जंतूंचा जग-प्रवास

By admin | Published: February 19, 2016 06:30 PM2016-02-19T18:30:45+5:302016-02-19T18:30:45+5:30

गेल्या दहा हजार वर्षातला मानवी इतिहास योद्धय़ांनी, राजांनी, प्रेषितांनी तर घडवलाच; पण त्यापेक्षा तो जिवाणूंनी, विषाणूंनी, किडय़ांनी केलेल्या पंचखंडांतल्या प्रवासामुळेच अधिक घडला.

World of insects | जंतूंचा जग-प्रवास

जंतूंचा जग-प्रवास

Next
>(ही वाट दूर जात)
- डॉ. उज्ज्वला दळवी
 
गेल्या दहा हजार वर्षातला मानवी इतिहास योद्धय़ांनी, राजांनी, प्रेषितांनी तर घडवलाच;
पण त्यापेक्षा तो जिवाणूंनी, विषाणूंनी, किडय़ांनी केलेल्या पंचखंडांतल्या प्रवासामुळेच 
अधिक घडला.
 शस्त्रस्त्रंपेक्षा, युद्धातल्या जखमांपेक्षा किंवा मुत्सद्दी राजकारण्यांच्या कारस्थानांपेक्षा 
शत्रूबरोबर आलेल्या आजारांनीच बाजी मारली. 
जोवर जंतूंची भटकंती जमिनीवरून 
आणि मंदगती जहाजांतून चालली होती तोवर त्यांच्या मर्दुमकीला मर्यादा होत्या. 
आता त्यांनी वेगवान जहाजांतून 
आणि हवाईजहाजांतूनही फिरणं 
सुरू केलं आहे.
 
‘‘अंग जरासं कोमट होतं. आजार फारसा मोठा वाटतच नाही. मरणाबिरणाचं तर डोक्यातही येत नाही. तरीही बहुधा त्याच, फारतर दुस:याच दिवशी मृत्यू घाला घालतो.  या शहरात मरणाने हैदोस घातला आहे. मेलेल्यांना पुरायला जिवंत माणसं शिल्लकच नाहीत. रस्त्यारस्त्यात प्रेतांचे ढिगारे साठले आहेत. सगळ्या शहरात मृत्यूची दुर्गंधी पसरली आहे. अशाने सगळी मानवजातच नष्ट होऊन जाईल!’’
- हे सहाव्या शतकातल्या प्लेगचं वर्णन आहे. इस्तंबूलमध्ये दिवशी 5000 माणसं मारणारी ती साथ सुरू झाली होती 2000 मैलांपलीकडे, आफ्रिकेतल्या इथियोपियाच्या उंदरांत! तिथून धान्याच्या पोत्यांतल्या उंदरांसंगे माणसांच्या पाठींवरून, गाडय़ांतून प्लेगचे जंतू इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया बंदरात आणि तिथून जहाजांत बसून भूमध्य सागराकाठच्या इस्तंबूल बंदरात टप्पा घेऊन पुढे ते गाडय़ाघोडय़ांवरच्या धान्यराशींतून, उंदरांपिसवांसोबत युरोपभर फैलावले. पूर्वेच्या गाझा, अॅण्टिऑकमधून मध्यपूर्व, आशिया आणि वेगळ्या दिशेने दक्षिणोकडची आफ्रिकाही त्यांनी पिसूक्र ांत केली. आठव्या शतकापर्यंत त्या जंतूंचा प्रवास आणि रोगाचं थैमान चालू राहिलं. 
प्लेगचा जागतिक प्रवास
त्यानंतरची प्लेगची ऊर्फ‘काळ्या काळदूताची’ साथ चौदाव्या शतकात आली. ती मध्य आशियातून निघाली; माणसाच्या सोबतीने व्यापारवाटांवरून, उंटांवरच्या कातडय़ांतल्या पिसवांतून चीन-भारत-इराण भटकली; तार्तार योद्धय़ांवर स्वार होऊन क्र ीमियात गेली. तार्तारांनी आपल्या प्लेगग्रस्त दोस्तांची प्रेतं क्र ीमियातल्या शहरांच्या तटांवरून गावांत फेकली. त्या ‘क्षेपणास्त्रं’तले जंतू गाशात गुंडाळूनच त्या शहरांतले इटालियन व्यापारी युरोपात पळाले. त्यांनी साथीला साथ दिली. त्या साथीचं धुमसणं, पसरणं आणि मृत्युकांड पुढची तीन शतकं चाललं. 
प्लेग हा माणसाबरोबर भटकणारा एकटाच आजार नव्हे. 
तशी जंतूंनी माणसाला पहिल्यापासूनच साथ दिली आहे. पंचाहत्तर हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून मानवजात निघाली तेव्हाही क्षयाचा जंतू आणि हेलिकोबॅक्टर हा जाठरजंतू त्याच्यासोबत होतेच, अजूनही आहेत. हेलिकोबॅक्टर तर मानवाकडून वाघ-सिंह-चित्त्यांनाही लाभला. 
दहा हजार वर्षांपूर्वी माणूस शेतकरी झाला, गावगर्दीत राहायला लागला. त्याने बैलघोडे, कुत्रीमांजरं, कोंबडय़ाबदकं माणसाळवली. घरालगत गोठय़ा-तबेल्यांत, खुराडय़ांत बाळगली. संपर्क-संसर्गामुळे त्या प्राण्यांच्या शरीरांत वस्तीला असलेल्या, तोवर ‘अमानुष’ असलेल्या जंतूंनी अडीनडीला माणूस‘प्राण्या’च्या शरीरात वसाहती केल्या. तिथे जुळवून घेण्यासाठी त्यांनी स्वत:चे गुणधर्मही बदलले, ते अधिक आक्र मक झाले. त्यामुळे माणसांना गंभीर रोग झाला. सांसर्गिक आजाराची साथ आली. तिच्यातून तावूनसुलाखून निघणा:या माणसांची प्रतिकारशक्ती त्या जंतूंची  लागण पुन्हा होऊ नये म्हणून सुसज्ज झाली. तिला चकवायला जंतूंनी आपल्या चेह:यामोह:यात पुन्हापुन्हा फेरफार केले; तिच्यावर कुरघोडी करायला आपली संरक्षक चिलखतं बदलली. त्या बहुरूपी खेळाला जाणतं प्रत्युत्तर देण्यात मानवी शरीरंही तरबेज झाली. सामना चालूच राहिला. 
वाटचाल, घोडदौड, गाडीसैर सगळ्या प्रवासांत अनाहुत हमसफर म्हणून जंतूही माणसांबरोबर गेले. नव्या गावांतल्या नव्या माणसांकडे सुसज्ज प्रतिकारशक्ती नव्हती. जंतूंचं फावलं. त्या नव्या गावगर्दीत ते जोमाने पसरले. त्यातून जी माणसं जगली, तगली त्यांना प्रतिकाराची ताकद आली. 
जंतू पुन्हा जनावरांकडे परतले. त्यांच्यात साथी पसरल्या किंवा पुढच्या संधीपर्यंत जंतू त्या मुक्या प्राण्यांमध्ये दबा धरून बसले. सिलसिला चालू राहिला.
रोमनांच्या काळात खुष्कीच्या आणि सागरी, लांब पल्ल्याच्या व्यापारमोहिमा सुरू झाल्या. उंटघोडय़ांवरून, जहाजांतून आशिया-आफ्रिकेतले देवीचे जंतू दुस:या शतकात रोमपर्यंत पोचले. जंतूंना नवे बळी लाभले. त्या साथीत लाखो लोक मृत्युमुखी पडले.
जंतूंना आसरा देणारे प्राणी गोठय़ा-तबेल्यांत राहणारेच असत असं नाही. युरोपमधल्या हिवाळ्यात कपडे उतरून अंघोळ करायला लोक धजत नसत. मोहिमेवर निघालेल्या सैनिकांना तर स्नानाबिनाला वेळही नसे. त्या समस्त पारोशा सैन्यावर उवांची महासेना चरत असे. टायफस हा त्या उवांमधून पसरणारा रक्तवाहिन्यांच्या अस्तराचा आजार मानवसेनेसोबत मजल-दरमजल करत दूरचा पल्ला गाठे. त्याने होणारा रक्तस्त्रवी ज्वर फैलावे. दोन सेनांमध्ये घावांखेरीज उवांचीही देवाणघेवाण होई. त्यामुळे ािस्ती-इस्लामी धर्मयुद्धांमध्ये अनेकदा टायफसच धर्मातीत विजेता ठरला. सहा लाख खंद्या योद्धय़ांसह नेपोलियन रशियावर चाल करून गेला. वाटेतल्या पोलंडमध्ये लुटालूट करताना त्याच्या सेनेने तिथल्या टायफसचं वाणही लुटलं. पुढे रशियामध्ये नेपोलियनचा जो पराभव झाला त्याला तो टायफस मोठय़ा प्रमाणात कारणीभूत ठरला.
गेली काही हजार वर्षं उष्ण कटिबंधातल्या आफ्रिकी आशियाई देशांत पाळीव प्राणी माणसांचे निकटवर्ती झाले होते. त्या सततच्या सहवासाने माणसांमध्ये मलेरिया, कॉलरा, पीतज्वर, देवी, गोवर, गालगुंड वगैरेंचं बस्तान बसलेलं होतं. पण ऑस्ट्रेलिया-अमेरिकेत परिस्थिती वेगळी होती. तिथली बरीचशी जनावरं तेरा हजार वर्षांपूर्वीच्या हिमयुगात नष्ट झाली होती. नव्या जगाच्या शोधात निघालेली युरोपियन जहाजं त्या खंडांच्या किना:याला लागेपर्यंत तिथे घरांत किंवा घरालगत राहणारी पाळीव जनावरं नव्हती. त्यांनी पाळलेले लामा, अल्पाका, टर्की घराबाहेर, मोकळ्यावर राहत. त्यामुळे तिथल्या मूळ रहिवाशांना प्राण्यांच्या निकटच्या संपर्कातून साथीचे, गर्दीचे रोग आंदण मिळाले नव्हते. परिणामी त्या रोगांशी झुंजायची ताकदही लाभली नव्हती. कोलंबसाच्या जहाजातून युरोपियन, आफ्रिकन, आशियाई रोग अमेरिकेला गेले. त्यांनी धुमाकूळ घातला. अमेरिकेत साथीचे रोग नसले तरी त्यांचा जंतुभाता अगदीच रिकामा नव्हता. त्यांच्याकडे अधिक नवलाईचे जंतू होते. कोलंबसाच्या परतीच्या फेरीबरोबर अमेरिकेने युरोपला सिफिलिस हा गुप्तरोग पाठवून दिला. वास्को-द-गामाच्या मोहिमेने तो आजार कोलकात्यापर्यंत पोचवला. पुढच्या पंचवीस वर्षांतल्या शोधमोहिमांसोबत, व्यापारी सफरींबरोबर तो आफ्रिकेत आणि चीनमध्येही जुनापुराणा झाला. 
स्पॅनिश जहाजं 1519 मध्ये मेक्सिकोला पोचली तेव्हा त्यांच्याशी लढायला तिथल्या अॅङटेक लोकांचं मोठं सैन्य सुसज्ज होतं. स्पॅनिशांची तिथे डाळ शिजली नसती. पण स्पॅनिश जहाजातल्या एका गुलामाला देवी आल्या होत्या. स्पॅनिशांची प्रतिकारशक्ती त्या जंतुहल्ल्याला तोंड द्यायला तयार नव्हती. त्या देवींची साथ वणव्यासारखी फैलावली. शूर, लढवय्या अॅङटेक योद्धय़ांची त्यात सरसकट आहुती पडली. त्यांचा पराक्रमी राजा त्या साथीने मृत्युमुखी पडला. साथीतून तगलेल्या अॅङटेकांचं मनोधैर्य खचलं. सैन्याची ताकद कमी असूनही स्पॅनिशांची जीत झाली. 
पेरुमध्ये फ्रेंचांनी देवींखेरीज गोवर, इन्फ्लुएंझा, टायफस, डिप्थेरिया वगैरे अनेक जंतूंच्या सेनाही राबवल्या. जंतूंच्या पाठबळामुळे युरोपियनांना अमेरिकेत जम बसवता आला.   
कोलंबसाच्या काळातली 
जागतिक देवाणघेवाण
गेल्या दहा हजार वर्षांतला मानवी इतिहास योद्धय़ांनी, राजांनी, प्रेषितांनी तर घडवलाच; पण त्यापेक्षा तो जिवाणूंनी, विषाणूंनी, किडय़ांनी केलेल्या पंचखंडांतल्या प्रवासामुळेच अधिक घडला. शस्त्रस्त्रंपेक्षा, युद्धातल्या जखमांपेक्षा किंवा मुत्सद्दी राजकारण्यांच्या कारस्थानांपेक्षा शत्रूबरोबर आलेल्या आजारांनीच बाजी मारली. जोवर जंतूंची भटकंती जमिनीवरून आणि मंदगती जहाजांतून चालली होती तोवर त्यांच्या मर्दुमकीला मर्यादा होत्या. आता त्यांनी वेगवान जहाजांतून आणि हवाईजहाजांतूनही फिरणं सुरू केलं आहे. त्यांच्या गगनभरा:यांची गाथा पुढल्या लेखात वाचायला मिळेल.
 
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)

Web Title: World of insects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.