झरीजामणीच्या तरुणाने शोधले काळे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:44 PM2019-07-20T23:44:21+5:302019-07-21T00:00:24+5:30

पिण्याच्या पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष आहे. तर वातावरणातील प्रदूषणाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. मात्र अवघ्या जगाने दुर्लक्षित केलेल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यातील एका तरुणाने या दोन्ही समस्यांवर प्रभावी उपाय शोधला आहे. झरीजामणी तालुक्यातील या तरुणाने ‘काळे सोने’ हा नवा पदार्थ शोधला असून या पदार्थाच्या सहाय्याने वातावरणातील कार्बनडायऑक्साईड कमी करणे शक्य होणार आहे. शिवाय समुद्रातील खारे पाणी पिण्यायोग्य बनविता येणार आहे.

Zarijamani youth searched black gold | झरीजामणीच्या तरुणाने शोधले काळे सोने

ब्लॅक गोल्डच्या संशोधनात सहभागी झालेल्या पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसह प्रा. विवेक पोलशेट्टीवार. दुसऱ्या छायाचित्रात नॅनो तंत्रज्ञानाद्वारे टप्प्या-टप्प्याने काळे सोने तयार होण्याची प्रक्रिया, ही प्रक्रिया प्रा. पोलशेट्टीवार यांनी त्यांच्या शोधनिबंधात दिली आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देजगाने उमटविली मोहोरप्रदूषण घटविणार, समुद्राचे पाणीही होणार पिण्यायोग्य, वाहनांसाठी इंधनही

मूळचेयवतमाळ जिल्ह्यातील मांगली गावचे असलेले प्रा. विवेक विजय पोलशेट्टीवार यांनी मुंबईच्या ‘टीआयएफआर’मध्ये हे संशोधन केले. नॅनोतंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी ‘काळे सोने’ विकसित केले आहे. त्याद्वारे कार्बन डायऑक्साइडपासून मिथेन वायूचे इंधन मिळवणे शक्य झाले आहे. ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ या रसायनशास्त्रातील प्रथितयश जर्नलमध्ये पोलशेट्टीवार यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. त्यामुळे या संशोधनाला जगाची मान्यता मिळाली आहे. लवकरच या प्रयोगाच्या पेटंटसाठी अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रयोगास केंद्र सरकारचा अणूऊर्जा विभाग व विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सहकार्य लाभले.
असे आहे संशोधन  


सोन्याच्या गुणधर्मात काही बदल करून प्रा. पोलशेट्टीवार यांनी त्याचे ‘ब्लॅक गोल्ड’ या वेगळ्या पदार्थात रूपांतर केले. याच पदार्थाचा वापर करून समुद्राच्या पाण्याचे बाष्पीकरणाद्वारे पिण्याच्या पाण्यात रुपांतर करणेही शक्य आहे. काळ्या सोन्याचे कृत्रिम वृक्ष उभे केल्यास वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे बहुपयोगी इंधनात रुपांतर करता येणार आहे. यात सोने वापरल्याने ते खर्चिक असले, तरी ते एकदाच वापरायचे असते. सोन्याच्या नॅनो (अतिसूक्ष्म) कणांमधील पोकळ्यांमध्ये बदल करून त्याची प्रकाश शोषण्याची क्षमता वाढवली. प्रकाश संग्रहित केल्यावर या कणांमधील इलेक्ट्रॉन्सचे संक्रमण होऊन त्यातून ऊर्जा तयार होते. तिचाच वापर करून कार्बन डायऑक्साइड व पाण्यातील हायड्रोजनचा वापर करून मिथेन वायू तयार करणे शक्य झाले. काळ्या सोन्याचा हा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आला. हा उपयुक्त शोध लावणाऱ्या तरुणाचे नाव आहे प्रा. विवेक विजय पोलशेट्टीवार. यवतमाळ जिल्ह्यातील मांगली (ता. झरीजामणी) हे छोटेसे खेडे त्यांचे जन्मगाव. मांगली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतच सातवीपर्यंत आणि वणीत बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर ते नागपूरला एका कंपनीत नोकरीसाठी गेले. आणि आता मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये संशोधनाचे कार्य करीत आहेत.
म्हणून त्याचे नाव ‘ब्लॅक गोल्ड’
निसर्गातील वृक्ष ज्याप्रमाणे कार्बन डायऑक्साइड, पाणी व सूर्यप्रकाश यांचा वापर करून आपले अन्न तयार करतात, त्याचप्रमाणे आम्ही तयार केलेले काळे सोनेही इंधन तयार करते. हे इंधन मोटारी चालवण्यासाठी वापरता येऊ शकते. हा पदार्थ तयार करताना सोने व सिलिका यांचा वापर केला असून त्याचा रंग काळा होतो व म्हणून त्याला काळे सोने (ब्लॅकगोल्ड) म्हटले गेले आहे. या प्रक्रियेत सोन्याच्या नॅनो कणांमध्ये सूर्यकिरण संग्रहित केले जातात. त्यामुळे औष्णिक व विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे कार्बन डायऑक्साइडचे मिथेन इंधनात रुपांतर होते, असे प्रा. विवेक पोलशेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नॅनो तंत्रज्ञानातील सूत्रे वापरून प्रदूषित वायूपासून इंधन मिळवणे व त्याद्वारे पर्यावरणाच्या प्रश्नावर मात करणे हे आमचे ध्येय होते. त्यात यश आले. याच काळ्या सोन्यापासून समुद्राच्या पाण्याची वाफ करून पिण्यायोग्य पाणी मिळवण्याची क्रियाही आम्ही ‘केमिकल सायन्स जर्नल’मधील शोधनिबंधात दिली आहे.
प्रा. विवेक पोलशेट्टीवार, संशोधक, टीआयएफआर.

  • अविनाश साबापुरे

Web Title: Zarijamani youth searched black gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.