'हे' ऑपरेशन लोटस नसून कोरोना व्हायरस; काँग्रेस नेत्याचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 01:03 PM2020-03-04T13:03:27+5:302020-03-04T13:06:01+5:30
मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून आमदारांची खरेदी सुरू असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे.
मुंबई - मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवलं जातं आहे. काँग्रेसच्या काही आमदारांना कोट्यवधीची ऑफर देऊन खरेदी केलं जात असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांना डांबून ठेवल्याचंही समोर आलं.
मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रतही उमटत आहेत. कमलनाथ एक सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्यप्रदेशात काँग्रेसच्या सरकारला कोणताही धोका नाही. ऑपरेशन लोटसला खतपाणी घातलं जाणार नाही, याची काळजी लोकशाही मानणार्या सर्व पक्षांनी घेतली पाहिजे असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
तसेच खरं तर भाजपचं हे ऑपरेशन लोटस नसून, कोरोना व्हायरस आहे. त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे असा टोलाही अशोक चव्हाणांनी भाजपाला लगावला आहे.
मध्य प्रदेशातील सत्ताधारी काँग्रेस आघाडीतले आठ आमदार मंगळवारी मध्यरात्री हरयाणातल्या मानेसरमधल्या एका हॉटेलमध्ये पोहोचले. भाजपानं या आमदारांना ओलीस ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी भाजपाकडून आमदारांची खरेदी सुरू असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. मानेसरमधल्या हॉटेलमध्ये असलेल्या आठ आमदारांपैकी चार आमदारांनी कमलनाथ सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला आहे. तर एक काँग्रेस आमदार दिग्विजय सिंह यांच्या गटातला आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काल सकाळीच ट्वीट करुन भाजपाचे माजी मंत्री भूपेंद्र सिंह आमदार रमाबाई यांना चार्टर्ड विमानानं घेऊन दिल्लीला गेल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस, समाजवादी, बसपाच्या आमदारांना दिल्लीला नेण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी ट्वीटमध्ये केला होता. रमाबाई मुलीच्या उपचारांसाठी दिल्लीला गेल्याची माहिती त्यांचे पती गोविंद सिंह यांनी दिली. रमाबाई कमलनाथ सरकारसोबतच असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदारांना २५ ते ३५ कोटींची ऑफर भाजपा देत असल्याचा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला होता.