आपलं नाव... आपली आकृती अन् उत्तरही...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:25 AM2019-08-25T00:25:48+5:302019-08-25T00:28:50+5:30
भूमिती विषय म्हटला की, आकृत्यांना देण्यात येणारी पीक्यूआर, एबीसी ही ठरलेली नावे डोळ्यासमोर येतात. ही परंपरागत पद्धत वापरल्याने अध्ययनात एकसारखेपणा येऊन त्या आकृतीत साचेबद्धता होतो.
भरत बुटाले
लक्षात ठेवणे हा मानवी जीवन व्यवहारातला आवश्यक भाग आहे. त्यासाठी स्वविचार, कौशल्यातून क्लृप्त्या वापरल्या जातात. त्यातही ओढ आणि कुतूहल वाढल्यास त्याचा अधिक फायदा होतो. हेच सूत्र भूमितीय आकृत्यांना वापरल्यानंतर त्या आकृत्यांच्या संकल्पना लक्षात ठेवण्यास मदत होतेच, शिवाय त्याची मनातली भीतीही कमी होते. हे मिणचे सावर्डे येथील आदर्श विद्यानिकेतनचे सहायक शिक्षक दीपक शेटे यांनी उपक्रमातून सिद्ध करून दाखविले.
भूमिती विषय म्हटला की, आकृत्यांना देण्यात येणारी पीक्यूआर, एबीसी ही ठरलेली नावे डोळ्यासमोर येतात. ही परंपरागत पद्धत वापरल्याने अध्ययनात एकसारखेपणा येऊन त्या आकृतीत साचेबद्धता होतो. त्यामुळे परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना अचूकता येत नाही. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या वैचारिकतेला संधी मिळत नाही आणि आपलेपणाही जाणवत नाही. याचाच अर्थ, आपण ती आकृती समजून न घेता तिला एका चौकटीपुरतेच बंदिस्त करतो. त्यामुळे त्या विषयाचे आकलन होईलच असे नाही.
गणिताच्या अध्यापनातला दीर्घ अनुभव असलेल्या दीपक शेटे यांनी यासाठी वेगळी संकल्पना तयार केली. विद्यार्थ्यांची आकृतीशी मैत्री व्हावी व त्यातून त्यांच्यात त्या संकल्पना दृढ व्हाव्यात, हा उद्देश समोर ठेवून ‘आपलं नाव, आपली आकृती आणि आपलं उत्तर’ हा उपक्रम राबविला. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता वाढू शकते, हे सिद्ध करून दाखविले.
त्यांनी हा उपक्रम प्रथम नववीच्या वर्गात राबविला. भूमिती विषयातील आकृतीस स्वत:चे, वडिलांचे व आडनाव यांतील अद्याक्षर घेऊन नाव द्यावे. चौथे अक्षर आवश्यक असल्यास गावाच्या नावातील अद्याक्षर द्यावे.
अद्याक्षर समान असल्यास त्यातील अनुक्रमे त्या नावातील दुसऱ्या किंवा तिसºया क्रमांकाचे अक्षर वापरावे, अशी पद्धत विद्यार्थ्यांना सांगून त्यांना आकृतीस नाव द्यायला सांगितले. प्रत्येकाने त्याप्रमाणे आकृत्यांना नावे दिली. त्यामुळे प्रत्येकाच्या आकृतीचे नाव वेगवेगळे आले. विशेष म्हणजे स्वत:चे नाव तिथे आल्याने त्यांना भूमितीय आकृतीत आपलेपणा जाणवला. त्यांच्यात उत्सुकता निर्माण होऊन आवडीने तो प्रमेय ते लिहू लागले. परिणामी, त्यांचे उत्तर अचूक आलेच शिवाय त्यांच्या विचारांना व वैचारिकतेला चालना मिळाल्याचे दिसले. त्यांच्यात आत्मविश्वासही वाढला. साहजिकच त्यामुळे त्यांना परीक्षेतील प्रश्नांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले आणि न समजता एकमेकांची उत्तरे बघून लिहिण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले. विद्यार्थ्यांना समजावून घेऊनच उत्तर लिहावे लागत असल्यामुळे आकलन क्षमतेबरोबरच अन्य विषयांच्या प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे बळ व रुची वाढल्याचे निदर्शनास आले.
उपक्रमाची यशस्विता
पारंपरिक पद्धत आणि नवीन उपक्रमातील पद्धत अशा दोन प्रकारे चाचणी घेतली. पहिल्या पद्धतीत ५७.८९ टक्के विद्यार्थ्यांची योग्य उत्तरे आली. नवीन उपक्रमाचा वापर करून चाचणी घेतल्यानंतर ८१.४७ टक्के विद्यार्थ्यांची उत्तरे अचूक आली.
फायदे असे...
- विद्यार्थ्यांच्या विचारांतील
- चालना वाढली.
- प्रमेय समजावून घेण्यातील उत्सुकता वाढली.
- विषयाची भीती कमी झाली.
- कॉपीचे प्रमाण कमी झाले.
- आकलनक्षमता व रुची वाढली.