ओंजळ!- अभिजात भारतीय संगीतासाठी जीव वेचणार्या परदेशी साधकांच्या दुनियेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:06 PM2020-04-18T21:06:13+5:302020-04-18T21:06:55+5:30
68-69 सालातील ही गोष्ट. तेव्हा मी होतो अमेरिकेतील एक यशस्वी सोप्रानो सेक्सोफोन वादक. मान्यवर संगीतकारांना आपल्याबरोबर हवा असलेला कलाकार. न्यूयॉर्कच्या झिंग आणणार्या माहोलमध्ये भान विसरून सेक्सोफोन वाजविणे हे माझ्यासाठी निव्वळ जगण्याचे साधन नव्हते. या स्वरांची धुंदी मी माझ्या अंगा-खांद्यावर वागवित होतो. पण अचानक मला माझ्या आसपासच्या संगीतात काही वेगळे स्वर जाणवू लागले. आजवर कधीच न ऐकलेले! हे कुठून आले, हा प्रश्न सतावू लागला आणि एकदम माझ्या आयुष्याने अकल्पित वळण घेतले..!
- स्टीव्ह गोर्न
बंदुकीतून सुटलेली गोळी सणसणत येऊन कानशिलात शिरावी, अंगावर ओघळणार्या रक्ताच्या उष्ण धारेची आणि वेदनेच्या तीव्र कल्लोळाची जाणीव होण्यापूर्वीच अंधाराच्या भल्या मोठय़ा लाटेने गिळंकृत करून टाकावे असे, सगळे जग बुडून जावे अशी काहीशी अवस्था होती कालपर्यंत मनाची.. न्यूयॉर्कमधील ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या माझ्या घराच्या खिडकीतून दिसणारे मरण, भयाच्या सावलीतील एकाकी रस्ते, कुलुपबंद दुकाने, माणसांच्या वर्दळीविना ओसाड फुटपाथ.. हे मला पडत असलेले भयावह स्वप्न की एखाद्या हॉरर सिनेमातील दृश्य? समोरच्या कॅलेंडरमधील पानांमध्ये तुडुंब भरलेले माझे दौरे, कॉन्सर्ट्स, भाषणे, शूटिंग हे सगळे एकाएकी त्या पानांमधून उडी मारून कुठे अदृश्य झाले? आणि माझी बासरी? सामानाची सगळी गर्दी घाईघाईने बाजूला सारीत त्या लांब कापडी पिशवीतून बांबूची ती लांब नळी बाहेर काढून ओठाला लावली. हलकेच त्यात फुंकर मारली आणि वार्याची एक हलकी झुळूक अंगाला सहज स्पर्श करून गेली. एकामागून एक स्वर तरंगत ओठावर आणि बोटावर येऊ लागले. आता ती आसपासची शांतता हवीहवीशी वाटू लागली..!
कोणता राग वाजवत होतो मी? छे, राग वगैरे नाही, सुचत होते ते निव्वळ स्वर. ते आठवण्यासाठी मला काही करावेच लागत नव्हते. एकमेकांच्या हातात हात गुंफून तेच माझ्याकडे येत होते. त्या वातावरणातील दु:खाच्या गडद छायेला आपल्या कुशीत घेऊन जोजवीत होते. कितीतरी वेळ. त्यावेळी मला आठवत होती ती बनारसमधील गंगेच्या प्रवाहातील संध्याकाळ. लाटांवर हेलकावणार्या द्रोणामधील दिव्यांच्या साथीने सुरू असलेला नावेतील माझा पहिला प्रवास. सारंगी मास्टर काशीनाथ मिर्श मला माझ्या गुरुकडे घेऊन निघाले होते.
68-69 सालातील ही गोष्ट. तेव्हा मी होतो अमेरिकेतील एक यशस्वी सोप्रानो सेक्सोफोन (सेक्सोफोन जातीमधील थोडे प्रगत वाद्य) वादक, अमेरिकेतील कित्येक मान्यवर संगीतकारांना आपल्याबरोबर हवा असलेला कलाकार, आठवड्याच्या कित्येक संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या प्रसिद्ध बँडबरोबर न्यूयॉर्कच्या झिंग आणणार्या माहोलमध्ये भान विसरून सेक्सोफोन वाजविणे हे माझ्यासाठी निव्वळ जगण्याचे साधन नव्हते. या स्वरांची धुंदी मी माझ्या अंगा-खांद्यावर वागवित होतो. जाझच्या अनेक प्रकल्पांवर रसरसून काम करीत होतो. पण जराही उसंत न देणार्या या जगण्यात मला माझ्या आसपासच्या संगीतात काही वेगळे स्वर जाणवू लागले. आजवर कधीच न ऐकलेल्या संगीताची छाया असणारे स्वर. हे कुठून आले? हा प्रश्न सतावू लागला आणि एकदम माझ्या आयुष्याने अकल्पित वळण घेतले..! आत्ता वातावरणात उतरत असलेले हे शरीर-मनावर फुंकर घालणारे सूर आणि मनातील भय, वेदना, एकाकीपण ह्याला सहज दूर नेणारे त्याचे सार्मथ्य हे सगळे माझ्या ओंजळीत टाकणारे वळण. ते नसते आले तर, सगळ्या जगाला आपल्या जबड्यात चिरडत निघालेल्या या क्रूर आजाराने मलाही संपवून टाकले असते? कदाचित.!
भारतातील संगीतात जशी घराणी आहेत तसे सेक्सोफोन या वाद्याचेही एक आफ्रिकन-अमेरिकन घराणे आहे ज्यावर उस्ताद बिस्मिल्ला खां यांच्या शहनाईचा प्रभाव आहे. शहनाई वादनातील काही वैशिष्ट्ये या वादनात जाणवतात. हे शहनाई प्रकरण काय आहे आणि त्यावर राज्य करणार्या बिस्मिल्ला खां साहेबांना भेटावे, जमल्यास थोडे धडे त्यांच्याकडून घ्यावे असे मनसुबे घेऊन मी 1969 साली भारतात आलो. पण भारतात मला बासरीच्या स्वराने चांगलेच झपाटले. बनारस हिंदू विद्यापीठात चेथिलाल र्शीवास्तव नावाच्या तिबेटियन बुद्धिझमच्या अभ्यासकाशी गाठ पडली. आणि त्याच्याबरोबर दार्जिलिंगला निघालो असताना वाटेत कोलकात्यात उतरलो. बासरीचा स्वर मला आवडला म्हणून ते मला एका गुरुकडे घेऊन निघाले होते. उत्तर कोलकात्यात हेदुवा भागातून अरूंद बोळीतून चेथिलाल झपझप चालत होते. कडेला चहाची आणि मिठाईची दुकाने होती तशी साडीची दुकानेसुद्धा होती. आसपासच्या छोट्या मंदिरातील घंटांचा आवाज कानावर येत होता. चंदन आणि शेणाचा एक अजीब दर्प नाकाला झोंबत होता. एका छोट्या अंगणातून एका दगडी भिंतीच्या आवारात आम्ही प्रवेश केला. अंगावर धोतर आणि पांढरी बंडी घातलेला तगडा माणूस पाच-सहा लोकांच्या कोंडाळ्यात बसला होता. नजर तेज, समोरच्याचा वेध घेणारी, तोंडात पानाचा तोबरा आणि बाजूला चहाचे पाच-सहा कप. चेथिलाल त्यांच्याशी माझ्याबाबत बंगाली भाषेत खूप काही बोलत होते आणि मंगळावरून आलेल्या अनोळखी प्राण्याकडे बघावे तसे ते गृहस्थ माझ्याकडे बघत होते.
माझ्याकडे वळून चेथिलाल म्हणाले, ‘‘हे तुझे गुरु र्शी गौर गोस्वामी.’’ पन्नालाल घोष यांचे शिष्य. या गुरुकडे शिक्षण म्हणजे फक्त त्यांचं वादन ऐकणे आणि बाकी शिष्यांचा वर्ग सुरू असताना त्यात सामील होणे. सगळा मामला फक्त आणि फक्त ऐकण्याचा. कागद आणि पेनचा या शिक्षणाशी कधी चुकूनसुद्धा संबंध नाही. मग जाणवू लागले, इथे नुसते ऐकायचे नाही, लक्षपूर्वक ऐकायचे आहे. आणि हेही जाणवू लागले, गुरु जे वाजवतील त्याच्या मागोमाग तेच वाजविण्याची क्षमता माझ्यामध्ये होती. माझा कान चांगलाच तयार असल्याचे माझ्या गुरुला पण जाणवले आणि मला खास शिक्षण मिळू लागले.! वर्ष- दोन वर्षाच्या इथल्या मुक्कामात मला गुरु -शिष्य नात्याची ओळख झाली. शिष्याकडून हक्काने पाय चेपून घेण्याचा या नात्यातील अधिकार आणि भारतीय संगीत, संस्कारांची आणि अन्नाची ओळख नसलेल्या शिष्याला आवर्जून ती ओळख करून देणारी माया हे दोन्ही या एकाच नात्याची रूपे..!
पण या नात्यातून जे संगीत मला दिसत होते, ऐकू येत होते आणि जाणवत होते तसे संगीत आजवर कधीच कुठेच कानावर पडले नव्हते.. ! या संगीतातील राग म्हणजे केवळ त्यात प्रवेश करण्याची एक औपचारिक चौकट. त्यातून आत गेलो की विस्ताराच्या वाटा आपण निवडायच्या. त्या वाटांवर लावायची तोरणे आपण गुंफायची. गुंफणारा त्यात जितका आणि जसा रमेल तितका त्या वाटांवर त्याच्याबरोबर येणारा प्रवासी रमत- रेंगाळत जाणार. सर्वात आधी या गाण्यात मला प्रेम दिसले, मग आसपास सतत असलेला आणि आपल्या मनातील कोलाहल, शांत करणारे ध्यान, मेडिटेशन मला या स्वरांमुळे साधायला लागले.
या मुक्कामावरून दिसत होते ते आयुष्याचे निखळ सत्य. माझी सगळी शारीरिक ओळख पुसत माझ्या भोवतालच्या जगाशी मला जोडून देणारे सत्य. निसर्ग आणि माझे नाते मला उलगडून सांगणारे सत्य. हे संगीत शिकत असताना मला मी ज्या संगीतकाराबरोबर अमेरिकेत काम करीत होतो त्या पॉल विंटर नावाच्या कलाकाराची नव्याने ओळख झाली. त्याचे संगीत पर्यावरण, निसर्ग, निसर्गातील अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी जीवन यांच्याशी असलेले माणसाचे नाते काय याचा शोध घेणारे असायचे. मला ते वेगळे वाटत होते ते यामुळे.
मग जाणवले भारतीय संगीतात अनेक वाद्यांचा कल्लोळ नाही. ते संगीत म्हणजे त्या कलाकाराची अगदी वैयक्तिक अशी साधना, पूजा असते त्यासाठी आलेल्या सुहृदांना तो आपल्या या पूजेत सामील करून घेतो इतकेच. इतक्या वैयक्तिक अशा या शोधासाठी वाद्यांचा गदारोळ हवा कशाला? माझ्या भारताच्या वारंवार होणार्या मुक्कामात मी अधिकाधिक शुद्ध संगीताचा मग शोध घेत राहिलो. निव्वळ शुद्ध स्वर असे डागर बंधूंचे धृपद ऐकले, झियाउद्दीन डागर गुरु जींची रु द्रवीणा खूप ऐकली. आणि हे सगळे संस्कार घेऊन माझ्या देशातील संगीतावर काम करीत राहिलो.! आफ्रिकन-अमेरिकन घराण्याचा वारसा सांगणारा माझा सेक्सोफोन, शुद्ध स्वरांचा विचार करणारे भारतीय धृपद, नोटेशन लिहिलेल्या कागदापलीकडे जाऊन ऐनवेळी स्फुरणारे संगीत वाजविणारे युरोपियन शास्त्रीय संगीत या सगळ्या वाटा शेवटी प्रत्येक कलाकाराच्या मनात एकत्र येतात तेव्हा त्यातून निर्माण होणार्या संगीताला काय म्हणायचे?
हे असे सगळे प्रश्न अगदी निर्थक ठरतील अशा एका कमालीच्या भीतीदायक वळणावर आपण येऊन थांबलो तेव्हा पुन्हा एकदा जाणवले, माणसांच्या डोळ्यातील भय, भविष्याबद्दलची अनिश्चितता, स्वत:चा सांभाळ करताना पावले डगमगत असतानासुद्धा पलीकडच्या माणसाबद्दल मनात असणारी करु णा हा अवघड तोल सांभाळायचा कसा? दुसर्या महायुद्धानंतर आलेल्या र्शीमंतीनंतर अमेरिकेच्या भूमीवर बेफाम उगवत गेलेले उद्दामपणाचे पीक आणि लोकांच्या मनातील भीतीचा फायदा उठवत लोकांमध्ये फूट पाडणारे जगभरातील राजकीय नेते यांना थांबविणार कोण?
मला वाटते, याचे एकच उत्तर आहे, भारतीय संगीत. शरीर आणि मन याचे पोषण करणारे आणि माणसाला सक्षम करणारे चांगले संगीत. सगळे भेद मागे टाकून जे माणसांना एकमेकांशी जोडते. हे कसे घडू शकेल? प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी, त्यातूनच उत्तराचे काही घाट, आकार सापडत जातील..
स्टीव्ह गोर्न
थिएटर, नृत्य, टलिव्हिजनपासून विविध नामवंत बँडस्साठी बासरी आणि सॅक्सोफोनवादन करणारा कलाकार. जगभरातील अनेक मैफली आणि संगीत संमेलनांमध्ये भारतीय संगीत, जाझ आणि आधुनिक अमेरिकन संगीत हे सगळे या दोन्ही वाद्यांवर वाजवणार्या स्टीव्हची दखल अनेक भारतीय समीक्षकांनी घेतली असून भारतीय संगीताचे सौंदर्य अतिशय तरलपणे टिपणारा वादक अशा शब्दात त्याचा गौरव केला आहे.
कोलकात्यातील वेश्यावस्तीतील मुलांवर झालेल्या चित्रपटासाठी स्टीव्हने दिलेल्या संगीताला अनेक पुरस्कार मिळाले.
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे
vratre@gmail.com
(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)