LMOTY 2020: ...म्हणून आझादांच्या जागी खर्गेना संधी; सुशील कुमारांनी सांगितलं काँग्रेसचं 'राज'कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 02:21 PM2021-03-18T14:21:01+5:302021-03-19T10:40:12+5:30
LMOTY 2020: काँग्रेसमधील जी-२३ गट पक्षविरोधी नाही; ते चित्र चुकीचं; सुशील कुमार शिंदेंनी सांगितला दबावगटाचा इतिहास
मुंबई: राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसनं मल्लिकार्जुन खर्गेंना संधी दिली. गुलाम नबी आझाद यांच्या खासदारकीचा कालावधी संपताच काँग्रेस नेतृत्त्वानं त्यांना पुन्हा संधी दिली नाही. यानंतर आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. यामागचं राजकारण काँग्रेसचे ज्येष्ठ सुशीलकुमार शिंदेंनी (Sushil Kumar Shinde) सांगितलं आहे. सगळ्यांना संधी मिळायला हवी या हेतूनं खर्गेंची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली, असं शिंदे म्हणाले. ते लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड २०२० सोहळ्यात (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) बोलत होते.
राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात प्रगल्भ नेत्यांची आवश्यकता असते. त्यामुळेच मल्लिकार्जुन खर्गेंना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. सगळ्यांना संधी देता यावी यासाठीच आझाद यांना दुसरी टर्म दिली गेली नाही, असं शिंदेंनी सांगितलं. काँग्रेसला ठेच लागली आहे. यातूनच सुधारणा होतील. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, ही पक्षातील युवाशक्तीची इच्छा आहे, असं ते पुढे म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधील २३ बड्या नेत्यांनी पक्षात निवडणुकीत व्हाव्यात, पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा, पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल व्हावेत, अशी मागणी केली. अनेक माजी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री असलेला हा गट जी-२३ नावानं ओळखला जातो. त्यावरही सुशीलकुमार शिंदेंनी भाष्य केलं. जी-२३ गट काँग्रेसविरोधी नाही. पक्षात सुधारणा व्हाव्यात अशीच या गटाची इच्छा आहे. मात्र माध्यमांनी हा विषय मोठा केला, असं शिंदेंनी म्हटलं.
काँग्रेसमध्ये विविध सूर असतात, मतमतांतरं असतात. यातून चर्चा होते आणि मार्ग निघतो, असं सांगताना शिंदेंनी इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालावधीत घडलेल्या घटनांची उदाहरणं दिली. इंदिरा गांधी, नेहरूंच्या काळातही पक्षात दबावगट तयार झाला होता. काँग्रेसमध्ये अशा घटना होतच असतात. पण तो गट काही पक्षाच्या विरोधात नसतो. त्यांच्यासोबत चर्चा होणं गरजेचं असतं. जी-२३ प्रकरणही तसंच आहे. माध्यमांनी हा विषय मोठा केला, असं मत शिंदेंनी व्यक्त केलं.