भय इथले संपत नाही...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:52 PM2018-07-18T16:52:31+5:302018-07-18T16:53:02+5:30
अठराविश्व दारिद्र्य उराशी बाळगून अशिक्षित पिढी सांभाळताना नाकेनऊ आलेली कुटुंबे प्रगत अशा श्रीगोंदा तालुक्यात ढोकराईच्या माळावर आली आहेत.
विजय उंडे
मढेवडगाव : अठराविश्व दारिद्र्य उराशी बाळगून अशिक्षित पिढी सांभाळताना नाकेनऊ आलेली कुटुंबे प्रगत अशा श्रीगोंदा तालुक्यात ढोकराईच्या माळावर आली आहेत. समाजापासून कोसो दूर असलेल्या या कुटुंबांची अवहेलना पाहून मन सुन्न होऊन जाते. भिक्षुकीवरच उदरनिर्वाह करणारी कुटुंबे राईनपाड्याच्या घटनेनंतर अजूनही भेदरलेली आहेत.
नगर-दौड महामार्गालगत नागवडे साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या जोशी, गोपाळ, वैदू, नंदीवाले, नाथपंथी डवरी गोसावी, तेलवाला समाज, गवळी, पारधी अशा महाराष्ट्रात दुर्मिळ असणाºया अनेक वेगवेगळ्या पंथांच्या भटक्या जमाती येथे गुण्यागोविंदाने राहताहेत. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर या परिसराला भेट दिली असता अनेक विदारक बाबी समोर आल्या.
दारिद्र्य किती विदारक असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा तांडा. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही या तांड्यापर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीत. शिक्षणाचा पूर्णपणे अभाव असल्याने व लहान लहान मुले उघडी-नागडी फिरताना या तांड्यावर चोहीकडे दिसतात. यांचे उदरनिवार्हाचे मुख्य साधन व व्यवसाय भिक्षुकी मागणे.
राईनपाड्यामुळे यातील सर्वच कुटुंबे भेदरलेली आहेत. पुरुषमंडळी घर सोडायला तयार होत नाहीत. या समाजातील पुरुषांना व स्त्रियांना दुसरा व्यवसाय येत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. यांना शिधापत्रिका नाही. नावाची ओळख नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही सोयीसुविधा यांच्यापर्यंत पोहचतच नाहीत. (पूर्वार्ध)
मुलांचे भविष्य काय?
महिलांच्या व पुरुषांच्या अंगावर मागून आणलेले जुने-पुराने कपडे आहेत. नवीन कपडे हे सणासुदीलाही घालत नाहीत. त्यांच्या मुलांची नावे विचारली असता एका पाच वर्षांच्या मुलाने रणबीर व दुसºयाने सलमान अशी नावे सांगितली. रणबीर व सलमानच्या अंगावर बोटभर कपडा नव्हता. प्रश्न पडतो या रणबीर व सलमानचे भविष्य काय?