हरणांच्या जगात

By admin | Published: October 18, 2014 01:53 PM2014-10-18T13:53:11+5:302014-10-18T13:53:11+5:30

भारतात हरणांचे जवळपास १0 प्रकार आढळतात; परंतु जगभरात १00 पेक्षा विविध वैशिष्ट्यपूर्ण जाती आढळतात. या हरणांचा अभ्यास आणि त्यांची विविध वैशिष्ट्ये खरोखर अभ्यासण्यासारखी आहेत. एका अभ्यासकाच्या नजरेतून या जगात टाकलेला दृष्टिक्षेप.

In the world of deer | हरणांच्या जगात

हरणांच्या जगात

Next

- आनंद राजेशिर्के

 
अतिशय गरीब, आखीवरेखीव, बांधेसूद, डोळ्यांतील नजरेत पाहिल्यावर दिसणारी करुणा, निरागसपणा असा वर्णन असलेला प्राणी हरिणाशिवाय दुसरा असूच शकत नाही. त्याच्या सुंदर डोळ्यांना मानवाने हरिणाक्षीची उपमाही दिली आहे. हरिणांचे जंगलातील अस्तित्व हा जैविक साखळीमध्ये फार महत्त्वाचा दुवा आहे. महत्त्वाच्या मांसाहारी प्राण्याचेच अस्तित्व जंगलात हरणांशिवाय धोक्यात येऊ शकते. सद्य परिस्थितीत पाहता तज्ज्ञांच्या मतेच पुढील १00 वर्षांच्या आतच महत्त्वाचे वन्य प्राणी हे जंगलात न दिसता प्राणिसंग्रहालयात किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारेच पुढील पिढीला दिसू शकतील, हे खरोखरच त्या पिढय़ांचे दुर्दैवच आहे.
भारतात मुख्यत्वे चितळ, सांबर, काळवीट, चिंकारा, नीलगाय, बाटासिंगा, भेकर संगई, पाडा इत्यादी हरिणांच्या प्रजाती आढळतात. त्यांची संख्या ८ ते १0 जातीपर्यंतच जाते. पण जगात विशेषत: आफ्रिका, उत्तर अमेरिका खंडात १00 पेक्षा विविध वैशिष्ट्यपूर्ण जाती आढळतात. काही दुर्मिळ जाती उदा. पार्शियन फॅलो डिअर, पॅम्पस डिअर, पुडुपुडु हरिण ही जंगलातून कधीच नाहीशी झाल्यामुळे फक्त प्राणिसंग्रहालयातच त्यांचे अस्तित्व उरले आहे. माझ्या या हरिण छंदाला सुरुवात १९७८ साली झाली. अहमदनगरवरून त्या वर्षी आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील जंगलाने वेढलेल्या डोंगराळ प्रदेशात पहिला शाखाप्रमुख म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राच्या तालमाडगू या छोट्या शाखेत माझी बदली झाली.
जंगलामुळे शेळ्या चरायला घेऊन जाणार्‍या मेंढपाळांना हरिणांची २-३ दिवसांची पिल्ले सहज सापडायची. गावकरी/मुले त्या गोंडस पिलांचा खाण्यासाठी उपयोग करायची. त्यांचे गोंडस निरागस पिल्लू मी प्रथमच पाळण्यासाठी मागितले.  इतकेच नव्हे, तर मी पाळलेल्या या पिल्लांची काळजी गावानेच साहेबांचा छंद म्हणून उचलून धरला. ते पिल्लू संपूर्ण गावाचेच झाले. चांभाराने घुंगरू असलेला आयुष्यात प्रथमच असा बनविलेला सुंदर पट्टा न मागता भेट दिला. रात्री मॅनेजरच्या क्वार्टरमध्ये हे पिल्लू माझा खाटेला बांधलेले असायचे. 
या माझ्या हरिणपालनामुळे एक मनात अनपेक्षित घटना मात्र घडली. हरिणांच्या लहान पिलांच्या हत्या, खाण्यासाठी वापर, त्या परिसरात कायमचा बंद झाला. कालांतराने माझी मुंबईत बदली झाली. हे हरिण काही निवडक गावकर्‍यांच्या साक्षीत एका विलक्षण हुरहुरीने मी जंगलात सोडले. लळा लावलेल्या त्या हरिणीने शेवटी जंगलात जाताना जी शेवटची नजर माझ्याकडे पाहून टाकली, तो क्षण अजूनही एखाद्या निवांत क्षणी जसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. आजही हुरहुर लावून, बैचेन करून जातो.
ते एक हरिण माझ्या आयुष्यातून कायमचे गेले. पण नंतर जगातील १५0 पेक्षा जास्त जातींची हरिणे पुढील ३0-३५ वर्षांत माझ्या जीवनात कायमची स्थिरावली.
सुमारे वीस वर्षांपूर्वी एका बँकरची ही जगावेगळी आवड बघून ब्रिटिश सरकारची हरिण, अभ्यासासाठी स्कॉटलंडमध्ये डॉ. जॉन फ्लेचर व निकोल फ्लेचर या आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या शेतावर शिक्षण व अनुभव घेण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. तेथील वास्तव्यात खर्‍याखुर्‍या अर्थाने जगभरातील या विषयावरील ज्ञानाचा खजिना मला खुला झाला. या संबंधात चालू असणार्‍या आंतरराष्ट्रीय घडामोडींशी कायमचा संपर्क आला. आजही आहे. त्यामुळेच गेल्या ३0-३५ वर्षांतील थोडेफार संशोधन व हरिणांच्या जगातील विविध प्रकारची शंभरपेक्षा जास्त प्रजातींची मनोरंजक माहिती, नष्ट झालेल्या व दुर्मिळ प्रजाती, हरिणांसंदर्भातील विविध वाड्मय, धार्मिक उल्लेख, शेक्सपिअरसारख्या लेखकांनी केलेला वारंवार उल्लेख, देशोदेशींची तिकीटे, नाणी, चलनी नोटा, सैन्यातील तुकड्यांची (ँी१ं’१ि८) चिन्हे परदेशातील झालेले/होत असलेले संशोधन इत्यादी माहितीचे मोठे संकलनही झाले आहे. 
सर्वसामान्य भारतीयांना भारतातील हरिणांच्या या अफाट विश्‍वाबद्दल अज्ञानच आहे; पण औत्स्युक्यही आहे. 
(लेखक जगभरातील हरणांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: In the world of deer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.