काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 06:29 PM2024-11-27T18:29:50+5:302024-11-27T18:33:35+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीकडे पाशवी बहुमत असतानाही सरकार स्थापण्यास उशीर होत असून, ‘मित्राचा’ निर्णय झाल्यावरच मुख्यमंत्री ठरेल व सरकार बनेल, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी संविधानदिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केली आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरु केली जाणार आहे. जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला होता आता पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी यात्रा काढली जाणार आहे, या यात्रेलाही महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळेल. लोकशाही वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याची लढाई लढलेली आहे, जनभावना तीव्र झाल्यानंतर १५० वर्षांची ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली हा इतिहास आहे. लोकशाही व्यवस्थेत जनताच सर्वोच्च असून जनभावनेचा आवाज काँग्रेस उठवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांच्याकडे हे अर्ज पाठवण्यात येतील, असे नाना पटोले यांनी सांगितले.
‘मित्राचा’ निर्णय झाल्यावरच मुख्यमंत्री ठरेल व सरकार बनेल
भारतीय जनता पक्ष महायुतीला पाशवी बहुमत मिळाले असूनही चार दिवस झाले तरी मुख्यमंत्री निश्चित होत नाही आणि सरकारही स्थापन होत नाही. राज्यात शेतकऱ्यांचा समस्या आहेत, बेरोजगारी, महागाई, कायदा व सुव्यवस्था असे प्रश्न आहेत पण भाजपा युतीला जनतेची चिंता नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय जोपर्यंत ‘मित्र’ घेत नाही तोपर्यंत सरकार व मुख्यमंत्री होणार नाही. अडीच वर्षात निम्मी मुंबई व महाराष्ट्र मित्राला विकला आहे, यापुढेही महाराष्ट्र विकण्याचे काम हे सरकार करेल, त्यामुळे ‘मित्राचा’ आदेश येताच मुख्यमंत्री व सरकार बनेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेता, गट नेता व प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना देण्याचा ठराव एकमताने या बैठकीत करण्यात आल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली. तसेच ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना केलेले विधान राजकीय आहे, असे मत मांडता येते का हा प्रश्न आहे. निकाल देताना कायद्यात काय तरतूद आहे. त्यावर स्पष्टता असायला हवी होती. परंतु न्यायाधीश व न्यायालयाच्या निकालावर जास्त काही बोलणे उचित नाही, असे पटोले म्हणाले.