"राहुल गांधींच्या पदयात्रेचा काँग्रेस कार्यकर्त्यांवरच परिणाम नाही, जनतेवर काय पडणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 05:27 PM2023-04-14T17:27:29+5:302023-04-14T17:27:51+5:30
राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे झाल्यास मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार असल्याचे बोलले जात आहे
मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, यातच आता महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तर, शिंदे गटाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनीही राहुल गांधींवर प्रहार केलाय.
राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे झाल्यास मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यान सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचे समजते. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी आधी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तर, उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राहुल गांधींना संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा असल्यामुळेच ते मातोश्रीवर येत आहेत, असा खोचक टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून संजीवनी मिळेल अशी अपेक्षा राहुल गांधींना आहे. मात्र, राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेनंतर जो फरक सामान्य माणसांवर पडला पाहिजे होता, तो फरक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर देखील पडला नाही. राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परिणाम पडला नसेल तर जनतेवर कसा पडणार? असा खोचक सवाल आमदार कडू यांनी उपस्थित केला. तसेच, शिवसेनेमुळे काँग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचे सांगत उपरोधात्मक टोलाही त्यांनी लगावला.