स्त्रिया आणि काटकसर

By admin | Published: October 14, 2016 02:36 PM2016-10-14T14:36:44+5:302016-10-14T15:11:51+5:30

वस्तू साठवून ठेवायला स्त्रियांना आवडतं, त्यामध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक असते, त्यामुळे निरुपयोगी गोष्टीही त्या कवटाळून बसतात,

Women and Crimson | स्त्रिया आणि काटकसर

स्त्रिया आणि काटकसर

Next

 
- शर्मिला फडके

वस्तू साठवून ठेवायला 
स्त्रियांना आवडतं, त्यामध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक असते,
त्यामुळे निरुपयोगी गोष्टीही 
त्या कवटाळून बसतात,
असं स्त्रियांविषयी म्हटलं जातं,
पण ते खरं नाही. 
खरं तर दु:खद, त्रासदायक आठवणींना मागे टाकून 
आयुष्य नव्यानं सुरू करण्याची 
उपजत क्षमता स्त्रियांमध्ये असते. त्यामुळे स्त्रिया तडजोडीला 
कायम तयार असतात आणि
अनावश्यक गोष्टी उराशी कवटाळून
बसण्यापेक्षा नव्या आव्हानांना
त्या कायम सामोरं जात असतात.
घरातल्या अडगळीलाही 
त्या अशाच सामोरं जातात
आणि त्यासाठी अख्ख्या
घरालाही तयार करतात..



स्त्रिया आणि मिनिमलिझम या दोन गोष्टी एकत्र येणे हे पुरुषांच्या तुलनेत अतिशय अवघड असा एक (गैर) समज आढळतो. कदाचित स्त्रियांना खरेदीची जास्त आवड असते, त्यांना वस्तू साठवून ठेवायला आवडतात, वस्तू टाकून द्यायला त्या नाखूश असतात, घरातल्या जुन्या वस्तू, भांडी, कपडे यांच्यात त्यांची भावनिक गुंतवणूक जास्त असते वगैरे जनरलीच अनेकांच्या मनात असलेले समज स्त्रिया आणि मिनिमलिझम एकत्र नांदू शकत नाही किंवा स्त्रिया मिनिमलिझमकडे स्वत:हून वळणे दुर्मीळ या गृहीतकाला कारणीभूत असू शकतात. 
खरंच तसं असतं का? 
गेल्या दहा वर्षांमध्ये नव्याने पुनरुज्जीवित झालेल्या मिनिमलिझम चळवळीमध्ये किती स्त्रिया आहेत पुरुषांच्या तुलनेत असा एक ढोबळ अभ्यास केला तरी हा समज किती निराधार आहे हे सहज लक्षात येते. द मिनिमलिस्ट वुमन हा ब्लॉग गेली अनेक वर्षं चालवणारी मेग वुल्फ आणि तिच्या ब्लॉग साखळीत जोडल्या गेलेल्या अनेक स्त्रिया आणि त्यांचे मिनिमलिझमचे अनुभव, विचार हेच सिद्ध करतात की स्त्रिया अतिशय सहजतेने मिनिमलिझमच्या तत्त्वांना आपलेसे करू शकतात. मुळातच झेन तत्त्वज्ञानाची आवड असणाऱ्या मेग वुल्फला मिनिमलिझम हा स्वत:च्या घराकरता आणि व्यवसायाकरता उपयुक्त वाटलाच शिवाय त्यामुळे आपण भावनिकदृष्ट्याही जास्त सक्षम आणि कार्यशील बनत चालल्याचे तिच्या लक्षात आले. मेगच्या मते स्त्रिया जास्त खरेदी करतात, वस्तूंमध्ये गुंततात, आपल्या आसपास आवडत्या गोष्टींचा पसारा असणे त्यांना आवडते या कशाहीपेक्षा जास्त महत्त्वाची एक गोष्ट त्यांच्याजवळ असते, जी मिनिमलिझमच्या दृष्टीने आत्यंतिक गरजेची, ती म्हणजे ‘मुव्हिंग आॅन’. दु:खद, नकोशा, त्रासदायक आठवणींना, परिस्थितीला मागे टाकून त्या अतिशय सहजतेनं आयुष्यात पुढे जाऊ शकतात. आपले आयुष्य नव्याने सुरू करू शकतात. शिवाय परिस्थितीशी, वातावरणाशी तडजोड करण्याची क्षमता त्यांच्यात जास्त असते. एकदा जे ठरवलं आहे ते पार पाडण्याचा किंवा त्यानुसार वागण्याचा निग्रहही त्यांच्यात जास्त असतो. 
मिनिमलिझम वैयक्तिक पातळीवर यशस्वी करून दाखवणारे स्त्री आणि पुरुष यांच्या आकडेवारीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन मिनिमलिझम अंगीकारणे किती जणांना शक्य झाले. याबाबतीत स्त्रिया नि:संशयपणे पुरुषांपेक्षा जास्त संख्येने यशस्वी झाल्या आहेत आजवर. एक स्त्री शिकली की सारे घर शिकते या गृहीतकालाच पुढे नेणारी ही गोष्ट आहे. 
क्रिस्तिन बोसिल या स्विडिश गृहिणीचे याबाबतीतले अनुभव महत्त्वाचे आहेत. ‘द मिनिमलिस्ट वुमन’ या ब्लॉगवरच्या गेस्टपोस्टमध्ये तिने आपली तीन मुले, एक मुलगी आणि नवरा या कुटुंबामध्ये मिनिमलिझम कसा रुजवला हे लिहिले आहे. क्रिस्तिनच्या मते सर्वात कठीण भाग होता मुलांना खेळणी आणणे कमी करणे/बंद करणे. मनाला गिल्ट देणारा हा प्रकार होता. 
आपण पैसे कमावतो ते मुलांना सुखी आयुष्य देणे शक्य व्हावे याकरता आणि तिच्या मते सुखी आयुष्याची संकल्पना अनेकदा भरपूर खेळणी आणून देणे इथवरच ती अनेक पालक सीमित ठेवतात. मुलांना सारखेच काही ना काही तरी नवे हवे असते आपले मन रमवायला. पण त्याकरता त्यांना खेळणीच लागतात असे नाही, हे क्रिस्तिन आवर्जून सांगते. 
मुलांना आपल्यातल्या ऊर्जेला, कल्पनाशक्तीला, क्रिएटिव्हिटीला वाव हवा असतो. बाजारातून आयत्या आणलेल्या महागड्या खेळांमध्ये ही क्षमता नक्कीच असते. पण पालकांनी जर आपली स्वत:ची कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी आणि बौद्धिक क्षमता वापरली तर मुलांची ही गरज घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमधून सहज भागवली जाऊ शकते. मुलं ते जास्त एन्जॉय करतात. 
क्रिस्तिनने सुरुवात केली आपल्या मुलीला बाहुली आणि बाहुलीचे घर बनवून देण्यापासून. तिच्या आठवणीत आपल्या लहानपणी पाहिलेली तिच्या आजीच्या लहानपणातली चिंध्यांपासून बनवलेली एक कापडी बाहुली होती. क्रिस्तिनने जुन्या, रंगीत कापडांच्या तुकड्यांमधून तशीच एक बाहुली मुलीकरता बनवली. त्यात मुलीला लहान झालेल्या तिच्या आवडत्या ड्रेसेसचे तुकडे जोडलेले होते. ते पाहून मुलगी इतकी खूश झाली की आपल्या इतर सगळ्या महागड्या बाहुल्या आणि खेळ सोडून ती त्यातच रमली. 
मुलीने मग स्वत: क्रिस्तिनच्या मदतीने त्या बाहुलीसारख्या इतर बाहुल्या, स्टफ्ड टॉइज इत्यादि आपल्या वॉर्डरोबमधील सामग्री वापरून बनवल्या. शाळेतल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हे कापडी बाहुल्यांचे लोण पसरले. त्यानंतर मग क्रिस्तिन आणि तिच्या नवऱ्याने घरातल्या वस्तूंमधून चेंडू, पंचबॅग बनवल्या. वर्तमानपत्रे आणि रंगीत मासिकांमधून पझल्स बनवली, शब्दकोडी तयार केली. या घरगुती खेळण्यांच्या निर्मितीसंदर्भात कम्युनिटीतल्या इतर पालकांकरता क्रिस्तिन आणि तिचा नवरा मोफत प्रशिक्षण वर्गही चालवतात. 
मुलांना भरपूर खेळणी आणि वस्तू, कपडे आणण्याची सवय आपणच लावलेली असते. ती मोडायला आपल्याला जरा जास्त कष्ट, वेळ द्यावा लागतो. त्यामुळे क्रिस्तिनच्या मते तिच्या मिनिमलिझम स्वीकारण्याच्या आव्हानातला हा सर्वात कठीण आणि सर्वात मनोरंजक भाग. एकदा हे आव्हान पार पडल्यावर कपड्यांचा पुनर्वापर, चारचाकी वाहनाचा कमीतकमी वापर करून सायकलची किंवा पायी चालण्याची सवय लावणे, बाजारातले विकतचे, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणण्याऐवजी घरीच केलेले साधे, पौष्टिक अन्न खाणे, आपल्या घराच्या अंगणामध्ये भाज्या, फळे लावणे, वीकेण्ड्सना सहलीकरता ठिकाण निवडताना थीम पार्क्स किंवा महागड्या पर्यटनस्थळांच्या ऐवजी समुद्रकिनारे, वस्तु-संग्रहालये, सार्वजनिक बागांमध्ये कुटुंबासहित जाणे, पुस्तके विकत आणण्यापेक्षा गावातल्या समृद्ध लायब्ररीचा वापर करण्याची सवय लावणे अशा अनेक गोष्टी क्रिस्तिनने केल्या आणि त्या सर्वच्या सर्व यशस्वी झाल्या. वेळ नक्कीच लागला पण एकदा सहकार्य मिळायला लागल्यावर गोष्टी फारच आनंददायक आणि सोप्या होत गेल्या.
‘द मिनिमलिस्ट वुमन’ची ब्लॉगलेखिका मेग वुल्फ हिने मिनिमलिझम आणि स्त्रिया या संदर्भातले आपले अनुभव आणि विचार मांडले आहेत. पर्यावरण आणि मिनिमलिझम या हातात हात घालून चालणाऱ्या दोन गोष्टींशी स्त्रियांचा कायमच फार जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध कसा आहे हे त्यातून स्पष्ट होत जाते. पुढच्या भागामध्ये त्याबद्दल जाणून घेता येईल.

 

 

Web Title: Women and Crimson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.