“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 06:19 PM2024-09-20T18:19:29+5:302024-09-20T18:20:03+5:30
Congress Nana Patole News: संजय राऊतांचे जास्त ऐकू नका. विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढवल्या जाणार असून, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते घेतील, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
Congress Nana Patole News:नरेंद्र मोदी खोटे बोलणारी मशीन असून महात्मा गांधी यांच्या तपोभूमीतून ते खोटे बोलले. महाराष्ट्राला प्रकल्प दिल्याचे भासवले जाते पण दिल्लीतील गुजरात लॉबी महाराष्ट्र कमजोर करत आहेत. नागपूरातील १८ हजार कोटींचा सोलर प्रकल्पही गुजरातला गेला आहे. पण तो प्रकल्प गुजरातला गेला नाही असे उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे सांगत आहेत. केंद्रातील गुजरात लॉबीच्या आदेशाने महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प गुजरातला पळवले जात असून महाराष्ट्रात बेरोजगारी वाढवली जात आहे, त्याला भाजपा सरकार जबाबदार आहे, भाजपा महाराष्ट्राला लुटत आहे. वेदांता फॉक्सकॉनचा सेमिकंडकर चीप प्रजोक्ट गुजरातला पळवल्यानंतर महाराष्ट्राला त्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ असे सत्ताधारी सांगत होते त्याचे काय झाले? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत, हे दाखवण्याचा प्रकार आहे. २३ जुलै २०२३ रोजी अमरावतीत ह्याच टेक्सटाईल पार्कचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते झाले. या टेक्सटाईल पार्कची अद्याप एक वीटही रचली नाही. एकाच प्रकल्पाचे दोनदा भूमिपूजन करून भाजपा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रकल्पही गुजरातला जाईल, असा दावा नाना पटोले यांनी केला.
राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही
काँग्रेस, राहुल गांधी व गांधी कुटुंबावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, देशातील सर्व भ्रष्टाचारी नरेंद्र मोदींनी भाजपात घेतले आहेत, भ्रष्टाचारावार बोलण्याचा काही एक अधिकार नाही. मविआ काँग्रेसचे सरकार आल्यानंतर हे सर्व भ्रष्टाचारी चक्की पिसिंग करताना करतील. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा खोटा आहे. माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला होता. पण पंतप्रधान मोदींनी जवान व किसान दोघांना बरबाद केले आहे. गांधी कुटुंबावर बोलण्याचा तर नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा काही अधिकार नाही, असा पलटवार नाना पटोले यांनी केला.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांचे जास्त ऐकू नका, विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढवल्या जात आहेत. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते घेतील असेही नाना पटोले म्हणाले.