'जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही', आंबेडकर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 04:03 PM2022-11-06T16:03:05+5:302022-11-06T16:09:31+5:30
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई - काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्याच्या सीमेपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्या दृष्टीने जयत तयारी केली जात आहे. देशभरात राहुल गांधींच्या या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेससह भाजपविरोधी पक्ष या यात्रेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचाही भारत जोडो यात्रेत सहभाग असणार आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे आगमन ७ नोव्हेंबर रोजी देगलूरपासून महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याने या भागातील सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सीमारेषेवर स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदींची उपस्थिती राहणार आहे. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी सभेत राहुल गांधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून शहरातील नवीन बसस्थानकापासून शंकरनगर मार्ग पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
एकीकडे राहुल गांधींच्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसेनेसोबत युती होणार असल्याची चर्चा असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना अगोदर देशातील जातीवाद संपायला हवा, असे म्हटले आहे.
भारत जोड़ो यात्रा सुरू आहे, चांगलं आहे. पण, जोडण्याचा मुद्दा काय? जे तुटलं असेल ते जोडता येते. खऱ्या अर्थाने देशातली हजारो वर्षांची गुलामी संपवायची असेल, तर जातीअंताचे आंदोलन झाले पाहिजे. जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही. जातींचा अंत झाला नाही, तर एक दिवस जातींमधलं भांडण इतकं वाढेल की कोणताच नेता ते सोडवू शकणार नाही. आजही आपल्याकडे केवळ जातीचे किंवा धर्माचे नेते आहेत, पण देशाचा नेता नाही.
एक दिवस जातींमधलं भांडण इतकं वाढेल की कोणताच नेता ते सोडवू शकणार नाही. आजही आपल्याकडे केवळ जातीचे किंवा धर्माचे नेते आहेत, पण देशाचा नेता नाही.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 5, 2022
२/२
ठाकरे-आंबेडकर जवळ येणार?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची जाहीर इच्छा बोलूनही दाखवली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा झाली असून लवकरच त्यांची भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता ठाकरे गटातील बड्या नेत्याने या युतीवर प्रतिक्रिया देतानाच या युतीला फुल्ल सपोर्ट केला आहे. त्यामुळे ठाकरे-आंबेडकर यांची जवळीक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.