ताजे आणि अथांग.. अभिजात भारतीय संगीतासाठी जीव वेचणार्या परदेशी साधकांच्या दुनियेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:46 PM2020-09-05T16:46:57+5:302020-09-05T16:48:22+5:30
सगळे दोर कापून भारतात जाण्याचा निर्णय सोपा नव्हता. पण हा निर्णय तपासून बघण्याची संधी तेव्हा परिस्थितीने मला दिली. गुरुजी जपान दौर्यावर आले तेव्हा त्या दौर्यात मी त्यांच्याबरोबर फिरलो. भारतीय राग, प्रत्येक मैफलीत दिसणारे त्यांचे वेगळे रूप, तालाबरोबर स्वरांची होणारी मैत्रीपूर्ण नोकझोक. प्रत्येक मैफलीचा अनुभव मला माझ्या निर्णयाकडे जणू ढकलत होता. जपानमधून भारतात येऊन दहा-बारा वर्ष झाली. आज मी इथल्या मातीत सामावून गेलो आहे.
- ताकाहिरो अराई
‘संगीत शिकून पोट कसे भरणार आहेस?’ संतुर शिकण्यासाठी भारतात निघाल्यावर आई-वडलांनी अगदी रोकडा प्रश्न उपस्थित केला तेव्हा काहीच उत्तर नव्हते माझ्याकडे. एखाद्या वाद्याच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या माझ्यासारख्या तरुणाची अवस्था ही प्रेमामुळे दिवाणा झालेल्या मजनुपेक्षा वेगळी नसते. मला त्यावेळी फक्त स्वर ऐकू येत होते. तेरा मात्रांच्या जयताल रागात वाजत असलेल्या रागेर्शीचे. वादक अर्थातच पंडित शिवकुमार शर्मा. आणि परिणाम? मला माझ्याभोवती जाणवत असलेली असीम शांतता, जी आजवर फार क्वचित अनुभवली होती!
संगीत फार लवकर आले माझ्या जीवनात. पहिली दोस्ती झाली ड्रम्सशी. रॉक-जाझ बरोबर नेहमी वाजवत होतो. पण ते वादन चालू असताना एक खंत सतत मनात असायची, या वादनात ठेका आहे; पण मेलडी नाही. आघात करून वाजणारे आणि तरीही सुरेलपणा असलेले कोणते वाद्य असेल का? होते, मारिम्बा नावाचे पाश्चिमात्य वाद्य. ज्यामध्ये ठेका होता आणि मेलडीसुद्धा. पण आकाराने भले मोठे शिवाय ते शिकवणारे गुरु हवेत, ते कुठे होते? एका मित्राने संतुरवादनाची सीडी दिली ऐकायला. जे काही कानावर पडत होते ते गोड वाटत होते; पण समजत मात्र काहीही नव्हते, ना त्यात वाजत असलेला रूपक ताल ना त्या संगीताची रचना. हे काहीतरी पाश्चिमात्य वाद्यापेक्षा फार वेगळे आहे हे मात्र प्रकर्षाने जाणवले.
हेच संगीत थोडे खोलात जाऊन शिकलो तर रॉक-जाझ-पॉप संगीतपण अधिक नीट समजू शकेल असे वाटले आणि सेत्सुओ मियाशिता यांचे दार ठोठावले. ते तेव्हा शिवकुमार शर्मा नावाच्या गुरुंकडे संतुर नावाचे भारतीय वाद्य शिकत असल्याचे ऐकले होते. त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी तास-दोन तास प्रवास करून जावे लागत होते; पण तरीही कधीच त्याचा कंटाळा नाही आला. कारण एकच, दरवेळी त्या संगीताबद्दल आणि संतुर नावाच्या वाद्याबद्दल नवे-नवे प्रश्न मनात असत. आत्ता जे शिकतोय त्यात पुढे नेमके काय असेल? तबल्यावर वाजणार्या तालाशी कसे जमवून घ्यायचे? रागाचा आणि कानावर पडत असलेल्या सीडीमधील बंदिशींचा संबंध काय?
सेत्सुओ भारतात निघाले तेव्हा मीही एका अनाम ओढीने त्यांच्याबरोबर निघालो. सतत विचार करायला लावणारे संगीत असलेल्या देशात, सेत्सुओच्या गुरुंना भेटण्यासाठी. या भेटीत आम्ही वेगवेगळ्या वेळी सतत फक्त संतुर ऐकत होतोच; पण परतताना बरोबर अनेक सीडी आणल्या होत्या. त्यातील एक होती, रागेर्शीची! ती ऐकता-ऐकता मनात खूप काही घडत गेले. तेव्हा म्युझिक कॉलेजमध्ये शिकत होतो, एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करीत होतो; पण हे सगळे आयुष्य मागे टाकून गुरुजींकडे शिक्षण घ्यायला जावे, असे प्रकर्षाने वाटू लागले आणि गुरुजींशी संपर्क केला.
सगळे दोर कापून भारतात जाण्याचा निर्णय सोपा नव्हता. पण हा निर्णय परत-परत तपासून बघण्याची संधी तेव्हा परिस्थितीने मला दिली. गुरुजी जपान दौर्यावर आले तेव्हा त्या दौर्यात मी त्यांच्याबरोबर फिरलो. भारतीय राग, प्रत्येक मैफलीत दिसणारे त्यांच्या विस्ताराचे वेगळे रूप, तालाबरोबर स्वरांची होणारी मैत्रीपूर्ण नोकझोक, हे सगळे घडत असताना मला दिसत होते, त्या स्वरांमुळे वातावरणात आणि प्रत्येक र्शोत्याच्या मनात निर्माण होणारे भावनांचे विविधरंगी कल्लोळ. प्रत्येक मैफलीचा अनुभव मला माझ्या निर्णयाकडे जणू ढकलत होता. सुदैवाने, याच काळात पुन्हा एकदा झालेल्या गुरुजींच्या दौर्यात मी माझ्या आई-वडलांना त्यांच्या मैफलीला घेऊन गेलो. परत येत असताना वडील शांतपणे मला सांगत होते, ‘हे संगीत शिकायला भारतात गेलास तरी पैसे कमवण्यासाठी सहा-सहा महिन्यांनी जपानमध्ये येण्याची गरज नाही. त्याची सोय होईल..’ गुरुजींच्या स्वरांनी त्यांना पुरते जिंकल्याचा हा परिणाम होता.
भारतात येऊन दहा-बारा वर्ष होऊन गेली. या देशात मी इतका सहज सामावून जाईन असे तेव्हा वाटले नव्हते. परवा कोणीतरी विचारीत होते, एका अनोळखी देशात येऊन इथली भाषा, माणसं, जगण्याच्या रिती आणि येथील संगीतामधून दिसणारा संस्कृतीचा चेहरा हे सगळे शिकत, स्वीकारत असताना कधीतरी तुटलेपण जाणवले? नाही आपल्याला जमणार हे इतके सारे म्हणून वैफल्य आले? या प्रश्नावर माझ्या आत डोकावून बघत असताना जे दिसले ते क्षणभर मलाच चकित करणारे होते. माझ्यासाठी वैफल्याचा सगळ्यात मोठा क्षण असेल तो गुरुजींना सोडून जाण्याचा! भारतात शिकण्यासाठी म्हणून आलो तेव्हा पहिला प्रश्न होता मला येणार्या (आणि न येणार्या भाषेचा!) इथल्या लोकांशी संवाद करू शकेन अशी कोणतीच भाषा मला येत नव्हती. ना इंग्लिश ना हिंदी. मग आधी एक दुभाषा गाठला. दुसरा प्रश्न होता तो अर्थातच इथे मिळणार्या जेवणाचा! पण संगीताचा अभ्यास सुरू झाला आणि कळले हे प्रश्न फारच किरकोळ आहेत. खरी परीक्षा आहे ती इथले संगीत समजून घेत राहण्याची. आणि तुम्ही किती वर्ष संगीत शिकताय यावर ही समज येणे अजिबात अवलंबून नाही. गुरुजींनी त्यासाठी एक मंत्र दिला. यमनपासून शिक्षण सुरू करताना ते एवढेच म्हणाले, ‘सारखा फक्त वाजवण्याचा सराव करू नकोस. ती वाट तुला फार पुढे नेणार नाही. त्यासाठी, जमेल तेवढय़ा कलाकारांकडून गाणे ऐकत राहा. मग विलायतखां साहेब, अमीर खांसाहेब, अली अकबर खां, बडे गुलाम अली खां, हरिप्रसाद चौरसिया अशी बडी-बडी मंडळी माझ्या घरातील टेबलवर हजेरी लावू लागले ! माझ्यापुरत्या दिवस-रात्रीच्या रागांच्या मैफली सुरू झाल्या.
प्रत्येक कलाकाराचे विलंबित गायन-वादन ऐकताना इतका गोंधळ असायचा मनात. कारण तालांच्या मात्रांचा हिशोबच पेचात पाडायचा. हा गोंधळ कमी व्हावा यासाठी मैफलींना हजेरी लावण्याचा सपाटा लावला. कलाकाराची देहबोली, तबला साथीदाराशी त्याचा स्टेजवर होणारा संवाद, रसिकांच्या प्रतिसादाचा मैफलीवर होणारा परिणाम अशा लहान-लहान गोष्टी मला माझ्या शिक्षणासाठी मदत करीत होत्या. एकाच रागाच्या वेगवेगळ्या कलाकाराकडून दिसणार्या भिन्न-भिन्न रूपामुळे भारतीय संगीतातील उत्स्फूर्त राग मांडणीचे वेगळेपण जाणवत गेले.
या काळात गुरुजींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर केलेल्या प्रवासाने मला खूप शिकवले. या काळात त्यांच्याबरोबर होणार्या गप्पा म्हणजे त्यांच्या जुन्या मैफलींच्या अनेक आठवणी. अच्छा इन्सान होण्यासाठी अच्छा संगीत सुनना चाहिये, असे गुरुजी म्हणत आणि पुढे मिस्कीलपणे म्हणत, ‘हां, और अच्छा खाना भी जरुरी है..’ या देशातील वेगवेगळ्या प्रांतांमधील अफलातून चवीचे पदार्थ खाण्याची चटक या भटकंतीमधून तर लागली. हैदराबादला प्रथमच कार्यक्रमासाठी जात होतो. निघताना एका मित्राकडून खास हैदराबादी मेजवानीबद्दल टिप्स विचारल्या. तो म्हणाला, ‘बिर्याणी न खाता परत येऊ नकोस..!’ हॉटेलवर गेलो तेव्हा बाहेरच चौकशी केली आणि सामान खोलीत ठेवून रिक्षा करून गेलो तडक बिर्याणी खायला. काही वेळाने संयोजक मला जेवायला बोलवण्यासाठी आले तर मी गायब! शिष्य गायब झाल्याचा फोन थेट गुरुजीकडे गेला. गुरुजींनी फोन करून विचारले, ‘कुठे गायब झाला आहेस?’ माझ्या बिर्याणी प्रेमाची त्यानंतर खूप दिवस चर्चा सुरू होती..!
आता हा देश माझ्यासाठी अनोळखी उरला नाहीय. मैफलीत श्रोत्यांशी हिंदीत संवाद साधू शकतो मी. आणि दरवर्षी मित्राकडे होणार्या होळीच्या मस्तीची वाट बघत असतो! भारतीय माणूस मला फार पॉवरफुल वाटतो. आम्ही जपानी माणसे खूप सभ्य आहोत, पण मनातील कोणाशीही सहसा न बोलणारे, अगदी अबोल..! मैत्री करण्यास सदैव उत्सुक असे अनोळखी लोक भारतात कितीतरी भेटतात. तो अनुभव फार ताजेतवाने करणारा असतो. दोन दशके गुरुजींकडे शिकतोय पण तरी गेली अकरा वर्ष जो यमन शिकतोय तो अजून पुरता समजला आहे असे वाटतच नाहीये.. इतके हे संगीत ताजे आणि अथांग आहे. त्यामुळे माझ्यासाठीही रोजचा दिवस आणि सराव हा अगदी नवा असतो.. आज उमललेल्या फुलासारखा.
ताकाहिरो अराई
ताकाहिरो अराई हा जपानमधील. पण आता भारतवासी झालेला संतुरवादक. पंडित शिवकुमार शर्मा यांचा तो सिनिअर शिष्य असून, संतुरवादनाचे स्वतंत्र एकल कार्यक्रम करतो. भारताची हिंदी भाषा, भारतातील जेवण आणि गुरु-शिष्य परंपरेत असलेले गुरु-शिष्याचे नाते त्याने पुरतेपणी अंगीकारले आहे.
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे
vratre@gmail.com