"राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं, आम्हाला अजिबात अडचण नाही; पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 08:43 PM2020-09-02T20:43:43+5:302020-09-02T20:43:48+5:30
'राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले तर आम्हाला अजिबात अडचण नाही. त्यांनी अध्यक्ष जरुर व्हावं, असं मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्ष नक्की व्हावं. राहुल गांधी सध्या एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी लढा देत आहे. पण आमची अपेक्षा अशी आहे की, राहुल गांधींनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी घ्यावी. त्यासाठी राहुल गांधी यांनी मी माझा राजीनामा परत घेतोय. मी पूर्णवेळ अध्यक्षाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असं जाहीर केलं पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. तसेच संघटनेची पण जबाबदारी राहुल गांधी यांनी घ्यावी. मात्र समजा त्यांना संघटनेची जबाबदारी खरोखरीच नको असेल तर पार्लमेंटची जबाबदारी घेऊन लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते होता येईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
राहुल गांधी तुम्हाला आवडो किंवा न आवडो आज एक व्हिजिबल फेस आहे. काँग्रेसकडे अजून दुसरा असा चेहरा नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोनच चेहरे आहेत. फक्त त्यांनी वेळ दिला पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केले होते. या नेत्याांनी पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी सोनिया गांधी यांच्याकडे केली होती.त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. या पत्रावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही स्वाक्षरी होती. यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसचे नेते सुनिल केदार यांनी निशाणा साधला होता.
सुनिल केदार यांनी ट्विट करुन गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणार्यांना लाज वाटली पाहिजे, असं म्हटले होते. त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी, अशी मागणी टि्वटरद्वारे केली होती. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील. गांधी घराण्याचे नेतृत्व असेल तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असेही सुनिल केदार म्हटले होते.
Move in state freely. Congress can give fight to BJP govt only when party has gandhi as it's head. This is high time to stand firmly behind Sonia ji's leadership.@SoniaGandhi_FC@RahulGandhi@priyankagandhi
— Sunil Chattrapal Kedar (@SunilKedar1111) August 23, 2020
सोनिया गांधींनीचं स्वीकारले अध्यक्षपद-
२०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षावरून बराच खल होऊन अखेरीस नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधींकडे पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. दरम्यान, आता २३ नेत्यांनी पत्र लिहून केलेल्या नेतृत्वबदलाच्या मागणीनंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. मात्र पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडेच कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय कार्यकारी समितीने घेतला.