इरफान खानच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीनं एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:20 PM2020-04-29T13:20:47+5:302020-04-29T13:35:05+5:30

इरफान खान यांची कर्करोगाविरुद्धची झुंज अपयशी; कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

With demise of Irrfan Khan film industry lost hardworking versatile actor CM uddhav thackeray pays tribute kkg | इरफान खानच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीनं एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

इरफान खानच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीनं एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

googlenewsNext

मुंबई: अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे आज निधन झाले. काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले  होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. यानंतर जगभरातून इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.



इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली. दुर्धर असा कॅन्सर झाला असूनही न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असताना परत उत्साहाने उभे राहिले. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली.



इरफान खान यांचं निधन भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कलाजगतासाठी मोठा धक्का असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. इरफान यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात अजित पवारांनी त्यांना आदरांजली वाहिली. 

अभिनेता म्हणून इरफान खान निश्चितच महान होते. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याची साक्ष देतात. कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन त्यांनी त्यांच्यातला लढाऊपणा दाखवून दिला होता, परंतु आज अचानक आलेली त्यांच्या निधनाची बातमी ही माझ्यासारख्या असंख्य चित्रपट रसिकांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असं उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे.



काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीदेखील इरफान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'इरफान खान यांच्या निधनाची माहिती समजून अतिशय दु:ख वाटलं. इरफान अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न अभिनेता होता. जागतिक स्तरावरील चित्रपटांमध्ये, दूरचित्रवाणीवर त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. ते कायम स्मरणात राहतील. या अतिशय दु:खद प्रसंगात माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासह मित्रपरिवार आणि चाहत्यांसोबत आहेत,' अशा शब्दांत गांधींनी इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीदेखील इरफान खान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. जागतिक सिनेमात अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. अतिशय संघर्षातून पुढे आलेल्या या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला होता.त्याच्या निधनामुळे एका महान कलावंतास देश मुकला, असं सुळेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title: With demise of Irrfan Khan film industry lost hardworking versatile actor CM uddhav thackeray pays tribute kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.