विद्यार्थ्यांचे भवितव्य ‘अंधारा’त

By admin | Published: July 6, 2017 03:24 AM2017-07-06T03:24:30+5:302017-07-06T03:24:30+5:30

कुणी वेटर, कुणी कार्यालयात मदतनीस, तर कुणी एखाद्या दुकानात मजूर... पण शिक्षण घेण्याची जिद्द असल्याने रात्रशाळेचा आधार घेतलेले... या

The future of students in 'Dark' | विद्यार्थ्यांचे भवितव्य ‘अंधारा’त

विद्यार्थ्यांचे भवितव्य ‘अंधारा’त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुणी वेटर, कुणी कार्यालयात मदतनीस, तर कुणी एखाद्या दुकानात मजूर... पण शिक्षण घेण्याची जिद्द असल्याने रात्रशाळेचा आधार घेतलेले... या शाळांमधून आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ‘अंधारात’ सापडले आहे. या शाळांवरील दुबार शिक्षकांचे काम काढून घेतल्यानंतर त्या जागी अद्यापही शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे शैक्षणिक कामकाज जवळपास ठप्प झाले आहे.
राज्यभरात सध्या १७६ रात्रशाळा आहेत. त्यामध्ये ३० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रात्रशाळांमध्ये दुबार नोकरी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अनुक्रमे १०१० व ३४८ अशी एकूण १३५८ होती. दिवसभर नियमित शाळेत आणि रात्री रात्रशाळेत काम करणारे हे शिक्षक होते. त्यांच्या वेतनावर सरासरी वार्षिक खर्च ३४ कोटी ५० लाख रुपये होत होता. हा खर्च कमी करण्यासाठी दुबार सेवेत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना खासगी अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत दुबार नोकरी करता येणार नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे रात्रशाळेतील १०१० शिक्षक कमी झाले. त्यामुळे सध्या सुमारे ६०० शिक्षक रात्रशाळांमध्ये कार्यरत आहेत. दुबार शिक्षक कमी झालेल्या जागेवर दिवस शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाने नियमित शाळेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन नियमित शाळेत होईपर्यंत रात्रशाळेतील
रिक्त पदांवर तत्काळ करण्याचे आदेश दि. ३ जून रोजी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक (माध्यमिक) यांना दिले आहेत. मात्र, अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे रात्रशाळांवरील शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत.

एकशिक्षकी झाल्या शाळा : विद्यार्थी राहताहेत बसून

शाळा सुरू होऊन २० दिवस उलटले तरी शिक्षक मिळालेले नाहीत. सद्य:स्थितीत काही शाळांमध्ये तर एकच शिक्षक उरले आहेत. त्यातच शिक्षकेतर कर्मचारीही काढण्यात आल्याने या शिक्षकांनाच शिकविण्यासह सर्व कामे करावी लागत असल्याचे चित्र आहे. अध्यापनाचे काम जवळपास ठप्प आहे.

रात्रशाळेतील विद्यार्थी हे दिवसभर काम करून रात्री शिकण्यासाठी येतात. त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होणे अवघड असते. त्यासाठी शिक्षक मोलाची भूमिका बजावतात. मात्र, सध्या शिक्षक नसल्याने विद्यार्थी शाळेत बसून राहत आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाला असल्याचे काही शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अतिरिक्त शिक्षकांची रात्रशाळांवर नियुक्ती करण्याचे काम जिल्हापातळीवर आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. लवकरच या शाळांवर संबंधित शिक्षकांची नियुक्ती केली जाईल.
- गंगाधर म्हमाणे, संचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग

दुबार शिक्षक कमी करण्यात आल्याने सध्या रात्रशाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. शाळा सुरू होऊन २० दिवस उलटले तरी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे अध्यापनात अडथळे येत आहेत. शासनाने तातडीने शिक्षकांची नियुक्ती करावी. - अविनाश ताकवले, प्राचार्य, पूना नाईट स्कूल

Web Title: The future of students in 'Dark'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.