Chinchwad Bypoll Election Result: चिंचवड विधानसभा मतदारसंघात नेमकं काय झालं?; अजित पवारांनी सांगितली Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:31 PM2023-03-02T13:31:05+5:302023-03-02T13:34:09+5:30
Chinchwad Bypoll Election Result: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण होत आली आहे.
मुंबई- Chinchwad Bypoll Election Result: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण होत आली आहे. याठिकाणी कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप आघाडीवर असून, याठिकाणी विजयाची औपचारिकता बाकी आहे. चिंडवडमध्ये महाविकास आघाडीचे नाना काटे यांना १० व्या फेरीत २८ हजार ५११ मत मिळाली आहेत. यावर आता चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'निकाल समोर येण्याअगोदर काही बोलण चुकीचे आहे म्हणून बोललो नव्हतो. माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झाली आहे. आम्ही कसब्यात योग्य उमेदवारी दिली. रविंद्र धंगेकर योग्य उमेदवार ठरला. धंगेकर हे तळागाळात काम करणारा नेता आहे. त्याने महापालिकेतही उत्तम काम केले आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकजुटीने काम केले यामुळे हा विजय झाला, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
'आताच्या राज्यकर्त्यांनी दोन्ही मतदारसंघात सर्व प्रकारचा वापर केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनेकवेळा दोन्ही मतदारसंघात आले. या निकालातून मतदारांनी वेगळा संदेश दिला आहे. मी चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटेचा फॉर्म मागे घेण्यासाठी प्रयत्न केला. पण, त्याने ऐकले नाही. राहुल कलाटे याने फॉर्म मागे घेऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले मला या संदर्भात सर्व माहिती मिळत होती, सत्ताधाऱ्यांनी सर्व यंत्रणांचा वापर करुन ही निवडणूक लढवली असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. (Chinchwad Bypoll Election Result)
'दोन्ही मतदाससंघात भावनिक मुद्दा होता, पण तरीही सहानभुतीचा मुद्दा पुढं आला नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष कसा काढून घेतला हे मतदारांना आवडलेले नाही. सत्ताधाऱ्यांनी अनेक मंत्र्यांना या दोन मतदारसंघात फिरवले पण याचा काहीही फरक दिसलेला नाही. राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांना मिळालेली मत एकत्र केली तर भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त मत आहेत. यावरुन भाजपच्या विरोधातील मतदारांचा रोष लक्षात येतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उत्तर यश मिळेल, असंही अजित पवार म्हणाले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मला राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांनीही उमेदवारी मागितली होती. या दोघातील एका उमेदवाराला उमेदवारी देण्यात यश मिळाले असते तर आम्ही यशस्वी झालो असतो, असंही अजित पवार म्हणाले. (Chinchwad Bypoll Election Result)