लंकेच्या जंगलात..

By Admin | Published: August 12, 2016 05:32 PM2016-08-12T17:32:42+5:302016-08-12T18:24:01+5:30

जंगलांचा अनुभव घ्यायचा, ‘वाइल्ड लाइफ’ बघायचं तर सर्वात आधी आपल्याला नावं आठवतात ती केनिया, टांझानिया, साउथ आफ्रिका अशीच. पण आपल्या शेजारी देशाचा विचार आपल्या मनात अपवादानंच येतो. आपल्यापेक्षा तिथं काय वेगळं असेल असा आपला समज, पण ते तिथं गेल्यावरच कळतं..

In the woods of Lanka .. | लंकेच्या जंगलात..

लंकेच्या जंगलात..

googlenewsNext

- मकरंद जोशी

आपण पर्यटनाला म्हणजेच सहलीला का जातो, तर काहीतरी वेगळं बघायचं असतं म्हणून. म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर विदर्भ मराठवाड्यातील लोकांना मुंबईचा किंवा गोव्याचा समुद्र भुरळ पाडतो. राज्यपातळीवर सांगायचं तर दक्षिणेतल्या राज्यातील लोकांना मनाली किंवा गुलमर्गचा बर्फहवासा वाटतो. त्याचप्रमाणे देशाबाहेर, परदेशात जातानाही आपण शक्यतो युरोप किंवा आॅस्ट्रेलिया किंवा जपानसारख्या आपल्यापेक्षा अगदी भिन्न हवामान, भूप्रदेश, निसर्ग असलेल्या ठिकाणांची निवड करतो. त्यात जेव्हा खास वाइल्ड लाइफ बघण्यासाठी जायचं असतं तेव्हा तर सर्वात आधी नावं आठवतात ती केनिया, टांझानिया, साउथ आफ्रिका अशीच. पण आपल्या देशाला लागूनच असलेल्या देशांचा विचार सहसा केला जात नाही. का? तर आपल्या शेजारच्या देशातला निसर्ग, तिथलं वन्यजीवन यात वेगळं काय असणार असा आपला समज..
निसर्गाची किमया मात्र आपल्या कल्पनेपेक्षा महान आहे. म्हणून तर भारतासारख्या एकाच देशात वाळवंटातील आणि बर्फातीलही वन्यजीवन पाहायला मिळतं. त्यामुळे शेजारी आहे मग वेगळं काय असणार, अशा विचाराने जर तुम्ही लंकेच्या जंगलांकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही एका संस्मरणीय जंगलानुभवाला नक्की मुकला आहात.
भारतीय उपखंडाच्या दक्षिण टोकाला, हिंदी महासागरात असलेलं चिमुकलं बेट म्हणजे श्रीलंका. रामायणापासून या बेटाशी आपला संबंध आहे, त्याची खूण असलेला ‘राम सेतू’ किंवा ‘अ‍ॅडम्स ब्रिज’ आता अवशेष रूपाने शिल्लक आहे. मुळात सुमारे वीस कोटी वर्षांपूर्वी भारत आणि श्रीलंका दोन्ही ‘गोंडवन’ या एकाच मोठ्या भूभागाचा भाग होते. नंतर भूगर्भातील उलथापालथींमुळे दक्षिण गोलार्धातील भूभाग उत्तरेकडे सरकू लागला आणि भारत, श्रीलंका मिळून एकत्रपणे आशिया खंडाच्या प्लेटवर आदळले. त्यानंतरच्या हिमयुगानंतर बर्फ वितळल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आणि श्रीलंका बेट बनलं. हे साधारणत: साडेसात, आठ हजार वर्षांपूर्वी घडलं. त्यामुळे एकीकडे श्रीलंकेचे हवामान, तिथले वन्यजीवन भारतासारखंच आहे आणि तरीही वेगळं आहे. म्हणजे साम्य सांगायचेच तर भारताप्रमाणेच श्रीलंकेत हत्ती आहेत आणि फरक म्हणाल तर वाघ नाहीत. अर्थात हा ढोबळ भाग झाला. वाघ नसल्याने श्रीलंकेच्या वन्यजिवांमध्ये सर्वोच्च शिकारी आहे तो बिबट्या. दिसायला भारतातील बिबट्यासारखाच असला तरीही श्रीलंकन उपजात भारतीय बिबट्यापेक्षा वेगळी मानली जाते. श्रीलंकेतील याला, वेलापट्टू या नॅशनल पार्क्समध्ये त्याचे दर्शन सहज होऊ शकते. श्रीलंकेतील आकाराने दुसऱ्या क्र मांकाचा असलेला ‘याला नॅशनल पार्क’ पाच वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये विभागलेला आहे. कोलम्बो या राजधानीच्या शहरापासून ३०० किलोमीटर्सवर असलेल्या ‘याला’च्या जंगलाला सागरकिनाऱ्याची सोबतही लाभलेली आहे. मॉइस्ट मान्सून फॉरेस्टपासून ग्रास लँडपर्यंत आणि मरिन वेटलँड्सपासून थॉर्न फॉरेस्टपर्यंत विविध प्रकारचं जंगल ‘याला’मध्ये पाहायला मिळतं. सुमारे पंचवीस बिबटे या जंगलाच्या आश्रयाने राहतात. शिवाय श्रीलंकन अस्वले, हत्ती, वॉटर बफेलो, टोक मकाक, गोल्डन पाम सिव्हेट, रेद स्लेंडर लोरिस असे सस्तन प्राणी इथे दिसू शकतात. इथे जे २१५ प्रकारचे पक्षी दिसतात त्यापैकी श्रीलंका ग्रे हॉर्निबल, श्रीलंका वुड पिजन, श्रीलंका रेड जंगल फाऊल, ब्राउन कॅप्ड बॅबलर, क्रिम्झन फ्रंटेड बार्बेट असे काही फक्त श्रीलंकेतच दिसणारे पक्षी लक्ष वेधून घेतात. 
‘याला’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथल्या किनारपट्टीवर लेदरबॅक, आॅलिव्ह रिडले, लॉगरहेड, हॉक्सबिल आणि ग्रीन टर्टल अशी पाचही प्रकारची समुद्री कासवे अंडी घालायला येतात. बिबट्यासाठी प्रसिद्ध असलेलं आणखी एक लंकेतलं जंगल म्हणजे ‘वेलापट्टू’. कोलम्बोच्या उत्तरेला १८० किलोमीटर्सवर हा नॅशनल पार्कआहे. फेब्रुवारी ते आॅक्टोबर हा ‘वेलापट्टू’ला भेट द्यायचा सर्वोत्तम काळ आहे. छोटे छोटे तलाव आणि पाणथळींनी भरलेला असल्याने इथे पाणपक्ष्यांचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्याचबरोबर घोरपड, मगर, अजगर, सॉफ्ट शेल टर्टल असे प्राणी इथे आढळतात.
श्रीलंकेला जर भेट दिली तर या बेटावरचा वन्यजिवांचा खजिना तुम्हाला निराश करणार नाही हे नक्की.

बोटीखालचा महाकाय व्हेल!
श्रीलंकेच्या भेटीतील चुकवू नये असा अनुभव म्हणजे ‘मिरिसा’ येथील ‘व्हेल वॉचिंग क्रूझ’. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर मिरिसा हे छोटंसं गाव आहे. नारळाची बने आणि खळाळणारा निळा सागरकिनारा यामुळे समुद्रप्रेमी पर्यटकांना आकर्षून घेणाऱ्या मिरिसामधून व्हेल वॉचिंग क्रूझ निघतात. महासागरातील महाकाय व्हेल्स म्हणजे जणू उत्क्र ांतीच्या साखळीतील मागे राहिलेला दुवाच. मिरिसामधून निघणाऱ्या क्रूझवर समुद्रात आतवर जाऊन स्थलांतर करणारे व्हेल्स सहज पाहायला मिळतात. ब्लू व्हेलपासून ते किलर व्हेलपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्हेल्स या समुद्रात पाहायला मिळतात. महाकाय व्हेल जेव्हा आपल्या बोटीच्या खालून जातो तेव्हा त्यामुळे उठणाऱ्या लाटा त्याच्या सामर्थ्याची चुणूक दाखवतात. या सागर सफरीत खेळकर मस्तीखोर डॉल्फिन्सही पाहायला मिळतात.

Web Title: In the woods of Lanka ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.