झिशान सिद्दीकींमुळे वांद्रे पूर्व जागेवर महायुतीत पेच; शिवसेना पदाधिकारी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 09:58 AM2024-08-22T09:58:51+5:302024-08-22T10:01:12+5:30

हिंदुत्वाचं धोरण असताना झिशान सिद्दिकीचा प्रचार कसा करायचा, लोक आमच्यावर हसतील, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची खंत 

Congress MLA Zishan Siddiqui causes Mahayuti trouble in Bandra East seat; Shiv Sena officials Kunal Sarmalkar are upset | झिशान सिद्दीकींमुळे वांद्रे पूर्व जागेवर महायुतीत पेच; शिवसेना पदाधिकारी नाराज

झिशान सिद्दीकींमुळे वांद्रे पूर्व जागेवर महायुतीत पेच; शिवसेना पदाधिकारी नाराज

मुंबई - वांद्रे पूर्व मतदारसंघ हा सध्या काँग्रेसकडे असून याठिकाणी झिशान सिद्दीकी आमदार आहेत. मात्र झिशान सिद्दीकी हे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. जर तसं झालं तर महायुतीत ही जागा अजित पवारांच्या पक्षाला जाईल यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे. वांद्रे पूर्व जागा शिवसेनेला मिळावी यासाठी येथील स्थानिक नेते कुणाल सरमळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे.

शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर म्हणाले की, गेल्या २ वर्षापासून आणि त्याआधीही आम्ही या मतदारसंघात सक्रीयपणे काम करतोय. जी माणसं आपल्यासाठी काम करतायेत त्यांच्या पक्षाकडून काही अपेक्षा आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात रोज काही ना काही कार्यक्रम असतो. या भागात उबाठा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते थंडावलेत. माझ्या पक्ष कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडवले जातात. स्थानिक उमेदवार, लोकांमधला प्रतिनिधी या उद्देशाने ही जागा आपल्याला मिळावी अशी मागणी आम्ही केली आहे.

त्याशिवाय वांद्रे पूर्व मतदारसंघ हा अगोदरपासून बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला राहिला आहे. झिशान सिद्दिकी हे काँग्रेसमधून निवडून आलेत. याठिकाणी गेल्यावेळी स्थानिक आमदारांना तिकीट डावलल्याने ते अपक्ष रिंगणात होते. इथं शिवसेनेने विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारी दिली होती. त्यात झिशान सिद्दीकी निवडून आलेत. अडीच वर्ष त्यांचे सरकार होते तेव्हा अनिल परब आणि त्यांच्यात वाद होते. मागील २ वर्ष त्यांना काँग्रेसनं काम करू दिले नाही. आता ६ महिन्यात ते काय काम करणार आहेत?, झिशान सिद्दीकी यांच्यावर जनता खुश नाही असा आरोप शिवसेना पदाधिकारी कुणाल सरमळकर यांनी केला. 

दरम्यान, आमच्या महायुतीचं धोरण हे हिंदुत्वाचं आहे. हिंदुत्वाचा धोरण घेऊन झिशान सिद्दिकींचा प्रचार आम्ही कसा करणार, भाजपही प्रचार कसा करणार? लोक आमच्यावर हसतील. जर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही जागा आम्हाला लढावी लागली तर उबाठा गटाचा कुणीही असला तरी त्याला आम्ही पाडू. आतापर्यंत आम्ही लोकांची कामे केलीत. मुख्यमंत्र्यांनी लागू केलेल्या योजना लोकांपर्यंत राबवल्या आहेत. मुस्लीम भागातही आम्ही काम केले आहे. उबाठाची माणसेही ही जागा आम्हाला मिळाली तर मदत करतील कारण त्यांच्याकडे स्थानिक उमेदवार नसून ते बाहेरचा उमेदवार इथे देतील असं कुणाल सरमळकर यांनी सांगितले. 

Web Title: Congress MLA Zishan Siddiqui causes Mahayuti trouble in Bandra East seat; Shiv Sena officials Kunal Sarmalkar are upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.