अद्भुत, रंगारंग पुरस्कार सोहळा आॅस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 01:25 AM2020-02-09T01:25:06+5:302020-02-09T01:25:43+5:30
हॉलिवूडसह संपूर्ण सिनेजगताचे लक्ष लागून असलेल्या ९२व्या आॅस्कर पुरस्काराचे वितरण ९ रोजी होत आहे. भारतीय वेळेनुसार १० फेब्रुवारीला सकाळी साडेसहाला २४ कॅटेगरीत आॅस्करचे वितरण होईल. हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा अद्भुत वरंगारंग सोहळा होईल.
- आप्पासाहेब पाटील-
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘जोकर’ आणि ‘वन्स अपॉन टाईम इन हॉलिवूड’ या चित्रपटांमध्ये पुरस्कार मिळवण्यात खरी चुरस असेल, असे नामांकनामधून दिसत आहे. यंदाच्या पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा १३ जानेवारीला करण्यात आली आहे. त्या अगोदर त्यासाठी मतदानप्रक्रिया सुरूहोती. ‘जोकर’ चित्रपटास तब्बल ११ नामांकने मिळाली आहेत. यात उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता यांसह वेगवेगळ्या कॅटेगरीचा समावेश आहे. त्या खालोखाल ‘दि आयरिश मॅन’, ‘१९१७’ आणि ‘वन्स अपॉन टाईम इन हॉलिवूड’ या चित्रपटांना प्रत्येकी दहा-दहा नामांकने मिळाली आहेत. त्यामुळे हे चित्रपटही ‘जोकर’च्या बरोबरीने आॅस्कर पटकावण्याच्या रेसमध्ये असतील. ‘जोजो रॅबिट’, ‘दि लिटल वूमन’, ‘मॅरेज स्टोरी’ व ‘पॅरासाईट’ यांना प्रत्येकी चार नामांकने विविध श्रेणीत मिळाली आहेत. त्या खालोखाल ‘फोर्ड व्ही फेरारी’ या चित्रपटास तीन नामांकने मिळाली.
यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या कॅटेगरीत ‘जोकर’, ‘वन्स अपॉन टाईम इन हॉलिवूड’, ‘दि आयरिश मॅन’, ‘लिटल वूमन’, ‘जोजो रॅबिट’, ‘मॅरेज स्टोरी’, ‘१९१७’, ‘पॅरासाईट’, ‘फोर्ड व्ही फेरारी’ या चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या नामांकनामध्ये एंटोनियो बैन्डरस (पेन अॅन्ड ग्लोरी), टायटॅनिक फेम अभिनेता लियोनार्डो डिकैप्रियो (वन्स अपॉन टाईम इन हॉलिवूड), एडम ड्राइव्हर (मॅरेज स्टोरी), जॉकिन फोनिक्स (जोकर) व जोनाथन प्रेस (दि टू पोपस) यांचा समावेश आहे. यातील ‘जोकर’ चित्रपट गतवर्षी तुफान हिट ठरला होता. मात्र, खरी चुरस फोनिक्स व डिकैप्रियो यांच्यात असेल.
सहायक अभिनेत्याच्या श्रेणीत टॉम हँक्स (ए ब्युटीफूल डे इन दि नेबरहूड), अँथनी हॉपकिंग्स (दि टू पोपस), स्कारफेस, गॉडफादर फेम अल पचिनो (दि आयरिश मॅन), जॉय पेस्की (दि आयरिश मॅन) व ब्रॅट पिट (वन्स अपॉन टाईम इन हॉलिवूड) यांना नामांकन मिळाले आहे. सर्वाेत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत सिंथिया एरिवो (हॅरिंट), स्कारलेट जोहान्सन (मॅरेज स्टोरी), साईओर्स रोनेन (लिटल वूमन), चार्लीज थेरॉन (बॉम्बशेल) व रेने जेलेगर (ज्यूडी) यांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे नामांकन मार्टिन स्कोर्सेस (दि आयरिश मॅन), टॉड फिलीप्स (जोकर), सॅम मेंडेस (१९१७), क्वि टिंन टॅरेन्टोनो (वन्स अपॉन टाईम इन हॉलिवूड) व बाँग जान हू (पॅरासाईट) यांना मिळाले. यामध्ये टॉड फिलीप्स व क्विटिंन टॅरेन्टोनो आघाडीवर आहेत. ‘पॅरासाईट’ चित्रपट दक्षिण कोरियाचा असून त्याला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या कॅटेगरीतूनही नामांकन मिळाले आहे.
विज्युअल इफेक्ट श्रेणीत ‘अॅव्हेंजर : एंडगेम’, ‘आयरिश मॅन’, ‘लायन किंग’, ‘१९१७’ व ‘स्टार वॉर्स : दि राईज आॅफ स्कायवॉकर्स’ या चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.
२०१९ मध्ये कमाईचे रेकॉर्ड करणारा ‘अव्हेंजर : एंडगेम’ हा चित्रपट केवळ विज्युअल कॅटेगरीत नामांकन मिळवू शकला. तो अन्य कॅटेगरीत स्थान मिळवू शकला नाही. जोया अख्तर दिग्दर्शित व रणवीरसिंह याच्या कसदार अभिनयाने गाजलेला ‘गल्लीबॉय’ चित्रपट विदेशी भाषा कॅटेगरीत आॅस्करला पाठविला होता. मात्र, या चित्रपटाचा टिकाव लागला नाही. डॉक्युमेंटरी श्रेणीत पाठविलेला ‘मोतीबाग’ चित्रपटही नामांकन मिळवू शकला नाही. पुरस्कार वितरण सोहळा अॅकॅडमी आॅफ मोशन पिक्चर अॅन्ड सायन्स यांच्याबरोबरील करारानुसार एबीसीहून जगभरातील २२६ हून अधिक देशांमध्ये लाईव्ह प्रसारित होईल. सोहळ्यात हॉलिवूडचे दिग्गज कलाकार स्टीव्ह मॉर्टिन, किनू रिव्हस, सलमा हेक हे अॅकरिंग व सादरीकरण करणार आहेत. पॉप सिंगर बिली आयलीश, पॉपसिंगर एल्टन जॉन व जानेली मोनाए हे गाण्याचे सादरीकरण करून लक्ष वेधतील. तत्पूर्वी, रेड कार्पेटवर जगभरातील अभिनेत्रींचा जलवा मोहित करून टाकेल.
- यंदा आॅस्करवर नेटफ्लिक्सची छाप
मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रात जगभरात आपला विस्तार करीत असलेल्या नेटफ्लिक्स कंपनीची यंदाच्या आॅस्करवर छाप असणार हे निश्चित झाले आहे. यंदाच्या रेसमध्ये नेटफ्लिक्स निर्मित चित्रपटांनी वेगवेगळ्या कॅटेगरीत २४ नामांकने पटकावली आहेत. त्या खालोखाल डिस्ने कंपनीने २३, तर सोनी कंपनीने २० नामांकने पटकावली आहेत. नेटफ्लिक्सच्या आयरिश मॅन (१०), मॅरेज स्टोरी (६), दि टू पोपस (३) व पहिल्यांदाच अॅनिमेटेड फिल्म क्लाऊजने अॅनिमेटेड कॅटेगरीत नामांकन मिळवले आहे. नेटफ्लिक्सच्या ‘अमेरिकन फॅक्टरी’ आणि ‘दि एज आॅफ डेमोक्रॅसी’ या डाक्युमेंटरीने या कॅटेगरीत, तर शॉर्ट डाक्युमेंटरी कॅटेगरीत ‘लाईफ ओव्हरटेक मी’ने नामांकन मिळविले आहे. नेटफ्लिक्सची गेल्या काही वर्षांपासून आॅस्करमध्ये यश मिळविण्यासाठी धडपड सुरू होती. त्याला यंदाच्या आॅस्करमध्ये यश मिळाले. कंपनीने २०१४ (१), २०१५ (१), २०१६ (२), २०१७ (३), २०१८ (८), २०१९ (१५) आणि यंदा २४ नामांकनांपर्यंत मजल मारली आहे. नेटफ्लिक्सला यंदा नामांकनांपैकी किती आॅस्कर पटकावण्याचा मान मिळतो, हे ९ फेब्रुवारीलाच समजेल.
(लेखक, ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)