गावापासून परदेशापर्यंत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:00 AM2019-05-26T06:00:00+5:302019-05-26T06:00:05+5:30

हे पुस्तक म्हणजे मी माझ्या  गावात आजोळी जन्मल्यापासून ते 1988मध्ये टोकियोमध्ये असताना माझी जी कारकीर्द झाली होती, म्हणजे पहिलं पोस्टिंग पूर्ण झालं तोपर्यंतचा अनुभव या पुस्तकात चित्रित झालेला आहे. 

Writer Dnyaneshwar Mule speaks about his book 'Mati, Pankh ani Aakash'.. | गावापासून परदेशापर्यंत. 

गावापासून परदेशापर्यंत. 

Next
ठळक मुद्देमी या पुस्तकाला काय दिलं माहिती नाही, किंवा या पुस्तकाने इतरांना किती आनंद दिला माहिती नाही; पण या पुस्तकाने मला प्रचंड आनंद दिलेला आहे. एका अर्थाने त्या लिहिण्याचं सार्थक झालेलं आहे असं मला वाटतं.

- ज्ञानेश्वर मुळे

‘माती, पंख आणि आकाश’ हे माझे सन 1998 साली प्रसिद्ध झालेले पुस्तक. (त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि नुकतीच त्याची नवी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे.) पहिली आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा मी जेमतेम चाळीस वर्षांचा होतो आणि जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा पस्तीस-छत्तीस वर्षांचा.
पुस्तक आत्मचरित्नात्मक आहे आणि माझ्या बालपणापासून ते 1988पर्यंतचा काळ या पुस्तकात चितारलेला आहे. हे ललित शैलीतील लिखाण आहे; पण मुख्यत: माझ्या जीवनात घडलेल्या घटना, आलेले अनुभव आणि मी पाहिलेले जग यावर हे आधारित आहे.
1998नंतर आजपर्यंत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. पहिली आवृत्ती बेळगावचे र्शी. जवळकर यांनी काढलेली होती. त्यानंतर त्यांनी काही पुढील आवृत्त्यादेखील काढल्या. त्यानंतर मग कोल्हापूरचे प्रकाशक आणि अलीकडे पुण्याचे मनोविकास प्रकाशक र्शी. पाटकर यांनी हे पुस्तक काढलेलं आहे.
हे पुस्तक आहे तरी काय? हे पुस्तक म्हणजे मी माझ्या  गावात आजोळी जन्मल्यापासून ते 1988मध्ये टोकियोमध्ये असताना माझी जी कारकीर्द झाली होती, म्हणजे पहिलं पोस्टिंग पूर्ण झालं तोपर्यंतचा अनुभव या पुस्तकात चित्रित झालेला आहे. बालपणीचे जे अनुभव आहेत त्याच्यामध्ये घरातलं वातावरण, माझं आजोळ, जिथे मी वाढलो ते माझं वडिलांचं गाव आणि तिथला सगळा परिसर याचं चित्नण आहे. गावातली माझी शाळा, पाण्याचा तलाव, त्या तलावावरची चिंचेची झाडं, गावापासून दूर असलेला माळभाग, नदी किनार्‍यावर असलेली आमची शेती, वेगवेगळ्या ¬तूंमध्ये शेतात होणारे बदल, निसर्गात होणारे बदल या सगळ्या गोष्टी रेखाटल्या आहेत. आमच्या नदीतलं किंवा विहिरीतलं आमचं पोहणं इतर अनेक बाल कुरापती, याचेही वर्णन यात आलेलं आहे.
दहाव्या वर्षी मला कोल्हापूरच्या विद्यानिकेतन या शाळेत घालण्यात आलं. त्या शाळेत गेल्यानंतर तिथलं जे अनुभवविश्व आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. या शाळेमध्ये  जिल्ह्यातले मला सोडून 34 विद्यार्थी होते आणि हे सगळे वेगवेगळ्या गावातून आलेले होते. ही निवासी शाळा होती आणि पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या प्रेरणेतून एक आदर्श शाळा म्हणून त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. तिचं नाव होतं विद्यानिकेतन.
पहिल्यांदाच मला इतर गावातल्या मुलांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भेटता आलं, त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांच्या सहवासात राहता आलं आणि माझं जीवन समृद्ध होत गेलं. कोल्हापूरला महाराष्ट्रातल्या पुरोगामी सुधारक चळवळीचं प्रतिबिंब मला प्रत्यक्षात अनुभवता आलं. विशेषत: कोल्हापूरवर शाहू महाराजांचा, फुले -आंबेडकरांचा मोठा प्रभाव आहे. कारण कोल्हापूर हीच  शाहूराजांची कर्मभूमी आणि कोल्हापूरजवळच कागल हे गाव ही त्यांची जन्मभूमी होती. शालेय जीवनापासून कोल्हापूरमधल्या पुरोगामी चळवळींचा आणि माझा जवळचा संबंध आला.
कोल्हापूरमध्ये असताना आणखीन एक गोष्ट ऐकायला मिळाली ती म्हणजे कोल्हापुरात येणार्‍या नामवंत वक्त्यांची भाषणे. त्याच्यामध्ये जसे ना.ग. गोरे होते, एसेम जोशी होते, ग.प. प्रधान होते, त्याचप्रमाणे शिरवाडकरांपासून कवी अनिल यांच्यापर्यंत सगळ्यांना मला ऐकण्याची संधी मिळाली. सुरेश भटांच्या गझला कोल्हापुरात ऐकल्या. वि. स. खांडेकर यांचं दर्शन घडलं, त्यांचं भाषण मी ऐकलं. ज्ञानपीठ पुरस्कारानंतर त्यांचा कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये भव्य सत्कार झाला होता; त्याला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं. त्यानंतर अगदी कॉलेजचं शिक्षण संपेपर्यंत ही अशी साहित्याची, संगीताची व वेगवेगळ्या कलांची मेजवानी मला मिळाली. या सगळ्यांचे प्रतिबिंब या पुस्तकात उमटलेलं आहे. शिवाय कोल्हापूरच्या शाळेनंतर तिथलं जे माझं कॉलेजजीवन सुरू झालं त्याबाबतही अत्यंत तपशीलवार असं वर्णन पुस्तकात आहे. मुख्य म्हणजे माझा त्या काळातला शिक्षकांच्या बरोबर आलेला सहवास, त्यांच्याबरोबरचा संवाद, कॉलेजचा आणि विशेषत: प्राचार्यांचा माझ्या जीवनावर झालेला परिणाम या सगळ्या गोष्टींचं यथासांग चित्नण आलेलं आहे. शिवाय त्यावेळचं कॉलेजमधल्या मुला-मुलींमधलं एकमेकांबरोबर वागण्या-बोलण्याचं नातं कसं होतं हेही या पुस्तकांमध्ये आलेलं आहे.
त्यानंतर माझ्या जीवनात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि यूपीएससी या दोन नवीन संस्थाचा प्रवेश झाला. परीक्षांची तयारी कशी केली, त्यावेळच्या अडचणी भाषेच्या असोत किंवा मार्गदर्शनाच्या, या सगळ्यांचा ऊहापोह या पुस्तकात आलेला आहे. मला उपयोगी ठरलेल्या लोकांचं वर्णनही यात आलेलं आहे. त्यानंतर मुंबईत दोन वर्षंं जी मी पदव्युत्तर अभ्यासासाठी घालवली, त्यातले अनुभव थोडेफार आलेले आहेत. मुख्य म्हणजे  यूपीएससीच्या परीक्षेची तयारी आणि प्रत्यक्षात यूपीएससीसाठी झालेली माझी मुलाखत याचं तपशीलवार वर्णन आलेलं आहे.
हे सगळं मी का लिहिलं आणि तेही अगदी वयाच्या 35-36व्या वर्षी असा प्रश्न अनेकांना पडण्याची शक्यता आहे. मी ज्या काळात वाढलो त्या वेळेस ललित साहित्याचा माझ्या मनावरती मोठा परिणाम झालेला होता. नुकतंच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी लिहायला सुरुवात केलेली होती. आधी ‘बलुतं’ आणि त्यानंतर ‘उपरा’ या आत्मचरित्नांनी त्यावेळेस खळबळ माजवली होती. या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला होता.
मला असं वाटलं की आपला जीवन प्रवासही थोडासा वेगळा आहे. त्यात अडचणीही भयंकर आल्या. ग्रामीण भागातला युवक म्हणून, इंग्रजी भाषेतून शिक्षण झालेलं नाही म्हणून, यूपीएससीसारख्या त्या काळात अशक्य वाटणार्‍या परीक्षांचा ध्यास घेणारा विद्यार्थी म्हणून आणि  त्यात उत्तीर्ण झालेला एक युवक म्हणून, माझे जे अनुभव होते ते माझ्या समवयस्क मित्नांपेक्षा खूप वेगळे होते. त्याशिवाय जपानमध्ये मी त्यानंतर पहिल्याच पोस्टिंगसाठी चार-एक वर्ष राहिलो, तिथले वेगवेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथली संस्कृती त्यांचं वर्णनही लिहिणं अपरिहार्य होतं.
मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा का झाली? - मला असं वाटतं की दूर गेल्यानंतर आपल्या लोकांना विशेषत: माझ्या आईवडिलांना, संपूर्ण मित्नपरिवाराला आणि महाराष्ट्राला एक राजनीतिज्ञ म्हणून मी काय जीवन जगतो ते सांगणं मला खूप आवश्यक वाटलं. त्यातूनही लिहिण्याची प्रेरणा अतिशय दृढ झाली. आणि त्यामुळेच मी हे लिहितं झालो. माझ्या लिहिण्यामध्ये जशी ललित साहित्यिकांची प्रेरणा होती तसा मला मिळालेला जो संत परंपरेचा वारसा आहे त्याचाही माझ्या लिखाणावर प्रभाव पडला.
या आत्मचरित्नामध्ये माझ्या प्रगतीचं आणि प्रगतीच्या टप्प्यांचं वर्णन आलेलं असलं तरी मी शक्यतो आत्मस्तुती टाळण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जीवनामध्ये जसे चांगले अनुभव आले तसे कटु अनुभवदेखील आले. कटु अनुभव लिहिण्याचे शक्यतो मी टाळलेलं आहे. जर लिहिलंच असेल तर त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींमुळे हे अनुभव आले त्या व्यक्तींची नावं मी टाळलेली आहेत. या दोन गोष्टी मी मुद्दाम केल्या. कारण मला असं वाटलं की आपल्याला कुठल्या व्यक्तीमुळे काही वाईट सोसावं लागलं हे जास्त महत्त्वाचं नाहीये तर तो अनुभव इतरांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. खरं तर माझ्या मनामध्ये कुणाविषयीच कटुता अजिबात नाहीये. याचं मुख्य कारण म्हणजे मला मदत करणार्‍यांची संख्या अतिशय मोठी आहे. त्यामानानं ज्यांच्यामुळे कटु अनुभव आले अशा लोकांची संख्या अगदी नगण्य आहे.
या पुस्तकाला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ सोळा-सतरा आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यूपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांंना या पुस्तकाचा खूपच उपयोग झाला आहे. कारण या आशयाची शेकडो पत्रं मला आली आहेत आणि अजूनही येतात. 
आज हे पुस्तक जळगाव विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्र मात आहे. त्यातील एक भाग कर्नाटकात माध्यमिक शाळेत लावलेला आहे. अनेक पारितोषके या पुस्तकाला मिळाली आहेत. मी या पुस्तकाला काय दिलं माहिती नाही, किंवा या पुस्तकाने इतरांना किती आनंद दिला माहिती नाही; पण या पुस्तकाने मला प्रचंड आनंद दिलेला आहे. एका अर्थाने त्या लिहिण्याचं सार्थक झालेलं आहे असं मला वाटतं.
‘माती, पंख आणि आकाश’
लेखक : ज्ञानेश्वर मुळे, 
प्रकाशक : मनोविकास

Web Title: Writer Dnyaneshwar Mule speaks about his book 'Mati, Pankh ani Aakash'..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.