Youtube: उनाड फिरतो अन् बक्कळ कमावतो...
By जयदीप दाभोळकर | Published: August 28, 2022 12:11 PM2022-08-28T12:11:16+5:302022-08-28T12:11:47+5:30
youtube: नवनवीन ठिकाणी फिरणं, नवनव्या जागा पाहणं, त्या एक्सप्लोअर करणं कोणाला आवडत नाही? काही लोकांना ते शक्य होतं, तर काहींना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते शक्य होत नाही. अनेकदा असतात त्या आर्थिक अडचणी. बिहारमध्ये राहणाऱ्या शुभमला भटकंतीची आवड आहे.
- जयदीप दाभोळकर
(सीनिअर कन्टेंट एक्झिक्युटिव्ह, लोकमत डॉट कॉम)
नवनवीन ठिकाणी फिरणं, नवनव्या जागा पाहणं, त्या एक्सप्लोअर करणं कोणाला आवडत नाही? काही लोकांना ते शक्य होतं, तर काहींना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते शक्य होत नाही. अनेकदा असतात त्या आर्थिक अडचणी. बिहारमध्ये राहणाऱ्या शुभमला भटकंतीची आवड आहे. त्यामुळेच त्यानं आपला हा छंद जोपासतच कमाईदेखील सुरू केली आहे. ‘नोमॅड शुभम’ असं त्याच्या यूट्युब चॅनलचं नाव. त्यानं आपल्या चॅनलवर अल्पावधीतच तब्बल २.२५ मिलियन युझर्स जोडले आहेत. त्याच्या प्रत्येकच व्लॉगला लाखोंच्यावर व्ह्यूज असतात. केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेरही तो भटकंती करत असतो. अनेकदा तर खासगी वाहनांनी प्रवास न करता पैसे वाचवत तो हिचहायकिंगही करतो. त्यात त्याच्या पैशांची बचतही होते.
१७ व्या वर्षापासून शुभमने ट्रॅव्हल व्लॉगिंगला सुरूवात केली. आतापर्यंत त्यानं अनेक देशांना भेट दिली आहे. अजून भरपूर फिरायचं आहे, असं तो सांगतो. आता तुम्ही म्हणाल ट्रॅव्हल व्लॉगिंग करून तो इतके पैसे कसे कमावतो किंवा प्रवासाचे पैसे कसे देतो. तर त्याच्या मागे असलेलं कारण म्हणजे, त्याचे फॉलोअर्स पाहून अनेकदा त्याला व्लॉग्ससाठी काही स्पॉन्सर्स मिळतात. तर यूट्युबच्या माध्यमातून वर्षभराच्या कालावधीत २० लाखांच्या आसपास कमाई झाल्याचंही त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. तुमच्यातही ती कला असेल, काही करण्याची जिद्द असेल तर तुम्हीही नक्कीच यात यशस्वी होऊ शकाल. सध्या शुभम इजिप्तसारख्या देशात फिरत असून, त्या ठिकाणची परिस्थिती तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे.