लेखन हा माझा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:05 AM2018-12-23T01:05:33+5:302018-12-23T01:09:47+5:30

पद्मगंधा प्रतिष्ठान या साहित्य क्षेत्रात भरघोस काम करणाऱ्या संस्थेचा रौप्यमहोत्सव राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाने दि. २९ व दि. ३० डिसेंबरला नागपूरच्या अंधविद्यालय, बी.आर. मुंडले शाळेच्या सभागृहात होत आहे. पद्मगंधा संस्थेच्या संस्थापिका श्रीमती शुभांगी भडभडे यांची ७५ पुस्तके प्रकाशित होत असतानाच हा कार्यक्रम होत आहे हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. त्यानिमित्त त्यांची घेतलेली ही मुलाखत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू स्पष्ट करीत आहे.

Writing is my breath | लेखन हा माझा श्वास

लेखन हा माझा श्वास

Next
ठळक मुद्देपद्मगंधा संस्थेच्या संस्थापिका श्रीमती शुभांगी भडभडेविशेष मुलाखत


सौ. प्रतिभा कुळकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क
पद्मगंधा प्रतिष्ठान या साहित्य क्षेत्रात भरघोस काम करणाऱ्या संस्थेचा रौप्यमहोत्सव राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाने दि. २९ व दि. ३० डिसेंबरला नागपूरच्या अंधविद्यालय, बी.आर. मुंडले शाळेच्या सभागृहात होत आहे. पद्मगंधा संस्थेच्या संस्थापिका श्रीमती शुभांगी भडभडे यांची ७५ पुस्तके प्रकाशित होत असतानाच हा कार्यक्रम होत आहे हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. त्यानिमित्त त्यांची घेतलेली ही मुलाखत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू स्पष्ट करीत आहे.
प्रश्न : आपण लेखन कधी सुरू केलं?
उत्तर : मी १५ वर्षाची असताना आकाशवाणीसाठी लेखन करू लागले होते. १६ वर्षाची असताना तरुण भारत दैनिकात स्वत:ची बालकथा घेऊन गेले होते. तेथे संपादक ग.त्र्यं. माडखोलकर यांची भेट झाली. त्यांनी कथा कशी लिहावी हे समजावून दिले. त्यामुळे माझ्या लेखनात नेमकेपणा आला.
प्रश्न : तुझी पाहिली कादंबरी कोणती?
उत्तर : ‘समाधी’ ही माझी पहिली कादंबरी. माझ्या एका कथेचा विस्तार करून ती कादंबरी मी लिहिली होती. सोलापूरच्या गुलमोहोर प्रकाशनानं ती प्रसिद्ध केली होती. त्या कादंबरीच्या रूपानं मला प्रथम मानधन मिळाले. सहा महिन्यात त्या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर मी कादंबरी लिहिण्याचा सपाटा लावला. कथा असो, कादंबरी असो वाचकांनी माझं लेखन उचलून धरलं. मला प्रकाशकही मिळत गेले. माझ्या माहेरी, सासरी माझ्या लेखनाचं कौतुक झालं. थोडं आर्थिक स्थैर्यही लाभलं.
प्रश्न : लेखनाशिवाय आणखी काय काय केलं?
उत्तर : तरुण भारत दैनिकाचा बालविभाग सांभाळण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे माझी ओळख वाढली. जनसंपर्क वाढला. पुढे काही दिवस लोकमत दैनिकाचा ‘सखी’ हा महिलांचा स्तंभ सांभाळला. जनवाद दैनिकात तर मी रविवारच्या साहित्य पुरवणीचे काम पाहात होते. असे विविध अनुभव येत गेले. हे करीत असताना एकीकडे पद्मगंधा प्रतिष्ठान या संस्थेची निर्मिती केली. त्यासाठी माझ्या पतींकडून मोलाचे सहकार्य मिळाले. पद्मगंधाच्या माध्यमातून अनेक साहित्यविषयक कार्यक्रम राबवले. अनेक प्रतिभासंपन्न स्त्रियांना एकत्र ठेवण्याचे काम पद्मगंधा प्रतिष्ठानने केले असे गौरवोद्गार कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी काढले. लोक म्हणतात ‘इतकी वर्षे बायका एकमेकांशी न भांडता कशा काय काम करतात’ आमचा खास महिलांचा नाट्यमहोत्सव ही आमची मोठीच उपलब्धी आहे.
प्रश्न : तुझ्या चरित्र कादंबऱ्यांसंबंधी सांग ना?
उत्तर : माझ्या सामाजिक कादंबऱ्यांना वाचकांचा खूप प्रतिसाद मिळाला. पण माझ्या चरित्रात्मक कादंबऱ्या या महापुरुषांच्या जीवनावर आधारित असल्याने त्यांना जास्त मानाचं पान मिळालं. माझी पहिली चरित्रात्मक कादंबरी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित ‘कृतार्थ’ ही होती. त्यानंतर गोळवलकरांच्या जीवनावर ‘इदं न मम’ ही लिहिली. आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावर ‘भौमर्षी’ ही लिहिली. स्वामी विवेकानंद आणि ‘योगी पावन मनाचा’ ही संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित याही कादंबऱ्या वाचकांना खूप आवडल्या. आता ‘अद्वैताचं उपनिषद’ ही आद्य शंकराचार्य यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. या सर्व कादंबऱ्यांनी मला प्रसिद्धी तर माझ्या प्रकाशकांना समृद्धी मिळवून दिली आहे.
प्रश्न : संसार करून लिखाण करणं हे कसं साध्य केलं?
उत्तर : माझी लेखन करण्याची वेळ सकाळी ४ ते ७ ही असते. माझ्या लेखनासाठी माझे पती आणि मुले यांचे भरपूर सहकार्य लाभले. उरलेला वेळ मी संसारासाठी देते. उत्साहाने सणवार करते. येणारे जाणारे खूप असतात. त्यांचं आदरातिथ्यही आवडीने करते. पण माझ्या लिखाणाचा शुक्रतारा कधी ढळला नाही. ईश्वराने मला शब्दसंपदा दिली आहे. देवी सरस्वतीने माझा हात धरून ठेवला आहे. त्यामुळे मी सातत्याने लेखन करू शकले. लेखन हा माझा श्वास आहे. माझ्या प्रकाशकांनी तो कायम ठेवलाय.
प्रश्न : तुझ्या नाटकांबद्दल सांग ना?
उत्तर : सरसंघचालक गुरुजी गोळवलकर यांच्या चरित्र कादंबरीचेच ‘इदं न मम’ या नावाने मी नाट्यरूपांतर केले. तसेच स्वामी विवेकानंद या कादंबरीवरही त्याच नावाने नाटक लिहिले. ही दोन्ही नाटके भारतभर गाजली कारण त्यांचे हिंदीतून नाट्यरूपांतर केले होते. इदं न मम या नाटकाला नऊ सन्मान मिळाले तसेच एक लाख रुपयाचा पुरस्कारही मिळाला. स्वामी विवेकानंद या नाटकाचे तर दोन प्रयोग दुबई या मुस्लीम प्रदेशात झाले. हे सर्व आनंदाचे क्षण आहेत.
अशी ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची शुभांगी भडभडे. पतीच्या निधनानंतर तिने लेखन सोडून तर दिले नाही पण ती अधिक जोमाने लेखन करू लागली आहे. स्वत:च्या बळावर साहित्य संमेलने आणि महिला नाट्यस्पर्धा यासारखे उपक्रम ती जिद्दीने पार पाडते आहे.

Web Title: Writing is my breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.