मुलं रस्त्यावर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:05 AM2019-09-15T06:05:00+5:302019-09-15T06:05:12+5:30

‘हवामानासाठी शाळा बंद’ असे म्हणत  स्वीडनमधील एक चिमुकली मुलगी  त्यांच्याच संसदेबाहेर धरणे देऊन बसली होती. या घटनेला वर्षही होत नाही, तोच जगभरातील 50 लक्ष मुले याच मागणीसाठी या आठवड्यात; 20 सप्टेंबरला रस्त्यावर येणार आहेत.  पृथ्वी वाचविण्यासाठी संपूर्ण जगातील उत्पादन  बंद करण्याची हाक या मुलांनी दिली आहे.  मुलांच्या या ‘चक्रीवादळा’च्या निमित्ताने का होईना, संपूर्ण जग एकदाचे स्वच्छ व्हावे,  अशीच सार्‍या पर्यावरणप्रेमींची इच्छा आहे.

Younger generation of the world is on the Global Climate Strike on September 20 to save the Earth !.. | मुलं रस्त्यावर..

मुलं रस्त्यावर..

Next
ठळक मुद्देपर्यावरण रक्षणाबद्दल मोठय़ा माणसांनी जबाबदारी उचलावी,  या मागणीसाठी जगभरातली मुलं रस्त्यावर उतरत आहेत, त्यानिमित्ताने..

- अतुल देऊळगावकर
  
फुलपाखरांनी एका ठिकाणी पंख फडफडवले तर जगाच्या दुसर्‍या टोकाला चक्र ीवादळ येऊ शकतं.   
- गणितज्ञ व हवामानशास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्झ 

स्वीडनमधील एक चिमुकली मुलगी ‘हवामानासाठी शाळा बंद’ असं लिहून त्यांच्याच संसदेबाहेर धरणे देऊन बसली तो दिवस होता, 20 ऑगस्ट 2018! केवळ 13 महिन्यांत म्हणजे 20 सप्टेंबर 2019 रोजी तिच्या साथीला जगातील सुमारे 50 लक्ष मुले येत आहेत. ही परिकथा वा विज्ञान कादंबरी नसून वास्तव आहे. पालक, बहीण वा मैत्रीण कोणीही सोबतीला येण्यास तयार नाही. तिकडे शाळा चुकविणे हा गुन्हा असल्यामुळे  शिक्षा होऊ शकते. तरीही  नवव्या इयत्तेत शिकणार्‍या ग्रेटा थुनबर्गला स्वत:च्या देशाच्या संसदेबाहेर ठाण मांडून बसण्याचं धाडस होतं. यानंतर मिळालेल्या पाठिंब्यामुळे ती मुले हवामानासाठी शाळा बंद आंदोलन चालू करतात आणि पाहता पाहता हे आंदोलन जगभर पसरतं, तेव्हा हवामानाचे संशोधक लॉरेन्झ यांचा सिद्धांत, समाजमनाबाबतही तंतोतंत लागू पडतो, हे सिद्ध होत आहे. 
छोट्या मुलीच्या एका छोट्या कृतीमुळे लक्षावधी मुलांना व तरुणांना स्फूर्ती मिळाली आणि भवितव्याच्या धास्तीने हादरलेली शाळकरी मुले आणि तरुण लाखोंच्या संख्येने हवामानाविरोधी लढय़ात उतरू लागले. त्यांना जगातील आघाडीचे शास्त्नज्ञ पाठिंबा देऊ लागले. ही मुले ‘आमचं नाही, विज्ञानाचं ऐका आणि कर्ब उत्सर्जन थांबवून जगाला वाचवा’  असं त्यांच्या नेत्यांना सांगू लागली. 
8 सप्टेंबर 2018 ला स्टॉकहोम येथे हवामानाकरिता जनमोर्चा (पीपल्स क्लायमेट मार्च) आयोजित केला होता. तिथे ग्रेटादेखील सराईत वक्त्याप्रमाणे बोलू लागली.   आमच्या शाळा बंद आंदोलनाचा राजकीय पक्षांशी काडीमात्न संबंध नाही. आपले राजकारण व पोकळ शब्द यांमुळे हवामान आणि जीवसृष्टी यांच्यात क्षणभरही बदल होणार नाही. आमच्या कृतीमुळे त्यांच्यात बदल होऊ शकतो. आमची आरोळी म्हणा, टाहो म्हणा वा आक्रंदन. ही मदतीची हाक आहे. हवामानबदलाविषयी अजूनही विशेष न लिहिणार्‍या सर्व वृत्तपत्नांकरिता आणि या संकटाला संकट न समजणार्‍या सर्वांसाठी ही हाक आहे. हवामान आणि पर्यावरण याशिवाय इतर सगळ्या गोष्टींसाठी भूमिका घेऊन वजन खर्च करणार्‍या प्रभावशाली व्यक्तींकरिता आणि हवामानबदलाकडे गांभीर्याने पाहात असल्याचे ढोंग करणारे राजकीय पक्ष व राजकारणी यांच्यासाठी ही हाक आहे. या सर्व घडामोडी चालू असताना काहीच झाले नाही असे मानणारे तुमचे मौन हे सर्वात वाईट व घाणेरडे आहे. येणार्‍या सर्व पिढय़ांचे भवितव्य तुमच्या खांद्यावर आहे. मी एकटा काय करू शकेन असा विचारच चुकीचा आहे. काही मुली शाळा चुकवतात ही जागतिक बातमी होते. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. वायू उत्सर्जनाचा प्रत्येक किलो महत्त्वाचा आहे. थेंबाथेंबांनीच पुढे जावे लागते. आम्हाला भविष्य द्या, आमचे जीवन तुमच्या हातात आहे.  ग्रेटा म्हणाली,  ‘ह्याचा जास्तीत जास्त प्रसार करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा.’ 
तिच्या बोलण्यात कुठलाही आव वा आविर्भाव नाही. त्याला अभिनिवेश वा उपदेशाची अजिबात बाधा नाही. साधे व सोपे, विज्ञानात व तर्कात पक्के तरीही ऐकणार्‍यांना अंतर्मुख करणारी ग्रेटाची हाक लहान व मोठे दोघांच्याही मनाचा ठाव घेत आहे. तिच्या या बोलण्याचा जनतेवर होणारा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला. ग्रेटाकडून स्फूर्ती घेतलेले हजारो विद्यार्थी शाळा बंद आंदोलनात सहभागी होऊ लागले. अवघ्या तीन महिन्यांत छोटी ग्रेटा जगातील पर्यावरणीय चळवळीची आंतरराष्ट्रीय राजदूत झाली. पर्यावरणीय व सामाजिक संघटना,  विविध देशांच्या संसद,  जागतिक परिषदा तिला व्याख्यानासाठी आमंत्रित करू लागल्या. त्याचवेळी या आंदोलनात अनेक देशांतील मुलेही सहभागी, अतिशय सक्रि य होत गेली. अमेरिका, बेल्जियम, आयर्लंड, कॅनडा, भारत, पाकिस्तान, कोलंबिया, नेदरलँड, नॉर्वे या देशांतील मुलांनी पर्यावरण रक्षणासाठी स्वत:च्या देशातील सरकारांवर न्यायालयात खटले दाखल केले. 
वॉशिंग्टन येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल एन्व्हायर्नमेंटल लॉ’चे अध्यक्ष कॅरोल मुफेट म्हणतात, ‘शाळकरी मुलांच्या पुढाकारामुळे जगातील पर्यावरण सक्रियता विलक्षण वेगाने वाढत आहे. ते ठणकावून सांगत आहेत- ‘तुम्ही अपयशी ठरला आहात. आमच्या हक्कांना न डावलता त्यांचे रक्षण करणे, हे तुमचे कर्तव्य आहे. यामुळे कायदा व घटना यांच्या आधारे लढा अधिक सशक्त होत आहे.’  
50 राष्ट्रांतील न्यायालयांनी सामान्य लोकांचे नागरी हक्क जपण्यासाठी त्या त्या सरकारांना फटकारले आहे. आता 100 राष्ट्रांतील वकील मंडळी या खटल्यांच्या यशाचा अभ्यास करून त्यांच्या देशात याचा उपयोग करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
350.1ॅ ही जागतिक संघटना ‘जगातील हवेत कर्ब वायूंची संहती 350 पार्ट्स पर मिलियनपर्यंत आणून तापमानवाढ 1.5  अंश सेल्सियसपर्यंत रोखले तरच पृथ्वीला कडेलोटापासून वाचवता येऊ  शकेल’,  हे ब्रीद घेऊन कार्यरत आहे. त्यांनी जीवाश्म इंधन कंपन्यांमधील समभाग काढून घेण्याची मोहीम हाती घेतली आहे.  
या संघटनेच्या विनंतीवरून जगातील आघाडीच्या  अर्थतज्ज्ञांनी ‘यापुढे जीवाश्म इंधनाचे उत्पादन वा त्यासाठीची पायाभूत रचना यातून निर्र्गुंतवणूक’ असे आवाहन केले आहे. ही संघटना हवामानाबाबत जागरुकता वाढविणार्‍या मुलांच्या  साथीला आली आणि मुलांनी संघटनेच्या कार्यात हातभार लावला. परिणामी जीवाश्म इंधन करणार्‍या कंपन्यातील समभाग काढून घेण्याला अतोनात वेग आला. 9 सप्टेंबर 2019 पर्यंत तब्बल 11 लक्ष कोटी डॉलरची गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. पर्यावरण चळवळीला आलेले हे यश ऐतिहासिक आहे. 
संयुक्त राष्ट्र संघाने हवामानबदलावर कृती आराखडा ठरविण्यासाठी, न्यू यॉर्क येथे 20 ते 23 सप्टेंबर या काळात जगातील नेत्यांची शिखर परिषद आयोजित केली आहे. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी मुलांनी 20 सप्टेंबर 2019 रोजी जगातील शाळा बंद करण्याचे ठरवले आहे. त्या दिवशी जगातील 50 लक्ष मुले या बंदमध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे. न्यूयॉर्क पब्लिक स्कूल व्यवस्थापनाने ‘पालकांच्या सहमतीने विद्यार्थ्यांना 20 सप्टेंबरच्या आंदोलनासाठी विद्यालायात अनुपस्थित राहण्याची मुभा’ दिली आहे. असे प्रथमच घडते आहे. 20 ते 27 सप्टेंबर हा ‘हवामान सप्ताह’ साजरा करण्याचं मुलांनी व तरुणांनी ठरवलं आहे. या काळात प्रदूषण करणार्‍या तेल व कोळसा कंपन्यांसमोर ते निदर्शने करतील, तिथे झाडे लावतील. रस्त्यावर समूहगान, नाटक, चित्ने सादर करतील. सायकल फेर्‍या काढतील. प्रत्येक ठिकाणी लोकांच्या बैठका घेतील. 
20 सप्टेंबर 2019 रोजी पृथ्वी वाचविण्यासाठी संपूर्ण जगातील उत्पादन बंद करण्याची हाक मुलांनी दिली आहे. ‘तुम्ही जगात कोठेही असा. एक दिवस दैनंदिन काम बंद ठेवत या व्यवस्थेपासून दूर राहा. हवामानबदल रोखून आपले भविष्य बदलायचे असेल तर एवढे कराच.’ असं कळकळीचं आवाहन ते करीत आहेत. ‘अँमेझॉन’ या कंपनीने वस्तू पुरविण्यासाठी 70 विमाने खरेदी केली. तसेच ती प्रदूषण करणार्‍या कंपन्यांना मदत करते, याच्या निषेधार्थ ‘अँमेझॉन’ कंपनीचे जगभरातील कर्मचारी 20 सप्टेंबरला वॉकआउट करणार आहेत. 27 सप्टेंबर 1962 रोजी पर्यावरण चळवळीच्या अध्वर्यू राशेल कार्सन यांच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. जगाला जागं करणार्‍या या अभिजात ग्रंथाविषयी आदर व्यक्त करून पर्यावरण चळवळीच्या निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करण्याचा इरादा मुलांनी केला आहे. 
पूर्वतयारीसाठी युरोप, अमेरिका व दक्षिण अमेरिका खंडातील तरुण राजकीय नेत्यांना अडवून हवामानबदलाविषयी बोलण्याचा आग्रह धरीत आहेत. जगातील अनेक शास्त्नज्ञ, अर्थतज्ज्ञ, तसेच पर्यावरण, मानवी हक्क, शांतता, कामगार यांच्या हक्कांसाठी लढणार्‍यांना सक्रिय पाठिंबा देत ‘बंद’मध्ये सहभागी होत आहेत. 
विख्यात दैनिक ‘द गार्डियन’ने  संपादकीयात   ‘मानवजातीवरील संकटाचे वार्तांकन करताना आम्ही आमच्या जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे. आम्ही पुढच्या पिढीसोबत आहोत’, असे सांगून स्पष्ट भूमिका घेण्याचे धैर्य दाखवले आहे. आता जगातील 60 प्रसारमाध्यमांनी या घटनांचे महत्त्व विशेषत्वाने दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा रीतीने जगातील जनांचे अनेक प्रवाह 20 सप्टेंबरला एकत्न येत आहेत. मुलांमुळे आलेल्या व यापुढे येणार्‍या चक्रीवादळांतून संपूर्ण जग एकदाचे स्वच्छ व्हावे. जगावर आलेली कार्बनची काजळी नष्ट होऊन मुलांचे भविष्य शुभ्र होण्याचा आश्वासक आरंभ व्हावा, अशीच आपल्या सर्वांची इच्छा आहे. 

जगाच्या सर्व भागातील
विद्यार्थी संपावर!

15 मार्च 2019 चा  ‘हवामानासाठी विद्यालय बंद’  हा आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा ठरला. ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत, 130 राष्ट्रांतील 15 लक्ष विद्यार्थ्यांंनी हवामानबदल रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी कृती करावी हे बजावण्यासाठी शाळा बंद पाडल्या. र्जमनीत 3 लक्ष, इटालीमध्ये 2 लक्ष, कॅनडात 1.5 लक्ष मुलांनी शाळा बंद केली. स्टॉकहोममध्ये (स्वीडन) 20 हजार, मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) 30 हजार, ब्रुसेल्स (बेल्जियम) 30 हजार विद्यार्थी जागतिक ‘शाळा बंद’मध्ये सामील झाले होते. शाळा नसलेला दक्षिण ध्रुव (अंटार्टिका) वगळता जगाच्या सर्व भागातील विद्यार्थी संपावर गेले. जागतिक हवामान आंदोलनाचा दुसरा टप्पा 24 मे 2019 रोजी झाला. 125 देशातील 1600 शहरांत निदर्शने झाली आणि त्यात 15 लक्ष विद्यार्थी सहभागी झाले. आता  भविष्यासाठी ‘शुक्रवार व हवामानासाठी शाळा बंद’ या आंदोलनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी टप्पा म्हणजे जागतिक बंद! 
atul.deulgaonkar@gmail.com
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)

Web Title: Younger generation of the world is on the Global Climate Strike on September 20 to save the Earth !..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.