ताल आणि तोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 06:01 AM2020-05-03T06:01:00+5:302020-05-03T06:05:02+5:30

संगीताचा इतका मोठा पसारा आणि त्यामागे  केवढे मोठे शास्र त्याच्या नादाचे?  ऑस्ट्रियात असताना मला रोज प्रश्न पडायचे, या पसार्‍यात माझ्या ड्रमचे स्थान काय?  माझा ड्रम ज्या भाषेत बोलतो ती भाषा  या पसार्‍यातील बाकी लोकांना, वाद्यांना कशी समजेल?  त्यासाठी आणखी किती वर्षे मला थांबावे लागेल? त्याचे उत्तर भारतीय गुरू आणि भारतात मला मिळाले. गुरु जींकडून मिळणारे तालाचे धडे ड्रम कीटवर बसवायचे  हा माझा या शिक्षणातील एक महत्त्वाचा भाग होता.  या काळात मी रोज स्वत:ला सांगायचो,  ड्रम्स आर द व्हेईकल, बट द ड्रायव्हर वॉज तबला!.

In the world of foreign seekers who sell their lives for classical Indian music- Interview of Austrian musician Bernhard Schimpelsberger | ताल आणि तोल!

ताल आणि तोल!

Next
ठळक मुद्देअभिजात भारतीय संगीतासाठी  जीव वेचणार्‍या  परदेशी साधकांच्या दुनियेत

- बर्नहार्ड शिम्पलसबर्गर
अभिजात भारतीय संगीतासाठी 
जीव वेचणार्‍या 
परदेशी साधकांच्या दुनियेत
‘या मुलाला माझ्याकडे भारतात शिकायला पाठवा’, असे ज्याच्याबद्दल गुरुजी आग्रहाने म्हणत होते तो एक किरकोळ जेमतेम पंधरा वर्षांचा मुलगा होता. आणि आग्रह करणारे गुरु जी म्हणजे भारतातील एक प्रतिभावंत कलाकार पंडित सुरेश तळवलकर. हो, ही माझीच गोष्ट. लहान वयापासून डोक्यात ड्रमचे खूळ असणार्‍या बर्नहार्ड नावाच्या मुलाची. दुनिया आणि त्याचे गुरु जी त्याला बर्नी म्हणतात. माझे कुटुंब ऑस्ट्रियामधले आणि सगळेच्या सगळे  पियानोच्या स्वरांमध्ये बुडलेले. मग काय, आम्ही आमचा एक बँडच काढला. 
मोठय़ा हौशीने आणि उत्साहाने ठिकठिकाणी कार्यक्र मासाठी भटकायचो. मी त्या बॅण्डमधील एकुलता एक ड्रमवादक! मोठेपणी संगीतकार होऊन जगभर भटकंती करायची असा भविष्याचा एक कलमी कार्यक्र म मी तेव्हाच पक्का केला होता. त्याला तोपर्यंत तरी कुटुंबातून कोणी विरोध केला नव्हता. पण भविष्यात खूप दूरवर असलेली ही गोष्ट एकदम फास्ट फॉरवर्ड होऊन झपकन समोर येऊन माझा हात धरू लागली तसे आई-वडील गांगरले. 
पंधरा वर्षाच्या पोराला असे दूरदेशी एकटे शिक्षणासाठी ढकलून द्यायचे? वेळ मारून नेण्यासाठी आई गुरु जींना म्हणाली, त्याचे शाळेचे शिक्षण तरी पूर्ण होऊ दे. मग अठराव्या वर्षी बघू.. 
पण नात्यांचे धागे असे वयाच्या हिशोबाप्रमाणे गुंफता येत नसतात. ते गणित वेगळेच असते जे आपण सोडवत नसतो. आपल्यापुढे ते फक्त टप्प्याटप्प्याने उलगडत असते. माझ्यापुढे ते तसेच उलगडत गेले. तालवाद्य शिकू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रियात वर्कशॉप घ्यायला आलेल्या गुरु जींच्या वर्गात मी गेलो ती गोष्ट साधारण 98-99 या काळातील. 
वर्कशॉपचा पहिला दिवस संपता संपता गुरु जी मला म्हणाले, उद्या तासभर लवकर ये, तुला वेगळे काही शिकवेन. पुढच्या एक दोन दिवसातच या तासाचे दोन तास झाले. सकाळी लवकर गुरु जींच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर गुरु जी आपल्या या छोट्या शिष्याबरोबर पायी फिरायला निघायचे. 
फिरता फिरता गप्पा, गप्पा कसल्या गुरु जींचा प्रकट संवादच तो, कशावर? जगाला आपल्या ठेक्यावर जगायला लावणार्‍या नाद, ह्रिदम नावाच्या अफाट गुहेत शिरायचे आणि त्याची रोज नव्याने उलगडत असलेली जादू सांगायची..! 
इतका मोठा पसारा आणि त्यामागे एवढे शास्र आहे या नादाचे? मला रोज नव्याने प्रश्न पडायचे. या पसार्‍यात माझ्या ड्रमचे स्थान काय? माझा ड्रम ज्या भाषेत बोलतो ती भाषा या पसार्‍यातील बाकी लोकांना, वाद्यांना कशी समजेल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मला आणखी तीन वर्ष थांबावे लागणार की काय? 
घडले ते वेगळेच. मी अठरा वर्षांचा होईपर्यंत दरवर्षी गुरुजींना वर्कशॉपसाठी युरोपमध्ये आमंत्रण येत गेले आणि मी त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य होऊन युरोप भटकत राहिलो. 
या काळात मी एखाद्या भारतीय शिष्याप्रमाणे त्यांची काळजी घेत होतो. खरं म्हणजे, आपल्या खासगीपणाबद्दल कमालीच्या आग्रही असणार्‍या युरोपियन संस्कृतीला हे असे गुरुबरोबर त्यांच्या खोलीत राहणे झेपणारे नाही. माणसांना परस्परांपासून दूर ढकलणारा हा खासगीपणा उपचार मी कसा नाकारला? माझ्यात कुठून आला हा स्वीकार आणि गुरुजींची काळजी घेण्याचा सेवाभाव? 
या नात्याच्या दोन दशकांच्या प्रवासानंतर आणि भारताच्या असंख्य भेटीनंतर वाटतेय, आमच्या नात्याची वीण घट्ट करणारे हे सगळे त्या त्या वेळी आतूनच स्फुरत गेले मला. माझ्या छोट्या ओंजळीतून गुरुजींना जी सेवा देत गेलो त्याच्या कित्येक पटीत मला मिळत गेले. गुरुजींचे अत्यंत निरपेक्ष प्रेम, तालाबद्दलची एक समृद्ध समज आणि त्यातून जगातील कोणत्याही वाद्याशी जमवून घेण्याची सहजता. 
भारतात येण्यापूर्वी मी या देशाची ओळख करून करून घेण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला होता. हिंदी भाषेचे थोडे धडे घेतले, भारतीय सिनेमा, त्यातील गाणी, भारतातील धर्म असे मिळतील ते तपशील गोळा केले. अर्थात तरीही प्रत्यक्ष इथे आल्यावर बसायचे ते धक्के बसतातच आणि खूप काही गोष्टींशी जमवून घ्यायचे आहे असे स्वत:ला वारंवार बजावावे लागते. 
भारतात येताना माझ्या डोळ्यापुढे एकच उद्दिष्ट होते, चांगला शिष्य होण्याचे! ताल नावाच्या अफाट अशा रचनेचा गणिती आराखडा भले पुस्तक वाचून समजून घेता येईल; पण या आराखड्याच्या कोर्‍या जागेत ज्या भावना, मूल्य, अर्थ याची पेरणी करीत त्या तालाला जो स्वत:चा स्पर्श द्यायचा असतो, तो कसा द्यायचा? मैफलीचा माहोल, निमित्त, र्शोत्यांचा मूड हे सगळे अजमावत तो ताजेपणा त्या वेळी आपल्या कामगिरीला कसा द्यायचा? हे आणि असे खूप काही फक्त भारतातील गुरु -शिष्य परंपरेत मला शिकायला मिळेल, त्यासाठी लागणारी खोलवरची समज मला मिळेल हा विश्वास मला गुरु जींच्या आजवरच्या शिक्षणाने दिला होता. 
हे शिक्षण देताना त्यांनी कधीच मला (किंवा कोणत्याच पाश्चिमात्य शिष्याला) तबला शिकण्याचा आग्रह अजिबात धरला नाही. भारतीय ह्रिदमपासून प्रेरणा घेत, दृष्टिकोन घेत प्रत्येकाने आपले वाद्य वाजवावे हा त्यांचा आग्रह होता. कारण जगातील सगळ्या तालापेक्षा भारतीय तालात असलेली कमालीची परिपक्वता (प्रोफाउण्ड) त्यातील बिनचूक गणिती हिशोब आणि अचंबित करणारे काव्य यावर असलेला त्यांचा असीम विश्वास. हे शिक्षण घेतलेला शिष्य कुठेही आणि कोणतेही वाद्य वाजवत असला तरी त्याच्यामध्ये असलेली भारतीय तालाची समज त्याच्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेणारी असेल ही खात्री त्यांना मनोमन होती..! 
गुरु -शिष्याचे नाते, त्याच्या र्मयादा आणि शिस्त ठाऊक असूनही कधी कधी माझा पाश्चिमात्य व्यक्तिवाद एकदम उफाळून यायचा. गुरु -शिष्य परंपरेत ‘असे का?’ ह्या प्रश्नाला आणि वादविवादाला फारसा थारा नाही. पण हे विसरून मी काही वेळा गुरु जींना जाहीर विरोध करीत प्रश्न विचारले आहेत. 
त्यानंतर येणार्‍या पश्चातापाच्या क्षणी वाटायचं, संपले आता सगळे.! पण गुरु जींचे एक महत्त्वाचे तत्त्व होते, ज्याचा आग्रह धरताय ते मला कृतीत उत्तम करून दाखवा. ते केल्यावर तो वाद, विरोध हे मावळायचे. पण या शिक्षणातील सर्वात मोठे आव्हान होते ते, मला गुरु जींकडून मिळत असलेले शिक्षण माझ्या वाद्यात परावर्तित करण्याचे. 
तबला आणि ड्रम ही दोन अगदी वेगळ्या जातकुळीची वाद्य आहेत. तबला बोटाने वाजवायचे वाद्य, वेगवेगळ्या आघातातून तालाच्या रचना निर्माण केल्या जातात. ड्रम कीटमध्ये मात्र एकाच वेळी अनेक ध्वनी निर्माण करता येतात. गुरु जींकडून मला मिळणारे धडे ड्रम कीटवर बसवायचे हा माझा या शिक्षणातील एक महत्त्वाचा भाग होता. या काळात मी रोज स्वत:ला सांगायचो, ड्रम्स आर द व्हेईकल आय ट्रॅव्हल ऑन, बट देन द ड्रायव्हर वॉज तबला!.
गुरु जींनीच मग माझी त्रिलोक गुर्टू नावाच्या माझ्या दैवताशी माझी गाठ घालून दिली. तबला आणि ड्रम या दोघांचे एक अद्भुत नाते गुंफणार्‍या या कलाकाराबरोबर आपल्याला काम करायला मिळेल असं स्वप्नसुद्धा मी कधी बघितले नव्हते..!  मी फक्त त्यांच्या कॉन्सर्ट्सना भक्तिभावाने हजेरी लावत असे. 
एका कॉन्सर्टमध्ये त्यांच्या डंकन नावाच्या ड्रम टेक्निशियनला काही अडचण येत होती, मी उत्स्फूर्तपणे गेलो आणि ती सोडवली. आता त्रिलोकजींचा ड्रम टेक्निशियन म्हणून मी त्यांच्याबरोबर जग फिरतो आहे. 
ज्या गोष्टीला ते स्पर्श करतील त्यातून नाद निर्माण करणारा हा कलाकार. त्यांच्या सहवासातून, त्यातून मिळणार्‍या शिक्षणातून अनेक गोष्टी मला स्फुरत गेल्या आणि अनेक संधी समोर येत गेल्या. ड्रमवर खुळ्यासारखे प्रेम करणार्‍या माझ्यासारख्या मुलाला जेव्हा अनुष्का शंकरसारखी कलाकार सहवादक म्हणून आमंत्रित करते तेव्हा आठवण येते ती मुंबई-पुण्यात दिवसेंदिवस गुरु जींच्या सहवासात केलेली मेहनत. त्यांच्याबरोबर गावोगावी प्रवास करीत त्यांचा तर्‍हेतर्‍हेच्या कलाकारांशी होणारा संवाद, वर्कशॉप, मुलाखती, कार्यक्रम. अनुभवांची केवढी संपन्न पोतडी आहे माझ्या खांद्यावर.. 
***
 अनेक प्रवास, प्रकल्प यांनी तुडुंब भरलेले वेळापत्रक खसाखसा पुसून टाकत आत्ता लंडनमधील माझ्या स्टुडिओमध्ये मी अनेक अर्धवट राहिलेली कामे संपवतो आहे. एका अर्थाने, कोरोनाने मला दिलेला हा आशीर्वादच.. पण मनावर अस्वस्थतेचा एक दाट तवंग आहे. अक्र ाळविक्र ाळ आव्हान बनून सगळ्या जगापुढे उभ्या असलेल्या या कोरोनाने किती भ्रम दूर केले आहेत आपले! 
सर्वांचे खरे चेहरेही आरशात दाखवले आहेत. आता-आतापर्यंत जणू प्रत्येकाला खात्री होती की, या अवाढव्य जगाचा भार आपल्या शिरावर घेऊन ते चालवण्याचे कष्ट घेणारी माणसे कोण? तर, राजकीय नेते, वेगवेगळ्या वस्तू पुरवणारे व्यापारी आणि ते निर्माण करणारे उद्योजक आणि असेच काही. पण परिस्थितीने एकाएकी उभ्या जगाला कुलूपबंद कोपर्‍यात ढकलून दिले आणि प्रथमच जाणवले, हे जग ज्यांच्यामुळे चालते ती माणसे ही नाहीत. वेगळीच आहेत ती. आपण ज्यांना आजवर कवडीची किमत देत नव्हतो, ती सांभाळत असतात आपल्या रोजच्या जगण्याचा वेग आणि तोल. रस्त्यावर वाहतूक सुरळीत करणारा पोलीस, हॉस्पिटलमधील नर्स आणि आया, भाजी विक्रेता, आपण झोपेतून उठण्यापूर्वी समोरचा रस्ता साफ करणारा सफाई कामगार आणि असे कितीतरी.
रोजच्या व्यवहारात जागोजागी ज्यांचे संगीत आपल्या कानावर पडते त्या कलाकारांची अवस्था त्यांच्यापेक्षा कुठे वेगळी आहे? लिफ्टमध्ये, फिरण्याच्या मैदानावर, मॉलमध्ये, प्रवासात आपली साथ देणारे संगीत निर्माण करणार्‍या; पण चेहरा नसलेल्या कलाकारांची काय किंमत आहे जगाच्या लेखी? महागड्या कॉफी शॉपमध्ये मिळणार्‍या कापुचिनोपेक्षासुद्धा कमी! क्षणाचे सुख देणार्‍या कॉफीसाठी सहज शंभर-दीडशे रुपये फेकतो आम्ही; पण जन्मभर आनंद देणार्‍या संगीताची एखादी रेकॉर्ड विकत घेण्याची वेळ येते तेव्हा मान वळवून पुढे जातो. 
हबकलेल्या, उदास, खिन्न जगावर असलेली निराशेची काळोखी दूर करण्यासाठी आज देशोदेशीचे अनेक कलाकार काम करतायत. उत्साह देणारे संगीत तुमच्या दारापर्यंत आणून देतायत. भयाची ही लाट ओसरल्यानंतरचे नवे जग वेगळ्या दृष्टीने बघेल का संगीताकडे? त्याच्या असीम सार्मथ्याकडे? या प्रश्नाने अस्वस्थ आहे मी.. 

बर्नी
बर्नहार्ड शिम्पलसबर्गर हा आज घडीला जगातील एक आघाडीचा ड्रमर आणि संगीतकार आहे. मूळचा ऑस्ट्रियामधील बर्नी आता लंडनमध्ये स्थायिक झाला आहे. अनेक ऑर्केस्ट्राज, अनेक समकालीन नृत्यांसाठी संगीतकार म्हणून काम करणार्‍या बर्नीने अनुष्का शंकरसारख्या आघाडीच्या कलाकाराबरोबर काम केले आहे. ताल ही विश्वाची भाषा आहे यावर विश्वास असलेल्या या कलाकाराने भारत, आफ्रिका, युरोप, क्युबा अशा अनेक देशांच्या संगीतकारांबरोबर त्या त्या देशाच्या संगीताचा शोध घेण्याचा एक अनोखा प्रयत्न केला आहे.

मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे 
vratre@gmail.com
(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)

Web Title: In the world of foreign seekers who sell their lives for classical Indian music- Interview of Austrian musician Bernhard Schimpelsberger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.