज्ञानाची नेत्रदीपक अशी प्रगती बघितली आणि मानवी प्रगतीच्या शक्यतांना अभूतपूर्व उंचीवर नेऊन ठेवले.

इतिहासात अशी अनेक स्थित्यंतरे आलेली आहेत. ज्यावेळी मानवी प्रगतीच्या आड निसर्ग येऊन उभा ठाकला आणि मानवाने बुद्धीच्या जोरावर निसर्गाला थोडेसे वाकवून किंवा एक वळसा घेऊन पुढे मार्गक्रमण केले. आदिम काळापासून विचार केला, तर अगदी शेतीचा शोधदेखील माणसाने निसर्गावर केलेली चढाईच. बीज अंकुरण्याचे शास्त्र समजून घेऊन वनस्पतीच्या वाढीला आपल्या काबूत आणणे, जंगली श्वापदांना माणसाळवून त्यांच्या विविध शक्ती आणि उत्पादनांचा वापर करून घेणे, पाण्याच्या वाफेचा वापर करून मानवी शक्तीच्या बाहेरची कामे त्या वाफेकडून करून घेणे, जमिनीच्या पोटातील कोळसा नावाचे इंधन काढून त्याच्यातील ऊर्जा असंख्य शक्यतांसाठी वापरणे आणि मग पुढे-पुढे जात सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान अशा विविध बाजूने मानवाने निसर्गाला वापरले. त्याच्या शक्तींचा वापर प्रगतीसाठी केला. या शक्तीचे रूपांतर समाजाच्या उन्नतीमध्ये झाले आणि सकलजनांच्या आरामदायी जीवनाकडे मानवी समाजाने वाटचाल सुरू केली. निसर्गाच्या चक्रात केलेले हे थोडे-थोडे बदल कालांतराने वाढत गेले आणि निसर्गनियम आणि मानवी जीवन यामध्ये दरी निर्माण झाली. नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंध वापर केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेच्या शक्यता कमी करत नाहीत, तर पर्यावरणाच्या, हवामानाच्या, अन्न साखळीच्या मूलभूत चक्रांमध्येदेखील काही बदल घडवू शकतो, असे चित्र हळूहळू समोर येऊ लागले.

त्यामुळेच, साधारण ७०च्या दशकात जागतिक पातळीवर पर्यावरणविषयक हालचाली सुरू झाल्या. १९७२ साली संयुक्त राष्ट्रसंघाने आयोजित केलेल्या स्टॉकहोम येथील पहिल्या वसुंधरा परिषदेत पर्यावरणाच्या ºहासाने होणाऱ्या अनेक शक्यतांचे पदर उलगडायला सुरुवात केली. पर्यावरणविषयक स्थानिक प्रश्नांपासून, जागतिकपातळीवरचे मुद्दे या परिषदेत मांडले गेले. या परिषदेनंतर अनेक देशांनी पर्यावरणविषयक कायदे करायला सुरुवात केली. भारतानेदेखील, वॉटर (प्रेव्हेंशन अ‍ॅँड कंट्रोल आॅफ पोल्युशन) १९७४ असा पहिला पर्यावरणविषयक कायदा १९७४ साली केला. ओझोन आवरणाच्या सुरक्षिततेसाठी १९८७ साली करण्यात आलेला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हादेखील पर्यावरण चळवळीच्या इतिहासातील जागतिक प्रयत्नांचे एक उत्तम उदाहरण होते. अशाच प्रकारे विषारी रसायनांच्या वाहतुकीसंदर्भात बेसल करार, वन्यजीवांची तस्करी थांबविण्यासाठीचा करार, पाणथळ जागांच्या संवर्धनासाठीचा रामसार करार, असे अनेक करार ७० नंतरच्या काळात जागतिक पातळीवर झाले. संयुक्त राष्ट्रसंघाने या कामामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली.

एकविसावे शतक सुरू झाले ते मात्र निसर्ग नियमांच्या बदलाच्या अधिक गंभीर रूपाने. याआधीचे बहुतांश पर्यावरणीय मुद्दे आणि प्रश्न एकरेषीय होते, प्रादेशिक होते; परंतु २१ व्या शतकासमोर वाढून ठेवलेल्या जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल ह्या प्रश्नांचा आवाका फारच मोठा, क्लिष्ट, बहुआयामी, मानवी सभ्यतेच्या आणि प्रगतीच्या सर्व क्षेत्रांवर परिणाम करणारा ठरणार, असे संशोधकांचे भाकीत येणारे वर्तमान खरे ठरवत निघाले आहे. जागतिक हवामान बदल हा या शतकाचा कळीचा आणि अग्रगण्य मुद्दा होत चालला आहे.

काय आहे हवामान बदल?
हवा आणि हवामान हे खरेतर आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. एखाद्या ठिकाणचे तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता या बाबी तेथील शेती, पाण्याची उपलब्धता आणि पर्यायाने विकासाच्या शक्यता आणि आराखडा ठरण्यास कारणीभूत असतात. शतकानुशतकांच्या हवेच्या मापकांच्या अनुभवाने तेथील हवामान ठरत असते. ऋतुमानानुसार या हवामानामध्ये जो बदल होत असतो तोदेखील एका विहित मर्यादेत होत असतो. त्याने एक लय सांभाळलेली असते आणि त्या-त्या ठिकाणचे सरासरी हवामान आणि हवामानाच्या कमाल आणि किमान शक्यता निर्धारित झालेल्या असतात. शतकानुशतके बसलेल्या ह्या घडीमध्ये जेव्हा अनपेक्षित असे बदल व्हायला सुरुवात होते तेव्हा परिस्थिती चिंताजनक बनते. हा हवामान बदल मोजण्याचे काही नियम असतात आणि ह्या मापनांच्या आधारे खरोखर हा हवामान बदल वाढत्या कलाने आणि जागतिक पातळीवर सुरू आहे की, केवळ स्थानिक बाबींमुळे झाला आहे हे पडताळून बघता येते. गेली अनेक वर्षे जगभरात सुरू असलेल्या संशोधनातून आता हे स्पष्ट झाले आहे की, हवामान बदलाच्या घटना या स्थानिक नाहीत. जागतिक पातळीवर पृथ्वीचे सरासरी तापमान वाढते आहे आणि हे वाढलेले तापमान हवामानाच्या सर्व घटकांवर परिणाम करत आहे. यालाच जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल, असे संबोधले जात आहे.

सद्य:परिस्थितीत पृथ्वीचे सरासरी तापमान पूर्व औद्योगिक काळापेक्षा ०.५ ते १ डिग्री सेल्सिअसने वाढलेले आहे. आता असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की, ०.५ ते १ डिग्री सेल्सिअसने तापमान वाढले तर असा काय मोठा फरक पडणार आहे? घरात एखादा पंखा वाढविला किंवा एसीचे तापमान २ अंशांनी कमी केले की काम झाले. त्याचा एवढा बाऊ करण्याची गरज काय? पण प्रश्न केवळ तापमान वाढीचा नाही.
०.५ ते १ अंशांनी वाढलेले हे तापमान हवामानाच्या सर्व घटकांवर परिणाम करीत असते. तापमान हा हवामानातील निर्धारक आणि हवामानाच्या सर्व घटकांमध्ये असणारे आंतरसंबंध प्रभावित करणारा अत्यंत
महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ ही केवळ तापमान वाढीपुरती मर्यादित राहत नाही, तर ती संपूर्ण जगाचे हवामान बदलण्यास कारणीभूत ठरू शकते आणि ठरत आहे.
भारतामध्ये गेली काही वर्षे सुरू झालेली मान्सूनची अनिश्चितता, पश्चिमी किनाºयावर येऊन थडकणारी वादळे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव येथील वेगाने वितळणाºया बर्फाच्या टोप्या, हिमालयातील माघार घेऊ लागलेली हिमशिखरे, नुकताच झालेला केरळमधील हाहाकार माजवणारा पूर आणि त्यानंतर कमालीचे वाढलेले तापमान हे सारे कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने हवामान बदलाशी निगडित असणारे वास्तव आहे. हवामान बदलाचे ज्या देशांवर सर्वाधिक जास्त परिणाम होणार आहेत त्यातील एक आपला भारत देश आहे आणि आता ते दूर कुठेतरी न राहता आपल्या अंगणात येऊन पोहोचले आहे.

Web Title: The wind has also changed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.